14 August 2020

News Flash

अफसाना लिख रही हूँ.. : ‘एक अकेला इस शहर में..’

एक घरटं! एका घरटय़ासाठी काय लागतं? चिमणाचिमणीच्या पंखातली ताकद, पिसे, तनसडी, काडय़ा जमवणं.. एका उमेदीनं ते उभारणं!

आयतं घर आणि कष्टानं उभारलेलं घरटं यात फरक असतो.

मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

दो पंछी, दो तिनकें, कहो ले के चले है कहां?

हम बनायेंगे एक आशियॉं..

एक घरटं! एका घरटय़ासाठी काय लागतं? चिमणाचिमणीच्या पंखातली ताकद, पिसे, तनसडी, काडय़ा जमवणं.. एका उमेदीनं ते उभारणं! आयतं घर आणि कष्टानं उभारलेलं घरटं यात फरक असतो. त्यात ऊब असते, एकमेकांच्या कष्टाबद्दल आदरही.. आणि मुळात सगळ्यात मोठी शक्ती असते ती प्रेमाची.. तीच हिरावून घेतली गेली तर? खरंच लळा, जिव्हाळा हे शब्द खोटेच आहेत? कुणी कुणाचं नाहीच?

मुंबईसारख्या शहरात- जिथे प्रेमसुद्धा घडय़ाळाच्या काटय़ांवर मोजूनमापून आखून करावं लागतं. आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी ‘राहण्याची जागा’नामक अतिशय जहाल प्रश्न सोडवावा लागतो आणि तोपर्यंत आतलं प्रेम फक्त त्या दगड बनलेल्या काळजावर धडका देत राहतं- त्या मुंबईच्याच समुद्राच्या लाटांसारखं! सहजीवन फक्त स्वप्नातच उरतं.. मग कुणाला तरी पैशाच्या जोरावर प्रेम विकत घेता येतं, डोळ्यातली स्वप्नं जिंकून घेता येतात, रक्तातली ओढ हिरावून घेता येते आणि उमेदीचा सौदाही करता येतो.. या भयंकर वास्तवाची जाणीव करून देणारा, सत्तरच्या दशकातलं मुंबईचं धकाधकीचं आयुष्य, अत्यंत माफक अपेक्षा ठेवणारं कारकुनी मध्यमवर्गीय प्रेम.. त्यावर पैशाने आलेल्या सत्तेचा फिरणारा वरवंटा. याचं दाहक दर्शन घडवणारा १९७७ साली आलेला, भीमसेन दिग्दर्शित, अमोल पालेकर, झरिना वहाब आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रमुख भूमिकांचा ‘घरौंदा’! खरं तर हा एक अजिबात ‘न पटणारा’ चित्रपट आहे. छायाच्या भूमिकेचं अनाकलनीय स्वरूप किंवा त्या भूमिकेला अचानक दिलेली कलाटणी.. सुदीपची विनाकारण केलेली चित्तरकथा याला कारणीभूत आहे. पण तरीही यातली तीनही गाणी मात्र अप्रतिम होती. गुलजार साहेबांनी यात शायरीचा वेगळा रंग दाखवलाय. मुंबईची बोलण्यातली सहजता त्यात दिसते. या व्यक्तिरेखांबरोबर गाणीही पक्की मुंबईकर वाटतात. एक गाणं नक्श ल्यालपुरींचं, तेही वेगळ्या ढंगाचं. हा रंग त्या गाण्यांना देणारे अतिशय प्रतिभाशाली संगीतकार जयदेवजी!

‘घरौंदा’ ही एक काजळकिनारी प्रेमकहाणी.. पण फक्त प्रेमकहाणी नाही तर त्या कहाणीच्या आजूबाजूला मनुष्यस्वभावाच्या अनेक छटा दाखवून जाणारा अनेक प्रसंगांचा एक कोलाज आहे. मनाचं ऐकावं की मेंदूचं? हा तर कधीच न सुटणारा प्रश्न आहे आणि मेंदू काय सांगतो हेच आपण ऐकणार असू तर मग त्या कोवळ्या भावनांना, त्या असोशीला, त्या क्षणांना त्या वाळूत बांधलेल्या घराला काही अर्थच उरत नाही.. स्वप्न धूसर असतात, पण वास्तव नको इतकं स्पष्ट असतं.. अगदी आखीवरेखीव जगायचं तर चौकोन आवडला पाहिजे. चौकोनाला मनाचे मुक्तछंद झेपत नाहीत आणि मुक्तछंदाला अनिश्चिततेचा शाप असतो, जो सामान्यांना परवडत नाही आणि सुरू होते परवड

एकाच ऑफिसमध्ये काम करणारे सुदीप (अमोल पालेकर) आणि छाया (झरिना वहाब) एकमेकांकडे आकर्षिले गेलेत. रोज संध्याकाळी चौपाटीवर भटकणं, भेळ खाणं असा टिपिकल मध्यमवर्गीय मुंबईकर प्रणय रंगतोय. छायाच्या मनात मात्र अजूनही गोंधळ आहे. हेच प्रेम आहे का? मला नाही वाटत तसं!

‘तुम्हें हो न हो’ (रुना लैला, नक्श ल्यालपुरी) नाही.. हे प्रेम नक्कीच नाही. मला तर पक्की खात्री आहे. प्रेमाबिमाची भानगड नाहीच ही.. पण का कोण जाणे एक रहस्य मात्र उलगडत नाही. का आवडतं तुझं बोलणं? का शोधत राहते मी संधी तुझ्याशी बोलण्याची? कधी कधी तर हळूच तुला स्पर्श करावा असं का वाटून जातं? पण तरीही प्रेमाबिमाची भानगड नाहीच ही. पण एक सांगू, ही अशी संध्याकाळ झाली ना की तुझ्या आठवणींनी उदास व्हायला होतं. या उंच उंच इमारतींमधून स्वप्नं डोकावतात, काही ऊर्मी तशाच मिटून जातात. कधी खूप काळोख तर कधी तुझ्या विचारांची लख्ख उजळ झगझगती अशी दीपमाळ. खरंच काय आहे हे? पण प्रेमाबिमाची भानगड नाहीच ही!

छायाचा सरळसोट एक घाव दोन तुकडे असा स्वभाव. पटकन स्पष्ट बोलणं, अनुभवांचा नवथरपणा.. सगळा उमटला गाण्यात. भूमिकेचा स्वभाव जेव्हा संगीतकार ओळखतो तेव्हा काही खास गोष्टी घडतात गाण्यात. तिचा तो वरवरचा नकाराखाली दडलेला तिचा होकार जयदेव बाहेर काढतात एका पॉजमधून.. ‘नही है नही है’.. नंतर एक पॉज घेऊन ‘है’ म्हणणं यातून पटकन् तिचा होकार बाहेर येतो.

अतिशय विचारपूर्वक रचलेली चाल. अंतऱ्याची सुरुवात खालच्या स्वरात. ‘मुझे प्यार तुमसे नही है’चाच हेका आहे अजूनही. पण मग ‘मगर मैंने ये राज अब तक न जाना’ हे चढत्या स्वरात आणि कभी ‘मैने चाहा तुम्हे छू के देखू’. हे अजूनच धाडसी विचार. या चढत जाणाऱ्या तीव्रतेप्रमाणे गंधार. पंचम, निषाद आणि मग वरचा षड्ज असा याचा ग्राफ आहे. पुढे ‘उदासी के साये’ ही ओळ कशी फुरंगटून खाली येते ते ऐकायला हवं. जयदेव शैली अशी की एखादी ओळ तालाच्या चौकटीला आव्हान देत येते. ‘इस बात का तो यकीन है’ या ओळीला ताल अडकवू शकलेला नाही. (अशीच ओळ ‘अपने हाथोंसे पिया मोहे लाल चुनर ओढा’ ही ‘तू चंदा मै चांदनी’मध्ये आली होती) कभी ‘दूर तक रोशनी मुस्कुराये मगर फिर भी’.. हे सगळं सलग येतं. खरं तर ‘मुस्कुराये’ला अंतरा संपलाय, पण हे असं ध्रुवपदात आतून अलगद गुंतत येणं हीसुद्धा जयदेव शैली (‘एक मीठी सी चुभन’ आठवतंय?). त्यासाठी ‘मुस्कुराये’ कसा घट्ट बांधला त्या लयीत! काय किमया असावी ही बुद्धीची! आणि रुना लैलाचा कसलाही संकोच नसलेला खनकदार आवाज.. संगीतकारानं टाकलेल्या विश्वासाचं सोनं करत रुनाजी गायल्यात. ‘कशिश’ या शब्दाचा अर्थ या आवाजातून समजला. गोडवा आणि मादकता यांचं अजब मिश्रण आणि एक मस्त अपील आहे या आवाजात. हा आवाज ऐकून तुम्ही स्वस्थ बसू शकत नाही, स्वत:कडे ओढून घेतो हा आवाज तुम्हाला. आणखी एक सूक्ष्म गोष्ट.  झरिना वहाबचा बोलतानाचा किंचित मेटालिक आवाज आणि रुनाचा आवाज यात एक साम्य आहे.

प्रेमात पडल्यावर फार काळ स्वप्नांच्या दुनियेत मुंबई फिरू देत नाही. खरं तर ज्या भेटीमध्ये थरथरत्या धिटाईचा थरार अनुभवायचा त्यात आकडेमोड करत आपल्याला ‘जागा’ कशी घेता  येईल याचे हिशेब मांडणं सरू होतं. शेवटी सुदीपच्या गुहा नामक मित्राच्या ओळखीनं एक ‘जागा’ मिळते. अर्धवट बांधलेल्या त्या इमारतीच्या न बांधलेल्या भिंती आपल्या कल्पनेनं बांधून काढत दोघांची स्वप्नं रंगतात.

‘दो दिवाने शहर में रात में या दोपहर में ’ (गुलजार, भूपेंद्र, रुना लैला). यातला ‘आबोदाना’ हा शब्द कमी आढळणारा. आबोदाना म्हणजे दाणापाणी.. या अफाट शहरात ‘आबोदाना’ आणि ‘आशियाना’ या दोन गोष्टी मिळाल्याशिवाय प्रेमाची गाडी पुढे जाऊच शकत नाही! यात गाण्यातलं काव्य बोलल्यासारखं.. सहज प्रश्नोत्तरं असलेलं. या गाण्याची हीच खासियत आहे की ठरावीक पॅटर्न यात वापरलेलाच नाही. शब्दात जी सहजता तीच चालीत. शब्दांचे खेळ, ‘अस्मानी’ या ‘आस्मानी?’ किंवा ‘तारे?’ और जमीन पर? ऑफकोर्स!’ या संवादांना काय सुंदर जागा दिलीय. सहज वाटणारं गाणं निर्माण करणं कधीही ‘सहज’ नसतं..

अशा रात्री असतील इथल्या! तारे जमिनीवर असतील.. आकाश खाली उतरलेलं असेल. मग तो चंद्र आपल्याला सोडून कसा जाईल घरी? इथंच झोपेल तो..

गाण्यातली व्हायोलिन्स खरंच त्या भुलभुलैयाचा भास देतात. एक शीळ या गाण्यांमध्ये कायम ऐकू येत राहते, त्या गाण्यांना एक खास व्यक्तिमत्त्व मिळतं. सुदीपच्या आनंदी स्वभावाचं प्रतीक आहे ती शीळ.

पण पुढची दानं मात्र उलटी पडतात. त्या जागेचे पैसे घेऊन मुन्शी पळून जातो. गुहा आत्महत्या करतो आणि हा आशियाना उभा राहण्याआधीच कोसळतो. या सगळ्यात, ‘आपल्या पत्नीच्या चेहऱ्याशी साम्य असणं’ या एका गोष्टीमुळे छायावर नजर ठेवून असलेला आणि पैशाच्या अमर्याद शक्तीवर अफाट विश्वास असलेला बॉस (मोदी- डॉ. श्रीराम लागू) संधी साधतो. खचलेला सुदीप नैराश्याच्या गर्तेत  वैफल्यानं बोलून जातो की, तू बॉसशी लग्न कर, असं किती असेल आयुष्य त्याचं? हे तेव्हा छायाला मान्य होत नाही. पण या लग्नामुळे भावाचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं कारण कदाचित स्वत:ला देऊन एका अनाकलनीय क्षणी ती बॉसशी लग्न करून मोकळी होते. हे अतक्र्य आहे आणि त्याहूनही अतक्र्य तिचं त्याच्या संसारात रममाण होणं! भावासाठी देऊ केलेली मदत स्वाभिमानाने नाकारणारी छाया हीच? भेटायला गेलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या सुदीपशी कोरडं वागताना, त्याला तोडून टाकताना तिला कुठलेच बंध, भावना, पूर्वस्मृती जाणवत नाहीत?

आता.. तेच मुंबईचे रस्ते.. तोच मरीन ड्राइव्ह.. तोच चर्नीरोडचा ब्रिज.. त्यांच्या भेटींना साक्षी असलेला! या रस्त्यांवरून भणंगावस्थेत फिरणारा सुदीप.

‘एक अकेला इस शहर में..’ (गुलजार, भूपेंद्र सिंग)

‘इस शहर के लोग रोने के लिये कंधा नही देते.. मरने तक इंतजार करते हैं,’ असं म्हणणारा सुदीप. भावनांच्या चिंध्या आठवणींच्या ढिगातून चिवडत बसलेला! न संपणारा दिवस रात्रीकडे ढकलण्यासाठीच जगणारा! जो आबोदाना आणि आशियाना शोधत एकेकाळी दोघे फिरले, तो आता एकटा शोधणारा.

‘दिन खाली खाली बर्तन है और रात है जैसे अंधा कुंवा

इन सूनी अंधेरी आंखो में आंसू की जगह आता है धुंवा

जीनेकी वजह तो कोई नही, मरनेका बहाना ढूंढता है’

कोरडय़ाठाक रिकाम्या भांडय़ासारखा हा दिवस आणि एक भयावह, तळ नसणारा काजळडोह भासणारी ही रात्र.. आता तर अश्रूंची सुद्धा वाफ झाली.. कशासाठी जगायचं?

‘इन उम्रसे लंबी सडकोंको मंजिलपे पहुंचते देखा नही बस,

दौडती फिरती रहती है हमने तो ठहरते देखा नही

इस अजनबीसे शहरमें जाना पहचाना ढुंढता है’

आयुष्यापेक्षा लांबचलांब या वाटा.. आयुष्य संपेल, पण हा रस्ता नाही.. कधीच पोचणार नाही आपण मंजिलपर्यंत.. सगळे चेहरे अनोळखी. माझं असं कोण? कुणाच्या कुशीत हा दिवस संपल्यावर जाईन मी?

गुलजारसाहेबांचे शब्द भयानक एकाकीपण घेऊन आले. जयदेवजींनी ही वेदना स्वरात अशी काही भिजवली की काळीज थरथरतं हे ऐकताना! अमोल पालेकरचे पोरके डोळे जास्त विषण्ण की हा आवाज? मूर्तिमंत वैफल्य उभं केलं या गाण्यानं. ‘एक अकेला’ ही ओळच अशी खाली येते की तो नैराश्याचा डोह जाणवावा. ‘एक’ हा शब्दसुद्धा एकटा आहे या ओळीत आणि गंधारावरचं ‘जयदेव प्रेम’ही दिसतंच मुखडय़ात. ‘एक अकेला’ ही सुरुवात गंधारावर. ‘आबोदाना’वरचा पंचम किंचित आशा लावणारा, पण तिथूनच सूर परत फिरतात आणि हताशपणे खालच्या षड्जावर येतात- नाइलाजानं. खरं तर हा आक्रोश कोणीही ऐकणार नसतं, पण तरीही काळीज फुटून आलेला भूपेंद्रचा आवाज टिपेला पोचतो-

‘दिन खाली खाली बर्तन है’ म्हणताना! छातीवर अजगर यावा तशी फ्रेममध्ये येणारी मुंबईची ती लोकल.. न थांबणाऱ्या,

अव्याहत धावणाऱ्या मोटारी आणि खुजेपणाची जाणीव  करून देणाऱ्या त्या उंच इमारती.. कसलं तुझं कस्पटासारखं आयुष्य घेऊन बसलास? असं खिजवणाऱ्या अरेंजर  श्यामराव कांबळे यांना किती दाद द्यावी? तो एकाकी सोलो व्हायोलिनचा फिलर, लोकल येताना मागे असलेला प्रचंड आक्रमक असा व्यायोलिनचा पीस.. तीच शीळ आता त्या रुदनात मिसळणं.. बासरीचा हळवा वावर.. नि:शब्द करतं हे गाणं. लोकल येतानाचा व्हायोलिनचा पीस अनुभवण्यासाठी हे गाणं कैक वेळा बघावं. अंगावर येतं ते. त्या स्वप्नांचा त्या लोकलखाली चिरडून मृत्यूच होतो असं वाटून जातं.

मुंबई सोडताना तिला शेवटचं भेटायला गेलेल्या सुदीपच्या पदरी निराशाच पडते. निर्वाणीचं विचारूनही ‘तेव्हा तूच म्हणलास की’.. असं ती सहज म्हणून जाते.. ‘तू कोसळला होतास म्हणून तुझ्याशी लग्न केलं नाही,’ हे ऐकवते. सुदीप अकराच्या गाडीनं निघणार असतो ‘तुझी वाट बघीन,’ असंही सांगतो, पण नवऱ्याशी आतून बंध निर्माण झालाय हे ती नाकारू शकत नाही. तिला आता काही वाटलं तरी त्या हस्तिदंती मनोऱ्यातून, सुरक्षित कवचातून आता त्याच्याबरोबर अनिश्चिततेत पाऊल टाकण्याचं ना धैर्य असतं, ना तेवढी तीव्र ओढ. कसलेला बिझिनेसमन मोदी. ‘छायाला तू घेऊन जाऊ शकतोस,’ असंही म्हणतो.. कारण ती जाणार नाही याची खात्री झालेली असते. पण अचानक सुदीप निर्णय बदलतो. त्या काल्पनिक ‘छायेत’ राहण्यापेक्षा वास्तवाशी दोन हात करत मुंबईतच नवीन आयुष्य सुरू करण्याचं सुदीप ठरवतो. मुंबईत जिंकायचं तर तिथे राहूनच, पळून जाऊन नव्हे.

या न पटणाऱ्या शेवटातच या गोष्टीचं मर्म आहे. एक वेदना देऊनच ही गोष्ट संपते. खरं तर सुदीपची नवी गोष्ट सुरू होते.

‘आवाज सुने ना कोई तो

उसी राह अकेले चल देना

जब हाथ पकडले राह कोई

उस राह को मंजिल कर लेना..

उस राह को मंजिल कर लेना!’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 1:56 am

Web Title: ek akela is shaher mein bhupinder singh gharaonda afsana likh rahi hun dd70
Next Stories
1 पडसाद : लांडगा आणि कुत्रा यांच्यातील फरक महत्त्वाचा!
2 चकमकींमधला धोका
3 निमित्त.. विकास दुबे
Just Now!
X