19 September 2020

News Flash

सांगतो ऐका : पाश्चात्त्य अन् भारतीय अभिजात संगीतातील भेद

सामान्य भारतीय श्रोत्याला ‘हार्मनी’ ही संकल्पना सहजपणे समजेल अशी नाहीये.

हार्मनीचे दोन प्रमुख घटक असतात. कॉर्डस् आणि काऊंटरपॉइंट.

मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

सामान्य भारतीय श्रोत्याला ‘हार्मनी’ ही संकल्पना सहजपणे समजेल अशी नाहीये. ती सोपी करून, शक्यतो पारिभाषिक शब्द न वापरता समजावून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हार्मनीची काही महत्त्वाची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे सांगता येतील. (१)हार्मनी ही संकल्पना पूर्णपणे मानवनिर्मित असून ती जवळजवळ एक हजार वर्षे जुनी आहे. (२) हिच्या शोधामुळे संगीताच्या इतिहासात एक आमूलाग्र क्रांती घडून आली; जिने संगीताच्या युरोपियन परंपरेला जगातील इतर संगीत परंपरांपासून वेगळं केलं. (३) हार्मनीमुळे संगीताला एक पोत प्राप्त होतो. एखाद्या चित्राला पस्र्पेक्टिव्हमुळे जशी खोली प्राप्त होते, तसा. आणि (४) परस्परसंबंधित नादांचा सुखद संयोग हार्मनीमध्ये झालेला असतो.

हार्मनीचे दोन प्रमुख घटक असतात. कॉर्डस् आणि काऊंटरपॉइंट. तीन किंवा जास्त संवादी स्वर जेव्हा एकाच वेळी वाजवले जातात तेव्हा कॉर्डस् निर्माण होतात. जेव्हा एक मेलडी दुसऱ्या मेलडीवर ठेवली जाते (अध्यारोपित केली जाते.) आणि तिथे दोन्ही मेलडी एकच आहेत अशा तऱ्हेने ऐकू येतात तेव्हा काऊंटरपॉइंट निर्माण होतो.

आता ऱ्हिदमबद्दल थोडक्यात.. पाश्चात्त्य संगीताच्या ‘बीट’ या कल्पनेपेक्षा आपली ‘ताल’ ही संकल्पना खूपच गुंतागुंतीची आणि परिष्कृत आहे. म्हणूनच पाश्चात्त्य संगीत परंपरेतल्या संगीतकारांना, विशेषत: जॅझ संगीतकारांना झाकीर हुसेन, त्रिलोक गुर्टू, शिवमणी या आपल्या तालवाद्य वादकांबद्दल विशेष आदर आणि अचंबा वाटत आलेला आहे.

या दोन संगीतव्यवस्थांची प्रमुख रूपं आहेत- कंठय़संगीत आणि वाद्यसंगीत! या दोन संगीत पद्धतींत असलेला लक्षणीय फरक म्हणजे आपलं संगीत हे प्रामुख्याने कंठय़संगीत आहे (म्हणून तर ‘उत्तम गाना, मध्यम बजाना’ असं आपले बुजुर्ग म्हणत आले आहेत.), तर पाश्चात्त्य संगीत हे प्रामुख्याने वाद्यसंगीत आहे. पुढे दिलेल्या त्यांच्या मुख्य प्रकारांकडे जर निरखून पाहिलं तर या दोन व्यवस्थांमधला भेद नीट लक्षात येईल.

(अ) भारतीय शास्त्रीय संगीत : धृपद, खयाल, ठुमरी, दादरा हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे कृती, पदम, जावली तिल्लाना आणि वर्णम हे कर्नाटकी शैलीमधील महत्त्वाचे गानप्रकार आहेत.

एक महत्त्वाची टीप : विसाव्या शतकाच्या मध्यापासून भारतातील या दोन्ही संगीत-पद्धतींमध्ये वाद्यसंगीत हे खूपच लोकप्रिय होऊ लागले आहे. आणि याचा परिणाम म्हणजे सतार, सरोद, विविध प्रकारच्या गिटार, फ्लूट, सनई, संतूर इत्यादी वाद्यांवर गायनातील वरीलपैकी जवळजवळ सर्व प्रकार अतिशय परिणामकारकरीतीने सादर केले जात आहेत.

(ब) पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातील महत्त्वाचे वाद्यसंगीतप्रकार असे आहेत : (१) सोनाटा : साधारणत: एक किंवा कधी कधी दोन वाद्यांसाठी लिहिलेली संगीतरचना. ही तीन किंवा चार विभागांत विभागलेली असते (उदा. बीथोवनचा पियानोसाठी लिहिलेला ‘मूनलाइट सोनाटा)

(२) कंचतरे : एकल वाद्य आणि ऑर्केस्ट्रासाठी लिहिलेली संवादात्मक संगीतरचना. हीदेखील तीन ते चार विभागांत विभागलेली असते. (उदा. चायकोव्हस्कीचा व्हायोलिन कंचतरे इन डी)

(३) सिम्फनी : हा पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातील सर्वात भव्यदिव्य, विस्तृत आणि गुंतागुंतीचा एक संगीतप्रकार आहे. हासुद्धा तीन ते पाच भागांमध्ये विभागलेला असतो आणि अर्थातच तो ऑर्केस्ट्रासाठी लिहिलेला असतो.. ज्याला ‘सिम्फनी ऑर्केस्ट्रा’ म्हणतात. उदा. मोझार्टची सर्वात प्रसिद्ध सिम्फनी क्रमांक ४० इन जी मायनर.

(४) चेंबर म्युझिक : साधारणत: तीन ते पाच वादकांच्या पथकासाठी छोटय़ा हॉलमध्ये सादर करण्यासाठी लिहिलेलं संगीत. ट्रायो, क्वार्टेट आणि क्विंटेट हे या संगीताचे उपप्रकार आहेत. उदा. बीथोवनचा िस्ट्रग क्वार्टेट इन ए. मायनर.

(५) ओव्हर्चर : ऑपेरा किंवा बॅलेच्या प्रस्तावनेसाठी लिहिलेली वाद्य-संगीतरचना. उदा. मोझार्टच्या ‘मॅरेज ऑफ फिगारो’ या ऑपेराचे प्रसिद्ध ओव्हर्चर.

आता काही महत्त्वाचे कंठय़संगीताचे मिश्र प्रकार : (१) ऑपेरा : ही अतिशय नाटय़मय रचना असून, यातील जवळजवळ सर्व संवाद पद्यात्मक असतात आणि ते नेहमीच वाद्यसंगीताबरोबर गायले जातात. उदा. वेर्दि या इटालियन रचनाकाराचा ‘ला ट्रॅव्हिआटा’ हा प्रसिद्ध ऑपेरा.

(२) मास : हा समूहगीताचा एक महत्त्वाचा प्रकार रोमन कॅथलिक चर्चमध्ये गायला जातो. उदा. बाखचा सुप्रसिद्ध ‘मास एन बी मायनर.’

(३) ओरेटोरियो : बायबलमधील एखाद्या गोष्टीवर आधारित असलेल्या ऑर्केस्ट्रासाठी आणि गायकांसाठी लिहिलेली संगीतरचना. उदा. हांडेलचा प्रसिद्ध ‘मसाया’ ओरेटोरियो.

(४) कॅन्टाटा : बहुदा धार्मिक विषयाची एक रचना- जी गायकवृंद ऑर्केस्ट्राच्या साथीने गातात. उदा. बाखचा कॅन्टाटा क्रमांक ४.

(५) द पॅशन : ही ओरेटोरियोसारखीच रचना असते, पण हिची लांबी जास्त असते. यात सहसा येशू ख्रिस्ताच्या अखेरच्या दिवसांची कहाणी सांगितलेली असते. उदा. बाखची प्रसिद्ध ‘सेन्ट मॅथ्यू पॅशन.’

(६) द लीड : कलात्मक गाण्यासाठीची ही जर्मन संज्ञा! (अनेकवचन ‘लीडर’) मराठीत याचा अर्थ ‘गीत’ हा आहे. शुबर्ट या जर्मन रचनाकाराने अनेक ‘लीडर’ लिहिली आहेत.

नोटेशन पद्धती : ही पद्धती हे पाश्चात्त्य संगीताचे एक अद्वितीय आणि अविभाज्य अंग असून, यामुळे हे संगीत इतर संगीतापेक्षा वेगळं ठरतं. संगीत लिपीबद्ध करण्याची ही अचूक व्यवस्था इटालियन संगीतकार, शिक्षक आणि धर्मोपदेशक ग्विडो डी आरेझ्झो याने इ. स. १००० च्या सुमारास विकसित केली. ग्विडोच्या या क्रांतिकारी शोधाचे महत्त्वाचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले..

(१) कोणाही एका व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर विसंबून राहण्याची गरज संपली. संगीत आता लिहिता येऊ लागलं. त्यामुळे त्याचा शिक्षणासाठी आणि भविष्यातील कार्यक्रमांसाठी मोठय़ा प्रमाणात वापर केला जाऊ लागला.

(२) यामुळे गायक आणि वादक या कलाकारांसारखीच ‘संगीतरचनाकार’ या नव्या सांगीतिक श्रेणीची निर्मिती झाली. संगीतरचनाकार आपली संगीतरचना ही अतिशय विकसित असलेल्या नोटेशन पद्धतीमध्ये लिहितो. यालाच ‘स्कोअर’ (Score) असे म्हणतात. याबरहुकूम वादक/ गायक ती रचना सादर करतात. ऑर्केस्ट्रा कंडक्टर हा त्या नोटेशनबरहुकूम सादरीकरणाची दिशा आणि गती नियंत्रित करतो. कागदावर चार किंवा  पाच आडव्या ओळींचा समूह असतो. त्यावर हे संगीत लिहिलं जातं. या ओळींना ‘स्टाफ’ (अनेकवचन : स्टाव्ह) असं म्हणतात आणि त्यावरूनच त्याचं नाव ‘स्टाफ नोटेशन’ असं पडलं आहे. वादकाला त्या रचनेत असलेल्या संगीताच्या तीन मूलभूत महत्त्वाच्या गोष्टींची माहिती कुठलाही ‘स्कोअर’ देत असतो. त्या तीन गोष्टी अशा : (१) ही रचना कुठल्या कुठल्या स्वरात (ज्याला संगीताच्या परिभाषेत ‘tonic’ म्हणतात.) वाजवायची आहे. उदा. सी, सी शार्प, इ फ्लॅट, ए इत्यादी. (२) ती रचना कोणत्या लयीत वाजवायची आहे- ज्याला ‘टेम्पो’ म्हणतात. उदा. अ‍ॅडाजियो (अति-विलंबित), लागरे (विलंबित). (३) कुठे जोरकस वाजवायचं आणि कुठे हळू किंवा नाजूकपणे वाजवायचं याच्या सूचना पुढील संज्ञांनी निर्देशित केल्या जातात. उदा. फोर्टे, फोर्टिसिमो आणि पियानिसिमो.

रवींद्रनाथ टागोरांच्या पुतणी इंदिरादेवी चौधुरानी (१८७३-१९६०) या स्टाफ नोटेशनचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या भारतीय होत. गुरुदेवांच्या सुमारे २०० गाण्यांचे त्यांनी स्फाट नोटेशन करून ठेवले आहे. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण तर घेतले होतेच; शिवाय लंडनच्या प्रसिद्ध ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा डिप्लोमादेखील मिळवला होता.

भारतीय शास्त्रीय संगीत परंपरा ही अनेक शतकांपासून मौखिक परंपरा म्हणून चालत आलेली आहे. पण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस/ विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे चित्र बदलले. प्रथम मौला बक्ष (१८३३-१८९६) आणि नंतर हिंदुस्थानी संगीतातील दोन महान विष्णू.. म्हणजे विष्णू नारायण भातखंडे (१८६०-१९३६) आणि विष्णू दिगंबर पलुस्कर (१८७२-१९३१) यांनी स्वत:च्या संगीत लिपी अस्तित्वात आणल्या. दक्षिणेकडे ए. एम. चिन्नास्वामी या अग्रगण्य संगीतकाराने स्वत:ची संगीत लिपी विकसित केली. ते ख्रिश्चन होते. ‘Oriental Music in staff  Notation’ या १८९३ सालच्या त्यांच्या महत्त्वाच्या पुस्तकात ही पद्धत दिलेली आहे.

पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घेणं आवश्यक आहे. आपलं संगीत हे ‘उपजप्रधान’ आहे. त्यामुळे त्याच्या सादरीकरणासाठी पाश्चात्त्य नोटेशन पद्धती फारशी उपयोगी नाही. पण आपल्या गुरू-शिष्य परंपरेला आता उतरण लागली असल्याने या पद्धतीला pedagogical tool (शैक्षणिक साधन) म्हणून नव्याने महत्त्व प्राप्त होत आहे.

शब्दांकन : आनंद थत्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 1:06 am

Web Title: difference between western and indian music sangte aika dd70
Next Stories
1 सूर सुखनिधान!
2 तुम्ही काहीही म्हणा..
3 हास्य आणि भाष्य : प्रतिमा आणि प्रतिभा
Just Now!
X