डॉ. नीता ताटके neetatatke@gmail.com

खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात असल्याने त्यांच्या सार्वजनिक वर्तनावरही सर्वाचे लक्ष लागून राहिलेले असते. जितका खेळाडू लोकप्रिय, तितकी त्याच्यावर लोकांची घारीची नजर असते. त्यामुळे त्यांच्या खेळातील कौशल्याबरोबरच सामाजिक वर्तणुकीचीही चिकित्सा होते.  त्यामुळेच त्यांनी समाजात वावरताना तारतम्याने वागणे आवश्यक असते.

पुराणातली ही बऱ्याच वेळा ऐकलेली गोष्ट.. भस्मासुर नावाच्या राक्षसाला पृथ्वीतलावर सर्वात बलवान बनण्याची लालसा उत्पन्न होते. असं म्हणतात की, त्याच्या कठोर तपश्चर्येनं कैलास पर्वत हलायला सुरुवात होते. शेवटी भगवान शंकर त्याला दर्शन देतात आणि वर मागायला सांगतात. अमरत्व मिळवण्याच्या लालसेने ‘मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होऊन जाईल’ असा वर द्यावा अशी भस्मासुर मागणी करतो. भगवान शंकर ‘तथास्तु’ म्हणताक्षणी भस्मासुर भगवान शंकरांवर उलटतो आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना नष्ट करण्यासाठी त्यांच्या मागे लागतो. भगवान शंकरांवर लपून बसण्याची वेळ येते. भस्मासुराच्या छळाला, उन्मादाला आवर घालण्यासाठी शंकर विष्णूला पाचारण करतात. विष्णू मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला सामोरे जातात. मोहिनीच्या सौंदर्याने भस्मासुराचे भान हरपते आणि तो मोहिनीला लग्नाची मागणी घालतो. ‘मी एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे आणि चांगले नृत्य करणाऱ्या पुरुषाशी मी विवाह करीन,’ असे मोहिनीने सांगितल्यावर भस्मासुर मागचा-पुढचा विचार न करता तिच्याकडे नृत्य शिकण्याची तयारी दर्शवतो. ‘मी करते तशा हालचाली कर,’ असे सांगून मोहिनी विविध पदन्यास करायला सुरुवात करते आणि भस्मासुर तिचे अनुकरण करायला लागतो. भस्मासुराला नृत्यात गुंतवताना मोहिनी मधेच स्वत:च्या डोक्यावर हात ठेवते. आपले भान विसरलेला भस्मासुरही स्वत:च्या डोक्यावर हात ठेवतो आणि क्षणार्धात भस्मसात होतो. उन्माद आणि मोहाच्या भरात सारासार विवेकबुद्धी विसरलेला भस्मासुर आपल्या हातानेच मृत्यू ओढवून घेतो. कृती करताना विसरलेले तारतम्य भस्मासुराला मृत्यूकडे घेऊन जाते.

पुराणातली ही कथा राहून राहून आठवत होती ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ा आणि के. एल. राहुल यांची मुलाखत बघताना! खरं तर लाखो लोक बघत असलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात त्यांना झळकण्याची, स्वत:चे ‘ब्रँडिंग’ करण्याची उत्तम सुवर्णसंधी होती. आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा तो एक उत्तम राजमार्ग होता. मात्र, या दोघांनी या सुवर्णसंधीची माती केली आणि अत्यंत अभिरुचीहीन वक्तव्यांनी व देहबोलीने त्यांनी स्वत:ची प्रतिष्ठा तर घालवलीच; शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतूनही त्यांना डच्चू मिळाला आणि स्वत:वर बंदी घालून घेण्याची नामुष्कीही त्यांनी ओढवून घेतली. विचार व वक्तव्यामध्ये नसलेले तारतम्य त्यांच्या उभरत्या कारकीर्दीला चाप घालून गेले.

खेळाडू, कलाकार वा सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींबद्दल लोकांच्या मनात एक वेगळे कुतूहल असते. या व्यक्तींच्या खासगी आयुष्यात डोकवायला लोकांना आवडते. प्रसिद्धी मिळायला लागली, जरा नाव व्हायला लागलं की या मंडळींनासुद्धा लोकांच्या नजरेत राहायला आवडायला लागते. बऱ्याचदा ती एक गरज बनून जाते. प्रत्येकाला स्वत:चं असं एक खासगी आयुष्य असतं. मात्र, प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात हे खासगीपण जपण्यापेक्षा त्यांचं आयुष्यही सार्वजनिक होण्याकडे कल वाढायला लागतो आणि मग लोकांच्या नजरेत राहण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांचा वापर व्हायला सुरुवात होते. ‘या आठवडय़ातील माझा तंदुरुस्तीचा मंत्र’, ‘माझा आहार’, ‘सण साजरा करण्याचे माझे विचार / माझी पद्धती’ या व अशा अनेक विषयांवर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवर भाष्य केले जाते. या व्यक्तींच्या चित्रफिती झपाटय़ाने ‘व्हायरल’ होतात. त्यामुळेच की काय, वैयक्तिक आयुष्य व सामाजिक आयुष्य यांच्यातील सीमारेषा धूसर व्हायला लागते. प्रसिद्धीचा एक उन्माद चढायला लागतो आणि एका बेसावध क्षणी अशांचा पाय घसरतो.

या मुलाखतीची दखल घेत बी. सी. सी. आय.ने लगेचच या खेळाडूंवर बंदी आणण्याची कारवाई करायला सुरुवात केली. क्रिकेटपटूंनी खेळाशी संबंधित नसलेल्या कार्यक्रमात भाग घेऊ नये अशी सूचनाही काढली. या खेळाडूंवर येऊ  घातलेल्या कारवाईवर उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, यानिमित्ताने माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. खेळाडूंना खेळ शिकवला जातो, खेळाचे बारकावे शिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण बघतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना शिकवणाऱ्या प्रशिक्षकांमध्येही तंदुरुस्ती व व्यायामासाठी वेगळा प्रशिक्षक, खेळातील विविध कौशल्ये शिकवण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षक, त्याबरोबरच फिजिओथेरेपिस्ट, आता तर वेळप्रसंगी मानसतज्ज्ञ या सगळ्यांची फौज असते. खेळाडू, त्याचे प्रशिक्षक, पालक, त्यांना प्रायोजित करणाऱ्या संस्था आणि समाजातील अनेक व्यक्ती व घटक या खेळाडूंचा खेळ दर्जेदार व्हावा यासाठी झटत असतात, मेहनत घेत असतात. मात्र, खेळाडूंना खेळाच्या अनुषंगाने मिळणारी प्रसिद्धी, त्यांच्यासमोर मोहात पाडणारे आलेले प्रस्ताव, क्वचित प्रसंगी मनोभंग करणारे प्रसंग यांना तोंड देण्याची क्षमता वाढवणारे काहीएक प्रशिक्षण त्यांना दिले जाते का? आणि खेळाडूंना खरोखरच अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का?

अमेरिकेतील एका प्रसिद्ध बास्केटबॉलपटूची एकदा मुलाखत बघताना खेळाडूंचा कस हा केवळ खेळतानाच नव्हे, तर इतर वेळीही कसा लागतो याची झलक पाहायला मिळाली होती. त्याने सांगितले, ‘‘आमची खेळाची स्पर्धा संपली की एका विशिष्ट उत्तेजित अवस्थेत आम्ही असतो. जिंकलो की शरीराबरोबर मनावरही एक उन्माद चढलेला असतो. आणि हरलो तरी मनाची एक विचित्र उत्तेजित अवस्था असते. स्पर्धा संपल्यावर आमच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडलेला असतो. त्यात बऱ्याचदा मुलीही असतात. आमच्याशी जवळीक साधत त्या हॉटेलपर्यंत येतात. आमच्याबरोबर खोलीत येण्याचीही त्यांची तयारी असते. अशावेळी आमचा बळी जाण्याची खूप शक्यता असते. क्वचित प्रसंगी असा समोर आलेला मोहमयी प्रसंग टाळावा असे आम्हाला वाटत नाही,’’ अशी प्रांजळ कबुली त्या खेळाडूने दिली होती.

तसं बघायला गेलं तर मूल्यशिक्षण हा खेळाचा एक भाग आहेच. खेळांच्या स्पर्धेत ते आवर्जून जाणवतेही. आपण जिंकलो वा हरलो तरी प्रतिस्पर्धी खेळाडू व पंचांशी हात मिळवणे, पंचांनी दिलेला निर्णय मान्य नसला तरीसुद्धा तो खुलेपणाने स्वीकारणे, खिलाडूवृत्ती अंगात बाणवणे या बाबी खेळाच्या अनुषंगाने आपसूकच शिकल्या जातात. मात्र, खेळाडूंना इतर अनेक बाबींचे शिक्षण द्यायला आपण कमी पडत आहोत, हे नक्की.

अर्थात पूर्वी कुठे होते हे फॅड? एक-दोन खेळाडू वेडेवाकडे वागले तर सर्वाना दावणीला बांधायचे काय कारण? आणि फक्त खेळाडूंनीच चांगल्या वर्तणुकीचा मक्ता घेतला आहे का? असे प्रशिक्षण द्यायचे झाले तर कोण तयार करणार याचा अभ्यासक्रम? समजा, असे प्रशिक्षण दिले गेले, तर ते कुठे, कोणाला आणि केव्हा दिले जावे? असे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. यावर मतभिन्नता होऊन अनेक मुद्दे/ चर्चा/ वाद/ युक्तिवाद मांडले जाऊ शकतात.

सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू आपले खासगी जीवन अतिशय संयमाने जपतो. आपल्या मुलांबरोबर एका प्रदर्शनाच्या रांगेत उभा राहणारा राहुल द्रविड आपली खेळाडू म्हणूनची प्रसिद्धी आपल्या वैयक्तिक जीवनात वापरत नाही. अगदी आपला कट्टर शत्रू आहे अशी भावना ज्या देशाबद्दल- पाकिस्तानबद्दल बाळगली जाते, त्या देशाच्या क्रिकेटपटूशी विवाह करूनही कोणत्याही खासगी बाबतीत वृत्तपत्रे वा इतर प्रसिद्धी माध्यमांत न झळकलेली सानिया मिर्झा.. ही आणि अशी अनेक उदाहरणे या खेळाडूंकडे असलेले तारतम्य दाखवून देतात. हे खेळाडू कुठल्या प्रशिक्षण वर्गाला गेले होते?

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत जिंकल्यावर आपली रॅकेट फेकून देत विजय साजऱ्या करणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनपेक्षा नम्रपणे तिची रॅकेट तिच्या हाती देणाऱ्या पी. व्ही. सिंधूने प्रेक्षकांची मने जिंकली होती. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही १०० मीटर स्पर्धेचा बादशहा उसेन बोल्टला हरवून प्रथम आलेल्या जस्टिन गॅटलिनची गुडघ्यावर बसून बोल्टला अभिवादन करण्याची कृती त्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. ही विनम्र मानसिकता तयार करणं, ही आज काळाची मोठी गरज आहे.

खेळांमध्ये पैसा आल्यावर मोठमोठे खेळाडू या अर्थकारणाला बळी पडलेले, फिक्सिंगमध्ये अडकलेले आणि थोडय़ा यशाने हुरळून आपली कारकीर्द बरबाद करताना दिसतात. खेळाडूची कारकीर्द ही काही वर्षांचीच असते. आता हेच बघा ना, आयपीएलच्या १२ व्या मोसमासाठी झालेल्या लिलावात एकेकाळी १६ करोड रुपयांची बोली लागलेल्या युवराज सिंगला कोणीही घ्यायला तयार नव्हते. शेवटी त्याला फक्त एक कोटी रुपयांत मुंबई इंडियन्सने खरेदी केले. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या आणि त्यात पहिले शतक ठोकणाऱ्या ब्रॅण्डन मॅक्लम, वेगवान गोलंदाजीचा बादशहा असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन यांना कोणत्याही संघाने विकत घेतलं नाही. एकेकाळी आयपीएलचे किंग असलेले, करोडोच्या किमतीत विकत घेतल्या जाणाऱ्या या खेळाडूंना आज कोणीही विकत घेतले नाही. आजच्या घडीला या खेळाडूंची किंमत शून्य आहे. मग यापैकी कोणते खेळाडू निवृत्तीनंतर जनमानसावर अधिराज्य करू शकतील? सजगपणे आजूबाजूला बघितले तर खेळाबरोबरच चारित्र्यसंपन्न असलेल्या खेळाडूंना लोकमान्यता व आदर मिळतो असे दिसून येते.

तारतम्य हा खेळ आणि आयुष्याचा गाभा आहे. यशस्वी व्यक्तींसंबंधात केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्या व्यक्तींची भावनिक बुद्धिमत्ता जास्त, त्या व्यक्ती यशस्वी तर होतातच आणि उत्तम दर्जाचे आयुष्यही जगतात. इतर अनेक घटकांबरोबर उत्तेजना व मोहावर ताबा हा भावनिक बुद्धिमत्तेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि योग्य प्रशिक्षणाद्वारे तो वाढवता येतो हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

आज दुर्दैवाने घर, शाळा आणि महाविद्यालये मूल्यशिक्षण देण्यात कमी पडत आहेत. खेळाचा जनमानसावर खूप मोठा पगडा आहे. या माध्यमातून मूल्यशिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात झाली तर समाजात नक्कीच सकारात्मक फरक पडू लागेल. खेळातील शिस्त, सातत्य याला जोड देऊन आजच्या अत्यंत आव्हानात्मक व स्पर्धात्मक वातावरणात, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे बदललेल्या परिमाणात खेळाडूंच्या प्रशिक्षकांच्या यादीत एखादा वर्तणूक प्रशिक्षकही असायला हरकत नसावी. हो ना?

(लेखिका क्रीडा मानसतज्ज्ञ आहेत.)