16 January 2021

News Flash

झाली घंटा.. आता शाळा सुरू!!

अगदी परवाच ‘थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार’ लागली. आणि सगळ्या खिडक्या-दरवाजे बंद असतानाही पहिल्या पावसाबरोबर येणारा तो कोणत्याही अत्तरापेक्षा धुंद करणारा

| June 16, 2013 12:41 pm

अगदी परवाच ‘थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार’ लागली. आणि सगळ्या खिडक्या-दरवाजे बंद असतानाही पहिल्या पावसाबरोबर येणारा तो कोणत्याही अत्तरापेक्षा धुंद करणारा मृद्गंध श्वासात भरून गेला. वाटलं- हा गंध बाहेरून आलेला नाही. हा असतोच मनात.. स्मरणात साठवलेला. पाऊस फक्त ते सारं जागवतो. आणि अगदी असाच श्वासात भरून राहिलेला एक गंध गेली कित्येक र्वष जून महिन्यामध्ये माझ्या मनात दरवळतो. नवीन वह्य़ा- पुस्तकांचा गंध. नवीन कोरी वही आणि नव्या इयत्तेची पुस्तकं यांचा गंध श्वासांत, स्मरणात खोलवर साठवला गेला आहे. फक्त माझ्याच नाही; आपल्या सगळ्यांच्याच!!
नवीन कोरे गणवेश.. नवी नवी दप्तरं याची खरेदीची धामधुम आता संपत आलीये. घराघरांत आई-बाबा वह्य़ा-पुस्तकांना कव्हर घालण्यात मग्न आहेत. यंदाचं माझं दप्तर आणि डब्याची बॅग कसली ‘भारी’ आहे, यावर चिमुकल्यांची चर्चा चालू आहे. हासुद्धा एक ऋतूच! कोणत्याही ऋतूइतकाच खास!! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो ओसरल्यावर पुन्हा पुन्हा आठवत राहणारा. रिक्षावाले काका तयारीला लागले आहेत. शाळा-शाळांत पुन्हा एकदा वर्दळ दिसायला लागली आहे. आणि सगळ्या शाळा जणू हात पसरून मुलांच्या स्वागतासाठी तयार आहेत..
आज-उद्यात कोरे गणवेश घातलेली, नवीन बूट, नवीन रेनकोट घातलेली मंडळी रस्त्यातून जाताना दिसायला लागतील. आणि मग हा ‘शाळा’ ऋतू अगदी जोरात सुरू होईल, तो अगदी वर्षभरासाठी!
‘शाळा’ हा विषय सगळ्यांच्या हृदयाच्याही हृदयातला! एरवी कितीही गंभीर चेहरे करून ‘जीवनाविषयीचे दृष्टिकोन’ वगैरे मांडणारी मंडळी शाळेतल्या मित्रांबरोबर बोलताना खूप वेगळी, खूप ‘खरी’ जाणवतात. पहिल्या बाकावरच्या हुशार, अभ्यासू मुलांइतकीच शेवटच्या बाकावरच्या मुलांनाही तितक्याच प्रेमाने कुशीत घेणारी शाळा..
‘पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनि कुशीत यावे, अन् पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे’ असं ती वाटायला लावते. खरोखरच आईच्या पदराखाली मिळणाऱ्या ‘अभया’इतकीच सुरक्षित वाटते ती ‘शाळा’!
‘मधली सुट्टी’च्या निमित्ताने इंटरनॅशनल स्कूलपासून जिल्हा परिषदेच्या शाळांपर्यंत सगळीकडे समान धागा जाणवला तो निरागसतेचा, खरेपणाचा! खरोखर, ‘सरळ’ असणाऱ्या या कोऱ्या मनांना आपणच सगळे मिळून उगाचच ‘वळण’ लावतो आणि त्यांनाही आपल्यासारखे हिशोबी करून टाकतो. आडनाव, आर्थिक परिस्थिती, वडिलांचा हुद्दा, राहण्याची जागा अशा कोणत्याही गोष्टींचा विचार न करता मैत्री केली जाते ती फक्त शाळेत. दुसऱ्याच्या यशाला मनापासून टाळ्या वाजवल्या जातात त्या शाळेतच. आणि ‘आमच्या वर्गातला हा मुलगा गणितात तुमच्यापेक्षा सॉलिड हुशार आहे,’ असं वडिलांना अभिमानाने सांगितलं जातं तेही शाळेतच! मुळात यशाच्या डोंगरावर प्रत्येकासाठी एक झाड असतंच. आणि दुसऱ्याला ते आधी सापडलं तर त्याचं अभिनंदन करावं आणि त्याच्या मदतीने आपलं यशाचं झाड शोधावं, इतकी साधी-सोपी दीक्षा शाळेत दिली जाते. आपल्यापेक्षा वयाने, मानाने मोठी व्यक्ती आल्यावर वाटणारा आदर आणि दरारा या  गोष्टीसुद्धा शाळेतच मनात पक्क्य़ा होतात.
भूतलावर कुठेही शाळेतले मित्र एकत्र भेटले की जणू जादूची कांडी फिरवावी असे वेगळे दिसायला लागतात. आणि मग सुरू होतात ‘आठवणी’.. गॅदरिंगमधली फजिती.. ‘ते’ सर कसे बोलायचे!!!.. ‘ती’ मुलगी आता काय करते?.. ‘त्या’ बाई किती प्रेमळ होत्या ना?.. अशा असंख्य क्षणांना पुन्हा एकदा श्वास मिळतो. मोठमोठय़ा पदांवर असणारी मंडळी पुन्हा एकदा एकमेकांना ‘वाश्या’, ‘बंडू’, ‘ज्ञानू’, ‘अंद्या’ म्हणताना दिसतात. छोटे छोटे किस्से आठवताना डोळ्यांत पाणी येईपर्यंत आपण हसत राहतो. दरवेळी तेच किस्से आठवूनही आपल्याला कंटाळा मुळीच येत नाही. आणि कधी कधी डोळ्यातलं पाणी हसून हसून आलंय, की हे ‘क्षण’ खूप मागे पडले म्हणून- हेसुद्धा समजत नाही.
आता घंटा वाजेल. नवीन गणवेश घातलेली मुलं-मुली हात जोडून प्रार्थनेला सुरुवात करतील. मधली सुट्टी होऊन डब्याची वाटावाटी होईल. मग स्पर्धा, सण, उत्सव, परीक्षा, गॅदरिंग.. कधी शिक्षा, तर कधी वर्गाची सहल.. सगळंच खूप निरागस, खरं आणि हवंहवंसं!!
आपणही क्षणभर थांबून, डोळे मिटून हा ‘शाळा’ ऋतू आठवू या. मग परत श्वासात जाणवेल तो कोऱ्या वह्य़ा-पुस्तकांचा गंध. आपला वर्ग आठवेल. आपल्या शाळेची प्रार्थना. आपला बालवाडीतला ‘आई, तू पण ये!!’ असं रडत शाळेत शिरलेला पहिला दिवस. आणि दहावी झाल्यावर डोळे पुसत पावलांनी शाळेतून बाहेर पडतानाचा शेवटचा दिवस!!   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2013 12:41 pm

Web Title: dr salil kulkarni sharing his school memories
Next Stories
1 आत्महत्या : असंवेदनशीलतेची परिणती
2 दक्षिणेतील नवग्रह मंदिरे
3 मेघा छाये…
Just Now!
X