News Flash

पँथरचा ‘सॉफ्ट टॉय’ होताना..

९ जुलै १९७२ रोजी इतिहासदत्त भूमिका निभावण्यासाठी जन्माला आलेली ‘दलित पॅंथर’ चळवळ येत्या ९ जुलै रोजी चाळीशी पार करत असताना या लढाऊ चळवळीचे योगदान, पुढे

| July 7, 2013 12:21 pm

९ जुलै १९७२ रोजी इतिहासदत्त भूमिका निभावण्यासाठी जन्माला आलेली ‘दलित पॅंथर’ चळवळ येत्या ९ जुलै रोजी चाळीशी पार करत असताना या लढाऊ चळवळीचे योगदान, पुढे दलित पॅंथरच्या उडालेल्या चिरफळ्या आणि तिच्या नेत्यांनी केलेली नवी सोयरीक वगैरेचा परामर्ष घेणे अप्रस्तुत ठरू नये. या चळवळीचे तटस्थपणे विश्लेषण करणारा संजय पवार यांचा लेख. तसेच पॅंथरच्या ऐन रणधुमाळीत तिचा महत्त्वाचा हिस्सा असलेल्या सुनील दिघे यांनी सिंहावलोकन करताना काय हाती लागते, यावर टाकलेला झोत..    
६०चे दशक हे जगभरातच ‘अस्वस्थ’ दशक म्हणून ओळखलं जातं. आणि ७० च्या दशकात या अस्वस्थतेने आपला विद्रोह प्रकट करायला सुरुवात केली. भारतातसुद्धा स्वातंत्र्यात जन्मलेली पिढी तरुण झाली होती. स्वतंत्र भारतही तरुण होता. पण स्वातंत्र्य चळवळीतल्या दिग्गजांचं जसं राजकारण आणि समाजकारणात वर्चस्व होतं, तसं ते साहित्य, नाटय़, चित्रपट अशा सांस्कृतिक क्षेत्रांतही होतं.
नेहरूंच्या ‘नियतीशी करार’ या भाषणाचा, त्यातल्या स्वप्नांचा अंमल ओसरायला लागला होता. संसदीय लोकशाही, समाजवादी भांडवलशाही या संज्ञा वापरून गुळगुळीत होण्याच्या मार्गावर होत्या. सर्वत्र ‘सरकार’ नावाच्या व्यवस्थेचा अजस्र असा पसारा होता. भारतीय भांडवलदार हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. उद्योग, शेती या क्षेत्रांत नवी धोरणे आखली जात होती. पण गांधींच्या स्वप्नातला भारत, त्यातली खेडी आणि तळातला माणूस हे आता गांधी विचारधनाच्या स्वरूपात गोठायला लागले होते. स्वातंत्र्यपूर्व काळातच ‘राष्ट्रीय काँग्रेस’मधून बाहेर पडून समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारेकडे वळलेल्या लोकांनी राजकीय पक्ष आणि जनसंघटना याद्वारे ‘व्यवस्थेविरोधात’ आवाज उठवायला सुरुवात केली होती. यातल्या कम्युनिस्टांचा भर ‘वर्ग’संघर्षांवर होता, तर समाजवाद्यांचा वर्गसंघर्षांबरोबरच जातीनिर्मूलन, आंतरभारती, मागास, आदिवासी भागात शिक्षण व समता, बंधुत्व, इ. गोष्टींवर होता. गांधीहत्येनंतरच्या सामाजिक उद्रेकामुळे ‘हिंदू’विचारांची हिंदू एकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघप्रणीत जनसंघ, सावरकरवादी हे बॅकफूटवर गेले होते. तर ५६ सालच्या धर्मातरानंतर दलितांमध्ये, विशेषत: महारांमध्ये ‘बौद्ध’ झाल्याने एका नव्या आत्मविश्वासाची पेरणी झाली होती. नवबौद्ध म्हणून हा समाज, समाजात वावरू लागला.
दलित पँथरच्या जन्माआधी देशात, महाराष्ट्रात ही अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी होती. ६० च्या दशकातलं अस्वस्थपण जगात, देशात तसंच महाराष्ट्रातही होतं. महाराष्ट्र राज्याची नुकतीच स्थापना झाली होती. त्यासाठीच्या लढय़ाच्या आणि १०५ हुतात्म्यांच्या स्मृती ताज्या होत्या. देशाच्या स्वातंत्र्यानंतर लढून मिळवलेली मुंबई ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरली. समाजवादी, कम्युनिस्ट यांच्या नेतृत्वाखाली लढलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा इतका प्रखर ठरला, की राज्यात संयुक्त महाराष्ट्र समितीचे अनेक धुरिण निवडून आले; परंतु दुर्दैवाने त्यांना सत्ता मात्र काबीज करता आली नाही. राष्ट्रीय काँग्रेसला पर्याय आणि परिवर्तन याबाबतच्या जनतेच्या आशेच्या अंकुराचा तो पहिला गर्भपात होता!
६२ साली चीनने आक्रमण करून स्वतंत्र भारताला पहिल्या युद्धाचा तडाखा दिला. यात दोन-तीन गोष्टी झाल्या. पहिली म्हणजे नेहरूंच्या ‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या रोमँटिसिझमचा बळी गेला. सरकारविरोधाच्या अस्वस्थतेत त्यामुळे आणखीनच भर पडली. परंतु यामुळे कम्युनिझमविषयी देशात विरोधी वातावरण तापवण्यात काँग्रेसला यश आलं. कृष्ण मेननांच्या जागी संरक्षण मंत्रीपदी यशवंतराव चव्हाणांना नेमून महाराष्ट्राच्या अस्मितेला गोंजारण्यात आलं. चिनी आक्रमणाचा धक्का पचवू न शकलेल्या पं. नेहरूंचं निधन झालं आणि नेहरूयुगाचा अंत झाला.
याच सुमारास समाजवादी, कम्युनिस्ट या विचारप्रणालींसोबत नक्षलवादी म्हणून एक चळवळ प. बंगालमधून उदयास आली. सशस्त्र क्रांतीचा पुकारा करणाऱ्या या चळवळीने बंगालमधल्या उच्चशिक्षित, उच्चवर्णीय तरुणांना दलित व आदिवासींच्या हक्कांसाठी सशस्त्र क्रांतीसाठी आकर्षित केलं. मार्क्‍स-लेनिन यांच्यासह आता माओचं तत्त्वज्ञानही वैचारिक परिप्रेक्ष्यात आलं. अस्वस्थ तरुणांत क्रांतीचा रोमँटिसिझम सुरू झाला.
देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही अस्वस्थता सुरू होती. संयुक्त महाराष्ट्र झाला. पण बेळगाव, निपाणीसह काही भाग वादग्रस्त सीमाप्रश्न बनला. ‘राज्य मराठय़ांचे नाही, तर मराठी माणसांचे असेल,’ या यशवंतरावांच्या शब्दाने मुंबई शहरात विपरीत वातावरण तयार होत होतं.
पहिल्यापासूनच बहुभाषिक असलेल्या मुंबईत गुजराती, पारशी, पंजाबी आणि भय्ये हे होतेच. त्यात आता दाक्षिणात्यांची भर पडून त्यांनी हळूहळू नोकऱ्यांमध्ये बस्तान बसवले आणि मुंबईत दाक्षिणात्यांची लक्षणीय वाढ झाली. यात कायम नोकरी- तीही शक्यतो सरकारी अशा मानसिकतेतल्या मराठी तरुणाला बेकारी अनुभवावी लागली. त्यात काँग्रेसच्या बहुभाषिक धोरणाने दाक्षिणात्यांमध्ये थोडीशी मुजोरीही आली. ते ऑफिसांप्रमाणेच फेरीवाले बनून रस्त्यारस्त्यांवर पसरले. या अस्वस्थ वातावरणाला आपल्या व्यंगचित्रांतून बाळ केशव ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराने ‘मार्मिक’ नावाच्या साप्ताहिकातून वाचा फोडली आणि ‘मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी’ शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना केली. संयुक्त महाराष्ट्र समितीकडून झालेल्या भ्रमनिरासामुळे मराठी समाजमन, विशेषत: तरुण हा बाळ ठाकरे यांचा अनुयायी बनला. ‘नेते’पणाचं कसलंही लक्षण नसलेल्या बाळ ठाकरे नामक सडपातळ व्यक्तिमत्त्वाने आणि त्यांच्या संवादी, पण उपरोधिक, मार्मिक, थेट वक्तृत्वाने महाराष्ट्रावर, विशेषत: मुंबईकरांवर गारूड करायला सुरुवात केली. आचार्य अत्र्यांनंतर असा बिनधास्त वक्ता, नेता महाराष्ट्राला लाभला आणि बघता बघता शिवसेना मुंबईभर पसरली. मुंबईचा मध्यमवर्गीय उच्चजातीय तरुण जसा शिवसैनिक झाला, तसाच मध्यम व दलित जातींतला तरुणही ‘मराठी’ म्हणून शिवसैनिक झाला.
या नव्या संघटनेची सत्ताधारी काँग्रेसला आपत्ती होण्यापेक्षा ती त्यांच्यासाठी इष्टापत्तीच ठरली. आणि त्यांनी खुबीने या संघटनेचा वापर गिरणगावात प्रभुत्व टिकवून असलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या विरोधात करायला सुरुवात केली. सीमाप्रश्नाच्या निमित्ताने सेनेने उसळवलेल्या दंगलीत ‘६९ हुतात्मे’ झाले आणि बाळ ठाकरेंचं नेतृत्व ‘बाळासाहेब ठाकरे’ म्हणून प्रस्थापित झालं.
मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू झालेल्या या संघटनेकडे स्वत:ची अशी वैचारिक बैठक नव्हती. (ती आजही नाही.) शिवसेनाप्रमुख हे सरसेनापती म्हणून सैनिकांना ‘आदेश’ देत आणि सैनिक ‘राडे’ करत. हीच पुढे सेनेची कार्यपद्धती ठरली. नक्षलवाद्यांकडे क्रांतीसाठी हिंसेचं तत्त्वज्ञान होतं, तर सेनेकडे मराठी माणसासाठी ‘राडे’ करणं, एवढंच प्रतिक्रियात्मक उद्दिष्ट होतं. त्यात आतून काँग्रेसची फूस व सेनापतींचं हुकूमशहा, हिटलरप्रेम यामुळे लवकरच सेनेची गणती फॅसिस्टांत होऊ लागली. त्यावेळी ठाकरेंचे तडाखे कम्युनिस्ट, समाजवादी यांच्याप्रमाणेच संघवाल्यांवरही बसत. या काळात जागोजागी सेनेच्या शाखा स्थापन झाल्या.
पण ‘मराठी’ या एका ध्येयापलीकडे सेना जात नसल्याने समाजातील इतर प्रश्नांबाबत ती बेफिकीर राहिली. ठाकरेंनी आपण जातपात मानत नसल्याचे सांगत जातीचा प्रश्न संपवला! तर राष्ट्रीय मुसलमान ‘आपले’ असं म्हणून इतरांना ‘शत्रू’ ठरवून टाकलं. मुंबई आणि मराठी माणूस, मुंबईत मराठी माणसाची(च) दादागिरी चालणार, असा आदेश देऊन शिक्षित, अर्धशिक्षित, अशिक्षित मराठी तरुणाला ठाकरेंनी ‘स्वाभिमानी गुंड’ बनवला!
या सैनिकांपलीकडे मुंबईसह महाराष्ट्रात तरुणांचा एक मोठा वर्ग अस्वस्थ होता. हा वर्ग विचारसरणीवर विश्वास ठेवणारा व लोकशाही मार्गाने जाणारा होता. त्याच्यावर समाजवादी, कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव होता. कारण या विचारसरणींचा प्रभाव जागतिक राजकारण, समाजकारण याबरोबरच साहित्य, नाटय़ व चित्रपट अशा क्षेत्रांवरही होता. त्याची सावली भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत पडू लागली.
या सावलीतूनच पुढे इप्टा, अनियतकालिकं, प्रायोगिक रंगभूमी, प्रायोगिक चित्रपट अशा चळवळी सुरू झाल्या. त्यातूनच सदाशिवपेठी मराठी साहित्य आणि सत्यकथेतलं अभिजन साहित्य याविरुद्ध विद्रोह होऊ लागला. साहित्य, नाटक, चित्रपट यांच्या व्याख्या बदलू लागल्या. कल्पनाविलास, शाब्दिक झालरी, सरस्वतीचं वरदान, मांगल्य, पावित्र्य आणि शब्दरूप होणारं ‘ब्राह्मणी’ जीवन, भाषा, गंड आणि त्यातला पोकळ पातळपणा यावर प्रहार होऊ लागले. धर्मचिकित्सा होऊ लागली तशी एकवचनी रामापेक्षा सीता नायिका झाली. पांडवांपेक्षा द्रौपदी न-नायिका झाली. जाती-धर्मभेदावर थेट, कडक भाष्ये होऊ लागली. त्याची रेवडी उडवली जाऊ लागली. शाहू, फुले, आंबेडकर, मार्क्‍स, चे गव्हेरा, पाब्लो नेरुदा, सीमॉन द बुव्हा, फ्रॉइड, काफ्का, कामू, बर्गमन, पोलोन्स्की, फेलिनी, सत्यजित रे, ऋत्विक घटक अशी एक वावटळच आली. आणि बघता बघता सांस्कृतिक पर्यावरणच बदलून गेलं.
या तरुणांतच इथला मागासवर्गीय- सरकारी भाषेत अनुसूचित जाती/ जमातीतला तरुण आरक्षणाचे फायदे घेऊन मुख्य धारेत येऊ लागला होता. त्याला समाजवादी, कम्युनिस्ट विचारांच्या तरुणांची साथ लाभली. त्यातून सेवादल, युक्रांद यांसारख्या विद्यार्थी संघटना उभ्या राहिल्या. आदिवासी, श्रमिक, मागास जाती-जमाती, भटके यांत संघटन व काम सुरू झालं. नवा विचार, नवा शब्द, नवं साहित्य, चित्र, नाटय़ आणि संपूर्ण क्रांतीचे स्वप्न. सनदशीर मार्गाने व्यवस्थेविरोधात लढा व क्रांती करणं हे ध्येय!
जाती-धर्माच्या भिंती मोडून, शिक्षण अर्धवट सोडून हे तरुण (व तरुणीही) गाव-खेडय़ांत जाऊन व्यवस्थेविरुद्ध संघर्षांत्मक लढे देत होते, संघटन करत होते. गांधींसह शाहू, फुले, आंबेडकर, मार्क्‍स पोहोचवत होते. रुजवत होते. स्वातंत्र्याची पंचविशी आली तरी गाव-खेडय़ांतील जातिधिष्ठित वास्तव बदलले नव्हते. धर्मातराने महारवाडय़ाचा बौद्धवाडा झाला, इतकंच. आर्थिक विषमता संपली की जातीय विषमता जाईल, या कम्युनिस्टांच्या विश्वासाला आता मागास तरुण पाठिंबा देण्यापासून कचरू लागला. समाजवादी पाश्र्वभूमी असलेल्या युक्रांदसारख्या संघटनांनी जातीनिर्मूलनासाठी काही कार्यक्रम घेतले, पण मागासवर्गीय शिक्षित तरुणांची अस्वस्थता वाढतच होती.
मुंबईसारख्या शहरातही सांस्कृतिक जगतात लपून बसलेली जात, गाव-खेडय़ांत उघडपणे वावरणारी जात- या वास्तवाने हा शिक्षित, सृजनशील मागासवर्गीय तरुण अस्वस्थ होता. अनियतकालिकांतील इतरवर्गीय/ जातीय तरुणांनी या प्रश्नावर साहित्यिक भूमिका घेतली. पण साहित्याने जगण्याचे प्रश्न सुटणार नव्हते. डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष चार गटांत विभागला होता आणि काँग्रेसच्या दावणीला बांधला गेला होता. त्यांचे नेते आपली पद, प्रतिष्ठा काँग्रेसच्या मेहेरबानीवर राखून होते. अशा वातावरणात ‘ब्लॅक पँथर’ची माहिती महाराष्ट्रात पोहोचली. निग्रोंच्या चळवळींचा अभ्यास होऊन त्यावरचं साहित्य प्रकाशित झालं आणि त्यातूनच दलित पँथरचा जन्म झाला.
आज या चळवळीचे, संघटनेचे संस्थापक राजा ढाले आणि नामदेव ढसाळ आपापली ‘व्हर्शन्स’ मुलाखतींतून सांगताहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वीची अन्यायाविरुद्ध बंड करण्याची असोशी संपून आता आजही- कोणी काय केलं, कोण चुकलं, कुणी फसवलं,  कुणी वापरलं, याचीच चर्चा करताना दिसतात. कधीकाळी एकत्र मुठी आवळणारे हे देशी चे गव्हेरा आता एकमेकांचं तोंड न बघता एकमेकांच्या तोंडी लागताहेत. म्हणजे आज कुणी दलित पँथरचा वस्तुनिष्ठ इतिहास लिहायचा ठरवला तर त्याला ‘फॅक्टस्’पेक्षा ‘फिक्शन’च जास्त ऐकावं लागेल अशी परिस्थिती आहे. तरीही ‘दलित पँथर’ नावाचं वादळ महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जगात आलं आणि त्याने इथे प्रचंड उलथापालथ केली, हा इतिहास कुणी नाकारू शकणार नाही.
मागास, सर्वहारा, गावकुसाबाहेरच्या अस्पृश्य समाजाला ‘दलित’ ही सर्वव्यापी संज्ञा देऊन त्यात कामगारांसह आदिवासी, भटके आणि स्त्रिया यांनाही ‘स्व’भान देणारी ही आक्रमक चळवळ, संघटना भविष्यात त्रासदायक ठरू शकते, या विचाराने काँग्रेसने तिच्या फुटीकडे लक्ष ठेवले. कम्युनिस्टांना अपेक्षित क्रांतीची बीजे त्यात दिसली, तर समाजवाद्यांना उद्याच्या क्रांतीचे नेतृत्व दलितच करेल, या आपल्या स्वप्नासाठी ती योग्य भूमी वाटली. आक्रमकतेमुळे नक्षलवाद्यांनाही पाय ठेवायला बरी जागा वाटली असणार. दलित पँथरने इतक्या घडामोडी घडवल्या.
दलित पँथरच्या स्थापनेमुळे समाजवादी, कम्युनिस्ट जनसंघटनांतला मागास तरुण ‘पँथर’ झाला, तसाच शिवसेनेत कार्यरत असलेला बौद्ध तरुणही पँथर झाला. काहींना पँथर म्हणजे सेनेसारखीच राडेबाज संघटना वाटली. पँथरने सेनेच्या शाखेप्रमाणे आपल्या ‘छावण्या’ उघडल्या. काही नेत्यांना ‘कमांडर’ वगैरे बिरुदे लागली.
सेनेच्या आक्रमकतेच्या साम्याखेरीज पँथर आणि सेनेत जमीन-अस्मानाचे अंतर होते. सेनेकडे विचार नव्हता, पँथरकडे होता. सेना प्रतिक्रियावादी होती, तर पँथरच्या प्रतिक्रियेत शारीरिक प्रतिक्रियेसोबत वैचारिक प्रतिक्रिया, धर्मचिकित्सा, जातीनिर्मूलन, आर्थिक विचार अशा अनेक गोष्टी होत्या. शिवसैनिक हा डोक्यात आणि हातात दगड घेतलेला होता, तर पँथर डोक्यात फुले, शाहू, आंबेडकर आणि हातात दगडासोबत पुस्तक आणि पुस्तकात पिंपळपान घेऊन होता! किंबहुना साक्षर, बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर पोसला गेलेला असा हा विचारी तरुणांचा समूह होता. इतका सृजनशील समूह देशात कम्युनिस्टांनंतर बहुधा पँथरमध्येच होता. पँथरची ‘थिंक टँक’ ही जवळपास प्रत्येक पँथर होता.
कालांतराने या वैचारिकतेनेच पँथरला फुटीकडे नेले. राजा ढालेंचं ‘सारा भारत बौद्धमय करेन,’ हे ढसाळांच्या सर्वहारा दलित व्याख्येला छेद देणारं होतं. सभास्थानी बाबासाहेबांसोबत गौतम बुद्धाची तसबीर महारेतर, बिगरधर्मातरित मागास समाजाला थबकवत होती, तर या सर्व समाजाला बौद्ध करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न ढालेंचं नवं लक्ष्य होतं.
‘जातीसाठी माती खावी’ या उक्तीला प्राणपणाने जपणाऱ्या भारतीय समाजात चार प्रमुख जातींव्यतिरिक्त उरलेल्या साडेसत्त्याण्णव टक्क्य़ांतील जातीयताही प्रखर असल्याने त्याचा उपयोग काँग्रेससह इतर पक्षांनी केल्याने कालांतराने ‘दलित पँथर’ ही रिपब्लिकन पक्षाप्रमाणे ‘महार वतन’ किंवा बौद्धवाडा होऊन राहिली!
तरीही सेना ऐन भरात असताना झालेल्या वरळी दंगलीने शिवसेनाप्रमुखांना दलितांची, विशेषत: महार (बौद्ध) तरुणांची ताकद कळली. त्यामुळेच राजा ढालेंनी शिवतीर्थावरच गीता जाळली तरी प्रतिक्रिया आली नाही!
शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि ठिपकेदार चित्ता या पँथरच्या प्रतीकांमधली लढाई वरळीत निर्णायक ठरली. यावरची प्रतिक्रिया सेनेने भागवत जाधवचा बळी मिळवून दिली. अर्थात, पुढे ढसाळ सेनेच्या व्यासपीठावर गेले. आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीला सेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला, तर नामदेव ढसाळांनी ‘प्रियदर्शिनी’ हे दीर्घकाव्य लिहून इंदिराजींची महती गायली. हा सेनेचा उतरता काळ होता. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला विरोध, आणीबाणीला समर्थन आणि त्याचदरम्यान सेनाप्रमुखांचं जवळपास जिवावर बेतलेलं आजारपण यातून सेना खचली होती. त्यात आणीबाणीनंतरच्या जनता पार्टीच्या काळात त्यांच्यावर दबाव वाढला होता. जनता पार्टीत जाण्याविषयी अथवा पाठिंब्यासाठी. पण त्यांचा निर्णय होईपर्यंत जनता पार्टीच आटोपली!
इकडे पँथरच्या विघटनानंतर आरपीआयप्रमाणेच पँथरचे गट झाले. त्यातला एक प्रमुख गट प्रा. अरुण कांबळे व रामदास आठवलेंचा होता. भाषण, वैचारिक मांडणी प्रा. अरुण कांबळेंची, तर संघटनात्मक बांधणी रामदास आठवलेंची. आज प्रा. कांबळे नाहीत आणि रामदासजी चारोळीप्रसिद्ध वक्ते झालेत!
याच प्रा. अरुण कांबळे यांनी लिहिलेल्या ‘रामायणातील सांस्कृतिक संघर्ष’ या पुस्तकाला बाळासाहेब ठाकरेंनी प्रथमच ‘हिंदू’ म्हणून विरोध केला आणि ‘आमच्या दैवतांची विटंबना सहन करणार नाही,’ असा दम दिला. हिंदुहृदयसम्राट होण्याच्या त्यांच्या प्रवासाची ही सुरुवात होती. हिंदू महासभेच्या लोकांनी त्यासाठी ठाकरेंची भेट घेतली होती आणि ‘सावरकरांनंतर ब्राह्मणांकडे नेतृत्व कुठं आहे?’ असं म्हणून ठाकरेंनी ते स्वत:कडे घेतलं. सेनेचा ढासळलेला डोलारा सावरायला हे ‘हिंदू कार्ड’ उत्तम हे चाणाक्ष बाळासाहेबांनी ओळखून आपली पांढरी सलवार, कुर्ता, पांढरी शाल ही ओळख पुसून ते भगवेवस्त्रांकित झाले!
ठाकरेंच्या या दमबाजीला न घाबरता पँथरसह दलित साहित्यिकांनी हिंदू धर्म, जातवास्तव, त्याआड येणारे दैवतीकरण यांना आडवा हात दाखवला. ठाकरेंनी त्यानंतर आपला मोर्चा देशद्रोही मुसलमानांकडे वळवला. ठाकरेंचा नामांतरविरोध आणि युतीच्या काळात अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची प्रक्रिया सर्वश्रुत असताना आज पूर्वाश्रमीचे पँथर ढसाळ आणि आठवले सेनेचे हिंदुत्व मान्य करतात तेव्हा ‘वाल्या’चा ‘वाल्मीकी’ करण्याची प्रोसेस आजही कशी समरसतेने चाललीय हे बघून हसावं की रडावं कळत नाही. ढाण्या वाघासोबत ठिपकेदार चित्त्यानेही गवत खायची सवय लावून घ्यावी?
आजही खैरलांजीसारखे प्रकार घडतात. आरक्षणावरून वाद झडतात. बाबासाहेबांच्या नावावरून वाद होतात. बौद्धांना सवलती द्याव्यात का, यात केंद्र-राज्य घोळ घालतात. ओबीसी वेगळे लढताहेत. मराठे आरक्षण मागताहेत. मातंग राजकीय चाणाक्षपणा दाखवताहेत. तर धनगरांसह इतर बलुतेदारांना कमळवाटपाचे जाहीर कार्यक्रम होताहेत.
धर्मातरानंतरची चौथी पिढी आता तरुण झालीय. एक मोठा वर्ग शासकीय, निमशासकीय, खासगी नोकरीत वरच्या पदावर आहे. क्रीमी लेयर वाढतंय. दलित मुली सनदी सेवेत आल्यात. कलाक्षेत्रात दलित तरुण आघाडीवर आहे. दलित उद्योजक वाढताहेत. कुलगुरूंपासून नियोजन आयोगापर्यंत आणि यूजीसीपासून परदेशी दूतावासापर्यंत हा समाज उत्क्रांत झालाय. तरीही २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात ‘जात’ आहेच आणि जातिसंघर्षही. त्यांचे स्वरूप बदललेय. नेमक्या या अशा स्थित्यंतराच्या काळात एक प्रखर पोलिटिकल स्टेटमेंटची डरकाळी मारण्यासाठी पँथरसारख्या संघटनेची गरज होती. पण..
सगळेच पँथर सोयीच्या मॉलमध्ये ‘सॉफ्ट टॉइज’ होऊन आपापली प्राइस टॅग लावून बसलेत! इतिहासाची शोभा म्हणून त्यातला एखादा आपल्या घरी आणून ठेवण्याशिवाय सध्याच्या दलित तरुणाईला दुसरा पर्याय नाही! 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 12:21 pm

Web Title: dalit panthers
टॅग : Dalits
Next Stories
1 पँथरची पहिली झेप
2 लोकभावनेचे उद्गाते कवी
3 पण लक्षात कोण घेतो?
Just Now!
X