दैनंदिन घटना-घडामोडींवर खाशा पुणेरी शैलीत व्यंगात्मक मल्लिनाथी करणारे सदर..
सलाम, भाई, सलाम
निवडणूक वर्षांत सब को साष्टांग सलाम
मावळलेल्या तारखांना सलाम
सरलेल्या वारांना सलाम
िभतीवरच्या नव्याकोऱ्या
कॅलेंडरांना सलाम
कॅलेंडरांच्या वाढलेल्या दरांना सलाम
महागलेल्या एसेमेसी शुभेच्छांना सलाम
मिळालेल्या भेटींना सलाम
नाइलाजाच्या गाठींना सलाम
जगण्याचे ईएमआय सालोसाल वाहून
भरून आलेल्या पाठींना सलाम
सलाम, भाई, सब को सलाम

कर्जासाठीच्या प्रेमळ आवाहनांना सलाम
दसादशे वाढत्या भावांना सलाम
वडापावांना सलाम
कटिंग चहांना सलाम
चहावाल्याला सलाम
शाहजाद्याला सलाम
आम आदमीला सलाम
सफेद टोपीला सलाम
त्या टोपीखाली दडलेय काय, त्यालाही सलाम
सलाम, प्यारे भाईयों और बहनों, सब को सलाम
 
टोपी लावणाऱ्यांना सलाम
गंडे घालणाऱ्यांना सलाम
झेंडे फडकावणाऱ्यांना सलाम
त्यांच्या व्यापाऱ्यांना सलाम
लोकपालला सलाम
तेजपालला सलाम
आदर्शाना सलाम अन्
दशजनपथी टिनोपालला सलाम
घोटाळ्यांना सलाम
कांडांना सलाम
च्यानेलच्या खिडक्यांतील
बोलभांडांना सलाम
सारे पचवून ढेकरही न देणाऱ्या
सफेदपोश ढेऱ्यांना सलाम
त्यांच्या ढेरीदार सावलीत चरणाऱ्या
फ्लेक्सदार गोऱ्ह्य़ांना सलाम
सलाम, मतदार बंधुभगिनींनो, सब को सलाम
 
मनमोहनी निर्णयलकव्याला सलाम
मोदीलिपीतल्या चकव्याला सलाम
युतीला सलाम
आघाडीला सलाम
खुर्चीसाठी आसुसलेल्या
नेत्यांच्या पिछाडीला सलाम
खळ्ळ् खटाकला सलाम
कानामागच्या सटाकला सलाम
वाघांच्या चिरक्या आवाजाला सलाम
सत्तेच्या माजाला सलाम
ज्याच्या हातात माइक त्याला सलाम
त्यांच्या आश्वासनांना सलाम
सलाम, प्यारे भाईयो और बहनों,
तुमच्या-आमच्या शवासनांना सलाम                                
 
कौटुंबिक व्रत म्हणून टीव्हीसमोर बसून
जेवण्याला सलाम
वाहिन्यांवरील मालिकांना सलाम
त्यातल्या गोड गोड रडण्याला सलाम
विनोदाच्या सर्कशींतल्या
हसण्याला सलाम
जाहिरातींतल्या लाललला
न्हाण्याला सलाम
च्यानेलांतील बडबोल्या
वृत्तवेटरांना सलाम
गुळगुळीत साबूजैशा
पेपरांना सलाम
पेपर वाचून घडीही न विस्कटणाऱ्या
सुळसुळीत आयुष्यांना सलाम
तरीही सलाम मतदार बंधुभगिनींनो, सलाम
तुमच्या डाव्या हाताला सलाम
हे निवडणूक वर्ष आहे म्हणून भाईयों
तुमच्या तर्जनीला सलाम
तिला लागणाऱ्या शाईला सलाम
शाईतून स्रवणाऱ्या लोकशाहीला सलाम
सलाम भाईयों और बहनो, सब को सलाम!!