News Flash

जावे दावोसच्या गावा…

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वार्षिक परिषदेचे ठिकाण म्हणजे स्वित्र्झलडमधील आल्पस्च्या कुशीत दडलेले देखणे दावोस!

| February 2, 2014 01:03 am

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वार्षिक परिषदेचे ठिकाण म्हणजे स्वित्र्झलडमधील आल्पस्च्या कुशीत दडलेले देखणे दावोस! या छोटय़ाशा गावी जगभरातील विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळी यानिमित्ताने एकत्र जमून माणसाच्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी सकारात्मक चर्चा करतात. या परिषदेत सहभागी झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिष्टमंडळातील ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांनी कथन केलेला आँखो देखा हाल..
जेमतेम १२ हजार वस्तीच्या एका देखण्या खेडेगावात दरवर्षी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपासून नोबेल पारितोषिक- विजेत्यांपर्यंत आणि गुगलच्या प्रमुखापासून ते आफ्रिकेमधील वंशवादविरोधी चळवळीच्या प्रमुखापर्यंत सर्वानी एकाच वेळी जावे असे काय असावे? सत्तरएक राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख, ‘फॉर्चुन- ५००’पैकी चारएकशे कंपन्यांचे अध्यक्ष किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, नामवंत अर्थतज्ज्ञ, विचारवंत, सामाजिक चळवळींचे प्रमुख, नोबेलविजेते, आघाडीचे सगळे बँकर्स, सल्लागार संस्था, जग बदलवण्याची तांत्रिक क्षमता घेऊन आलेले तंत्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय माध्यमे!
एकाच वेळी चार दिवसांसाठी हे सगळे दिग्गज एका छोटय़ाशा गावात आले तर निश्चितच तिथली व्यवस्था कोलमडणार! वाहतूक व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा यांची तारांबळ, रस्त्यावर कचरा, गोंगाट, सगळीकडे प्रचंड गर्दी.. दावोसला मात्र असे काहीच घडत नाही. जागतिक आर्थिक परिषदेच्या मुख्य ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असणारे डझनभर स्की-सेंटर्स सुरळीतपणे चालू असतात. स्कीइंग आणि स्नो-बोर्डिग करणारे युवक आपल्याच मस्तीत रमलेले असतात. ज्यांच्या जिवाला धोका आहे असे किमान १२-१५ राष्ट्रप्रमुख तिथे आलेले असतानाही रस्त्यावर एकही पोलीस दिसत नाही (काय हा हलगर्जीपणा!) की सायरन वाजवणाऱ्या पोलिसांच्या गाडय़ा विनाकारण हेलपाटत नाहीत. जगभरातून येणाऱ्या खरेदीदारांसाठी स्विस घडय़ाळांच्या किमती एका फ्रँकनेही कमी होत नाहीत. किंवा रात्री ११ वाजता बंद होणारी रेस्टॉरंट्स उशिरापर्यंत उघडी राहत नाहीत. कोणाच्याही स्वागताचे, शुभेच्छांचे बॅनर्स लागत नाहीत. आणि घोटय़ाएवढय़ा बर्फामधून चालावे लागते म्हणून कुणी व्हीआयपी तक्रारही करत नाही. संपूर्ण गावात एकही वाहतुकीचा दिवा नाही. पण धीम्या गतीने वाहने सुरळीत फिरत असतात.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या स्वयंघोषित बिनसरकारी संस्थेच्या वार्षिक हिवाळी बैठकीचे ठिकाण म्हणजे स्वित्र्झलडमधील आल्पस्च्या कुशीत दडलेले देखणे दावोस. या बैठकीत सहभागी होण्यासाठी आयोजकांचे निमंत्रण लागते. केवळ पैसा वा सत्ता यांच्या बळावर ते प्राप्त होत नाही. (या वर्षी असे निमंत्रण मिळालेले भारतातले एकमेव मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण!) तर जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, तंत्रज्ञान, तसेच वैचारिक क्षमतेने सभोवतालचे विश्लेषण करण्याची क्षमता आणि या सगळ्याचा तौलनिक अभ्यासाचा वापर करून माणसाच्या जगण्याचा स्तर उंचावण्याची इच्छाशक्ती असणाऱ्यांनाच आयोजकांकडून हे निमंत्रण प्राप्त होते!
बेट्रनवूडस् कोसळल्यावर झालेल्या पोकळीनंतर आणि अरब-इस्रायल संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर १९७४ पासून हा बैठकांचा सिलसिला सुरू झाला. बघता बघता ‘दावोस’ हा बँड्र बनला. परस्परविरोधी विचारसरणीच्या जनकांची किंवा घटकांची एका व्यासपीठावर येण्याची ती हमखास जागा बनली. द्विपक्षीय तसेच आंतरराष्ट्रीय करार होऊ लागले. जगाच्या वाटचालीची दिशा निश्चित होऊ लागली.
दावोसचे जुळे गाव म्हणजे क्लोस्टर्स. तेही या परिषदेसाठी नटू लागते. परिषदेच्या मुख्य सभागृहात (काँग्रेस) एकाच वेळी अनेक विषयांवर चर्चा, परिसंवाद, प्रदर्शने, बैठका चालू असतात. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली जागा अगोदरच निश्चित करावी लागते. काही सेकंदांचा विलंब झाला तरी प्रवेश बंद होतो. मग ती व्यक्ती राष्ट्राध्यक्ष असो किंवा अवाढव्य तेल कंपनीची वरिष्ठ. जगातील नव्या संकल्पनांची देवाणघेवाण करणारी विद्यापीठे-ऑक्सफर्ड, एमआयटी वगैरे, तसेच चैतन्याने सळसळणारी विधायक युवाशक्ती तंत्रज्ञानाच्या नव्या मायाजालाचे प्रदर्शन येथेच करतात.
‘दावोस’ हा ‘ब्रँड’ स्वस्त नाही. एखाद्या गोष्टीचे प्रभावी मार्केटिंग कसे करावे, याची शेकडो उदाहरणे पाश्चात्त्यांकडून आपल्याला बघायला मिळतात. दावोस हे त्यापैकीच एक.
अचाट नियोजन, एकाच व्यासपीठावर दिग्गजांना आकर्षित करण्याची क्षमता, स्तंभित करणारी माध्यमांची नियोजकता, कमालीच्या व्यावसायिकतेने आणि चातुर्याने आखणी केलेले कार्यक्रम.. या सर्वामुळे कोटय़वधी रुपये खर्च करून येथे सहभागी होण्याकरिता कंपन्यांमध्ये अहमहमिका असते. ‘मी दावोसला चाललोय’, ‘आपण आता दावोसला भेटूनच चर्चा करू’, ‘वी जस्ट बीन टू डॅवोस’ अशी वाक्ये म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक स्तराची निशाणीच! पण ज्या पद्धतीने येथे नियोजन केले जाते आणि ज्या क्षमतेची मंडळी येथे अवतीर्ण होतात, त्याची झलक पाहिल्यावर यात काहीच अतिशयोक्ती वाटत नाही.
दावोस येथे जमणाऱ्या उद्योजकांना, गुंतवणूकदारांना भेटणे ही एक पर्वणीच असते. ज्या लोकांची वेळ मिळण्याकरिता खूप कष्ट करावे लागतात, ज्यांच्या भेटीच्या पुढच्या सहा महिन्यांच्या तारखा अगोदरच बुक असतात असे अनेक बडय़ा कंपन्यांचे सीईओज्, अध्यक्ष, संचालक येथे विनासायास भेटतात- हे येथील मुख्य आकर्षण! अर्थात भेट सहजशक्य असली तरी पूर्वनियोजन करावेच लागते. भेटींचा हा उद्योग सुरू होतो सकाळी सातपासून. या भेटी वेळेनुसार होत नाहीत, तर भेटीनुसार घडय़ाळे लावून घ्यावीत एवढे वेळेचे काटेकोर महत्त्व! बौद्धिकता आणि व्यावसायिकता यांचे प्रत्यक्ष दर्शन या बैठकांमधून होते. बैठका १५ मिनिटे ते फार तर ३० मिनिटे एवढय़ा कालावधीच्या असतात. अत्यंत मुद्देसूद, नेमक्या. कोणताही फापटपसारा नाही. हवापाण्याच्या गप्पा नाहीत. एकमेकांची माहिती, कंपन्यांची माहिती याची बैठकीपूर्वीच देवाणघेवाण झालेली असते. त्यामुळे मुद्दा सोडून भरकटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
येथे बर्फातून चालायचे असल्यामुळे अर्मानी किंवा हुगो बॉसच्या किमती सूटखाली स्पोर्ट्स शूज घालण्याची सहजता येथे आहे. गरजेप्रमाणे स्वत:च चहा, कॉफी, सँडविच बनवून खाण्याची अपरिहार्यता आहे. वाहनतळावरील आपली रोल्स राईस सोडून बैठकीस विलंब होऊ नये म्हणून छोटय़ाशा गल्लीतून धावत दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याची मानसिकता आहे. न्याहारी, भोजन यामध्ये वेळ वाया जाऊ नये म्हणून ते करतानाही बैठकांचे आयोजन करण्याचा धोरणीपणा येथे आहे. यापुढच्या काळात एखाद्या अमेरिकन सीईओने आंघोळ करताना एखादी बैठक घेण्याचे अपारदर्शी तंत्र शोधून काढले तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही!
भारत सरकारतर्फे या कालावधीमध्ये ‘इंडिया अड्डा’ या नावाने येथे एक रेस्टॉरंट चालविण्यात येते. ताज हॉटेलतर्फे तयार केलेल्या भारतीय स्वादाच्या वैविध्यपूर्ण पक्वान्नांचा लाभ घेण्यासाठी तिथे अनेक परदेशी असामी हजेरी लावतात. तिथेच अनेक गाठीभेटी, बैठका यांचाही रतीब चालू असतो. उणे पाच तापमानात गरम मसाला चहा पिण्याची आणि स्वित्र्झलडमध्ये भारतीय चॉकलेट्स खाण्याची ही एकमेव जागा. दावोस संस्मरणीय ठरते ते अशा माहोलमुळेच.
दावोसला पाच वर्षांपूर्वी ‘इंडिया’ थीम होती. तेव्हा सर्व वातावरण भारतमय करून टाकण्यात आले होते असे तेथील लोक सांगतात. यावेळीही भारतातून अनेक मोठय़ा उद्योजकांनी या परिषदेला हजेरी लावली असली तरी भारताचे महत्त्व घटल्याचे प्रकर्षांने जाणवत होते. या पाश्र्वभूमीवर सुखद वाटणारी घटना म्हणजे महाराष्ट्राची इथे घेण्यात आलेली नोंद! महाराष्ट्र हे पश्चिम भारतातील प्रगत राज्य असून मुंबई त्याची राजधानी आहे, अशी छापील ओळख करून देण्याअगोदरच ‘महाराष्ट्र म्हणजे काय?’ याची मूलभूत माहिती नसणारे कुणीही आढळले नाही. जागतिक स्तरावर महाराष्ट्राची स्वत:ची एक ओळख बनत चालली आहे याची ही खूण म्हणता येईल. अर्थात अल्पसंतुष्टता आणि खास मराठी न्यूनगंड या दोन्हीच्या बाहेर पडून स्वच्छपणे जगाचे दर्शन घ्यायचे असेल तर दावोसला आलेच पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2014 1:03 am

Web Title: davos in switzerland
टॅग : Switzerland
Next Stories
1 अशोक – द ग्रेट!
2 जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता
3 प्रजासत्ताक पोरकं आणि पोरकट
Just Now!
X