हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

वराह हे विष्णूच्या दशावतारांपैकी एक रूप. गेल्या लेखामध्ये प्राचीन विज्ञानाविषयी (आधुनिक धारणेमध्ये ज्याला ‘science’ म्हणतात.) चर्चा करताना ‘वराह-भूमाताउद्धार’ या पौराणिक कथेचा संदर्भ आपण पाहिला. तो ज्या संदर्भात वाटला, तो संदर्भ आज लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करणं गरजेचं आहे. काही वर्षांपूर्वी एका अतिशय चार्मिग व्यक्तिमत्त्व असलेल्या, फडर्य़ा इंग्रजीमध्ये भाषण करणाऱ्या एका वक्त्याचं भाषण समाजमाध्यमावर व्हायरल झालं होतं. प्राचीन भारतीय लोकांनी ‘सायन्स’मध्ये केलेली प्रगती या विषयावर एका आयआयटीमध्ये हे व्याख्यान आयोजित केलं गेलं होतं. वराहांनी आपल्या अर्धवर्तुळाकार सुळ्यांवर पृथ्वी तोलली असल्याच्या कल्पनेवरून पृथ्वीच्या गोलाकारत्वाची जाणीव शास्त्रकारांना होती, अशी एक धारणा वक्त्याला रुजवायची होती. मूर्तिशास्त्रानुसार आणि पौराणिक रचनांनुसार, वराहांनी पृथ्वीगोलाचा उद्धार केला नसून, भूदेवी या पृथ्वीच्या स्त्रीरूपाचा उद्धार केल्याचे आपल्याला दिसून येते. भारतभर पसरलेल्या शेकडो प्राचीन वराहमूर्ती आणि मध्ययुगापर्यंतची चित्रे आपल्याला हेच दाखवून देतात. भूगोलाविषयीची बहुतांश प्राचीन-मध्ययुगीन भारतीय समाजातील धारणा साधारणत: अशीच होती. भारतीय ज्ञानव्यवस्थांची रचना करणाऱ्या विद्याशाखा व ग्रंथपरंपरा आधिदैविकवाद, निवृत्तिवाद, मोक्षनिर्वाणादि हेतू आणि पौराणिक मिथकविश्व यांच्यात अगदी बेमालूमपणे मिसळून गेल्याने त्यांचा विचार करताना किमान भौतिक ज्ञानव्यवस्थांच्या बाबतीत तरी आपल्याला सतत सावध राहावे लागते. साक्षात पृथ्वीविषयीच्या पारंपरिक ग्रंथधारणा याच कोशांमध्ये गुरफटलेल्या असतात, तिथे भूगोलविषयक किंवा उपखंडीय प्रादेशिक धारणा यादेखील अशा असणे स्वाभाविकरीत्या दिसून येते.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

महाराष्ट्राचा समाजेतिहास, धर्मेतिहास या क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या अमेरिकन प्राध्यापिका अ‍ॅन फेल्डहाऊस यांनी आपल्या ‘कनेक्टेड प्लेसेस : रीजन, रिलीजन अ‍ॅण्ड जिऑग्राफिकल इमॅजिनेशन इन् इंडिया’ या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथाची सुरुवात करताना कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील, पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर नामक प्रसिद्ध स्थानासंबंधीच्या चर्चेतून आपल्या ग्रंथाचा श्रीगणेशा केला आहे. स्थानिक धारणांनुसार, कऱ्हा खोऱ्यात असलेल्या या ठिकाणी महाभारतकाळात पांडवांनी यज्ञ केला. पण तेव्हा कऱ्हा नदी अस्तित्वात नव्हती. पाणी शोधण्यासाठी भटकणाऱ्या अर्जुन आणि नकुलाला एक तपस्वी ध्यानमग्न अवस्थेत दिसला. त्याला जागे करण्याच्या नादात दोन भावांचा धक्का कमंडलूला लागला व त्यातून कऱ्हा नदीचा उगम झाला. संतापलेल्या तपस्व्याने दोघा पांडवांचा पाठलाग सुरू केला. तपस्वी जसजसा जवळ येई तसे अर्जुन-नकुल एक तांदळाचा दाणा मागे फेकत. त्याचे शिवलिंगात रूपांतर होई व तो तपस्वी त्या लिंगाची पूजा-नमस्कार करण्यात वेळ घालवी. प्रा. फेल्डहाऊस यांनी दाखवून दिल्यानुसार, कऱ्हेचा शंभर कि. मी. लांबी असलेला पूर्ण टापू हा शिवमंदिरांनी भरलेला आहे. फेल्डहाऊस बाई म्हणतात त्यानुसार, नदी हे एकमेव भौगोलिक भौतिक तत्त्व असे आहे, जे वाहते आहे. या प्रवाहांनी वेगवेगळे भूभाग, गावे, प्रदेश जोडले जातात. भौगोलिक अंतर व भिन्नतेमुळे वेगळ्या असलेल्या या भूप्रदेशांना जोडणारा धागा हा नदी असल्याने नदीच्या भौगोलिकतेला पौराणिक देवत्वाची जोड देऊन त्या भौगोलिकतेला पावित्र्यव्यूहात बसवण्याची रीत प्राचीन साहित्य/शास्त्रकारांनी अंगीकारली असे आपल्याला दिसून येते. विद्यमान भूगोलाचा रूढ इतिहास पाहता काही लाख वर्षांपूर्वी एकसंध असलेला भूपट्टा तुकडे पडून विखंडित झाला. त्या तुकडय़ांपैकी गोंडवन अशी आधुनिक संज्ञा असलेला सर्वात मोठा भूपट्टा विखंडित होऊन त्यापैकी उपखंडाचा तुकडा उत्तरेकडे सरकत दुसऱ्या भूपट्टय़ाला आदळला व त्या भौगोलिक स्थित्यंतराची परिणती हिमालयाच्या निर्मितीत झाली, हा भूगोलशास्त्रात ढोबळपणे सर्वाना मान्य असलेला सिद्धान्त आहे. पृथ्वीचा एक्काहत्तर टक्के  भूभाग पाण्याने व्यापला असल्याने व पाणी मानवी जीवनासाठी आवश्यक असा सर्वात प्राथमिक घटक असल्याने मानवी संस्कृतीचा, किंबहुना सजीव संस्कृतीचाच पूर्ण पसारा पाण्यावर व जलस्रोतांवर बेतलेला आहे. पर्यायाने मानवी श्रद्धा व आस्था यासोबतच समाजाच्या भूगोल/ प्रदेशविषयक धारणादेखील जलवाहिन्या व कुंड-विहिरी-तीर्थादि जलस्रोतांभोवती केंद्रित दिसतात. प्राचीन भारतीय भौगोलिक धारणा आणि त्यांच्याभोवतीची पावित्र्यव्यूहाची वीण याला इंग्रजीत ‘sacred geography’ असे म्हटले जाते. अर्थात प्राचीन भारतीय साहित्यातील भौगोलिक वर्णने केवळ श्रद्धेच्या अंगाने चित्रित आहेत असे म्हणणे काहीसे अन्याय्य असले तरीही संस्कृत साहित्यकार किंवा बौद्ध जातकादि साहित्याचे निर्माते यांच्या भौगोलिक धारणांना पौराणिक किंवा गुरू-देव-बुद्धगौरवाच्या भावनांच्या प्रभावाने भारलेले दिसते. वेंकटध्वरी या कवीचे ‘विश्वगुणदर्शचंपू’सारखे ग्रंथ आहेत; ज्याचा वण्र्यविषय उपखंडातील वेगवेगळ्या प्रदेशांतील भूरचनांची वैशिष्टय़े, तिथले सौंदर्य, पीकपाणी, लोकांची स्वभाववैशिष्टय़े हा आहे. कालिदासाच्या ‘मेघदूता’मध्ये असलेली भूगोलाची वर्णने अद्याप रसिकांच्या मनाला गूढ गारूड घालत आलेली आहेत. अर्थात या वर्णनांचा आधार त्या कवी-रचनाकारांची स्वत:ची निरीक्षणे हा असला तरीही त्या- त्या स्थानाभोवती विणल्या गेलेल्या स्थानमाहात्म्यांचा, धार्मिक-पौराणिक संदर्भाचा प्रभाव त्यांवर दिसून येतो.

प्राचीन व मध्ययुगीन भूगोलाला धार्मिक श्रद्धांच्या चौकटीत पाहायची रीत आपण वर पाहिलेल्या पांडेश्वर या तुलनेने अप्रसिद्ध अशा स्थानाच्या अंगाने तपासून पाहिली. मात्र, भारतीय धर्मातील वेगवेगळी तीर्थक्षेत्रे आणि त्यांच्याभोवतीच्या कोशांनी झाकून टाकलेल्या शास्त्रकारांच्या भूगोलविषयक धारणा तपासता या अध्ययनामागे वसाहतींचे कृषीव्यवस्थेचे व अन्य अर्थकारणाचे वेगवेगळे संदर्भ असल्याचे आपल्याला दिसून येते. आजच्या वर्तमानात जगताना उपखंडाच्या भूगोलाविषयीच्या धारणांना आपण आधुनिक पाश्चात्त्य राजकीय धारणांच्या अंगाने पाहू लागलो आहोत, हे आपल्याला मान्य करावे लागते. या भौगोलिक धारणांना आपल्या राष्ट्र-राज्यविषयीच्या विद्यमान संकल्पनांची जोड मिळाली आहे. नद्यांच्या पाण्याविषयीच्या वादाचे अनेक संदर्भ त्यामागे आहेत, धर्मविषयक भावनांची गुंतागुंत त्यात दडली आहे. ऐतिहासिक तपशिलांच्या परस्परविसंगत अशा जंत्रींतून निर्माण झालेली संभ्रांत ओळख व अस्मिता त्यामागे आहेत. शिवाय आधुनिक राजकीय इतिहासातील वेदनादायी अशा अप्रिय घटनांतून घडलेल्या भावनांच्या आवेगाची जोड त्या धारणांना मिळाल्याने आपल्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय जाणिवांना आमूलाग्र बदलून टाकण्याची क्षमता मानवी समाजातील भूगोलविषयक धारणांमध्ये असते हे आपण लक्षात घेणे आज गरजेचे आहे. यातील बरेचसे घटक या लेखमालेत व प्रस्तुत लेखकाने ‘लोकरंग’मध्येच लिहिलेल्या ‘धारणांचे धागे’ या सदरात चर्चेस घेतले गेले आहेतच. तरीही लेखाचे समापन करण्याआधी त्यांचा थोडक्यात धावता आढावा घेऊ या.

भारतवर्ष ही कल्पना महाभारताच्या काळात मोठय़ा प्रमाणात प्रसृत झाल्याचे आपल्याला दिसून येते. अर्थात महाभारत रचनेचा काळ हा काही‘शे’ वर्षांचा असल्याने संबंधित काळात बदलत गेलेल्या भौगोलिक धारणा, राजकीय व सांस्कृतिक भूभागांतील विस्तार इत्यादी गोष्टींसोबत या कल्पनेचा  विस्तार झालेला दिसतो. आधुनिक राजकारणात उदयाला आलेल्या व प्रसिद्ध पावलेल्या ‘अखंड भारत’ या संकल्पनेच्या कल्पित मानचित्रानुसार थेट अफगाणिस्तानापासून ते इंडोनेशियापर्यंत ही व्याप्ती दिसते. थोडक्यात- जिथे हिंदू (व बौद्ध) श्रद्धाविश्वातील सांस्कृतिक-राजकीय इतिहासाचे लिखित-भौतिक पुरावे मिळाले आहेत त्या भूभागांपर्यंत या ‘अखंड भारत’ संकल्पनेचा विस्तार झालेला दिसतो. त्यापैकी अफगाणिस्तान व म्यानमार हे ब्रिटिश इंडियाच्या काळात राजकीयदृष्टय़ा उपखंडाला जोडले गेलेले आहेत, हे वास्तव दुर्लक्षित ठेवले गेल्याचे दिसते. अनेकदा नामसाधम्र्य व उपासनासाधम्र्यामुळे प्राचीन झरतुष्ट्रीय लोकांच्या इराणला आर्य-राष्ट्राशी जैवसंबंध जोडला जातो तो अशाच कल्पित वांशिक राष्ट्रवादातून! हे असे संबंध जोडताना मानववंशशास्त्रातील इतिहास, स्थलांतरोत्तर सामाजिक अभिसरणाचा इतिहास, त्यातून झालेल्या सामाजिक उन्नयनाचा इतिहास बाजूला पडतात. अगदी मराठी ब्राह्मण समाजाच्या अस्मितांचा अभ्यास केल्यास दोन-तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत- म्हणजे शिवकालापर्यंत अनेक मराठी ब्राह्मण उपजातींना त्यांच्या भौगोलिक उगमाविषयीच्या वेगळेपणाच्या जाणिवांमुळे पुरेसे धार्मिक साहचर्याचे अधिकार नसल्याचे डॉ. माधव देशपांडे व रोझालिंड ओहँलोन यांसारख्या साक्षेपी अभ्यासकांनी दाखवून दिले आहे.

मनुस्मृतीमध्ये तर नर्मदेच्या दक्षिणेला वैदिकांनी न जाण्याविषयीच्या सूचना स्मृतिकारांनी घालून दिल्याचे दिसते. नदीच्या पाण्याच्या वादाचे म्हणाल तर तमिळनाडू-कर्नाटकातील कावेरीच्या पाण्यावरून असलेल्या संघर्षांला आधुनिक काळातील भाषावार प्रांतरचनेची जोड मिळाल्याचे दिसते. विशिष्ट भौगोलिक भूभागात राहत असल्यावर निर्माण होणाऱ्या प्रादेशिक अस्मितेला भाषिक अस्मितेची, ऐतिहासिक अस्मितेची जोड कशी मिळते, हे मराठी समाजाला वेगळे सांगायला नको.

थोडक्यात, इतिहास आणि भूगोल यांच्या संदर्भातील कल्पना मानवी इतिहासातील राजकीय स्थित्यंतरांनुसार बदलत जाणाऱ्या आहेत. इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा असल्यास भौगोलिक रचना, त्यांच्या स्वरूपातील बदल, भारतीय उपखंडीयसंदर्भात भौगोलिक कारणांमुळे आपल्या वाटय़ाला आलेल्या मान्सून चक्रातील बदल व संक्रमणे इत्यादी अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. इतिहासातील गुंतागुंती केवळ मानवी व्यवहार आणि राजकीय- सांस्कृतिक संदर्भानुसारच जटिल होत जातात असे नव्हे, तर भूगोलाशी निबद्ध शेकडो-हजारो बाबी या इतिहासाला लक्षणीय वळणे देत असतात. या वळणांचा परामर्श घेणे काही खंडात्मक ग्रंथाचा विषय आहे. आपण माध्यम व वेळेच्या मर्यादा लक्षात घेत या लेखात आढावा घेतलेल्या कळीच्या मुद्दय़ांवर अधिक विचार व इतिहासाचे बहुपेडीपण लक्षात घेऊ या.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)