News Flash

जलविज्ञानाची प्रवाही कहाणी

माणसाच्या नैसर्गिक गरजेत पाण्याला महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या काळातील सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय पाणी हाच आहे.

| August 18, 2013 01:10 am

माणसाच्या नैसर्गिक गरजेत पाण्याला महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या काळातील सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय पाणी हाच आहे. जीवसृष्टीची निर्मिती ही पाण्यातूनच झाली असून या जीवसृष्टीतील मानव या सर्वाधिक विकसित जिवाच्या तांत्रिक प्रगतीचा मुख्य पाया पाणी हाच असल्याचे दिसते. मानवाच्या या उत्क्रांतीच्या प्रवासात अनेक संस्कृती नदीकाठी उगम पावल्या व पाण्याच्या ऱ्हासानेच नष्ट झाल्या. याबाबतचे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. अशा या पाणी विषयाची साद्यंत कहाणी मोहन आपटे यांच्या ‘याला ‘जीवन’ ऐसे नाव’ या पुस्तकात वाचायला मिळते.
खरे तर पाणी हे आपल्या जगण्याचे महत्त्वपूर्ण अंग. पाण्याशी आपला नियमित संबंध असूनही त्याबदद्ल आपल्याला फारच थोडी वैज्ञानिक माहिती असते. पाण्याची निर्मिती, जलचक्र, पाण्याचे स्रोत याबाबतही आपण फार वरवरची माहिती जाणून असतो. म्हणूनच मानवाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जगण्याशी पाण्याचा असलेला बंध या पुस्तकात मोहन आपटे यांनी फार उद्बोधक व माहितीपर पद्धतीने सांगितलेला आहे.
आठ विभागात विभागलेले हे पुस्तक पाण्याचे विविध पैलू थोडक्यात, पण नेमकेपणाने व्यक्त करते. वेद, उपनिषदे यांच्या पायाभूत संदर्भापासून पाण्याच्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासपूर्ण दाखला देते. पुस्तकातील सर्व प्रकरणांच्या लिखाणामागे लेखकाचा शास्त्रीय दृष्टिकोन महत्त्वपूर्ण ठरत असून पाण्यामागचे शास्त्र सोपेपणाने व रंजकपणे उलगडून दाखवले आहे.
या पुस्तकाच्या जलस्त्रोत या पहिल्या विभागात सूर्यमालेतील पाण्याच्या स्त्रोतांचा परामर्श घेण्यात आला आहे. यात विविध उपग्रह व त्यातील पाण्याच्या शक्यता, हिमनद्या, भूमिगत पाणी, जलचक्र, मान्सून या विविध घटकांचे सुंदर छायाचित्रे, अचूक आकडेवारी आणि रेखीव आकृत्या यांच्या साहाय्याने सुस्पष्ट व सहज असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सूर्यमाला हा मोठा कॅनव्हॉस या पुस्तकात सर्वत्र आल्याने पाण्याकडे पाहण्याचे वैश्विक भान जागृत होते. चंद्रावर पाणी असल्याचे सिद्ध झाल्याने भविष्यकाळात पाण्यासाठी काय काय घटना घडू शकतात याची झलक पाहायला मिळत असल्याने हा विभाग वाचनीय झाला आहे. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी पाण्याचे स्त्रोत शोधणारी ‘आयसोटोप हायड्रॉलॉजी’ या नावीन्यपूर्ण पद्धतीची माहिती सोप्या भाषेत या विभागात दिली आहे.
दुसऱ्या विभागात पाण्याच्या विशेष गुणधर्माबद्दल सांगितले आहे. यात पाण्याच्या रेणूची रचना, पाण्याचा पृष्ठताण, पाण्यातील सुप्त उष्णता, पाण्याचे बाष्पीभवन या अनेक घटकांची काटेकोर माहिती मिळते. केशाकर्षन प्रक्रिया म्हणजे नेमके काय हे येथे उलगडते. बर्फ, हिमनग, हिमस्फटिक यांच्या रचना व त्यांच्या निर्मितीमागची विज्ञान कहाणी समजते. बर्फाच्या तरंगण्याने मानवी अस्तित्व कसे टिकून राहते, यामागची मनोरंजक कारणमीमांसा येथे मांडली आहे. साध्यासोप्या गोष्टी, उदाहरणार्थ हवेतील आद्र्रतेचा मानव, वनस्पती, प्राणी, इमारती, विविध उपकरणे यांवर होणारा परिणाम काय असतो, यांसारख्या बाबी लेखकाने फार सहजपणे उलगडलेल्या आहेत. पाणी हे आग कशी विझवते या व यासारख्या कुतूहल असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे गमतीदार पद्धतीने मिळतात.
जलप्रदूषण या तिसऱ्या विभागात पाण्याचे विविध पद्धतीने होणाऱ्या प्रदूषणाचे विवेचन केले आहे. यात प्रदूषणामुळे मानव, प्राणी, वनस्पती, हवामान यावर होणारा घातक परिणाम विशद केला आहे. जलप्रदूषणामुळे विविध रोग व आजार यांच्या बरोबरीला आम्लयुक्त पावसामागचे कारण स्पष्ट केलेले आहे. शुद्ध पाणी मिळवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात तसेच पाणी शुद्ध ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे या विभागात सांगितलेले आहे.
या पुस्तकातील चौथा विभाग महत्त्वाचा आहे. यात भविष्यकालीन जलसंकटाची माहिती दिली आहे. पाण्याच्या जागतिक पातळीवरील चणचणीमुळे भावी युद्धे पाण्यासाठीच होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. हा विभाग आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडतो, तर पुस्तकातील पाचवा विभाग हा संदर्भयुक्त म्हणावा असा आहे. यात संस्कृत भाषेतील पाण्याची महती अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली आहे. यातील सर्व संदर्भाकरता लेखकाने बरेच कष्ट घेतल्याचे जाणवते. आयुर्वेद आणि पाणी व संस्कृत भाषा आणि पाणी या दोन्ही लेखांतून पाण्याचा प्राचीन मानवी संबंध आपल्याला समजतो. वराहमिहीर, वाग्भट या प्राचीन शास्त्रज्ञांचे पाण्याच्या अभ्यासासंबंधीचे योगदान चरक व सुश्रुत संहितामधील पाण्याबाबतची चर्चा यात दिली आहे. ती प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी आहे.
संकीर्ण या सहाव्या विभागात पाण्याच्या संदर्भातील मराठी व इंग्रजी भाषेतील वाक्प्रचार, म्हणी याविषयी एक स्वतंत्र प्रकरण आहे. आपल्या जलमय शरीराची इत्थंभूत माहिती देताना प्रत्येकाने दिवसभरात नेमके किती पाणी प्यायला हवे हेदेखील शास्त्रीय पद्धतीने सांगितले. गरम पाण्याचे झरे व साबणाच्या पाण्याचे फुगे या दोन भिन्न विषयावर समान चिकित्सेने लिहिले आहे. शहाळ्याच्या पाण्याचे काय गुणधर्म असतात, यापासून मुंबई शहराचा पाणीपुरवठा नेमका कसा आहे याबद्दल या विभागात अत्यंत बारकाईने माहिती दिली आहे. याच विभागातील महत्त्वाचा लेख म्हणजे समर्थ रामदास यांचे आपनिरूपण. दासबोधातील हे प्रकरण पाणी हे कसे परमेश्वरासमान आहे याची मांडणी करते.
परिशिष्टांमध्ये पाण्याच्या संदर्भात महत्त्वाचे असणारे विविध पारिभाषिक शब्द व महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ, वेबसाईटस् यांचा समावेश केल्याने पुस्तक परिपूर्ण होण्यास मदत झाली आहे. या पुस्तकासाठी लेखकाने जागतिक मासिकांचा, वर्तमानपत्रांचा, अहवालांचा व घटनांचा वापर केल्याने मराठीमध्ये पाण्याविषयी उत्तम माहिती देणाऱ्या पुस्तकाची भर पडली आहे. अभ्यासक, वाचक यांच्यासाठी ते महत्त्वाचे आहे.
याला ‘जीवन’ ऐसे नाव – मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २१२, मूल्य- २०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2013 1:10 am

Web Title: following story of water science
Next Stories
1 सांगोपांग मास्टर दत्ताराम
2 असण्याची सर्जनशील ग्वाही
3 क्रांतपथिक डॉ. गणेश देवी
Just Now!
X