News Flash

कापड दुकान : वय वर्षे दोनशे!

‘‘तयार कपडे वापरण्याची पद्धत जशी वाढू लागली तसा तयार कपड्यांचा विभाग अधिकाधिक व्यवसाय करू लागला.

दुकानाचे संस्थापक बलदास्सारी रोंझोनी यांच्या जुन्या दुकानाचे दुर्मीळ छायाचित्र...

|| विनायक जोशी

२५ जून १८२० रोजी मिलानच्या उत्तरेला कांतू नावाच्या छोट्या गावात कापडाचे एक दुकान उघडण्यात आले. आज दोनशे वर्षे लोटूनही अनेक पिढ्यांच्या ग्राहकांचा विश्वास ते अजूनही टिकवून आहे. द्विशतक पार केलेल्या या पिढ्यानुपिढ्यांच्या दुकानाबद्दल…

या गोष्टीची सुरुवात जवळजवळ २०१ वर्षांपूर्र्वी झाली. युरोपात नेपोलियन नुकताच मरण पावला होता आणि भारतात शनिवारवाड्यावरील भगवा ध्वज उतरून तिथे युनियन जॅक येऊन दोन-अडीच वर्षे झाली होती. त्यावेळी आमच्या या छोट्याशा गावात एका माणसाने २५ जून १८२० या दिवशी एक कापडाचे दुकान उघडले. माणूस उद्यमशील. जवळच्या सूतगिरणीशी संबंध असलेला. तिथे त्याचे काही माग होते. त्यावर तयार झालेले कापड आपणच का विकू नये, असा विचार करून त्याने दुकान उघडायचे ठरवले. गावाच्या मध्यभागी, एका महत्त्वाच्या रस्त्यावर एक छोटासा गाळा घेऊन त्याने या दुकानाची सुरुवात केली. त्यावेळी गावची लोकसंख्या होती जेमतेम पाच हजार. विक्री बहुतांशी सुती आणि रेशमी कापडाची. कारण या भागात रेशमाच्या किड्यांची पैदास आणि संलग्न व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता.

एखाद्या दुकानाने २०० वर्षं पूर्ण करणं हे तसं अप्रूपाचंच. म्हणून कुतूहलापोटी त्याच्या आजच्या मालकांशी संवाद साधला. आज जवळजवळ सत्तरीला आलेल्या दुकानाच्या  मालकांनी सांगितले की, या दुकानाचे संस्थापक आहेत त्यांच्या आजोबांचे पणजोबा! ‘‘आमच्या सहा पिढ्या हा व्यवसाय चालवतायत. एकदाही या व्यवसायात खंड पडलेला नाही.’’ दुकानाच्या पहिल्या शंभर वर्षांबद्दल त्यांना फारशी काही माहिती उपलब्ध नाही. आज जे काही त्यांना  माहिती आहे, ते त्यांनी त्यांच्या आजोबांकडून ऐकलेले. पहिल्या तीन पिढ्यांनी व्यवसाय हळूहळू वाढवला. कापडाबरोबरच इतर गोष्टीही दुकानात ठेवायला सुरुवात केली. चादरी, गाद्या, गाद्यांमध्ये भरण्यासाठी लागणारा कापूस, लोकर आदी सामान ठेवल्यामुळे दुकानाची भरभराट होत होती. ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्याची हातोटी, त्यानुसार योग्य तो सल्ला आणि वस्तू पुरवण्याची तत्परता आणि वेळप्रसंगी थोडीफार उधारी देण्याचीही तयारी यामुळे साऱ्या पंचक्रोशीमध्ये दुकान नावाजले जाऊ लागले होते.

मालक सांगत होते की, त्यांच्या आजोबांकडे एक जाडजूड खातेवही होती. दर शनिवारी ते त्यात आवक-जावक मांडत. उधारीच्या नोंदीही तपशीलवार ठेवत असत. प्रत्येक नोंदीसमोर ग्राहकाची सही घेत. ‘‘आपल्या दुकानाने अनेक कुटुंबांना अनेक वर्षे कापडचोपड पुरवले आहे…’’ असं ते सांगायचे- ‘‘व्यवसाय जसजसा वाढत गेला, तशी ही जागा कमी पडू लागली. त्यावर उपाय म्हणून १९३२ मध्ये आजोबांनी जवळच एक इमारत बांधली आणि तिथे आणखी एक दुकान सुरू केले. पहिल्यापेक्षा मोठे. प्रशस्त. कालांतराने नुसते कापड विकण्याबरोबरच पेहराव शिवून द्यायलाही सुरुवात केली. आम्ही कधी शिंपीकामाचा विभाग सुरू केला नाही. पण आसपासच्या शिंप्यांकडे कापड पाठवून कपडे शिवून घेत असू. पन्नासच्या दशकात तयार कपड्यांची मागणी वाढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे १९६२ साली मूळ दुकानाच्या जागी नवीन इमारत बांधली आणि तिथे तयार कपड्यांचा विभाग आणि दुसऱ्या दुकानात इतर गोष्टी अशी विभागणी केली.’’

‘‘तयार कपडे वापरण्याची पद्धत जशी वाढू लागली तसा तयार कपड्यांचा विभाग अधिकाधिक व्यवसाय करू लागला. आजोबांनी वेगवेगळ्या उत्पादकांशी करार केले आणि चांगल्या प्रतीचे आणि वाजवी किमतीचे कपडे आपल्या दुकानात असतील याची काळजी घेतली. साठच्या दशकात दुकानात आठ-दहा माणसे काम करीत असत आणि आलेला सगळा माल भराभर विकला जात असे. वधू-वरांचे पोशाख, कोट-पाटलोणी आणि इतर नव्या पद्धतीचे, धर्तीचे कपडे आम्ही मागवत असू आणि सगळे विकले जात असत.’’

‘‘मूलत: माझ्या वडिलांना या व्यवसायात यायचे नव्हते. त्या काळात वाढत असलेल्या नव्या मोटारींच्या व्यवसायात उतरावे, मोटारगाड्यांची विक्री करावी अशी त्यांची इच्छा होती. पण आजोबांनी त्यांचे काही ऐकले नाही. माझी आई मात्र दुकानात खूप मदत करीत असे. तिचा जनसंपर्क दांडगा होता. त्याचा व्यवसायाला खूप फायदा झाला.’’

‘‘हळूहळू नुसते कापड विकण्याचे प्रमाण कमी कमी होत गेले आणि शेवटी कुटुंबातल्याच दुसऱ्या पातीकडे गेलेले केवळ कापड विकणारे दुकान १९९७ मध्ये बंद झाले…’’ ते गृहस्थ सांगत होते.

‘‘या दोनशेपेक्षा जास्त वर्षांच्या या दुकानाच्या यशाचे रहस्य काय?’’ असे विचारल्यावर मालक म्हणाले की, ‘‘ग्राहकांची सेवा! अनेकदा आमच्याकडे दुसऱ्या दिवशीच्या एखाद्या समारंभासाठी वापरायचे कपडे घेण्यासाठी आदल्या दिवशी ग्राहक येत असे. अंगावर माप घेऊन शिवलेले नसल्यामुळे या तयार कपड्यांमध्ये थोडेफार किरकोळ बदल करावे लागत. कितीतरी वेळा मी आणि माझा भाऊ सायकलवर टांग मारून अशा कामांसाठी आसपासच्या शिंप्यांकडे अनेक चकरा मारत असू आणि ग्राहकाची गरज पूर्ण करत असू. आजही आमच्याकडे विशीतल्या तरुणांपासून त्यांच्या आजी-आजोबांच्या वयाचे ग्राहक येत असतात. काही कुटुंबांच्या तीन-तीन पिढ्या आमच्या ग्राहक आहेत. आज मी आणि माझी पत्नी हा व्यवसाय सांभाळतो. अनेक ग्राहकांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एखादी नवीन गोष्ट दुकानात आली आणि ती एखाद्या ग्राहकाला आवडेल असे आम्हाला वाटले तर आम्ही त्याला आवर्जून कळवतो, बघायला बोलावतो आणि बहुतेक वेळा ती वस्तू तो विकतही घेतो.’’

‘‘ई-व्यापाराचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला?’’ या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘काही प्रकारच्या कपड्यांची विक्री जवळजवळ शून्यावर आली आहे. पण अजूनही अनेक लोक इंटरनेटवर खरेदी करत नाहीत, आमच्याकडेच येतात.’’

पुढच्या पिढीला दुकान चालू ठेवण्यात रस आहे का, असे विचारल्यावर मात्र सखेद नकारार्थी उत्तर आले. ‘‘आम्हाला एकच मुलगी आहे. आणि तिला काही या व्यवसायात रस नाही. त्यामुळे बहुधा आम्ही निवृत्त व्हायचे ठरवले की आम्हाला दुकान बंद करणे भाग पडेल.’’

‘‘कोविड साथीचा तुमच्या व्यवसायावर किती परिणाम झाला?’’ या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘विक्री नक्कीच खूप कमी झाली आहे. पण आम्ही वेळीच उपाय योजल्यामुळे दुकानात माल पडून असल्याचे ओझे डोक्यावर नाही. काही काळ उत्तम जातो, तर काही दिवस साधारण असतात. फार अनिश्चिातता आहे… जी आम्ही कधीच अनुभवली नव्हती. या साथीमुळे गेल्या वर्षी आम्हाला दुकानाची द्विशताब्दीही साजरी करता आली नाही.’’

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की हे दुकान आहे तरी कुठे? हे दुकान आहे मिलानच्या उत्तरेला कोमोजवळ असलेल्या कांतु नावाच्या एका छोट्या गावात! दुकानाच्या संस्थापकांचे नाव बलदास्सारी रोंझोनी आणि आताच्या मालकांचे नाव मास्सीमो रोंझोनी. अलीकडच्या काळात अनेक दुकाने उघडतात आणि कालांतराने बंदही होतात. त्यामुळे या अखंड दोनशे वर्षे पूर्ण केलेल्या दुकानाबद्दल सांगावे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच!

vinayaklaser@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 12:03 am

Web Title: cloth shop two hundred years of age akp 94
Next Stories
1 आगामी : पुष्पा भावे विचार आणि वारसा
2 दखल : उज्ज्वल अमेरिकेचे मर्म
3 ‘समाजापासून वेगळे राहून दुर्लक्षिले जाऊ!’
Just Now!
X