१८६१ ते १८६५ हा काळ हिंदी कापसाचे सुवर्णयुग मानला जातो. अमेरिकेत यादवी युद्ध सुरू झाल्याने तोपर्यंत अमेरिकेतून कापूस आयात करणाऱ्या इंग्लंडला आपली गरज भागविण्यासाठी या काळात मुंबईतून कापूस मागवणे भाग पडले आणि आपल्या कापसाला अचानक सोन्याचे दिवस आले. मोठय़ा प्रमाणावर कापसाची निर्यात होऊ लागली. त्यातून मुंबईतले व्यापारी प्रचंड गब्बर झाले. परंतु अकस्मात हे यादवी युद्ध थांबल्याने हा व्यापारीवर्ग नंतर अक्षरश: दिवाळखोरीत निघाला. या घटनेस दीडशे वषर्ं होत आहेत. त्यानिमित्ताने कापसाचा हा भूकंप घडवून आणणाऱ्या काळ्या दिवसाबद्दल..
इ. स. १८६१ ते १८६५ चा काळ हा हिंदी कापसाचे सुवर्णयुग मानला जातो. मुंबई शहरात दारिद्रय़ व श्रीमंती यांचा पाठशिवणीचा खेळ सतत सुरू असतो. परंतु १९ व्या शतकाच्या १८६४-६५ या दोन वर्षांत लक्ष्मीच्या चंचलतेचा असा काही जबरदस्त फटका बसला, की मुंबईच्या इतिहासात हे नमूद करणे भाग आहे.
मुंबईत कापसाचा व्यापार इ. स. १७५० पासून सुरू झाला. तत्पूर्वी सर्व व्यापार कल्याणच्या बंदरातून चालत असे. कल्याण ही मोठी बाजारपेठ होती. मुंबईत हा कापूस बाहेरगावाहून येत असे व इथून तो युरोप खंडात आणि चीनला जात असे. तथापि इंग्लंडमधील कापड गिरण्यांना मात्र पुष्कळ वर्षांपासून अमेरिकेतूनच कापूस जात असे. तेथे त्याचे तलम धोतरजोडय़ांत रूपांतर होऊन त्या भारतात विकावयास येत असत.
१८६१ साली गुलामगिरी बंद करण्याच्या मुद्दय़ावरून अमेरिकेच्या उत्तरेकडील संस्थानांची दक्षिणेकडील संस्थानांशी लढाई सुरू झाली. त्यामुळे अमेरिकेतील कापूस इंग्लंडला जाईनासा झाला. त्यामुळे भारतात पिकलेल्या  कापसाला अचानक इंग्लंडवरून मागणी येऊ लागली. मुंबईचे नशीब अकस्मात उजाडले.lr25 अमेरिकेतील यादवीमुळे मुंबईच्या कापसाचा भाव वाढून श्रीमंतीचा महापूर आला. भडोच, सुरत, जंबुसर, भावनगर, बारशी, नगर, धारवाड, खानदेश अशा अनेक ठिकाणांहून मुंबईत कापूस येऊ लागला. कापसाला खूप मागणी होती व किंमतसुद्धा चांगली मिळे. वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून कापसातील सरकी काढून टाकल्यावर कापसाच्या घट्ट अशा गाठी बांधल्या जातात. त्यासाठी पूर्वी चिंचेच्या लाकडाचे साधे यंत्र करून त्यामध्ये ते गठ्ठे घालून थोडेसे लहान करीत. कालांतराने वाफेच्या यंत्रावर कापूस दाबून दगडासारखा घट्ट करून त्याच्या गठडय़ा बांधल्या जाऊ लागल्या. त्यावेळी टाऊन हॉलसमोरील सर्व जागा मोकळी होती. तेथे कापसाच्या गठडय़ा ठेवत. त्याचबरोबर चर्चगेटजवळील मोकळ्या जागेत कापसाचा साठा केला जात असे. या गाठींचे वजन वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे असते. भारतात या गाठीचे वजन साधारणपणे १७० कि. ग्रॅ. एवढे असते. तर अमेरिकेत ते ५०० पौंड म्हणजे २२७ कि. ग्रॅ. इतके असते. १८६१ साली केवळ युरोप खंडात मुंबईहून ७,१७,८२१ कापसाचे गठ्ठे गेले. १८६२ मध्ये मुंबईत मोठय़ा व्यापाऱ्यांपैकी कोणाला ७०, कोणाला ४०, कोणाला ३०, तर कोणाला दहा लाख रुपये इतका प्रचंड नफा झाला होता. मुंबईत आलेल्या या पैशाच्या प्रवाहाने व्यापारी लोकांना वेडे करून सोडले. १८६४ मध्ये तर मुंबईतील कापसाच्या व्यापाऱ्यांची भरभराट अक्षरश: शिगेला पोहोचली होती. कापसाची निर्यात चौपट झाली होती, तर कापसाचा भाव दसपट झाला होता. लोकांनी आपल्या घरातील गाद्या, उशा, तक्के, लोड- जिथे जिथे कापूस मिळेल तो सारा इंग्लंडच्या मागणीत घातला. या चार-पाच वर्षांत जवळपास ७० ते ८० दशलक्ष स्टर्लिग पाऊंड कापसाच्या मोबदल्यात मुंबईत आले. त्यामुळे १८६४ ला मुंबईत दणक्यात दिवाळी साजरी करण्यात आली. व्यापाऱ्यांनी ‘अत्तराचे दिवे जाळणे’ ही म्हण प्रत्यक्षात आचरणात आणली. या वैभवाच्या दिवाळीत ओव्हल मैदानावर फटाक्यांच्या आतषबाजीचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मुंबईतल्या साऱ्या सरकारी-बिनसरकारी, काळ्या-गोऱ्या प्रतिष्ठित नागरिकांना पाचारण केले गेले होते. बेसुमार पैशांच्या उलाढाली होत होत्या. घोडय़ांना चांदीचे दागिने, तसेच घोडय़ाच्या बग्गीला जेथे सजावटीसाठी पितळेचा वापर होत असे तिथे चांदी वापरून आपल्या गडगंज श्रीमंतीचे प्रदर्शन केले जात होते. काही महाभाग तर शंभर रुपयाच्या नोटेमध्ये तंबाखू घालून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करीत असत.
पैसा हाती खेळू लागल्याने बॅकबेचा समुद्र हटविण्याच्या संकल्पाच्या कितीतरी कंपन्या निघाल्या होत्या. त्यावेळी मुंबईतल्या काही धनाढय़, व्यापारी व प्रतिष्ठित मंडळींनी मुंबईचा सर्वागीण विकास करण्यासाठी एलफिन्स्टन लॅण्ड अ‍ॅण्ड प्रेस कंपनी काढली होती. १८६१ ते १८६४ या काळात येथील धनिकांनी अमाप धन मिळवले आणि ते मुंबई घडविण्यासाठी खर्च केले.
त्यावेळी प्रेमचंद रायचंद या शेअर ब्रोकरना लोक ‘कापसाचा राजा’ म्हणत. जनतेचा त्यावेळी प्रेमचंदवर इतका विश्वास होता, की त्यांनी कंपनी काढली की मागचा-पुढचा विचार न करता लोक त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत. शेअर्सना तुफान मागणी असे. मुंबई सरकारच्या माझगांव येथील जागेत दारूगोळ्याचा व शस्त्रास्त्रांचा प्रचंड मोठा साठा ठेवलेला होता. ती जागा ‘गन-पावडर वर्क्‍स’ या नावाने ओळखली जायची. नुकतेच १८५७ चे स्वातंत्र्यसमर होऊन गेले होते. सुरक्षेसाठी व सैन्याच्या सोयीसाठी दारूगोळानिर्मिती व शस्त्रास्त्रांचा साठा lr22अन्यत्र हलवून सरकारने माझगांवची जागा विकायला काढली. हस्ते-परहस्ते ती जमीन प्रेमचंदनी ४० लाखांना विकत घेतली आणि ही जमीन विकसित करण्यासाठी लिमिटेड कंपनी काढली. प्रेमचंदवरील लोकांच्या विश्वासामुळे या कंपनीचे शेअर्स हातोहात खपले. या धामधुमीत मुंबई सरकारने कायद्यात बदल करून स्थावर-जंगम मालमत्तेच्या तारणाखेरीज श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या फक्त हमीवर बँकेतून कर्ज घेण्याची सवलत जाहीर केली. प्रेमचंद आणि कंपनीने या सवलतीचा फायदा उठवला. प्रेमचंद निरनिराळ्या कंपन्या काढू लागले. शेअर्सची किंमत आज १०० रु., उद्या १२५ रु., तर परवा १५० रु. अशी वाढत गेली. जे अल्पसंतुष्ट होते ते पैसा कमावून गप्प बसले. १८६४ या वर्षी पैशाच्या अशा बेसुमार उलाढाली होत होत्या. ही उलाढाल एकाची टोपी दुसऱ्याच्या डोक्यावर चढविण्यासारखी होती. फक्त कागदावरच करोडो रुपयांचा व्यापार होत होता. या धामधुमीला त्या काळात ‘शेअर मॅनिआ’ म्हणत. अमेरिकेतील यादवीने हिंदी कापूस एकदम महागल्याने मुंबईच्या व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले. अमेरिकेतील लढाई किती काळ चालेल हे निश्चित नसले तरी ती यादवी १८६५ मध्ये अचानक थांबून हिंदी कापसाचा व्यापार गडगडेल अशी शंकाही व्यापारीवर्गाच्या मनाला शिवून गेली नव्हती. लढाई आणखी काही वर्षे चालेल, या अंदाजाने व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कापसाचे भाव १८६५ मध्ये युद्ध थांबताच कोसळले. शेअर बाजारही आपटला. मुंबईतील व्यापारीवर्ग दिवाळखोरीच्या खड्डय़ात कोसळला. कापसाच्या व्यापारातले अनेक धनिक रसातळाला गेले. या संकटाचे मूळ प्रेमचंद होत, अशा समजुतीने ज्या प्रेमचंद यांचा एकेकाळी सर्वत्र जयजयकार चालला होता त्या प्रेमचंदांच्या वाटय़ाला शिव्यांची लाखोली आली. याच प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या साडेचार लाख रुपयांच्या देणगीतून मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथसंग्रहालयाची इमारत व त्यालगतचा शिखरावर घडय़ाळ असलेला राजाबाई टॉवर बांधण्यात आला आहे. राजाबाई हे त्यांच्या आईचे नाव!
१ जुलै १८६५ या दिवसाला मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस असे म्हटले गेले. आदल्या वर्षी- म्हणजे १८६४ मध्ये दणक्यात दिवाळी आणि पुढच्याच वर्षी दिवाळे असे दारुण स्थित्यंतर व्यापाऱ्यांच्या नशिबी आले. या घटनेपायी हजारो माणसे नागवली. जिकडे तिकडे हाहाकार माजला.
परंतु कापसाचा हा भूकंप होण्यापूर्वी व्यापारीवर्गाने मिळविलेले प्रचंड धन मुंबई घडविण्यासाठी खर्च केल्यामुळे ‘व्हिक्टोरियन युगाचे जगातील सर्वोत्तम शहर’ या संज्ञेला मुंबई पात्र झाली. तेव्हाच्या गॉथिक शैलीतील इमारती आजही मोठय़ा डौलाने उभ्या आहेत. तर १८५३ मध्ये मुंबईत सुरू झालेल्या आगगाडीचे जाळे दहा-पंधरा वर्षांतच देशभर पसरले आणि मुंबईचा दूरदूरच्या शहरांशी संपर्क जोडला गेला. कर्मधर्मसंयोगाने सुवेझ कालव्याचे कामही १८५६ ते १८६९ या कालावधीत पूर्ण झाले व तो सागरी वाहतुकीस खुला झाला. युरोपातून मोठाल्या बोटी मुंबईस येऊ लागल्यावर शिडाच्या बोटी जाऊन आगबोटीचे युग सुरू झाले आणि पाश्चात्य जगाशी मुंबईचे नाते जोडले गेले. १९ व्या शतकाच्या मध्यावर घडलेल्या या तीन घटनांमुळे आधुनिक युगात प्रवेश करताना सुरुवातीलाच जबरदस्त झेप घेतल्यामुळे मुंबईचे सारे चित्रच पालटले आणि समुद्राने व्यापलेल्या या लहानशा भूभागाला भव्य वैभवशाली रूप प्राप्त झाले. पुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली आणि आज ती भारताची आर्थिक राजधानी आहे.
– विश्वास अजिंक्य 

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल