फाळणीच्या काळात पश्चिम बंगालच्या सीमावर्ती क्षेत्रात अत्यंत प्रक्षुब्ध स्थिती होती. पूर्व पाकिस्तानातून आपले सर्वस्व गमावलेल्या निर्वासितांचे लोंढे येत होते. त्यातील महिलांची स्थिती तर अत्यंत शोचनीय होती. ‘वास्तुहारा साहाय्यता समिती’ स्थापन करून निर्वासितांना साहाय्य आणि त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था एकनाथजींच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. सियालदाह स्टेशनजवळ निर्वासितांची एक तात्पुरती छावणी उभी करण्यात आली होती. त्याचवेळी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा कोलकाता दौरा होता. नेहरूंच्या मुक्कामात एकनाथजी त्यांना जाऊन भेटले. त्यांनी निर्वासितांच्या विदारक स्थितीविषयीचे सविस्तर निवेदन नेहरूंना सादर केले. नेहरू म्हणाले, ‘तुम्ही थोडेसे अतिरंजित वर्णन करीत आहात काय? ‘युगांतर’मध्ये तर असे काहीच प्रसिद्ध झालेले नाही!’ (‘युगांतर’ हे तेथील एक अग्रगण्य वृत्तपत्र!) एकनाथजी त्यावर स्वस्थ बसले नाहीत. ते तिथून निघाले ते थेट ‘युगांतर’च्या कार्यालयात जाऊन संपादक विवेकानंद मुखर्जी यांना भेटले आणि त्यांना सोबत घेऊनच सियालदाह स्टेशनवर गेले. तेथील निर्वासितांच्या लोंढय़ांतील एका महिलेची त्यांनी आस्थेने चौकशी केली. त्या भगिनीला अश्रू आवरेनात. आपल्या डोक्यावरचा पदर खाली सरकवून तिने जे दाखविले ते पाहून सगळेच हादरून गेले. तिच्या गळ्याखाली टोकदार वस्तूने कोरले होते. ती जखम दाखवून ती म्हणाली, ‘मी भ्रष्ट झाले आहे..’ हे दृश्य पाहून संपादक मुखर्जी स्तंभित झाले. एकही क्षण न दवडता ते तत्काळ ‘युगांतर’च्या कार्यालयात आले. प्रेसमध्ये सुरू असलेली दुसऱ्या दिवसाच्या अंकाची छपाई त्यांनी थांबविली. पहिल्या पानावरील काही मजकूर रद्द करून त्यांनी नवा मजकूर लिहून दिला. तो अर्थातच निर्वासितांची व्यथा मांडणारा होता.
दुसऱ्या दिवशीच्या ‘युगांतर’मध्ये हा मजकूर संपादकीय टिपणीसह प्रसिद्ध झाला. त्याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधान नेहरूंची जाहीर सभा होती. या सभेतील भाषणात नेहरूंना निर्वासित बांधवांच्या वेदनेची सविस्तर दखल घ्यावी लागली.
या साऱ्या घटनाक्रमात एकनाथजींच्या सोबत असलेले अमल बसू (आज अमलदा ९२ वर्षांचे आहेत.) ही आठवण सांगताना भावविव्हल झाले होते. निर्वासितांच्या व्यथा आणि त्यांचे पुनर्वसन याविषयीची एकनाथजी रानडे यांची तळमळ अवर्णनीय होती. सर्वस्व हरपून गेलेल्या निर्वासित बांधवांना तत्काळ मदत देण्याबरोबरच त्यांच्या स्थायी पुनर्वसनाकडेही एकनाथजी कटाक्षाने लक्ष पुरवीत होते. निर्वासितांसाठी ‘वास्तुहारा कुटीर शिल्प प्रतिष्ठान’ आणि ‘वास्तुहारा मेकॅनिकल होम’ अशा दोन रचना त्यांनी सिद्ध केल्या. प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्लॅस्टिक वस्तुनिर्मिती व अन्य गृहोद्योगांचे, तर मेकॅनिकल होमद्वारे अभियांत्रिकी उद्योगाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. निर्वासित तरुणांना कोलकात्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे नातू रणदेव चौधरी यांनी याकामी त्यांना मदत केली.
स्वीकारलेली जबाबदारी परिपूर्ण रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक तो गृहपाठ, त्यादृष्टीने सुयोग्य नियोजन तसेच कृतीतील अचूकतेचा ध्यास ही एकनाथजींची वैशिष्टय़े होती. १९६२ साली स्वामी विवेकानंद जन्मशताब्दीच्या निमित्ताने कन्याकुमारी येथे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प केला गेला आणि त्याच्या नियोजनाची जबाबदारी एकनाथजी रानडे यांच्यावर सोपविली गेली. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी स्मारकाच्या निर्मितीचे अत्यंत सूक्ष्मरीत्या नियोजन केले, तसेच त्या नियोजनाचा काटेकोर पाठपुरावा करून हे देखणे स्मारक प्रत्यक्षात साकारले. त्यांचे हे कार्य व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. विशेष म्हणजे सुमारे दहा हजार चौरस फुटांची ही भव्य स्मारकवास्तू उभी करणारे एकनाथजी स्वत: मात्र एका छोटय़ाशा पत्र्याचे छत असलेल्या कुटीत शेवटपर्यंत राहत होते.    

russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
Shahpurkandi
यूपीएससी सूत्र : जम्मू काश्मीरच्या सीमेवरील शहापूरकंडी धरण अन् राजकीय पक्षांना असलेली आयकरातील सूट, वाचा सविस्तर…
indus waters treaty
विश्लेषण : शहापूरकंडी धरणाद्वारे भारताने पाकिस्तानमध्ये जाणारा रावी नदीचा प्रवाह का रोखला? याचा जम्मू व काश्मीरला कसा फायदा होईल?