06 July 2020

News Flash

परवडू लागण्यास कारण की..

एकेकाळी श्रीमंतांपुरता सीमित असलेला मोबाइल आता आम आदमीपर्यंत पोहोचला आहे. केवळ पोहोचला नाही, तर त्यांना तो परवडूही लागला आहे.

| December 7, 2014 01:03 am

एकेकाळी श्रीमंतांपुरता सीमित असलेला मोबाइल आता आम आदमीपर्यंत पोहोचला आहे. केवळ पोहोचला नाही, तर त्यांना तो परवडूही लागला आहे. केंद्रातील वाजपेयी सरकारच्या काळात रिलायन्सच्या ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ जाहिरातीने व त्यांनी देऊ केलेल्या स्वस्त दरांमुळे सर्वसामान्यांच्या हातात मोबाइल आला. पुढे मोबाइल कंपन्यांमधील तीव्र स्पध्रेमुळे घरटी किमान चार मोबाइल हे दृश्य आज आढळते.
मोबाइलवर इंटरनेट आणणे ही संकल्पना रिलायन्सच्या आधी काही कंपन्यांनी सुरू केली असली तरी त्यांच्यामुळे ती परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाली. यानंतर मोबाइल नेटवर्क बाजारातील स्पर्धा वाढली आणि मोबाइलवरून फोन करणे आणि इंटरनेट वापराचे दर कमी होऊ लागले. पुढे स्मार्टफोनचा धमाका सुरू झाला. त्यात फोन करण्याबरोबरच इंटरनेटचा प्रभावी वापर करणे शक्य होते. पुढे मोबाइलमध्ये विविध अ‍ॅप्सचा उदय झाला. पण विदेशी कंपन्यांनी अँड्रॉइड ओएसवर आधारित जी उपकरणे बाजारात आणली, ती अल्प उत्पन्नदारांना परवडणारी नव्हती. त्यामुळे अनेक देशी कंपन्या स्मार्टफोन्सच्या स्पध्रेत उतरल्या आणि त्यांची किंमतही दीड हजारापर्यंत खाली आली. या सगळ्यामुळे हे फोन सामान्यांना परवडू लागले. त्यावर इंटरनेटचा वापर करता येऊ लागल्याने त्याच्या जोडीला फोन करणे इथपासून ते संदेशवहनासाठी विविध पर्याय उपलब्ध झाले. व्हॉट्सअ‍ॅप या अ‍ॅपने तर मोफत संदेशवहन सुरू केले आणि या क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली. परिणामी अल्पावधीतच लघुसंदेशाची जागा या अ‍ॅपने घेतली. तरीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात इंटरनेट उपलब्ध नव्हते. परंतु मोबाइल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांमध्येही मोठी स्पर्धा निर्माण झाली आणि मोबाइल इंटरनेटचे दर कमी होऊ लागले. हे दर इतके कमी झाले, की लोकांना आज अगदी सात रुपयांपासून रिचार्ज उपलब्ध आहेत. यामुळे ग्रामीण भागातील तरुणही मोबाइलचा मुक्तपणे वापर करू लागले आहेत. संगणकावर मर्यादित असलेले फेसबुक-ट्विटरसारखे समाजमाध्यम मोबाइलवरून वापरणे शक्य झाले आहे. आज ज्या गावांत ब्रॉडब्रँड इंटरनेट पोहोचलेले नाही त्या गावांत मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचणे शक्य झाले आहे. सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, देशभरात ९३ कोटी दोन लाख दोन हजार २० मोबाइलधारक आहेत. यातील ३८ कोटी २५ लाख मोबाइलधारक हे ग्रामीण भागातले आहेत. मोबाइल नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या महाराष्ट्र वर्तुळात ही संख्या सात कोटी ४७ लाख ८५ हजार ४३९ इतकी आहे. मोबाइल कंपन्यांनी देऊ केलेल्या विविध ऑफर्स आणि प्लॅन्समुळे मोबाइलधारक वाढले यात शंकाच नाही. अनेक कंपन्या पहिल्यांदा इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी मोफत इंटरनेट वापराचे धडेही देतात. तसेच सात रुपयांपासून रिचार्ज उपलब्ध असल्याने एक दिवसासाठी इंटरनेट वापरून ते पुन्हा बंद ठेवणे तसेच लागेल तेव्हा पुन्हा तात्पुरते रिचार्ज करून इंटरनेट सुरू करणे असे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. इतकेच नव्हे तर काही कंपन्यांनी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारखे तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले अ‍ॅप महिन्याला ९९ रुपये भरले की अमर्याद वापरासाठी खुले केले आहे. येत्या काळात येणारे  फोर-जी हे थ्री-जी पेक्षाही स्वस्तात उपलब्ध होणार आहे. या क्रांतीमुळेच मोबाइल तरुणांच्या ‘रेंज’मध्ये आले आणि त्याचा ते अमर्याद वापर करू लागले आहेत.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2014 1:03 am

Web Title: each one holds mobile phone now
टॅग Social Media
Next Stories
1 ‘व्यक्त’ होण्याचा भीषण नाद
2 विनयसर!
3 ‘सुलभ’ जाहली स्वच्छतागृहे..
Just Now!
X