News Flash

व्हायरसचे विज्ञान

विषाणू म्हणजे इंग्रजीत ‘व्हायरस’! या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे.. विष. विषाणूंबद्दलच्या आपल्या ज्ञानात गेल्या शतकभरात खूपच वाढ झाली आहे.

स्वत:च्या वंशाची वाढ करणे, स्वत:त बदल घडवणे अशा युक्त्या-प्रयुक्त्या ही रसायने विविध रासायनिक क्रिया करून अमलात आणतात.

डॉ. प्रबोध चोबे – prabodh.chobe@gmail.com

विषाणू म्हणजे इंग्रजीत ‘व्हायरस’! या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे.. विष. विषाणूंबद्दलच्या आपल्या ज्ञानात गेल्या शतकभरात खूपच वाढ झाली आहे. आज आपल्याला माहीत आहे की, विषाणू एरव्ही निर्जीव असतात.. रसायनांप्रमाणे. पण ते दगड नव्हेत! ती अत्यंत हुशार अशी रसायने आहेत. स्वत:च्या वंशाची वाढ करणे, स्वत:त बदल घडवणे अशा युक्त्या-प्रयुक्त्या ही रसायने विविध रासायनिक क्रिया करून अमलात आणतात. त्यांचे हे गुणधर्म पाहून त्यांना खरोखरीच निर्जीव म्हणायचे का, असा कधी कधी संभ्रम पडतो. त्यांचा माग काढणे अशक्य आहे असे पूर्वी मानले जायचे. परंतु ही कोंडी गेल्या शतकात फुटली. मात्र, प्रत्येक नव्या विषाणूच्या बाबतीत त्याचे स्वरूप समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे या गोष्टीला काही एक वेळ द्यावा लागतोच. ‘करोना’च्या बाबतीतही हे सत्य आहे.

सध्या करोना व्हायरसने साऱ्या जगभर जे थैमान घातले आहे त्यासंदर्भात एक खरोखर उल्लेखनीय गोष्ट लक्षात येते आहे की, या साथीदरम्यान कोणीही अंधश्रद्धेला बळी पडून अंगारेधुपारे यांच्या नादी लागलेले नाही. सभोवती करोनाचे एवढे प्रचंड तांडव चालू असताना व त्यावर आजघडीला तरी कोणताही उपाय नसतानाही विज्ञान या रोगावर रामबाण उपाय शोधून काढेलच याची सर्वांना खात्री वाटत आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचीदेखील दृढ श्रद्धा आहे की वेळ लागेल, पण आज ना उद्या विज्ञानानेच या विषाणूवर उपाय सापडणार आहे. एरव्ही अंधश्रद्ध भासणारे लोकदेखील आज जी विज्ञाननिष्ठा दाखवीत आहेत त्यामागे विषाणूंच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे गेल्या शतकभराचे प्रयत्न कारण आहेत. देवी, पोलिओ, कांजिण्या, नागीण, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू यांसारख्या दुर्धर समजल्या जाणाऱ्या विषाणूंच्या रहस्याचा भेद करून, यातले अनेक रोग पूर्णपणे आटोक्यात आणून आणि देवी व पोलिओसारखे रोग तर पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीसे करून शास्त्रज्ञांनी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनातदेखील विज्ञानाबद्दल जो विश्वास निर्माण केला आहे तो खरोखरच लक्षणीय आहे. या शास्त्रज्ञांनी घालून दिलेल्या पायामुळेच आणखी काही काळातच आपल्याला करोनावरदेखील रस्ता सापडणार आहे. गेल्या शतकात विषाणूंवर मूलभूत स्वरूपाचे काम करणाऱ्या त्या शास्त्रज्ञांचे पथदर्शी काम समजून घेणे हा या लेखाचा उद्देश आहे.

आजच्या करोना रोगाच्या निमित्ताने विषाणूंनी होणारे रोग नेमके वेगळे कसे असतात व पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी विषाणूंसंदर्भात कोणती उल्लेखनीय कामगिरी करून ठेवली आहे ते पाहू या.

करोनाच्या साथीमुळे सध्या ‘व्हायरस’ (विषाणू) हा शब्द सगळीकडे फारच चर्चेत आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की, सध्या प्रचलित असलेली औषधे व प्रतिजैविके करोनाचा नायनाट का नाही करू शकत?

आपण सरसकट सर्वच सूक्ष्मजीवांना जीवाणू (बॅक्टेरिया) समजण्याची गल्लत करतो व जीवाणू (बॅक्टेरिया) आणि विषाणू (व्हायरस) यांतला फरक समजून घेत नाही. त्यामुळेच अशी गल्लत होते. आजच्या रोगाच्या संदर्भात हा फरक समजून घेतला तर परिस्थिती लक्षात यायला मदत होईल.

एवढा प्रगत माणूस.. पण असे नवे रोग उपटूच नयेत म्हणून तो काही उपाययोजना नाही का करू शकत? या रोगांना तो एवढा का घाबरतो? या प्रश्नांचे थोडक्यात उत्तर द्यायचे तर ते असे आहे की, हे रोग नवनवीन विषाणूंमुळे होतात.  विषाणू  हे रूढ अर्थाने सजीव नाहीत. सजीवांना विष देऊन मारता येते; पण निर्जीवांना मारणार कसे? आणि इथेच सारे घोडे अडते!

सुमारे ७० ते १०० वर्षांंपूर्वी पोलिओ, इन्फ्लुएन्झा, गोवर, कांजिण्या या विषाणूंनी जगभर थैमान घातले होते. १०० वर्षांपूर्वी आजच्या करोनाची भानगड काहीच नाही एवढी इन्फ्लुएन्झाची दहशत निर्माण झाली होती. पण त्याउलट जीवाणूंमुळे होणारे रोग मात्र ६०-७० वर्षांपूर्वी आटोक्यात येऊ लागले होते. जीवाणूंविरुद्धच्या या लढय़ाची सुरुवात १८७० साली डॉ. रॉबर्ट काक यांनी केली होती. प्रयोगशाळेमध्ये जीवाणू वाढविण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. निरनिराळ्या औषधांचा व रसायनांचा अशा जिवाणूंच्या कॉलन्यांवर प्रयोग करून रोगनिवारक औषधे शोधून काढली गेली. त्यातूनच सल्फा औषधे, पेनिसिलीन व तत्सम प्रतिजैविके निघाली. त्यातून प्लेग, कॉलरा, टायफॉईड, घटसर्प असे भयानक रोग पूर्णपणे आटोक्यात आले. जिवाणूंमुळे होणाऱ्या रोगांपायी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण खूपच घटले.

पण  विषाणू हे मात्र वेगळेच प्रकरण आहे हे शास्त्रज्ञांना जाणवले. १९ व्या शतकाच्या अगदी शेवटी विषाणूंचा शोध लागला खरा; पण विषाणू म्हणजे काय, हे नीटपणे समजायलाच मुळी काही दशके लागली. विषाणू म्हणजे इंग्रजीत ‘व्हायरस’! या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे.. विष. विषाणूंबद्दलच्या आपल्या ज्ञानात गेल्या शतकभरात खूपच वाढ झाली आहे. आज आपल्याला माहीत आहे की, विषाणू एरव्ही निर्जीव असतात- रसायनांप्रमाणे. पण ते दगड नव्हेत! ती अत्यंत हुशार अशी रसायने आहेत. स्वत:च्या वंशाची वाढ करणे, स्वत:त बदल घडवणे अशा युक्त्या—प्रयुक्त्या ही रसायने विविध रासायनिक क्रिया करून अमलात आणतात. त्यांचे हे गुणधर्म पाहून त्यांना खरोखरीच निर्जीव म्हणायचे का, असाच कधी कधी संभ्रम पडतो.

विषाणूंना बाटलीत भरून ठेवले तर ते एखाद्या गरीब निर्जीवाप्रमाणे पडून राहू शकतील. पण ते जर कोणत्याही सजीव पेशींच्या संपर्कात आले तर जणू स्वत:च सजीव बनतात. तंबाखूला लागणाऱ्या रोगाच्या तपासात बायजेरिकने पहिला विषाणू १८९८ साली प्रथम शोधून काढला. विषाणू हे जीवाणूंपेक्षा सुमारे १०० पट तरी लहान असतात. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागेपर्यंत ते मानवी दृष्टीला अदृश्यच होते.

गेल्या शतकाच्या मध्यावर शास्त्रज्ञांना प्रश्न पडला होता की, निर्जीव विषाणूंना वाढवायचे कसे? त्यांच्यावर संशोधन करायचे कसे? जो जिवंत नाही त्याला मारायचे कसे? विषाणूंच्या बाबतीत जीवाणूंप्रमाणेच प्रयोगशाळेत वाढविण्याच्या व प्रजनन करण्याच्या तंत्रज्ञानाचा शोध लावणे आवश्यक झाले होते. विषाणूंना प्रयोगशाळेत खाद्य, हवा, सुयोग्य तापमान वगैरे उपलब्ध करूनही त्यांच्यावर ढिम्म परिणाम होत नव्हता. ते निर्जीव असल्याने रॉबर्ट काकच्या पद्धतीने प्रयोगशाळेत वाढवता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरचे संशोधन व उपाययोजना आणखीनच कठीण होऊन बसली होती. याला अपवाद होता फक्त देवीच्या रोगाचा. देवी हा जरी विषाणूंमुळे होणारा रोग असला तरी त्यावरची उपाययोजना त्यामानाने लवकर शोधली गेली होती. एडवर्ड जेन्नरचे या कामी जगावर अनंत उपकार आहेत. पण इतर अनेक रोगांच्या बाबतीत लस शोधून काढणे तितकेसे सोपे, सरळ  नव्हते. काही प्रकारच्या कर्करोगांमागेही विषाणू असू शकतात. एड्स, इन्फ्लुएंझा, नागीण, कावीळ हे सारे रोग विषाणूंमुळे होतात.

पोलिओ हादेखील विषाणुंमुळेच होणारा रोग आहे. हा रोग मुख्यत्वे माणसांनाच होतो. विशेषत: लहान मुलांना अचानक ताप येऊन नंतर त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन त्यांना अपंगत्व येते. हा रोग तसा फार जुना आहे. पण पूर्वी कदाचित तो इतका सर्रास होत नसावा. १८४० साली हा रोग सर्वप्रथम गाजला. १८८० नंतर तर पोलिओच्या अनेक मोठय़ा साथी आल्या. जगातल्या कित्येक शहरांमध्ये उन्हाळ्यात अचानक मोठी साथ उपटायची आणि कितीतरी मुलांना पंगू करून सोडायची.

विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांवर पहिला तोडगा म्हणून विषाणूंचे प्राण्यांवर प्रयोग केले जाऊ लागले. पण काही विषाणू वेगवेगळ्या सजीवांवर वेगवेगळे परिणाम करतात. माणसांमध्ये अचानक साथ पसरविणारा पोलिओचा विषाणू इतर काही प्राण्यांमध्ये कोणतीच लक्षणे उत्पन्न करीत नाही, किंवा अगदीच मामुली परिणाम करतो. या साऱ्या फरकामुळे कोणत्याही धोकादायक विषाणूंचे प्राण्यांवर प्रयोग करायचे म्हणजे आधी त्या प्राण्यांमध्ये त्या विषाणूमुळे कोणती लक्षणे उत्पन्न होतात, त्यामुळे कोणता रोग होतो, ते शोधून काढावे लागत असे. त्यानंतर त्यावरून त्या विषाणूंची माहिती जमविण्याचा प्रयत्न करावा लागे. जीवाणूंच्या बाबतीत जसे प्रयोगशाळेतील बशीमध्ये वाढ व पुनरुत्पादन करून संशोधन करता येत होते तसे प्राण्यांवर विषाणूंचा प्रयोग करून ते जमत नव्हते. त्यामुळे रोगनिदान करणे व रोगावर उपचार शोधणे यासाठी प्राण्यांचा वापर करता येण्यासारखा नव्हता. आणि माणसांवरच प्रयोग करून बघायचे ठरवले तर त्यासाठी ‘स्वयंसेवक’ कसे मिळवणार? कोणत्या माणसाला स्वत:वरच प्रयोग करून पोलिओ झालेला चालेल?

बोस्टन येथे मुलांच्या साथीच्या रोगांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. एन्डर्स, डॉ. वेल्लर आणि डॉ. रॉबिन्स या डॉक्टर त्रयीने आपले  संशोधन पणाला लावले आणि ‘टिश्यू कल्चर’ या कलेत प्रावीण्य संपादन केले. पूर्वी हे तंत्रज्ञान म्हणजे मृत व्यक्तींच्या पेशींपासून नव्या जिवंत पेशी बनवायच्या म्हणजे एक गूढविद्या समजली जायची.

टिश्यू कल्चर ही पद्धत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला शोधून काढली गेली होती. माणूस मेला तरी त्याच्या पेशी प्रयोगशाळेत जगवता येतात, त्या वाढवता येतात व त्या पेशींपासून नव्या पेशींना प्रयोगशाळेत जन्मही देता येतो, हे ज्ञान माणसाला १०० वर्षांपूर्वीच झाले होते. पण मृताच्या पेशींपासून वाढविलेल्या पेशी म्हणून या ज्ञानाकडे विज्ञान म्हणून न बघता त्याच्याकडे गूढविद्या किंवा चेटूक वगैरे दृष्टिकोनातून पाहिले जाई. ही विद्या खऱ्या वैज्ञानिकांच्या हातात नव्हती. ती नेहमी गुप्त राखली जायची.

विषाणूंची वाढ करण्याचे तंत्र विकसित करण्यासाठी डॉ. एन्डर्स व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ‘तंत्रविद्ये’च्या (!)  मुळाशी जायचे ठरवले.

टिश्यू कल्चर म्हणजे काय? सोपे करून सांगायचे म्हणजे सजीवांच्या पेशी या स्वत:देखील स्वतंत्र सजीवच असतात. त्यांना अन्न, हवा व उब  मिळाली तर त्यादेखील स्वतंत्रपणे थोडय़ाफार प्रमाणात जगू शकतात, वाढू शकतात आणि नव्या पेशींना जन्म देऊ शकतात.

विषाणूंवर संशोधन करायचे तर हे टिश्यू कल्चरचे तंत्रज्ञानच काहीतरी मार्ग दाखवू शकेल असे या त्रयीला वाटले. पण हा मार्ग काही पूर्णपणे नवा नव्हता. पूर्वी अनेकांनी या दिशेने प्रयत्न केले होते व ते सपशेल फसले होते. १९३६ साली त्या काळात श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या सबीन आणि ओलिटस्की या शास्त्रज्ञांनी कोंबडी, उंदीर, माकड व माणूस यांच्या गर्भांवर प्रयोगशाळेत प्रयोग केले होते. पण या प्रयोगांमध्ये ‘निर्जीव’ विषाणू अजिबात वाढले नाहीत. उलट, ते एखाद्या प्रेताप्रमाणे पडून होते. या प्रयोगांनंतर वैज्ञानिकांनी विषाणूंसाठी टिश्यू कल्चरचा नाद सोडून दिला होता.

विषाणू फक्त मज्जातंतूंच्या पेशींवरच थोडेफार वाढू शकतात असे काहींनी दाखवून दिले होते. पण ही फार कठीण गोष्ट असल्याने विषाणूंवर संशोधन करण्याचे सर्व रस्ते बंद झाले आहेत असा समज करून वैज्ञानिकांनी या क्षेत्रातून अंग काढून घेतले होते.

मुलांच्या हॉस्पिटलात काम करत असल्याने पोलिओचे गांभीर्य डॉ. एन्डर्स व त्यांचे सहकारी रोज पाहत होते. केवळ आधीच्या शास्त्रज्ञांनी ‘पुढील संशोधनाचे रस्ते बंद आहेत असे सांगितले म्हणून आपण त्यांचे ऐकून हजारो मुलांना पांगळे होताना पाहायचे की काय?’ हा त्यांच्यापुढचा खरा प्रश्न होता. विज्ञानात कोणत्याही कारणाशिवाय रस्ते बंद होऊच कसे  शकतील? रस्ते बंद असतील तर त्याचे कारण काय? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेत घेत एन्डर्स  व त्यांच्या सहकाऱ्यांनी टिश्यू कल्चरच्या बंद झालेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा संशोधन चालू केले. अनुभवासाठी आधी गोवर, कांजिण्या, फ्लू या विषाणूंवर काम करून नंतर त्यांनी पोलिओच्या विषाणूंना हात घातला.

त्यांच्या टिश्यू कल्चरच्या सुधारित तंत्राने पोलिओचे विषाणू वाढविण्याचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. बंद झालेला रस्ता उघडला. आता मागे फिरणे नव्हते. तिघांनी भरपूर काम करून दाखवून दिले की, माणसाच्या शरीरातली हाडे व कुर्चा सोडून कोणत्याही पेशीमध्ये प्रयोगशाळेत टिश्यू कल्चरने पोलिओचे विषाणू वाढवले जाऊ शकतात. विषाणूंनी हल्ला केल्यावर खराब झालेल्या पेशी या तिघांना आता सूक्ष्मदर्शकाखाली ओळखता येऊ लागल्या. म्हणजे पोलिओ ओळखण्याची सोपी सूक्ष्मदर्शक टेस्ट त्यांना आता अवगत झाली होती. पुढे टिश्यू कल्चर तंत्र वापरून दुबळ्या विषाणूंपासून  प्रतिबंधक लस बनविण्याचे नवे तंत्रही त्यांना अवगत झाले. या तंत्राचा वापर करून अनेक प्रकारच्या लशी मोठय़ा प्रमाणावर बनविण्याचा मार्ग खुला झाला. शरीरात श्वसनमार्गात व पचनमार्गात असलेले अनेक नवे विषाणू त्यांनी शोधून काढले. टिश्यू कल्चर करताना विषाणूंबरोबर इतर जीवाणूही वाढतात. पण निरनिराळी प्रतिजैविके वापरून जीवाणू मारून टाकून फक्त विषाणू वाढविण्याचे तंत्र त्यांनी शोधून काढले. नव्या विषाणूंसाठी लशीही शोधून काढल्या. जनावरांच्या काही रोगांवरही यशस्वी काम केले.

डॉ. एंडर्स व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचे महत्त्व असे की, कोणतीही मोठी यंत्रे न वापरता प्रयोगशाळेत साधी परीक्षानळी वापरून विषाणू वाढविण्याचे तंत्रज्ञान त्यांनी जगाला दिले. आज साऱ्या जगभर हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. पोलिओच्या विषाणूंची वाढ प्रयोगशाळेत कोणत्या परिस्थितीत होते ते कळल्याने गलिच्छ वस्त्यांमध्ये व उष्ण किंवा समशीतोष्ण कटिबंधामध्ये उन्हाळ्यात या रोगाचा फैलाव जास्त का होतो, हेही  कळून आले.

पूर्वी ‘देवी’वर भार टाकून आपण विषाणूंनी  होणारे रोग मानवी शक्तीच्या आवाक्यातले नाहीत असेच समजत होतो. आज डॉ. एन्डर्स व त्यांच्या संशोधनामुळे जवळजवळ कोणताही नवा विषाणू यशस्वीपणे हाताळायला विज्ञान समर्थ आहे असा आत्मविश्वास शास्त्रज्ञांमध्ये आला आहे. फक्त वेळ लागेल. तेवढी थांबायची तयारी मात्र हवी.

निर्जीव विषाणूंना प्रयोगशाळेत वाढवून दाखवून, त्यांचा रोग ओळखण्याची टेस्ट शोधून व त्यांच्यावर लस बनविण्याची सोपी पद्धत  शोधून काढून डॉ. एन्डर्स, डॉ. वेल्लर आणि डॉ. रॉबिन्स या तिघा डॉक्टरांनी मानवजातीवर मोठे उपकार केले आहेत. त्याप्रीत्यर्थ या तिघांना १९५४ सालचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

विषाणूंच्या क्षेत्रातले आणखी एक संशोधन फार महत्त्वाचे आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात संशोधनाच्या क्षेत्रात एक अपूर्व योगायोग घडून आला. मॅक्स डेलब्रुक नावाचा जर्मन पदार्थवैज्ञानिक १९३७ साली संशोधनासाठी जर्मनीतून अमेरिकेत स्थलांतरित झाला. सजीवसृष्टीबद्दल डेलब्रुकला प्रचंड आकर्षण होते व पदार्थविज्ञानाचे नियम सजीवसृष्टीला कसे लावता येतील, हे तो अभ्यासत होता. त्याचवेळी इटलीतून साल्व्हादॉर ल्यूरिया नावाचा डॉक्टर संशोधन करण्यासाठी अमेरिकेत स्थलांतरित झाला. त्याला सूक्ष्मजीवशास्त्र फार आवडत असे. तिकडे अमेरिकेत संशोधनाची आवड असलेले बायोकेमिस्ट अल्फ्रेड हर्षे हे वॉशिंग्टन विद्यापीठात सूक्ष्मजीवांवर संशोधन करीत होते. गंमत म्हणजे तिघांनी पूर्णपणे एकत्र संशोधन कधीच केले नाही, पण एकमेकांशी स्पर्धाही कधी केली नाही. तिघांनाही एकाच प्रश्नाच्या उत्तराचा ध्यास लागला होता, की सजीवांची पुनरुत्पत्ती कशी होते? तिघांनी मिळून एक प्रकारचा ‘वैज्ञानिक चमू’च स्थापन केला होता. पुनरुत्पत्ती हा विषय एवढा कठीण किंवा अशक्यप्राय वाटायचा, की या विषयावर संशोधन करताहेत म्हटल्यावर काही वैज्ञानिकांनी ‘जाऊ दे, हे जमणार नाही..’ असे सल्ले द्यायलाही कमी केले नाही. पण तिघेही आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. ‘पुनरुत्पत्ती कशी होते?’ या प्रश्नाचे उत्तर शोधायचे तर सर्वात लहान व सोप्यात सोपा जीव निवडणे महत्त्वाचे होते. अशा सोप्यात सोप्या जीवाचा शोध घेताना त्यांचे लक्ष जिवाणूंवर हल्ला करून त्यांना मारून टाकणाऱ्या ‘बॅक्टेरिओफेज’ नावाच्या म्हटले तर सजीव व म्हटले तर निर्जीवावर गेले. हे विशिष्ट विषाणू जीवाणूंना मारून टाकायचे म्हणून त्यांना ‘बॅक्टेरिओफेज’ म्हणतात. या शब्दाचा अर्थ- जीवाणूंना मारून टाकणारे.

या त्रयीने अनेक वर्षे बॅक्टेरिओफेजच्या पुनरुत्पादनावर संशोधन केले. बॅक्टेरिओफेज या नावावरून अमेरिकन संशोधकांच्या वर्तुळात त्या तिघांना ‘फेज चमू’ म्हटले जायचे. तिघांनी बरीच वर्षे संशोधन करून विषाणूंबद्दल बरीच महत्त्वपूर्ण माहिती शोधून काढली. त्यांनी दाखवून दिले की विषाणू ही निर्जीव रसायने असतात. बहुतेक विषाणूंच्या बाहेरच्या बाजूला प्रथिनांचे आवरण असते व या आवरणाच्या आतल्या बाजूला डी. एन. ए. किंवा आर. एन. ए.सारख्या जैविक रसायनांच्या साखळ्या दडवलेल्या असतात. काही खोडकर मुले कशी करूनसवरून नामानिराळी असतात, तसे हे विषाणू एरव्ही निष्पाप वाटतात. पण जेव्हा कधी ते एखाद्या सजीव पेशीच्या संपर्कात येतात तेव्हा त्या निर्जीव विषाणूंमध्ये जणू जीव येतो. सजीव पेशींवर विषाणू बसण्याची ही क्रिया रासायनिक प्रक्रियेच्या स्वरूपात असते. विषाणूंच्या आवरणात एक प्रथिनांची किल्ली असते. ही  किल्ली सजीव पेशींच्या भिंतीला भिडते व ‘तिळा  उघड..’प्रमाणे भिंतीला भोक पडते. विषाणूंच्या आतल्या जैविक रसायनांच्या साखळ्या या भोकातूनच आत सोडल्या जातात. एकदा का या साखळ्या आत आल्या की, डी. एन. ए. राजाला त्या जखडून टाकतात. पेशींचा सारा कारभार स्वत:च्या हाती घेतात. एकदा हा पेशींचा गड शत्रूच्या हाती लागला की मग काय! पेशींमधले प्रथिनांचे कारखाने आता या शत्रूच्या हुकमाप्रमाणे चालवले जातात. आता पेशींचे एकच ध्येय असते.. शत्रूंची म्हणजेच विषाणूंची संख्या वाढविणे! विषाणूंच्या हुकमतीवर चाललेल्या ‘कैदी’ पेशी आता सजीवाला लागणारी रसायने बनविण्याऐवजी नव्या विषाणूंना लागणारी प्रथिनांची आवरणे बनवू लागतात. विषाणूंच्या आतल्या जैविक रसायनांचेही भराभरा पुनरुत्पादन केले जाते. अक्षरश: काही मिनिटांत हजारो नवे विषाणू निर्माण केले जाऊ शकतात. या विषाणूंची फौज आता इतर पेशी मारून टाकायला सरसावते व अशा रीतीने रोग बळावत जातो.

जेव्हा एकाच सजीव पेशीवर एकाहून जास्त प्रकारचे विषाणू हल्ला करतात तेव्हा जैविक साखळ्यांची अदलाबदल होऊन नव्या प्रकारचे विषाणूही बनू शकतात. ‘फेज चमू’ या त्रयीने केलेल्या कामामुळे विषाणू नक्की काय आहेत व ते कसे कार्य करतात, ते स्पष्ट झाले. निर्जीव विषाणू रासायनिक प्रक्रियांच्या माध्यमातून पुनरुत्पादन करतात. या पुनरुत्पादनावर प्रकाश पाडणाऱ्या शोधाबद्दल या तिघा शास्त्रज्ञांना १९६९ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सजीवांमध्ये जे चैतन्य असते तेही केवळ रासायनिक प्रक्रियांमुळे येते की त्यामागे आणखी काही आहे, ते गूढ अजून उकलायचे आहे. ते गूढ उकलण्याच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सजीव-निर्जीव यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषाणूंवरचे संशोधन होय. ज्या दिवशी सजीवातील चैतन्यामागचे (सजीवांच्या प्राणामागचे) गूढही शास्त्रीय व रासायनिक परिभाषेत उकलेल त्या दिवशी विज्ञानात महान क्रांती झालेली असेल. तो दिवस या शतकातच उगवेल अशी आशा वाटते!

(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:08 am

Web Title: coronavirus science of virus dd70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अफसाना लिख रही हूँ.. : ‘साथ साथ’
2 भारत-पाक सौहार्दाचे प्रतीक
3 अथेन्सचा प्लेग
Just Now!
X