News Flash

फुटबॉलचं गाणं.. युद्धाचं गाणं

चार वर्षांपूर्वीचीच गोष्ट. जगभरचे फुटबॉलप्रेमी टीव्हीच्या पडद्याला चिकटून बसले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘फिफा’ जागतिक करंडकाच्या स्पर्धा पार पडत होत्या.

| November 16, 2014 06:18 am

चार वर्षांपूर्वीचीच गोष्ट. जगभरचे फुटबॉलप्रेमी टीव्हीच्या पडद्याला चिकटून बसले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘फिफा’ जागतिक करंडकाच्या स्पर्धा पार पडत होत्या. माझ्या कानांवर इकडेतिकडे lok10तुकडय़ातुकडय़ानं एक गाणं पडत होतं. कोका-कोलाची जाहिरात वाटत होती; पण ते गाणं तर जिंगलपेक्षा पुष्कळ निराळं वाटत होतं. कुणीतरी म्हणालं, ‘के नानचं गाणं आहे ते- वेव्हिंग फ्लॅग.’ तरी ते तेव्हा लगोलग ऐकायचं राहूनच गेलं. पण चांगले सूर हे रसिकांचा पाठलाग करतात यावर माझा विश्वास आहे. तसेच ते ढंगदार आफ्रिकी ठेक्यांनी आंदोळणारे सूर मला सरतेशेवटी भेटलेच आणि जगातल्या अनेकांसारखा त्यांनी माझा ताबा घेतला. त्या गाण्याची चालच किती आशादायी होती! नुसतं आनंदी उत्सवाचं सार मांडणारी नव्हे, तर श्रद्धेची, स्वप्नांची, आंतरिक उमाळ्याची किनार त्या चालीला होती. त्या केनान का बेनानचा आवाजही आवडला मग. मधुर, जाड, फिरता आणि कुठल्याच विशेषणात न बसणारा, पण तरी स्वतंत्र बाज असलेला.. आणि मुख्य म्हणजे जग बघितलेला! आणि मग त्या शब्दांचं वजनही जाणवलं मला.
   ‘Give me freedom, give me fire
Give me reason, take me higher…’
स्वातंत्र्याची, तेजाची, प्रज्ञेची आराधना करून वरती वरती झेपावणारा एखादा मंत्रच वाटला मग तो. ‘स्पोर्ट्स साँग्ज’च्या सामान्यपणे दिसणाऱ्या लक्षणांत ते गाणं मावत नव्हतं. त्याचा जिवंतपणा हा उपयोजित संगीताच्या कक्षेवरचा वाटत होता. पण मग ते तिथवरच राहिलं. स्पर्धा संपल्या, टीव्हीवरची गाणी बदलली. लक्षात राहिल्या त्या चार मंत्रासारख्या असणाऱ्या ओळी आणि त्यामागोमाग येणारा आशावाद.
‘When I get older, I will be stronger
They’ll call me freedom,
Just like a waving flag
and then it goes back…’
‘जेव्हा होईन मी मोठा, शक्तीला मग ना तोटा, स्वतंत्र मजला म्हणतील रे, ध्वजासारखा लहरीन रे, पुढे नि मागे लहरीन रे..’
आणि अजून लक्षात राहिलं त्या गायक-गीतकाराचं जगावेगळं नाव K’ naan म्हणायचं की केनॉन, की नुसतं नाऽऽन? मी तीन रसिकांना तीन तऱ्हांनी ते नाव उच्चारताना ऐकलं होतं. तो मूळचा सोमालियाचा; पण नंतर कॅनडामध्ये स्थलांतरित झालेला आहे याची नोंदही पुरवणीमधली गॉसिप बातमी वाचताना मी घेतली आणि मग ते गाणं तिथं थांबलंच. जवळजवळ विस्मृतीत गेलं.
दोन वर्षांनंतर एम. ए. इंग्रजीच्या विद्यार्थ्यांशी तास संपल्यावर गप्पा चालल्या होत्या. ‘कॉन्टेक्स्ट’ (context)या समीक्षेतल्या जिव्हाळ्याच्या विषयावर गप्पांची गाडी सरकली. एक तल्लख परदेशी विद्यार्थिनी म्हणाली, ‘पण संदर्भ (context) हे खरंच इतके महत्त्वाचे असतात का? संदर्भ नसतानाही आपण चित्राचा आस्वाद घेऊ शकतो, परकं गाणं ऐकू शकतो.’ ‘संदर्भ नसणं असं काही नसतंच. पहिल्यांदा सुमो मल्लांची कुस्ती आपण भारतीय बघतो तेव्हा जपानी संदर्भ माहीत नसतात. पण आपण आपल्या मातीचे, आखाडय़ांचे, हिंद-केसरी वगैरे मल्लांचे संदर्भ त्याला जोडतोच,’ मी म्हटलं.
ते माझंच विधान त्याच रात्री मला प्रात्यक्षिकासारखं भेटेल आणि तळ हलवून टाकेल असं वाटलं नव्हतं. पण तसं झालं आणि ‘वेव्हिंग फ्लॅग’ गाण्याच्या रूपानं झालं. अगदी सहज म्हणून गाणं ऐकायला घेतलं आणि एका क्षणात कळलं, की मागची स्वरयोजना निराळी आहे. मग कानावर पडले शब्द. तेही वेगळेच होते. फक्त ध्रुवपद सारखं होतं. आणि काय गाणं होतं ते! छे! मी लगोलग नेटवर शोध घेतला आणि मग लक्षात आलं की, जगापुढे केनानचं गाणं आलं ते फुटबॉलच्या संदर्भात- ‘celebration mix’ या नावानं. पण मुळात ते गाणं नुसतं गाणं नव्हतं, तर सोमालियाच्या एका अख्ख्या करपलेल्या पिढीचं ते आक्रंदन होतं! ‘मोगादिशू’ या सोमालियाच्या राजधानीमध्ये केनान लहानाचा मोठा होताना त्यानं स्वत: दंगली पाहिल्या, मृत्यू पाहिले. यादवी युद्धाचं तांडव त्यानं स्वत: अनुभवलं. एकदा तर हातामध्ये खेळताना बटाटा म्हणून जे धरलं तो ग्रेनेड निघाला आणि त्यानं फेकताक्षणीच तो फुटला. तो जेमतेम वाचला! त्याचं कलाकारांचंच घराणं होतं मुळी. या अस्थिर देशातून पाय बाहेर काढणं त्या माणसांना गरजेचं वाटलं यात आश्चर्य नाही. पण आश्चर्य हे होतं, की न्यूयॉर्क (आणि नंतर टोरँटो)मध्ये गेलेला सोमाली के नान हिप-हॉप, रॅप ऐकता ऐकता इंग्रजी शिकला! त्याला कुणी रीतसर इंग्रजी शिकवलं नाही, तरी एकलव्यासारखा तो गाणी ऐकत भाषा शिकला! (गाण्याचं भाषाशिक्षणात किती महत्त्व आहे हे अशावेळी पटतं!) आणि नुसता शिकला नाही, तर गाणीही रचू लागला. सोमालियाची, आफ्रिकेचीच खरं तर दु:खं त्याच्या गाण्यांमधून बाहेर पडू लागली. ‘वेव्हिंग फ्लॅग’ गाण्यातला स्वातंत्र्याचा संदर्भ-contex असा होता तर! ‘जेव्हा होईन मी मोठा, शक्तीला मग ना तोटा’ हे बोल मग शाळकरी उत्साही फुटबॉलप्रेमी पोराचे राहिले नाहीत. एका महाभयंकर अराजकाशी सामना करणाऱ्या पिढीचे ते बोल ठरले. खरंच, context हा किती किती महत्त्वाचा असतो. पुढे ते गाणं मी कितीदा तरी ऐकलं. डोळ्यात पाणी आणणारं ते गाणं आहे. पहिल्यांदा ऐकताना त्याचे इंग्रजी उच्चार मला पटपट समजत नव्हते. ‘स्ट्रगलिंग, फायटिंग’ इतकंच ऐकू येत होतं. आणि मग जेव्हा ती ओळ ‘So we struggling, fighting to eat…’ अशी असल्याचं ध्यानी आलं तेव्हा त्या भुकेच्या पुढे सारी रसिकता फोलपटासारखी उडून गेली!
केनानचं ते गाणं गीत म्हणून, चाल म्हणून, गायकी म्हणून, स्वरयोजना म्हणून- सर्वच स्तरांवर अप्रतिम आहे. तो गातो आणि सांगतो- काळय़ाकभिन्न उजाड रस्त्यांची कहाणी.. तिथलं दैन्य.. नेत्यांनी वापरून सोडून दिल्याचा संताप. आणि तरी या साऱ्यातूनही वर उंचावलेला आशावाद. तो आशावाद खोटा नाही आणि तो संतापही खोटा नाही.
‘But look how they treat us
Make us believers
We fight their battles
Then they deceive us’
‘ते बघा तर आम्हाला कसे वागवतात! आम्ही त्यांच्यासाठी लढतो अन् ते आम्हाला पार फसवतात, दगा देतात..’ असा संताप आपल्या थेट परिचयाचा नाही. ऑफिसातल्या बॉसच्या संदर्भातही या ओळी लागू होतात; पण त्याचं त्या बिनवजनाच्या संदर्भात सारं महत्त्वच हरवून जातं! युद्ध, यादवी जिथे प्रत्यही घडत असते अशा उजाड देशाचा नागरिक असणं, हीच मुळी एक शिक्षा असते. ग्रेस यांनी आपल्या एका कवितेत म्हटलंय, ‘हृदय सजवणारा मित्र नाही उशाशी.’ तेही एक युद्धच असतं- निराळ्या पातळीवरचं. परवाच माझ्या त्या परदेशी विद्यार्थिनीचा फेसबुकवर ‘मेसेज’ आला. तिचं आणि तिच्या देशाचं नाव मला सांगायचं नाही, पण ती जे लिहिते आहे ते केनानसारखंच आहे. ‘सर, इथे परिस्थिती वाईट आहे. रोज माणसं दगावतात. इंग्रजीच्या शिक्षणालाही अर्थ राहिलेला नाही. माझ्या देशाचा नागरिक असण्याचाही मला आता अभिमान वाटत नाही. ‘And I miss India.’ उत्तरादाखल मी तिला केनानचा आशावाद पाठवून दिला आहे. ‘So we patiently wait for that fateful day’ – ज्या सुवर्णक्षणी आम्ही मोकळे होऊ, स्वतंत्र होऊ, जेव्हा आम्ही मोठे होऊ आणि स्वातंत्र्याचा ध्वज तेव्हा कसा वर-खाली, आडवा-तिडवा वेगामध्ये लहरत असेल!’ केनान आज कोका-कोलाच्या त्या गाण्यामुळे प्रसिद्ध आहे. कुणी म्हणतात, त्यानं त्याचं गाणं बाजारू व्यवस्थेला विकलं. कुणी म्हणतात, उलट त्यामुळे त्याचं मूळचं गाणं हळूहळू करत का होईना, पण जगभर पोहोचलं. कुणी असंही कुजबुजतात, की तो आता खोऱ्यानं पैसे मिळवत गाऊन चैन करीत असेल. पण मला मात्र कवी ग्रेसांचीच ओळ पुन्हा स्मरते- ‘हृदय सजविणारा मित्र नाही उशाशी.’ आणि मग टोरँटोमधल्या त्या थंडगार हवेत आपल्या मूळ आफ्रिकन देशाची, तिथल्या बालसवंगडय़ांची आठवण काढत कुशीवर तळमळणारा केनान दिसू लागतो! त्याच्या गाण्यांनी अनेक हृदये सजवलेली असली तरी त्याचं स्वत:चं हृदय सजवणारा देश मात्र कॅनडा नसतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:18 am

Web Title: football song a good music follows listeners
टॅग : Music
Next Stories
1 ढगाला लागली कळ
2 जगणं एक कोडं असतं
3 लक्ष्मीपूजन: पॉप स्टाईल!
Just Now!
X