सामान्य माणूस आनंदात असताना त्याच्यामागे खोटी दु:खे लावून देणे आणि त्याच्या आनंदावर विरजण घालणे, हा कित्येकांचा छंद असतो. म्हणजे माहिती देण्याच्या नावाखाली फक्त काळजीच दिली जाते. काळजी घेणे केव्हाही योग्य; परंतु काळजी करणे म्हणजे विनाकारण स्वत:ची ऊर्जा वाया घालवणे असते. जगात अनंत गोष्टी घडत असतात. त्यातील कित्येक गोष्टी चांगल्या आहेत की वाईट, हेदेखील कळायच्या आत आपले आयुष्य संपून जाते. पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या झाडाझुडपांपासून प्राणिमात्रांपर्यंत नव्वद टक्के प्राणी व वनस्पती मनुष्य निर्माण व्हायच्या आतच नाहीशा झाल्या आहेत. असे असताना आपण माणूस म्हणून आनंदात जगताना कसे जगले पाहिजे?
पहिल्यांदा आपण खोटी दु:खे देणारे पाहूयात. ‘पृथ्वीचे तापमान वाढते आहे. पिण्यालायक पाणी कमी होत चालले आहे. शहरांतील प्रदूषण कमाल मर्यादेबाहेर गेले आहे. रोज दहा वनस्पती नाहीशा होत आहेत. रोज कित्येक हजार हेक्टर जंगल नाहीसे होत आहे. हिमनग वितळत आहेत. पेट्रोल संपत आले आहे..’ सकाळी उठून असल्या बातम्या वाचायच्या आणि हळहळत बसायचे, यात काय गंमत आहे? तुम्ही हळहळून यांतील एकाही गोष्टीत फरक होणार नसताना हळहळून आपली ऊर्जा का वाया घालवायची? अशाने थंडगार पाणी पिताना सहारा वाळवंटात कुणीतरी ‘पाणी.. पाणी’ असा आक्रोश करते आहे असे ऐकण्यासारखे आहे. त्या बिचाऱ्याला मदत तर करता येत नाही, पण आपली पाणी पिण्यातली मजाही जाते. मग तेल गेले, तूप गेले, हाती फक्त धुपाटणे उरलेल्या माणसाला आयुष्यात जितपत आनंद होईल, तितकाच आपल्याला होणार. मग धुपाटण्याचा गैरवापर करून इतरांचाही आनंद घालवायचा आपण प्रयत्न करणार!
एकदा असेच एक भयग्रस्त भाषणे देणारे वैज्ञानिक म्हणाले, ‘साठ कोटी वर्षांनंतर पृथ्वीचे वाळवंट होणार आहे. एक झाड दिसणार नाही,’ इ. हे ऐकून एक बाई एकदम बेशुद्ध पडल्या. साहजिकच मोठाच गोंधळ झाला. सारेजण त्या बाईंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. ते वैज्ञानिकदेखील तिथे आले. जरा वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यांनी डोळे उघडले तर त्यांना समोर ते वैज्ञानिक दिसले. त्या त्यांना उद्देशून म्हणाल्या, ‘काय भयंकर बोललात हो तुम्ही?’ त्यावर वैज्ञानिक म्हणाले, ‘अहो, साठ कोटी वर्षांनंतर पृथ्वीचे वाळवंट होणार आहे.’ त्यावर त्या बाई म्हणाल्या,‘ साठ कोटी होय? मग मी उगाचच घाबरले. मला वाटले, सात कोटी!’
निसर्गप्रेमापोटी निसर्गापासून साऱ्यांना दूर करणे सुरू आहे. ‘फक्त पायवाटेने जा. निसर्गात इकडे तिकडे जाऊ नका. त्याने पर्यावरण बिघडेल..’ असे जिथे-तिथे लिहिलेले दिसते. आपल्याभोवती जे काही आहे तो निसर्गच आहे. त्यामुळे चिमणीचे घरटे किंवा आपली घरे हे दोन्ही निसर्गाचाच भाग आहेत, हे आपण विसरतो. वाळवंट आणि घनदाट अरण्य हेही निसर्गाचाच भाग आहेत. त्यातले एक चांगले आणि एक वाईट असे अजिबात नाही. हे लक्षात न आल्याने माणसे कुढत बसतात. म्हणजे- नद्या गटारं झाली आहेत, असं म्हटलं तरी गटार हाही निसर्गाचाच भाग आहे हे विसरून चालत नाही. आता आपल्याला गटारापेक्षा स्वच्छ पाण्याची नदी आवडेल हा भाग वेगळा. पण कित्येक किडय़ांना (जे निसर्गाचाच भाग आहेत!) गटार खूप आवडते. आपल्याला श्रीखंड आवडते म्हणून शेणकिडय़ाला श्रीखंडात टाकून चालत नाही; तो मरेल. कारण त्याला शेणच लागते. हे अद्वैत एकदा लक्षात आले, की आपल्यासमोर जो निसर्ग आहे, तो आहे तसा आपल्याला समजू लागतो.
आपल्या सोयीसाठी आपण निसर्गात अनेक बदल घडवून आणतो. जसे सर्व प्राणी थोडय़ाफार प्रमाणात करतात. हे करताना निसर्गाची कमी-जास्त नासधूस होतेच. अर्थात नासधूस ही आपली कल्पना आहे. निसर्गात फक्त बदल होतो; नासधूस होत नाही. म्हणजे झाडांवर रोग पडतात. मग झाडे मरतात. पण रोग ज्यामुळे होतो ते कृमी, कीटक हे निसर्गाचाच भाग असतात. त्यांची प्रजा झाडे मेल्याने वाढते. आता आपल्याला हे पाहवत नाही, ही गोष्ट वेगळी. म्हणजेच आपल्या सोयीचा निसर्ग आपण ‘निसर्ग’ मानतो आणि आपल्याला गैरसोयीचा भाग आपण दृष्टिआड करतो. आपण मोठमोठय़ा वसाहती बांधतो. त्या बांधताना बाभळी वगैरेसारखी ‘घाणेरडी’ झाडे तोडून टाकतो. आपल्याला आवडतात अशी झाडे भलतीकडून आणतो. त्यांच्यावर फवारे वगैरे मारून त्यांना जगवतो. निसर्गात घाणेरडे, निरुपयोगी असे कुठलेच झाड नाही. या आपल्या कल्पना आहेत. त्या कल्पनांच्या आहारी जाऊन अरण्याचे वाळवंट झाले की काहीतरी वाईट झाले असे आपल्याला वाटते. निसर्गात म्हणाल तर फक्त बदल होतो. आता त्यामुळे अरण्यात राहणाऱ्या प्राण्यांऐवजी वाळवंटातले प्राणी येतील आणि तिथे राहू लागतील. फार कशाला, मानवजात अस्तित्वात येण्याअगोदर सहारा वाळवंटात घनदाट जंगल होते. ते निसर्गत: नाहीसे झाले. त्याला आपण जबाबदार नाही.
निसर्ग चिरंजीव आहे. तो दयाळूही नाही आणि दुष्टही नाही. या दोन्ही मानवी भावना आहेत. तो निर्गुण व भावनाविरहित आहे. त्याला काही प्राणी, पक्षी, झाडे, किडे; फार कशाला- संपूर्ण मानवजात जरी नष्ट झाली तरी काहीही फरक पडत नाही. तसे झाले तरी सूर्योदय व सूर्यास्त तसेच होत राहणार. निसर्गात सतत बदल होत असतात. मग ते तापमानात, भूगर्भात, पावसात, प्राण्यांच्या संख्येत, झाडाझुडपांत असे कशातही असोत. हे बदल कोटय़वधी वर्षे सुरू आहेत. या बदलांना तुम्ही भूकंप, ग्लोबल वॉर्मिग, अशी काहीही नावे दिलीत तरी ते बदल असतात. निसर्ग प्रत्येक बदल सामावून घेतो. हे बदल सामावून घेताना कित्येक गोष्टी नष्ट होतात, कित्येक नव्याने उत्पन्न होतात आणि हे चक्र सुरूच राहते. निसर्ग हा सदैव संतुलित राहतो. हे संतुलन ‘चल’ असते. म्हणजे इतकी झाडे, इतके प्राणी, इतके पक्षी असले म्हणजेच संतुलन असते, असे नाही.
निसर्गाकडून अत्यावश्यक असलेल्या गोष्टी घेतल्याच पाहिजेत. आपली गरज भागण्यात आनंद आहे. हावरटपणा झाला की आनंद गेला. याचं कारण हावरटपणाला अंत नाही. बाळाने आईचे दूध प्यायचे, त्यात दोघांनाही अपार आनंद आहे. बाळाने आईचे रक्त शोषणे सुरू केले तर मात्र ते दोघांनाही मारक ठरेल. त्यामुळे आपण म्हणजे निसर्ग आहोत. आपण आनंदी, तर निसर्ग आनंदी! त्यासाठी निसर्गातून घ्यायचे, तसेच परतही द्यायचे. आपण सुंदर, सुगंधी, चवदार फळे व भाज्या खातो आणि त्याची दुगर्ंधीयुक्त विष्ठा करतो. ती पृथ्वीतत्त्वाला परत देण्याऐवजी आपण पाण्यात सोडतो. अशा प्रकारे गंगेला गटार बनवतो. त्याऐवजी संडास गॅसप्लँट तयार करून आपण स्वयंपाकाचा गॅस आणि उत्तम सोनखत बनवू शकतो आणि गंगा खरोखरी निर्मळ राहू शकते.
आपल्या सुखासाठी आपण अनेक गोष्टी उत्पन्न केल्या आहेत; ज्या अकबर बादशहाच्याही नशिबात नव्हत्या. आपण वापरतो त्या यच्चयावत आधुनिक गोष्टी निसर्गात कधीही नव्हत्या. त्या आपण निर्माण केल्या आहेत. आपण त्या गोष्टी वापरणे सोडून देऊन पुन्हा नैसर्गिक अवस्थेत राहणे शक्य नाही. वाहने, संगणक, मोबाइल अशा आश्चर्यकारक गोष्टी आपण आज सहजपणे वापरतो. त्या वापरताना मनात ‘निसर्गाचा ऱ्हास’ वगैरे मूर्ख शब्द मनात आणू नका. चवीने वापरा, तसेच चवीने खा. पण हावरटासारखे खाल्ले तर कधीही आनंद मिळत नाही.
आता आपल्याला खोटय़ा काळज्या देणारे तज्ज्ञ पाहूयात. प्रत्येक तज्ज्ञाला आपला विषय हा जगातला सर्वात महत्त्वाचा वाटत असतो. त्यामुळे ते त्याला अवास्तव महत्त्व देणारी भाषणे किंवा लिखाण करत असतात. आता हेच पाहा- अलीकडेच स्तनांच्या कर्करोगाविषयी एक बातमी आली होती. पुण्यात दर लाख बायकांमागे आठ बायकांना कर्करोग होतो. तर अमेरिकेत लाख बायकांमागे शंभरजणींना तो होतो. त्यामुळे भारतातील बायकांनी खेडय़ातील जीवनशैली अनुसरावी; अमेरिकन नव्हे! आता हेच पुढील प्रमाणेदेखील सांगता येते : पुण्यात एक लाखात नव्व्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव बायकांना स्तनांचा कर्करोग होत नाही. त्यामुळे काळजी करू नका. अमेरिकेतील बायकांनी पुण्यात येऊन राहावे, म्हणजे त्यांना कर्करोग होण्याची ‘शक्यता’ लाखात शंभरऐवजी लाखात आठ इतकी कमी होईल.
माणसाला हजारो अवयव. त्यांना असंख्य प्रकारचे आजार होतात. आपल्या बाजूने आपण मजेत राहायचे सोडून ‘जागृती’च्या नावाखाली काळज्या देणारे असले तज्ज्ञ वाढीस लागले आहेत. प्लास्टिक पाण्यात एक पीपीएम इतके विरघळते, ते पिऊन काहीतरी भीषण आजार होऊ शकतात, हे तुम्ही वाचले असेलच. एकदा ‘शक्यता’ असे म्हटले की काहीही बोलता येऊ शकते. नशीब तितकेच भिकार असेल तर अंतराळातील एखादी उल्का तुमच्या टाळक्यावर पडून तुम्ही मरूदेखील ‘शकता’!
विशाळगडची लढाई चालली आहे. फाजलखानच्या आसपास कत्तल चालली आहे. सूंसूं करत तोफगोळे सुटत आहेत. धीर सुटलेला फाजलखान दिलेरखानाला- ‘आपल्याला भयंकर भीती वाटते आहे,’ असे सांगतो. मात्र, दिलेरखान त्याला म्हणतो, ‘बुझदिल, डर किस चीज का?’ काय कमाल वाक्य आहे! पावला-पावलावर मृत्यूचे थैमान चालले आहे, कोणत्याही क्षणी कोणतीही गोळी आपल्या हृदयाचा वेध घेऊ शकेल अशी परिस्थिती आहे; आणि तरी ‘डर किस चीज का?’ हे वाक्य ज्याच्या हृदयात सन्नाटा उत्पन्न करणार नाही असा माणूस नसेल.
दोन वाक्ये कायम लक्षात ठेवा.. ‘देव तारी त्याला कोण मारी?’ तसेच ‘देव मारी, त्याला कोण तारी?’ तेव्हा मजेत राहा. तुमची वेळ आल्यावर एकही तज्ज्ञ तुम्हाला वाचवू शकणार नाही. आणि वेळ आलीच नसेल तर.. डर किस चीज का?

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!