|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

 

Mumtaz slams Zeenat Aman for suggesting live-in
“यामुळे फॉलोअर्स वाढणार नाही”, झीनत अमान यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर भडकल्या मुमताज; म्हणाल्या, “Cool आंटी…”
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
18 month old baby head stuck in vessel viral video
पातेल्यात अडकले चिमुकल्या बाळाचे डोके!अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कसे वाचवले त्याचे प्राण, पाहा हा Video…
live-in partner killed and hung the body on tree
नागपूर : खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…

‘‘परधानजी.. आवो, आमाला हरवल्यागत व्हतंय.’’

‘‘हरवल्यागत? काय हरवल्यागत?’’

‘‘आम्मी सोत्ता!’’

‘‘आँऽऽऽऽ!’’

‘‘व्हय.. व्हय. आम्मी सोत्ताच सोत्तापासून हरवल्यागत व्हतंय.’’

‘‘महाराज, कलोक्युअलच्या नावाखाली भाषेची पार आय..’’

‘‘हां..हां, सबूर परधानजी, आपन दरबारात नस्लो तरी प्रोटोकॉल पाळलाच पायजेन.’’

‘‘आवो, मी म्हनत होतो- भाषेची आयडेंटिटीच पार हरवून जाती तुमी बोलायला लागल्यावर. मी काय शिवी देत नव्हतो.’’

‘‘हा ना! हरवतीए ना? तेच म्हणतोय आमी. सरक हरवल्यागत व्हतंय.’’

‘‘परसाकडं जाताय न्हवं टायमावं?’’

‘‘तर! देहधर्म टायमशीरच करतूय की. एकाड एक दिवस. दोन-दोन तासांनी खातोय. बाकी बारा तासांनी भोजनं घेतोय. भोजनात रेड मीट कमी केलंय.’’

‘‘व्हाट्सप बघताय का रात्रीचे?’’

‘‘नाय वो.’’

‘‘मंग न्यूज?’’

‘‘अं हं.’’

‘‘मंग काय इंस्टाच्या श्टोऱ्या पहात जागताय का?’’

‘‘छ्यॅ.. बिलकुल न्हाई.’’

‘‘ट्वीटर, एफबी तर चालवायला त्या कंपनीलाच दिलंय म्हना. पन तरी फीड घेत बस्ता का?’’

‘‘नाय. आजाबात नाय.’’

‘‘मायला, म्हाराज! म्हंजे तुमी मीडियाच कन्ज्युम करत न्हाई का काय?’’

‘‘नाय करत. मंजे थोडा टीवी, युटूब, ओटीटी वगरे पहातो, पन रँडममदी. आपल्याकडच्या मीडियावर ईश्वासच उरला न्हाई काई.’’

‘‘आवो, मंग भाएरचा घेत जा थोडा. एकदमच मीडिया बंद केलात तर बी ट्वेल्व्ह डेफिशियन्शी व्हीन की.’’

‘‘घ्येतोय ओ, थोडा अल् जजिरा न् बीबीशी जेवल्यावर झोप यीस्तवर चालू ठय़ेवतो रोज.’’

‘‘आन् तरीबी हरवल्यागत व्हतंय!’’

‘‘तर! त्येच म्हन्तोय मी. जीमिंग म्हनू नका, डायटिंग म्हनू नका, व्हॅकेशिनग म्हनू नका,  कल्चरल आऊटिंग म्हनू नका, इंटरनॅशनल फादमफॉक म्हनू नका.. समदं नॉर्मलवानी चालूए. आन् तरीबी हरवल्यागत व्हाया लागलंय.’’

‘‘एजिंग म्हनावं तर त्येबी नाय. आत्ता कुठं पंचविशी पार केलीया तुमी.. आन्.. आन् तरी..?’’

‘‘सत्तावीस परधानजी.’’

‘‘हा हा, तेच. पन सत्तावीस म्हंजे पन यंगन् डायनॅमिकच  की वो. आन् मंग तरीबी का व्हतंय?’’

‘‘मायला, म्हनून तर तुमाला अर्जंट बलावलं. आवो, पर्वा तर आसं वाटलं की आपनपन चंद्रयानातून गेल्यालोय आनी चांदोबाला घिरटय़ा घालत बसल्यालोय खिडकीत.’’

‘‘खिडकीत?’’

‘‘चंद्रयानाच्या हो. उतरुशी पन नाय वाटत आन् ऑर्बटंगपन बोर व्हतंय.’’

‘‘च्या मायला.. लयच त्रांगडं झालं म्हनायचं. म्हाराज, मी काय म्हंतो- रोजचं सकाळचं गाईचं दूद प्या आन् उघडय़ा अंगानं कवळ्या उनात बसा.’’

‘‘आमाला काय मुडदूस झालाय व्हय?’’

‘‘न्हाई- तसं न्हाई, पन फ्रेश वाटंन तुम्हाला म्हनून म्हनलं.’’

‘‘पन परधानजी, वाटतंय खरं मन मुरगळून गेल्यागत. म्हंजी बॉडीचा न्हाई, पन मनाचा मुडदूस तर नसंन?’’

परधान्या आ वासून बगत बसला. आता आपल्यावर काय आफत येती, या काळजीत बुडाला. तशी म्हाराज वराडले..

‘‘परधानजी, हे आसं आमच्यागत राज्यात आजून कुनाकुनाला व्हतंय शोदून काडा. कुनाकुनाची मनं मुरगळल्यात- समद्यांना आमच्यापुढं आना. या रोगावरचा उपाय काय ते वैद्य, डाक्टर, हकीम समद्यांना ईचारा. कामाला लागा.’’

परधान्या धपापला. आता ह्य़ो उरावर पडलेला कामाचा डोंगर कसा उपसावा त्याला कळंना. हिकडं राजवाडय़ात म्हाराजांना आराम पडावा म्हनून जो-तो कामाला लागला. कुनी थंड शरबताचा पेला प्यायचा आग्रह केला, तर कुनी मल्टिफ्लो एशी लावलं. उंची कपडय़ांच्या चळती कुनी पसरून दाखवल्या, तर कुनी दागदागिने, जडजवाहिरानं भरलेल्या पेटय़ा उघडून समोर मांडल्या. सात खंडांमधली सतराशे पक्वान्नं हारीनं वाढली तबकात.. आन् रानीनं केला सप्तशृंगार. सारं करूनही राजाचं मन काही रमंना. त्याचा मूड सुदरंना. मग दरबार भरला. दरबाऱ्यांनी खल केला. कुनी सरदार म्हनला, ‘‘शिकारीवर न्यू म्हाराजांला. रानातल्या जनावरांवर जनावरागत तुटून पडल्यानं म्हाराज ताजंतवानं व्हत्याल..’’

सेनापती म्हणला, ‘‘त्यापरीस बाजूच्या राज्यावर आक्रमन करू. त्यानं म्हाराजांमधी वीरश्री संचारून त्यांचा मूड परत यीन.’’

दरबारात खल सुरू होता आन् परधान्या गावभर फिरत व्हता. त्याला समदा कारभार सुरळीत चालल्यागत वाटत व्हतं. मानसं, वेडं स्वतत रमावं तशी हिकड तिकडं न बगता काहीबाही करत हुते. जो-तो बीजी व्हता. त्यांच्या बीजीनेसमदी डीश्टॉप करून त्यास्नी ईचारलं आसतं तर त्येंचा ढीसमूड व्हनार व्हता. म्हनून मग परधान्यानं आयडिया काडली. त्येनं वॉटशॅप मॅसेज ब्रॉडकाश्ट केला..

‘‘एवरीबडी फाईन एण्ड किकिंग?’’

तशी समदीकडनं मूठ वळून उभे आंगठे लोकांनी पाटवले.

परधान्याला हायसं वाटलं. त्यो मनाशी म्हनला,  ‘‘समदे तर मूडमदे हाएत. उगा म्हाराज परेशान करत्यात.’’ तरीपन एकदा खात्री करून घ्यायला त्यानं एका बीजी नोकरदाराला हटकून ईचारलंच-

‘‘काय बाबा, कसं काय? बरा हैस का?’’

तशी त्ये उदास हासलं आन् म्हनालं, ‘‘तसा तर बराच हाय म्हना. पन मन लागत न्हाई कशात. लई काळज्या आन् भीत्या मन पोखरत्यात. रोजची ईलायती दारू पितो, पर इमान उडत नाय. रिलॅक्स वाटत न्हाय. गोळ्या चालूएत.’’

परधान्या हाबकलं. त्ये गेलं डॉक्टरकडं आन् म्हनालं, ‘‘तू चल राजाकडं आन् दे गोळ्या.. नोकरदाराला दिल्या तश्या.’’

डॉक्टर म्हनला, ‘‘उगा नस्ती आफत का आन्ताय? मी दिलेल्या गोळ्यांनी लागलीच तर झोप लागंन फार फार तर. मी सोत्ता डबल डोस घ्यून पडून आस्तोय रातभर. उगा वेळ दवडू नका. भाएर लाईन लागलीए.’’

परधान्यानं लाईनीत पायलं. शाळकरी पोरांपासून शाळा संचालकांपर्यंत समदेच व्हते. आया-बाया, तरून-तरुनी, आजी-आजोबा समदेच. कुनाला भविष्याची भीती वाटत व्हती, तर कुनी चालू दिवसाचं भय बाळगून व्हता. कुनाला एकटं पाडलं गेलं व्हतं, तर कुनावर समदे तुटून पडले व्हते. ज्यांना नोकरी व्हती ते गुलामीत व्हते आन् नसलेले रागात. कुनाला मनासारखं शिक्षान मिळत नव्हतं, तर ज्यांना मिळत व्हतं त्यांना ते यंत्र बनवीत व्हतं. कुनी स्पध्रेनं खचला व्हता, तर कुनाला संधीच मिळत नव्हती. हाऊसवाईफला नवरा भेटत नव्हता आन् प्रेमीक प्रेयशीचा मुडदा पाडत व्हता. शेतकरी नेमानं आत्महत्या करत व्हते आन् गच्च जंगलात वनवे पेटत व्हते. दुष्काळानं विस्थापित हून कुनी रस्त्यावर आला व्हता. तर एक गाडी घरात लावून दुसरी फिरवीत कुनी रस्ता जाम सोडत नव्हता. समदेच गोळ्या खात व्हते. समदेच आंगठे पाटवत व्हते. पावसाच्या दिवसात पाऊस पडत नव्हता आन् बाजारात बारा महिने आंबा पिकत व्हता. गावं ओस पडत व्हती. शहरात नवी वसत व्हती. गावाची शहरं आन् शहरांचे देश झाले व्हते. सगळे रस्ते भरले व्हते. रातसारी दिवा उजळत व्हता. जो-तो टक्क जागा व्हता. आभाळात चांदन्या दिसत नव्हत्या तरी पावसाच्या पागोळ्या गळत नव्हत्या. प्रत्येकजन प्राब्लेम सांगत व्हता. परधान्या ऐकून दमत व्हता. वाहत्या रस्त्यातून, चमकत्या वस्त्यातून, चकाकत्या बाजारातून परधान्या भोवंडून वेशीभाएर आला. कल्यानकारी राज्याच्या त्यानं केलेल्या जाहिरातीच्या बोर्डावरचा दिवा भरदिवसा लख्ख उजळला व्हता. त्याखाली एक पिकला धनगर उदास बसला व्हता. परधान्यानं जाऊन त्येला ईचारलं,

‘‘बाबा, मेंढरं कुटं गेली?’’

आजानं आल्लाद वर पाह्य़लं. म्हनला,

‘‘लांडगं लय झाल्यात- मेंढरानं एकमेकाला सांगितलं आन् आपूनच मेली सगळी. लांडगं कमी करन्याचा उपाय तरी काय दुसरा?’’

परधान्या हाबकला. पळत म्हाराजांपाशी आला. त्यांला बाजूला घ्यून त्यानं पट्दिशी गोळ्या म्हाराजांच्या हातात कोंबल्या आन् म्हन्ला, ‘‘म्हाराज, लईच मोठी साथीची रोगराई आलीया. त्येच्यावर कायबी औषध न्हाय.’’

‘‘मंग आतारं!’’ म्हाराज कासावीस झाले.

‘‘काय न्हाय, या डबीतल्या गोळ्या खावा आन् पडून ऱ्हावा. कुनाचा मॅसेज आला.. ‘एवरीबडी फाईन एण्ड किकिंग?’ तर फक्त मूठ वळून आंगठा वर केलेला ईमोजी पाटवा. बास! काय व्हत नाय मग.’’

girishkulkarni1@gmail.com