डॉ. संजय ओक

जीवन आणि मृत्यू या दोन संकल्पनांवरील लेख अनेक वाचकांना सुन्न करून गेला. हे वास्तव आहे, पण त्याचा स्वीकार वेदनाकारक आहे अशा प्रतिक्रिया आल्या. ‘‘सर, तुमच्याकडून आम्हाला सकारात्मक ऊर्जा हवी आहे,’’ अशी विनंतीवजा आज्ञाही आली आणि मी विचार करू लागलो. सकारात्मकता स्वर्गातून टपकणार नाही, तर प्रयत्नपूर्वक तिचे सिंचन करावे लागेल. समाजात काही नवे प्रकल्प, योजना राबवाव्या लागतील. मनावर फुंकर मारायची तर फुफ्फुसातून तोंडात हवा भरावीच लागेल. काय करावे, या विचारचक्रात गुरफटलो असतानाच क्रांतीचा ई-मेल आला..

क्रांती रायमाने माझा अनेक वर्षांचा सहकारी.  व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या क्रांतीने माझ्याबरोबर अनेक वष्रे सामाजिक आरोग्य व्यवस्थांमध्ये काम केले आहे. क्रांतीने एका नव्या संकल्पनेसाठी मला निरोप पाठवला होता..  ‘नॅशनल कोविड मेमोरिअल’ संकल्पना डिजिटल स्वरूपात अस्तित्वात येणार होती.  ‘‘सर, तुम्ही याचे आधारव्यक्ती (Patron) व्हाल का?’’ मी तात्काळ होकार कळवला. आज ही संकल्पना ‘लोकरंग’च्या माध्यमातून सर्वदूर पोहोचविण्यासाठीच हा लेख..

करोनाच्या काळात अनेकजण मृत्युमुखी पडले. काही ज्ञात, काही सर्वज्ञात, तर काही अज्ञात. एखादी ओळखीची व्यक्ती गेली तर आपण अंत्ययात्रेत सहभागी होतो, तिचे शेवटचे दर्शन घेतो, पुष्पांजली वाहतो. या सगळ्या गोष्टींना करोनाने पूर्णविराम दिला. मृत्यू अचानक आणि अवेळी तर आलाच, पण तो एकाकी आणि अज्ञातवासाचे पांघरूण घेऊन आला. गेलेल्या व्यक्तीच्या फक्त आठवणी मागे उरल्या. खूप काही करायचे, बोलायचे राहून गेले. ही रुखरुख मागे उरलेल्यांना आयुष्यभर छळणार होती.

‘गेले द्यायचे राहुनि

तुझे नक्षत्रांचे देणे..’

..साधा दिवा लावता आला नाही, फुलं वाहता आली नाहीत. कळ्या मनातच कोमजल्या.

अशा सगळ्या कळ्यांना उमलण्याची संधी देणारी संकल्पना म्हणजे ‘नॅशनल करोना मेमोरिअल’! ‘मेमोरिअल’ हा वास्तविक पाहता इंग्रजी भाषेमधला एक भारदस्त शब्द. मी अनेक वर्षांपूर्वी वॉशिंग्टन मेमोरिअलचा स्तंभ पाहिला होता. आपल्या देशाच्या सीमांवर उभारलेली वॉर मेमोरिअल्स पाहिली होती. मेमोरिअल हे खरं तर लोकोत्तर कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ बांधले जाते. त्याची उंची किंवा कळस गगनाला स्पर्श करतो आणि त्या व्यक्तीच्या कार्याचे प्रतीक बनून राहतो. इथे कोविड केअर नेटवर्क (https:\\nationalcovidmemorial.in) जनसामान्यांना अजरामर करण्याची संकल्पना राबवीत होते. पण आज त्याची गरज होती.

या संकल्पनेत प्रत्यक्षात कुठे काय उभे राहणार? हे सगळे Virtual (आभासी)!  वास्तव आणि वर्तमानाशी फारकतलेले. बांधायचे काहीच नाही, फक्त पडद्यावर चित्रनिर्मिती करायची. माझ्या मते, आभास हेच यापुढे एक वास्तव होणार आहे. आपण व्हच्र्युअल वाङ्निश्चय पाहिले, विवाहांना उपस्थिती लावली, शोकसभांमध्ये मनोगते व्यक्त केली. आता Virtual च्या माध्यमातून त्या अभागी व्यक्तींना अजरामर करण्याची ही संधी आपण स्वीकारायला हवी.

गेलेल्या व्यक्तीचे नाव, फोटो, तिचे जीवन, तिने केलेले कार्य, नातलग आणि तुमचे त्या व्यक्तीबरोबरचे महत्त्वाचे क्षण आणि आठवणी या साऱ्यांची साठवण म्हणजे हे मेमोरिअल असेल. करोनाचा प्रतिकार ही जर आपली राष्ट्रीय लढाई असेल, तर या पुण्यात्म्यांचे स्मरण हे मेमोरिअलच्या स्वरूपात बांधायला नको का? काही कायदेशीर कागदपत्रांच्या प्रती आणि १०० टक्के सत्यता यावर हे आधारित आहे. कोणतीही फी नाही.

मेमोरिअलच्या वेबपेजमध्ये गत व्यक्तीच्या स्मरणचित्राला फुले वाहण्याचा, पणती लावण्याचा, मेणबत्ती प्रज्ज्वलित करण्याचा विकल्प असेल. आभासी अनुभूतीमध्ये किती ताकद आहे हे आपल्याला करोनाने गेल्या दीड वर्षांत दाखवून दिलेच आहे. यामुळे आज पाठीमागे उरलेल्या तुमच्या-माझ्यासारख्या अनेकांना मोकळे होण्याची संधी मिळेल. मनावरचा भार थोडाफार तरी हलका होईल. जेव्हा पाहिजे तेव्हा त्या गत व्यक्तीच्या आयुष्यात डोकावण्याची संधी उपलब्ध होईल. हा सारा आभास मागे उरलेल्यांचे जीवन सुस करेल.

कोलकात्याहून डॉ. अभिजीत चौधरी या जगविख्यात गॅस्ट्रोएन्ट्रॉॅलॉजिस्टने मांडलेली ही संकल्पना आम्ही अनेकांनी उचलून धरली आहे. त्यात टास्क फोर्सचे सदस्य आहेत आणि चंदिगढ, चेन्नई, दिल्ली येथील अनेक पत्रकार मित्र आहेत. ‘द हिंदू’चे एन. राम आहेत. ही चळवळ नाही, याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. राजाश्रय तर मुळीच नाही. ही लोकांनी, लोकांसाठी बांधलेली आभासी स्मरणगाथा आहे. माझी वाचकांना एवढीच विनंती आहे की, आपणही https:\\nationalcovidmemorial.in ला भेट द्या आणि आपल्याही एखाद्या गत सुहृदाच्या स्मृतींना एक पान वाहून त्या व्यक्तीस अजरामर करा. यामुळे गत आत्म्याला तर शांती लाभेलच, पण तुम्हालाही अपूर्णतेतून पूर्णत्वाकडे मार्गक्रमणा केल्याचे समाधान लाभेल.

आभासी विश्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित होईल.

sanjayoak1959@gmail.com