18 November 2019

News Flash

गाण्याचं गद्य

‘‘मला ठाऊक नाही. मी बराच व्यवहारी झालोय असं वाटतं.’’

|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

‘‘तुम्ही गाणं कराल का एखादं माझ्यावर? म्हणजे तुम्हीच म्हणून नाही, तर कुणीही करेल का एखादं गाणं? सुचतील का काही रुणझुण नादाच्या ओळी? का तो काळ गेलाच आहे? मला माझ्यावरचं एखादं गाणं न ऐकताच परत फिरावं लागेल?’’

‘‘गाणं सुचायला हळवं मन हवं.’’

‘‘तुमचं आहे त्याहून हळवं?’’

‘‘मला ठाऊक नाही. मी बराच व्यवहारी झालोय असं वाटतं.’’

‘‘गाणं म्हणणं खुळेपणा वाटण्याइतके व्यवहारी?’’

‘‘तसं सांगता येणार नाही. कारण मला पूर्वीही कधी गाणं करावंसं वाटलं नाही. वाटलं असतं तर त्यातला खुळेपणाही जाणवला असता!’’

‘‘पूर्वी सहजी सुचायची म्हणे गाणी. शांतता जास्त होती म्हणून का?’’

‘‘हं. खुळेपणाही जास्तच असावा.’’

‘‘आजकाल थोडय़ा वेळापुरतंही खुळं होताच येत नाही कुणाला.’’

‘‘तुम्हाला पाहून मी झालोच की.’’

‘‘पण ते एकदाच. पुन्हा एकदा प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे?’’

‘‘सरावलो मी तुम्हाला. सरावलेपणातून मुग्धता जात असणार.’’

‘‘तरी का हट्ट करता वारंवार भेटण्याचा?’’

‘‘सारं कसं ठाऊक असणार? शोधायचं असतं बहुदा काहीतरी.’’

‘‘माझ्यात की तुमच्यात?’’

‘‘छे! छे!! असं ठरवून काहीच नाही. पण हवं असतं काहीतरी नवं.’’

‘‘मुग्ध होण्यासाठी?’’

‘‘नेमकं नाही सांगता येत. कधी हरवून जाण्यासाठी, तर कधी हसण्यासाठी.’’

‘‘आज हरवला आहात का? हसला नाहीत आल्यापासून.’’

इथे तो हसला.

‘‘पहा, आता मी काही हसवण्यासाठी बोलले नव्हते हं!’’

इथे तो परत हसला.

‘‘आजचा शोध संपला?’’

‘‘तुमच्या आवाजात भुलावण आहे.’’

‘‘तरीही तुम्ही हरवत नाही म्हणजे खचितच व्यवहारी आहात.’’

‘‘किमान ती एक नेमकी ओळख सांगता येते स्वतची. पण तुम्ही जादू करता.’’

‘‘असं? ते कसं काय?’’

‘‘माझ्यातून मलाच गायब करता.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘म्हणजे खुळं करता पुरं.’’

‘‘तरीही का नाही करत गाणं मग?’’

‘‘अं..? गाणं करायला तेवढा खुळेपणा पुरे पडत नसावा.’’

‘‘चला- मग जाऊ चालत समुद्रात.’’

‘‘आत्ता? अंधारात?’’

‘‘दुसरा खुळचटपणा सुचत नाही.’’

‘‘बुडालोबिडालो तर दोघांचं गाणं होईल.’’

‘‘ ‘एक दुजे के लिए’सारखं?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘काही नाही. उगाच खुळ्यासारखं बोलणं. सिनेमा आहे तो. जुना.’’

‘‘मी नाही पहात ते सिनेमे अन् तो टीव्ही.’’

‘‘वेळ नसतो?’’

‘‘वेळ वाया घालवायचा नसतो.’’

‘‘मग वेळ कसा उपयोगात आणता?’’

‘‘वाचतो. बाग झाडतो. रद्दी घालतो. स्वच्छता करतो.’’

‘‘गाणं ऐकता?’’

‘‘कधी कधी.’’

‘‘हेच का? अन् तेच का नाही?’’

‘‘माझी चेष्टा करता तेव्हाचा खटय़ाळपणा लोभस असतो.’’

‘‘कौतुक करताना वेळ वाया गेल्यासारखं वाटतं?’’

‘‘नाही.’’

‘‘पण निर्हेतुक कौतुक करता की काही हेतू ठेवून?’’

‘‘तुमचं उत्स्फूर्त करतो. पण शेवटी हेतू आहेच.’’

‘‘मला मिळवण्याचा? पण गाणं केल्याशिवाय ते कसं होईल?’’

‘‘ठीक आहे. प्रयत्न करतो. वेळ लागेल.’’

‘‘पहा बरं. वेळ वायाही जाईल कदाचित.’’

‘‘खरंय. पण प्रयत्न करायला हवा. म्हणजे आतून वाटतंय तसं.’’

‘‘का?’’

‘‘कुणास ठाऊक! कदाचित तुम्ही दुष्प्राप्य वाटता म्हणूनही.’’

इथे ती हसली. खळखळून.

‘‘का बरं? इतकं काही गुलबकावलीचं फूल मी नाही.’’

‘‘स्वत:ला स्वत:ची नेमकी ओळख सापडेलच असं कुठं असतं?’’

‘‘हो.. खरंय. दुसऱ्याच्या लेखी असलेली आपली ओळख अप्रुपाची वाटते.’’

‘‘अन् मग असा दुसराही अप्रुपाचा वाटतो?’’

‘‘अर्थात! निदान त्यानं दिलेली ओळख हवीहवीशी वाटत रहाते तोस्तोवर.’’

‘‘हा कुठला शब्द? तोस्तोवर?’’

‘‘माझा समजा!’’

‘‘उगाच अनेक अनोळखी गोष्टी आपल्याशा होत रहातात. नाही?’’

‘‘उगाच का? इतकी काही निरुद्देशानं माणसं माणसांना भेटत नाहीत.’’

‘‘तुम्ही कडेलोट करता. बोलायला काही शिल्लक रहात नाही.’’

‘‘मग शांत रहावं. शांततेत गाणं सुचेल.’’

‘‘सुचेल? खरंच? हमखास?’’

‘‘हमखास असं कसं सांगू? पण शक्यता तयार होतेच.’’

इथं त्यानं बराच काळ विराम घेतला. तिनंही संयमानं वाट पहात शांतता तयार होऊ दिली. त्या शांततेनं मात्र कुठलंही संगीत तयार न करता केवळ अवकाश पसरवत ठेवलं. अंधारं अन् मुकं. मग सावकाशीनं तो म्हणाला,

‘‘‘माझं प्रेम आहे तुमच्यावर..’ असं म्हणायची छाती होत नाही.’’

तिनं न बोलता पुढच्या वाक्याची वाट पाहिली.

‘‘पूर्वसूरींची कथनं ऐकून गोष्ट रचता येण्याचा काळ सरला. गोड गाणं स्फुरण्याचाही काळ सरला. आता निर्हेतूक काही घडेल याची खात्री नाही. तेवढा भाबडेपणा बाजारात मिळत नाही. मग सांगा- मी कसा तुम्हाला रिझवू? माझे गद्य प्रश्न कसे लपवू? तुमच्या पूर्वअटींनी मी गारद आहे. काळ नि:संशय तुमचा आहे. राज्य घ्यायची माझी तयारी आहे. मात्र, कधीतरी तुम्ही इश्टॉप व्हावं अशी अनिवार इच्छा आहे. सगळाच विरोधाभास खरा आहे. मी असहाय आस ठेवून पाठलाग करतो आहे. मला अपराधी बनवू नका. अर्थात् वृथा भीक घालू नका. सवयीच्या गुलामागत वृत्तीत निरसता आहे अन् उष्ण रक्ताच्या धडाची तप्त धगधगती वासना आहे. या सगळ्याचं गाणं होणं कठीण आहे. तुम्ही सहृदयतेनं तुमची अतृप्ती विसरून जा. माझी इभ्रत पणास लागली आहे.’’

त्याच्या स्खलनाच्या लाटांचे महिरपी वण फेसाळत उमटत राहिले. काळ समुद्रागत अथांग होत पसरत गेला.

तिनं सहज अनावृत होत रोख धरला. तिची अतृप्ती क्षितीजरेषेवर तप्त होत स्पष्ट दृगोचर झाली. पावलागणिक भवताल मागे टाकत ती त्या अमर्याद खोल डोहाकडे निघाली. तिच्या अनावृत देहाची तीव्र आस डोळ्यात पेटूनही तो ग्लानीत पडून राहिला. स्त्री-पुरुषाच्या प्रेमाचं गाणं आता संभवत नाही. काळच मुळी गद्य आहे.

girishkulkarni1@gmail.com

First Published on June 30, 2019 12:10 am

Web Title: girish kulkarni song
Just Now!
X