06 August 2020

News Flash

नव्या जीवनमूल्यांचे धडे (जर्मनी)

मी मागच्या उन्हाळ्यात हॅम्बर्ग येथे कामानिमित्त आलो. हे शहर इतकं सुंदर आहे की मी या शहराच्या जवळजवळ प्रेमातच पडलो.

मुलींची शाळा आणि माझं ऑफिस अगदी छान सुरू असताना ‘करोना’ची बातमी पसरू लागली.

मिलिंद कपाळे – Milind.Kapale.ext@siemensgamesa.com

चीनमध्ये सुरू झालेल्या करोनाच्या थैमानाने सगळे जग आज आपल्या कवेत घेतले आहे. जग ठप्प करणे आजवर नैसर्गिक वा मानवी करणीलाही शक्य झाले नव्हते, जे करोनाने करून दाखवले. देशोदेशी करोनाने माजवलेला हाहाकार आणि तिथले शासन, प्रशासन आणि जनता त्याचा कशा तऱ्हेने सामना करीत आहे याचा प्रत्यक्षदर्शी हालहवाल! चीन, अमेरिका, दुबई, जपान, जर्मनी, नेदरलॅंडस् या देशांतील करोनाच्या सद्य:स्थितीवरील झोत..

मी मागच्या उन्हाळ्यात हॅम्बर्ग येथे कामानिमित्त आलो. हे शहर इतकं सुंदर आहे की मी या शहराच्या जवळजवळ प्रेमातच पडलो. संपूर्ण शहरात पाण्याचे सुंदर कालवे आहेत आणि त्याभोवती मस्त बगीचेआहेत. मी छायाचित्रकार असल्याने माझ्यासाठी हे अगदी उत्तम ठिकाण! या शहरातली लोकल सेवादेखील अगदी उत्तम आहे. माझा घर ते ऑफिस हा प्रवासही सुखकारक आहे. मी घरून निघालो की चालत.. लोकल.. चालत असा हा प्रवास होतो. भोवतालच्या वातावरणामुळे खूप आल्हाददायक वाटते. दिवसाला मस्त चार-पाच किलोमीटर चालणं आणि निसर्गाची सुंदर सोबत.. अजून काय हवं?अगदी सुख म्हणजे काय ते हेच असं वाटू लागलं.

मागच्या जुलैमध्ये माझी बायको आणि दोन मुलीसुद्धा माझ्याकडे आल्या. मग मुलींच्या  शाळेजवळच्या एका मोठय़ा घरात आम्ही राहू लागलो. हे घर शहरापासून दूर, पण शाळेच्या जवळ आहे. अगदी कमी गर्दी. गाव एकदम शांत, निवांत आहे. गाव यासाठी म्हणायचं की इथे चक्क रोज कोंबडा आरवतो आणि आम्हाला उठवतो. तशी युरोपमधली गावंदेखील छोटी शहरंच असतात. मात्र, सगळ्या सोयीसुविधा असलेली आणि आधुनिक!

डिसेंबरमधला ख्रिसमस अगदी मजेत गेला. हॅम्बर्गमधलं नववर्षांचं स्वागत अगदी विलोभनीय होतं. इतकी गर्दी आणि जल्लोष.. जसं काही सगळं शहर एकाच वेळी पार्टी करत होतं. आम्ही इथल्या बाजारपेठांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थाचा मनमुराद आस्वाद घेतला.

मुलींची शाळा आणि माझं ऑफिस अगदी छान सुरू असताना ‘करोना’ची बातमी पसरू लागली. सुरुवातीला साधा व्हायरस वाटणारा करोना जेव्हा युरोप, इराण आदी देशांत पसरू लागला आणि जर्मनीमध्येही त्या रुग्णांची संख्या वाढू लागली तेव्हा प्रथम काळजाचा ठोका चुकला. हॅम्बर्ग हे बंदर असल्यामुळे इथे इतर देशांतून जहाजं येत-जात असतात. या कारणाने काळजी वाटत होती. जसा करोनाचा प्रभाव वाढू लागला तशा सुरुवातीला शाळा बंद झाल्या. मुलं ‘लर्निग फ्रॉम होम’ करू लागली. इथल्या मेयरने इतर सार्वजनिक ठिकाणंही तात्पुरती बंद केली. तथापि आश्चर्य हे की, हॅम्बर्गमध्ये करोनाचा अगदी कमी प्रसार झालाय. जनजीवन बऱ्याच प्रमाणात सुरळीत आहे; परंतु जमाव, गर्दीची मात्रा कमी झाली आहे. पोलीस वेळोवेळी महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालून जमावाला पांगवत आहेत. एक-दोन जणच फक्त जोडीने जाऊ  शकतात. ट्रेन अगदी रिकाम्या धावत आहेत. १५ मार्चपासून सगळेच घरून काम करत आहेत. घरात एक महिन्याचे सामान- जसं की तांदूळ, पीठ, डाळी आणून आम्ही सगळे आता पूर्णवेळ घरीच असतो.

आजच्या डिजिटल युगामुळे माझं आणि माझ्या मुलींचं काम आणि शाळा घरून छान सुरू आहे. मागच्या काही दिवसांत घरी राहून एकमेकांचा सहवास छान अनुभवता येतो आहे. व्हिडीओ संभाषण सुरू असल्यामुळे सगळे ऑफिसचे आणि घरचे संपर्कात आहेत. घरच्या बागेत फिरणं सुरू आहे. अपार्टमेंटऐवजी असं घर घेण्याचा निर्णय छान वाटतोय.

आता दुकानं हळूहळू रिती होत आहेत; पण दूध, औषधं आणि इतर आवश्यक गोष्टी (वाइन आणि लिकरसुद्धा!) उपलब्ध आहेत. घरून केवळ आवश्यक गोष्टींची गरज असेल तरच बाहेर जाणं होतं. ऑनलाइन एंटरटेन्मेंटमुळे सध्या तरी सुरेख दिवस जात आहेत.

सरकारने हॅम्बर्गमध्ये करोनाचा प्रभाव कमी असल्याने जनजीवन बंद न करता केवळ शाळा, पार्क्‍स, पब, शंभरपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव, स्टेडियम्स बंद केली आहेत. अजून तरी इथे एकही मृत्यू झालेला नाही. बर्लिन, ब्रेव्हरिया डिस्ट्रिक्टमध्ये कडक संचारबंदी आहे. बाहेर पडल्यास ३०० ते ५०० युरो दंड आहे. जसजशी परिस्थिती बिकट होत जाईल तसतसे आमच्या इथेही सक्त नियम लागू होतील. कोविड हेल्पलाइन सुरू केली गेली आहे. तिथे जुजबी माहिती आणि काही प्रश्न विचारून करोनाची पहिली चाचणी घेतात. जसं की, श्वास ३० सेकंदापर्यंत रोखून ठेवणे, खोकला, ताप आहे का ते विचारणे. आणि जर खरंच करोनाचे निदान झाले असेल तरच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे. दवाखान्यात उगीचच गर्दी करणे टाळले जात आहे. शॉप्समध्ये दोन-दोन फूट अंतर ठेवून रांगेत उभं केलं जात आहे; जेणेकरून माणसांचा एकमेकांना स्पर्श होणं टाळलं जाईल. लोकलचे दरवाजे जास्त वेळ उघडे ठेवून लोकांना डोअर आणि बटनांचा स्पर्श टाळणे सुरू आहे. एकंदरीत कॉमन सेन्स वापरून लोकांना सोशल डिस्टन्स ठेवणे शिकवलं जातंय.. कळत-नकळत. कधी कधी दूर राहूनदेखील खूप काळजी घेता येते. Long Distance Relationship पण काळजी करणारं आणि सुखाचं असू शकतं हे आता कळू लागलंय. कोविड-१९ नक्कीच आटोक्यात येईल; पण काही गोष्टी निश्चितच आपल्याला शिकवून जाईल.

घरातल्यांशी एकोपा आणि प्रत्येकानं आपल्या वाचन, लिखाण, छंद अशा सवयी जोपासणं हे पुढेही सुरू राहो म्हणजे हे सुख कायम राहील. कोविड-१९ चा प्रभाव लवकर आटोक्यात आणण्यासाठी जर्मनी आटोकाट प्रयत्न करत आहे.. आणि सगळं जगदेखील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:19 am

Web Title: coronavirus germany has learned new life morals dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : दहा ते पाच!
2 विश्वाचे अंगण : शेपटीविना…
3 व्हायरसचे विज्ञान
Just Now!
X