रात्री दीडच्या सुमाराला माझ्या स्वीडिश पाहुण्यानं मला विचारलं, ‘‘यलगॉन कुठे आहे?’’
पाहुण्याला तासाभरापूर्वी मी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रिसीव्ह केलं होतं. गाडी ताजमहाल हॉटेलच्या दिशेनं पळत होती. पाहुण्यानं विमानात मान टेकून आराम केलेला होता. मी दिवसभर ऑफिसात मान मोडून काम केलेलं होतं. पाहुण्याची झोप विमानात पुरी झाली होती. माझी अजून सुरू झाली नव्हती. साहजिकच गाडीत माझा डोळा लागला होता. पाहुण्यानं ब्रीफकेसमधून फाइल काढून ती चाळायला घेतली होती.
पाहुण्यानं प्रश्न रिपीट केल्यावर माझ्या मेंदूत प्रकाश पडला. पण माझ्या कोणत्याही भारतीय किंवा परदेशी सहकाऱ्याचं नाव यलगॉन नव्हतं. भारतातल्या कोणत्याही नागरिकाचं इतकं विचित्र नाव नसतं.
मी उत्तर दिलं, ‘‘यलगॉनचा आमच्या कंपनीशी काडीचाही संबंध नाही.’’
पाहुणा गडबडला, ‘‘असं कसं? माझ्याकडच्या कागदांमध्ये सतत यलगॉनचा संदर्भ येतोय.’’
मी जांभई देत म्हटलं, ‘‘आश्चर्य आहे. या नावाचा कोणताच माणूस आमच्या कंपनीत नाही.’’
माझ्याकडे रोखून पाहत पाहुण्यानं ठणकावलं, ‘‘माणूस नव्हे. कारखाना. यलगॉनमधला तुमचा कारखाना बघायला आपण जाणार आहोत ना आज सकाळी? माझ्या कार्यक्रमात तसं स्पष्ट लिहिलंय.’’
 ‘‘आज? आजचा दिवस संपला. शेपूटसुद्धा शिल्लक राहिलं नाही. उद्याचं बोला.’’
 ‘‘असं कसं? नवीन दिवस सुरू झाला की बारा वाजता.’’
अरेच्चा! माझ्या लक्षातच नाही राहिलं. आमचा नवीन दिवस सूर्योदयापासून सुरू होतो. यांचा मध्यरात्रीपासून. रात्रीच्या वेळी यांचा दिवस कसा काय सुरू होतो हे एक कोडंच आहे. तरीही यलगॉन नावाच्या गावात आमचा कारखाना नाही इतकंच नव्हे तर या नावाचं गावही भारतात नाही हे निर्वविाद सत्य होतं. मी त्याला ते खंबीरपणे सांगितलं. पण पाहुणा हटायला तयार नव्हता,  ‘‘माझ्याकडच्या माहितीनुसार मी यलगॉन आणि युन्नऽ या दोन ठिकाणचे तुमचे कारखाने पाहायचे आहेत.’’
पाहुण्याची काही तरी गफलत होत होती हे मी जाणलं. अशा टाइपची नावं सर्वसाधारणपणे व्हिएतनाम, कंबोडिया, ब्रह्मदेश या देशांमध्ये असतात. ब्रह्मदेशच्या राजधानीला आता रंगूनऐवजी यानगॉन म्हणतात हे ऐकून होतो. यलगॉन हे यानगॉन शहराचं उपनगर असणार बहुतेक. मी पाहुण्याच्या पाठीवर थोपटून म्हटलं,  ‘‘प्रवासाच्या घाईगडबडीत होतं असं बऱ्याचदा. तुम्ही चुकून दक्षिण आशियाची कागदपत्रं आणण्याऐवजी दक्षिण-पूर्व आशियाचे आणले आहेत. यलगॉन हे ठिकाण ब्रह्मदेशात आहे.’’
 ‘‘ब्रह्मदेश म्हणजे?’’
 ‘‘आताचं म्यानमार. १९८९ मध्ये नाव बदललं नाही का?’’
धांदरट पाहुणा भूगोलाप्रमाणेच इतिहासातही कच्चा होता तरीही हेका सोडायला तयार नव्हता, ‘‘यलगॉन म्यानमारमध्ये नाही. भारतातच आहे. हा बघा तुम्हीच पाठवलेला कार्यक्रम.’’ असं म्हणून त्यानं एक कागद माझ्या डोळ्यांसमोर फडफडावला. मी गाडीतला दिवा ऑन करून वाचलं, ‘जळगाव आणि जुन्नर.’
मी कपाळावर हात मारला. पाहुण्यानं विजयी मुद्रेनं माझ्याकडे पाहिलं. मी दिवा ऑफ केला.
स्वीडनमधल्या मूळ कंपनीत चार महिन्यांचं प्रशिक्षण आटोपून परतलेल्या एका सहकाऱ्यानं दुसऱ्या दिवशी माझं प्रबोधन केलं, ‘‘नॉर्थ जर्मनिक भाषांच्या गटामधल्या स्वीडिश भाषेत जे अक्षराचा उच्चार वाय अक्षरासारखा होतो. आपण काही वर्षांपूर्वी ज्या जागतिक टेनिसपटूला बिजोन बोर्ग या नावानं ओळखत होतो त्याच्या नावाचा मायदेशी उच्चार ब्योन बोर्ग असा आहे. जेन्स जोहानसन हे नाव स्वीडिश लोक येन्स योहानसन असं उच्चारतात.’’
पण जुन्नरचा फॅक्टरी मॅनेजर जबरदस्त हैराण झाला. त्या जयाजीत जमसंडेकरला पाहुणा सतत ययायीऽ यम-संडे-खाऽ म्हणत होता. ‘य’च्या बाराखडीत घेतलं जाणारं आपलं नाव ऐकून जयाजीतला परत बालवर्गात गेल्यासारखं वाटायला लागलं. वर फोडणी मिळत होती ती यम, संडे आणि खा या शब्दांची. पाहुण्याच्या कानात ‘ज’ ओतला की त्याचा आत्मा जीभेला ‘य’ म्हणण्याची स्फूर्ती देत होता. तशात एकदा कधी तरी पाहुण्यानं भारताचा दौरा आटोपण्यापूर्वी ययपूऽ, योध्पूऽ, यय-सलमे आणि यार-कॅन पाहण्याची इच्छा दर्शवली तेव्हा माझ्या सेक्रेटरीनं उघडलेलं तोंड मला स्वत:च्या हातानं बंद करावं लागलं.
ही हकीकत मी एका भाषातज्ज्ञांच्या कानांवर घातली. ते खो खो हसत म्हणाले, ‘‘आपण भारतीय लोकही तेच करतो की. पूर्वीपासून करतोय. फक्त त्यांच्या उलट करतो इतकाच काय तो मामुली फरक.’’
मी सात्त्विक संतापानं म्हणालो, ‘‘आपण अशी फिरवाफिरवी कधीच करत नाही. आपले उच्चार शुद्ध असतात. आपण पुण्याला गेल्यावर एक वेळ ‘ध’चा ‘मा’ करू, पण ‘ज’चा ‘य’ कधीही करणार नाही.’’
 ‘‘पण, ‘य’चा ‘ज’ करतो की.’’
मी ‘आ’ वासला. विद्यावाचस्पतींनी माझ्याकडे रोखून पाहत विचारलं,  ‘‘चलो मन गंगा जमुना तीर हे भजन ऐकलंय? ते कोणाचं?’’
 ‘‘अनुराधा पौडवालचं.’’
 ‘‘संत मीराबाईचं.’’
 ‘‘हो.’’
 ‘‘सूरदासांची भजनं, तुलसीदास आणि कबिराचे दोहे कधी वाचनात आले आहेत का? उत्तर िहदुस्थानात कधी पायधूळ झाडून आलात की नाही?’’
 ‘‘जातो की दर महिन्याला मार्केट रीव्ह्यू मीटिंगसाठी.’’
 ‘‘मग? तिथं अजूनही सर्रास यशवंतचा जसवंत होतो, यशोमतीची जसोमती होते हे कसं माहीत नाही? माता जसोदा करत आरत, कबीर दरसन जावे. तिथं यास्मिनची जस्मिन होते, यदुनाथचा जदुनाथ होतो. कबीर म्हणतो- दो दिनका जजमान. पुढे म्हणतो- जोगी दुखिया, सुखिया कोई नही. तुलसीदास म्हणतात..’’
 ‘‘आलं लक्षात.’’ मी प्रासादिक जमुनेत गटांगळ्या खात कबुली दिली. चुरचुरणाऱ्या डोळ्यांसमोर लालूप्रसाद आता जाधवकुलोत्पन्न झाल्याचं दिसलं.     
 ‘‘यूरोपमध्ये माया हे नाव प्रचलित आहे. पण तिथल्या काही देशांत वाय ऐवजी जे अक्षर लिहिलं जात असल्यामुळे त्या महिलेला बाहेरचे लोक माजा अशी हाक मारण्याचा धोका असतो. तसंच, योयोबा नावाच्या एका बहुगुणी वनस्पतीचं अधिकृत स्पेिलग जोजोबा असं आहे. महाराष्ट्रात आपणही राजाला राया म्हणतोच की. तर ‘ज’ आणि ‘य’ यांचं हे असं आंतरराष्ट्रीय साटंलोटं आहे. तुमच्या पाहुण्यालाही शिकवा हे. सोबत मराठी शिष्टाचारही शिकवा. म्हणजे मग तो जिथं तिथं ‘य’ म्हणण्याऐवजी ‘ज’ म्हणायला शिकेल.’’
मी जरा विचार केला आणि पाहुण्याच्या शिकवणीची कल्पना रद्द केली.
मनात म्हटलं, ‘‘नको रे बाबा! हॉटेलच्या खोलीचं दार उघडल्यावर तो व्यवस्थितपणे सूचनापालन करून माझ्यासारख्या सभ्य गृहस्थांना ‘या या’ म्हणण्याऐवजी ‘जा जा’ असं म्हणायला लागला तर काय घ्या?’’