23 January 2020

News Flash

‘इंग्लंडातील प्रवास’

गोडसे भटजींचा ‘माझा प्रवास’ हे १८५७ च्या बंडाच्या हकिकतीचे वर्णन करणारे पुस्तक मराठीतले पहिले प्रवासवर्णन म्हटले जाते.

| July 5, 2015 12:10 pm

गोडसे भटजींचा ‘माझा प्रवास’ हे १८५७ च्या बंडाच्या हकिकतीचे वर्णन करणारे पुस्तक मराठीतले पहिले प्रवासवर्णन म्हटले जाते. प्रत्यक्षात ते १९०७ साली प्रसिद्ध झाले. ‘इंग्लंडातील प्रवास’ या मूळ गुजराती lok06पुस्तकाचा मराठी अनुवाद या पुस्तकाच्या जवळजवळ ४० वर्षे आधी प्रसिद्ध झाला होता.
करसनदास मुलजी हे भाटिया जातीत जन्मलेले पत्रकार. त्यांची विधवाविवाहासंबंधीची मते न पटल्यामुळे घरच्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. त्यांना जेमतेम ४३ वर्षांचे आयुष्य लाभले. प्रथम त्यांनी शाळामास्तरचा पेशा स्वीकारला व नंतर गुजरातीत ‘सत्यप्रकाश’ नावाचे साप्ताहिक काढले. मृत्यूपूर्वी काही दिवस ब्रिटिश सरकारने त्यांना काठेवाड संस्थानचा वारस अवयस्क असल्याने तेथे प्रशासक म्हणून नेमले होते. वल्लभाचार्य पंथाच्या संतांच्या अनैतिक वर्तनाच्या कहाण्या त्यांनी उजेडात आणल्या होत्या.
१३/ ३/ १८६३ रोजी ते लंडनला रवाना झाले आणि लंडनला सहा महिने राहून तिथे हिवाळा सुरू होण्यापूर्वी ते परतले. कारण तेथील हिवाळा त्यांना सोसणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. १८६५ मध्ये आपले प्रवासवृत्त त्यांनी गुजरातीमध्ये लिहिले. त्याच्या एक हजार प्रती अल्पावधीत संपल्या. सुधारित आवृत्तीचा अनुवाद मराठीत व्हावा, या सरकारच्या इच्छेला अनुसरून हे अनुवादित पुस्तक जन्माला आले. ते जवळजवळ ५०० पृष्ठांचे आहे आणि अनेक छायाचित्रे त्यात समाविष्ट केली आहेत. या प्रवासात त्यांचे सहप्रवासी होते- रावबहादूर रामचंद्र बाळकृष्ण, डॉ. आत्माराम पांडुरंग यांचे १६ वर्षांचे चिरंजीव मोरेश्वर राव, वासुदेव बाबाजी नवरंगे, मनोहरदास रूपजी.
मुलजींनी हा प्रवास १८६३ साली- म्हणजे १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध झाल्यावर लगेचच केला. ब्रिटिश सरकारचा अंमल व्यवस्थित बसला होता आणि ब्रिटिशांचे राज्य म्हणजे परमेश्वराची कृपा असे मानणाऱ्यांचा मोठा वर्ग तयार होऊ लागला होता. मुलजी जवळपास याच वर्गात मोडतात. ब्रिटिश साम्राज्यातल्या अनेक गोष्टी, त्यांचे जे गुण, प्रवृत्ती, ब्रिटिशांनी केलेली आर्थिक व औद्योगिक प्रगती मुलजींना प्रशंसनीय वाटली त्याबद्दलची विस्तृत माहिती व कौतुक या पुस्तकात आहे.
आपल्या लिखाणाचा हेतू विशद करताना मुलजी लिहितात- ‘‘या ग्रंथाचे विचारपूर्वक अवलोकन केले असता इंग्लंडसारख्या समर्थ व पराक्रमी देशाचे पर्यटन करण्याची हौस आमच्या लोकांस येईल आणि व्यापार-विद्या-कला-कौशल्य यांत स्वदेश इंग्लंडसारख्या उंच स्थितीप्रद पोचण्याविषयी उत्कंठा त्यांच्या ठायी उत्पन्न होईल अशी आशा आहे.’’
प्रत्यक्ष प्रवासाचे वर्णन करण्यापूर्वी त्यांनी विस्तृत ऊहापोह केला आहे तो भारतीयांत असलेल्या परदेशप्रवासाच्या विरोधी भावनेचा. ती कशी चुकीची आहे, वेदातही परदेशप्रवास कसा मान्य होता, इत्यादींचा. तो करताना त्यांनी मूळ श्लोक उद्धृत केले आहेत. इतिहासातले दाखले दिले आहेत. त्यात ते सांगतात, ‘‘रघुनाथराव पेशवे (राघोबादादा) यांनी १७८१ मध्ये इंग्रजांची मदत मागण्यासाठी हणमंतराव lr17नावाचा कारभारी व मणियार नावाचा त्यांचा पारशी मदतनीस ब्रिटनला पाठविले होते. ब्रिटनला जाणारे ते पहिले हिंदी गृहस्थ होत. १८३० साली लंडनला गेलेले राजा राममोहन रॉय हे दुसरे हिंदी गृहस्थ.’’
हे पुस्तक मुलजींनी १२ प्रकरणांत विभागले आहे. पहिले प्रकरण- प्रस्तावनेदाखल, नंतर प्रत्यक्ष प्रवासाची हकिकत, लंडनमधील रस्ते, बागा, पूल, पुतळे, लंडनची वास्तुकला/ स्थापत्य, म्युझियम, झूऑलॉजिकल गार्डन, टाइम्स ऑफिस, क्रस्टिल पॅलेस अशी अनेक पर्यटकप्रेमी स्थळे, ब्रिटनची सामाजिक स्थिती, आचारपद्धती, रीतभात, ब्रिटनचे राष्ट्रीय चरित्र, ब्रिटनच्या श्रेष्ठत्वाची कारणे, राज्यपद्धती व घटना.. थोडक्यात, हे ब्रिटनचे केवळ प्रवासवर्णन नाही, तर ब्रिटनवरचे पुस्तक आहे.
१५० वर्षांपूर्वीचे भारतीयांच्या मनातील विजयी ब्रिटिशांबद्दलचे औत्सुक्य, आदर, भीती अशा साऱ्या भावना एकत्रित झाल्यावर त्यांच्या नव्या वस्तूंचे, दृश्यांचे, तिथल्या निसर्गाचे, लोकांच्या प्रवृत्तीचे कौतुक येणे अपरिहार्य होते. आपल्या वर्णनाला बिनचुकता यावी म्हणून अनेक ग्रंथांचा आधारही घेतल्याचे करसनदास सांगतात.
प्रवासवर्णन या प्रकारात पाहिलेल्या सामाजिक स्थितीचे अवलोकन हा एक महत्त्वाचा भाग असतो. इथे तर करसनदास त्यावर अख्खे प्रकरण लिहितात. त्यांची निरीक्षणे ठायी ठायी विखुरलेली आहेत. ब्रिटिशांच्या कथित घुमेपणाबद्दल ते म्हणतात, ‘‘इंग्लंडचे लोक कसे आहेत व ते परदेशीयांवर कशी ममता करतात, असे पुसाल तर त्याचे उत्तर मी असे देतो की, ते फार भले व ममताळू आहेत. आणि परदेशस्थांवर प्रीती व ममता करण्याविषयी त्यांची प्रशंसा आहे. हे म्हणजे काही सर्व इंग्रजांस लागू पडत नाही. बोलके नव्हेत व गंभीर स्वभावाचे असे लोक अधिक पाहण्यात येतात. ते ओळखीवाचून आपणाबरोबर बोलत नाहीत, यावरून त्याविषयी आपण वाईट तर्क केला तर ते चूक ठरेल. या देशातील इंग्रजांवरून तेथील (इंग्लंडातील) इंग्रजांविषयी तर्क बांधला तर ती मोठी चूक होईल.’’
या लेखनातून काही विचारांना चालना देणारी माहितीही मिळते.
* माष्टामध्ये सेंट जॉन चर्चमध्ये मुलजी व त्यांचे सहप्रवासी यांना प्रवेश मिळाला नाही, कारण चर्चमध्ये पागोटे घालून जायला बंदी होती.
* पॅरिसमध्येही त्यांना असाच अनुभव आला.
* मात्र लंडनमध्ये पोशाखावरून काही टवाळांनी थट्टा केली तेव्हा रस्त्यातल्या इतर ब्रिटिशांनी टवाळखोरांना चापले.
* लंडनच्या मांस बाजारात बकरे मारण्याची रीत फारच वाईट होती. बकरी वरून खाली भुयारात फेकून देत असत; तेणेकरून त्यांचे पाय मोडत. मग त्यांना कापले जात असे.
* लंडन टाइम्सच्या १८६३ मध्ये रोज साठ हजार प्रती खपत असत.
पुस्तकात ब्रिटिशांचे खूपच कौतुक असले तरी मुलजींनी काही अपवादही केले आहेत. त्यांच्या मते, १५० वर्षांपूर्वी पॅरिस लंडनच्या तुलनेत अनेक पटींनी सुंदर होते. कारंज्यांच्या बाबतीतही लंडन पॅरिसच्या खूप मागे होते. लंडनच्या ब्रिजेसचा काळेपणा आणि नदीचे गटारत्व ते मोजक्या शब्दांत सांगतात. तिथली तोंड न धुता चहा पिण्याची पद्धतीही त्यांना पसंत नव्हती. ब्रिटनच्या जलवाहतुकीकडे पाहून भारतातही ती असावी आणि नदीकिनारीची गावे व शहरे बोटींनी जोडली जावीत अशी इच्छा ते व्यक्त करतात. एडन येथे त्यांना अनेक यशस्वी हिंदी व्यापारी लोक दिसले. पण मुलजींनी त्यांना तुम्ही ब्रिटनला का जात नाही, असे विचारल्यावर ते उत्तरले, ‘‘बिटिश आमच्यापेक्षा अधिक हुशार आणि चलाख आहेत.’’
करसनदास क्वचित अविश्वसनीय अशी विधानेही करतात.. ‘‘मार्सेलीस इथल्या हॉटेलापुढे गायकवाड सरकारचा वाडा काहीच नाही.’’ (पृष्ठ ८४) त्यांच्याबरोबरच्या दक्षिणी नोकरास त्यांना हिंदुस्थानात परत पाठविणे भाग पडले. कारण तो फारच पुंडगिरी करून इंग्रजी खलाशांच्या मुलांस छडय़ा मारण्यापर्यंत धीट झाला होता.
ते गॅसच्या दिव्यांचे वर्णन करतात, ‘प्रत्येक मोठय़ा आळीत दुकानांच्या रांगा असून प्रति दुकानात धुराचे दिवे इतके लागलेले असतात की उजेडाचा भपकारा होऊन जातो व नित्य लंका पेटली आहे असे वाटते.’
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी माहिती देणे आणि त्याबरोबरच भारतीयांना परदेशप्रवासास उद्युक्त करू इच्छिणारे हे लेखन मराठी प्रवासलेखनाचा अर्वाचीन काळातला नमुनेदार नग आहे.
‘इंग्लंडातील प्रवास’- करसनदास मुलजी, अनुवाद : भास्कर हरी भागवत, गुजराती प्रथम प्रकाशन- १८६५, अनुवाद- १८६७.
मुकुंद वझे – Vazemukund@yahoo.com  

First Published on July 5, 2015 12:10 pm

Web Title: englandatil pravas
Next Stories
1 सुटाबुटातली गुन्हेगारी!
2 ‘डावेदार’
3 शब्द एकेक ‘असा’येतो की!!
Just Now!
X