इस्राएलच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि पुढे इस्राएलचे पंतप्रधानपदही भूषविलेल्या गोल्डा मेयर. त्यांचे वीणा गवाणकर लिखित चरित्र ‘गोल्डा : एक अशांत वादळ’ इंडस सोर्स बुक्सतर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश..

ज्यूइश एजन्सीचे खजिनदार एलिझर काप्लान यांना बेन गुरियॉन यांनी अमेरिकेला निधी संकलनासाठी पाठवलेलं होतं. त्यात ते निराश होऊन परतले होते. त्यानंतर झालेल्या बठकीत त्यांनी अमेरिकेतील श्रीमंत ज्यू मंडळींचा अनुभव सांगितला. युद्धकाळात आणि नंतरही आम्ही भरपूर पसा पुरवला. आता शक्य नाही, असं ते श्रीमंत ज्यू म्हणताहेत, असं काप्लान म्हणाले. त्या मोहिमेसाठी बेन गुरियॉन यांनी स्वत:च अमेरिकेला जायचं ठरवलं, तेव्हा गोल्डा म्हणाली, ‘‘मी ती जबाबदारी घेते, मला अमेरिकेला पाठवा.’’ बेन गुरियॉन यांनी वयाची साठी ओलांडली होती. तसंच त्यांचा अमेरिकेतील तरुणाईशी संपर्क नव्हता. गोल्डा मात्र अमेरिकेत वाढलेली आणि अमेरिकी मानसिकता जाणून असलेली होती. शिवाय धडपडी. त्यामुळे बठकीत इतरांनीही तिच्या प्रस्तावाला तात्काळ अनुमोदन दिलं.

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Loksatta explained North Korea also has a destructive hypersonic missile
उत्तर कोरियाच्या हाती लवकरच विध्वंसक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र… पण या छोट्या, मागास देशाकडे हे तंत्रज्ञान आले कसे?

१९४८ सालच्या जानेवारीत गोल्डा अमेरिकेला निघाली. ती निघण्यापूर्वी इच्छित सामानाची यादी बेन गुरियॉननी तिच्या हाती ठेवली. जीप्स, शस्त्रास्त्रं, दारूगोळा, ब्लँकेट्स, तंबू, स्वेटर्स, स्पीडबोट्स, मालवाहू विमानं.. हे सर्व सामान ब्रिटिश जेव्हा पॅलेस्टाइन सोडतील त्या दिवशी आलं पाहिजे, असंही निक्षून सांगितलं.

गोल्डा एका वेगळ्याच धाडसी मोहिमेवर निघाली होती. त्या मोहिमेसाठी तिनं कसलीही पूर्वतयारी केलेली नव्हती. गोल्डाला अमेरिकेत खूप वेगळे, वेगळ्या पातळीवरचे प्रयत्न करावे लागणार होते. मोठमोठी दुकाने, कारखाने असणारे व्यावसायिक जर्मन-ज्यू आता पक्के अमेरिकी होऊन गेलेले होते. ते आता छानछोकीत राहणारे, झायॉनवाद न पटणारे ज्यू, फक्त इंग्रजी बोलणारे आणि यीडिश भाषेचा गंध नसल्याने त्यांच्या संपर्कात नसणारे समाजवादी ज्यू होते.. गोल्डाला इथे पॅलेस्टाइनमध्ये एक ओळख लाभली होती. एक स्थान मिळालं होतं. त्याविषयी त्यांना काहीच माहिती नव्हती. त्या कारणाने तिच्या पूर्वीच्या अमेरिकेच्या दौऱ्यात तिचं अस्तित्व ठळकपणे असं कोणाला जाणवलं नव्हतं. ती हॉटेलात न उतरता कोणाकोणाच्या घरात राहिली होती. या वेळीही ती विमानतळावरून तिच्या बहिणीच्या- शेयनाच्या घरी ब्रुकलीनला गेली. पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी आलेली शेयना अजून अमेरिकेतच होती. तिची सर्वात धाकटी बहीण क्लारा आणि मुलगा मेनाहेम तिला न्यायला विमानतळावर आले होते.

अमेरिकेत पोहोचताच गोल्डाने हेन्री मॉन्टर यांच्याशी संपर्क साधला. हेन्री मॉन्टर ही बडी असामी. त्यांनी तीन वर्षांपूर्वी- १९४५ मध्ये अमेरिकेतील सतरा श्रीमंत व्यावसायिकांना, न्यू यॉर्कचे एक लखपती ज्यू व्यावसायिक- रुडॉल्फ जी. सोनेबॉर्न यांच्या निवासस्थानी बेन गुरियॉन यांना भेटण्यासाठी पाचारलं होतं. त्या भेटीत भावी ज्यू देशाच्या गरजा भागवण्यासाठी आणि मोठय़ा प्रमाणावर लष्करी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठा निधी ‘सोनेबर्ग संस्था’ या छद्म नावाने उभा करायचं ठरलं. आणि तसा व्यवहार होऊही लागला. हेन्री मॉन्टर हे युनायटेड ज्यूइश अपील (यू.जे.ए.) चे उप-कार्यवाहही होते. गोल्डा त्यांना पूर्वी कधी भेटलेली नव्हती आणि तेही तिच्याबद्दल खास काही ऐकून नव्हते. ‘आहे एक कोणी पैसे उभे करण्याकरिता धडपडणारी, साधी, गरीब कार्यकर्ती. लोकांच्या घराघरांतून वास्तव्य करून पैसे जमवते.. टॅक्सीसाठीही तिच्याकडे पैसे नसतात..’ वगैरे त्यांच्या कानी होतं.

शिकागोत हॉटेल शेरेटन इथे कौन्सिल ऑफ ज्यूइश फेडरेशन्स अ‍ॅण्ड वेल्फेअर फण्ड्स यांचं वार्षिक संमेलन व्हायचं होतं. तिथे तुला बोलायला मिळालं तर तुला निधी संकलन चांगलं करता येईल, असं तिच्या धाकटय़ा बहिणीने- क्लाराने तिला सुचवलं. क्लारा स्वत: स्थानिक ज्यूइश फेडरेशनची प्रमुख होती. गोल्डाने हेन्री मॉन्टरना फोन करून त्या सभेत बोलण्याची संधी मिळावी, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी इस्राएलच्या प्रेमापोटी, ‘द्यावी एक संधी’ एवढय़ा माफक हेतूनं गोल्डाला होकार दिला.

कौन्सिल ऑफ ज्यूइश फेडरेशन्स अ‍ॅण्ड वेल्फेअर फण्ड्स ही बलाढय़ धर्मादाय संस्था. तिचे आठशे धनाढय़ प्रतिनिधी वार्षिक संमेलनासाठी हॉटेल शेरेटनमध्ये जमत होते. या अतिश्रीमंत उच्चभ्रू मंडळींपुढे हिचा कसा काय निभाव लागणार, असा प्रश्न मॉन्टरना पडला होताच आणि गोल्डालाही हा आपला नेहमीचा श्रोतृवर्ग नव्हे, याची कल्पना असल्याने तीही मनातून धास्तावलेली होतीच.

गोल्डा नेहमीच्या साध्या पोशाखात, मधोमध भांग, केस मागे वळवून मानेवर सलसा अंबाडा.. नट्टापट्टा तर अजिबात नाही.. अगदी बायबलच्या काळातून आलेली स्त्री दिसावी, तशी ती दिसत होती.

हेन्री मॉन्टरनाही ती प्रथमच भेटत होती. ते होते बेचाळीस वर्षांचे. गोल्डाहून ते आठ वर्षांनी लहान. १९४६ साली यू.जे.ए.साठी शंभर मिलियन (दहा कोटी) डॉलर्स जमा करण्याचं उद्दिष्ट ठरवून, तेवढा निधी धडाक्याने त्यांनी उभाही केला होता. एक ऐतिहासिक विक्रमच तो आणि तेव्हापासून त्यांना ‘निधी संकलक’ हे बिरुद मिळालं होतं. ते एक संधी आपल्याला देत आहेत याची कल्पना गोल्डाला होती. त्यामुळे ही संधी साधलीच पाहिजे याची पूर्ण जाणीवसुद्धा तिला होती.

हातात कागद, नोंदी काहीही न घेता, ‘मित्रांनो’ म्हणून साद घालत, सर्वावर नजर फिरवत तिने बोलायला सुरुवात केली..

‘‘पॅलेस्टाइनच्या एका भागात ज्यू देश स्थापण्यासाठी जगातील राष्ट्रांनी त्यांचा निर्णय आम्हाला दिलाय. संयुक्त राष्ट्राने पारित केलेला ठराव प्रत्यक्षात साकारण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.. मुफ्ती आणि त्याच्या लोकांनी आमच्याशी युद्ध पुकारलंय.. आमच्या आयुष्यासाठी, आम्ही पॅलेस्टाइनमध्ये जे उभं केलंय ते राखण्यासाठी, आमच्या सुरक्षिततेसाठी, ज्यूंच्या स्वातंत्र्यासाठी, ज्यूंच्या गौरवासाठी लढण्याखेरीज आम्हाला गत्यंतर नाही..’’

मग तिने सतरा-अठरा वर्षांची ज्यू तरुण मुलं (हागॅनाचे सदस्य) ज्यू निर्वासितांना सुरक्षितपणे पॅलेस्टाइनमध्ये आणण्यासाठी कशी जिवावर उदार होत असतात, त्या काही घटना सांगितल्या. शिवाय वीस हजारांहून अधिक ज्यू तरुणांनी हागॅनाचे सदस्य होण्यासाठी नाव नोंदवल्याचं सांगितलं. एका ज्यू तरुणानं एका अरब हल्ल्याच्या वेळी त्याला प्रतिकार करताना, त्याच्या जवळचा दारूगोळा संपल्यानं हातात दगड घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत अरबांना प्रतिकार केला आणि शेवटचा श्वास घेतानाही त्याच्या हातात दगड कसा होता, त्याचं हृदयद्रावक वर्णन तिने केलं. म्हणाली, ‘‘पॅलेस्टाइनमधील ज्यू शेवटच्या श्वासापर्यंत लढतील. जर हातात काही लढण्याजोगं शस्त्र असेल, तर त्याच्या आधारे लढू आणि नसेल तर दगडाने लढू.. लढा देण्याची ईर्षां ज्यू तरुणांत निश्चित आहे; पण बंदुका, मशीनगन्स यांना ते तोंड कसं देणार? रायफल किंवा मशीनगन ईष्रेशिवाय चालवण्यात अर्थ नसतो. शस्त्रास्त्रांविना ईर्षां प्रसंगी मोडूही शकते. त्यासाठी त्यांना शस्त्रास्त्रं हवीत आणि तीही त्वरित.. अवधी ही आमची समस्या आहे. सद्य:प्रसंगाला तोंड देण्यासाठी आम्हाला तीन किंवा चार महिन्यांनी लाखो डॉलर्स मिळणार असतील तर त्याला काही अर्थ नाही. प्रश्न आहे तो, आम्हाला त्वरित काय मिळणार आहे याचा.. आणि मित्रांनो, मी त्वरित म्हणते याचा अर्थ पुढच्या महिन्यात असा नाही. आत्तापासून दोन महिन्यांनी असाही नाही. त्वरित म्हणजे आत्ता या क्षणी.’’

‘मित्रांनो’ अशी वारंवार साद घालत, कुठल्याही प्रकारे विनवणी वा क्षमायाचनेचा सूर न लावता तिनं सांगितलं, ‘‘आम्हाला रोख पंचवीस ते तीस लाख डॉलर्सची गरज आहे.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘आम्ही काही लब्धप्रतिष्ठित ज्यू वर्गातले नाही आहोत. झालंय असं की, आम्ही ‘तिथे’ आणि तुम्ही ‘इथे’ आहात. तुम्ही पॅलेस्टाइनमध्ये आणि आम्ही अमेरिकेत असतो, तर मला खात्री आहे की, आम्ही तिथे जे आज करतोय, तेच तुम्हीही केलं असतं.’’

अखेरीस ती म्हणाली, ‘‘आम्ही लढावं की नाही, हे तुम्ही ठरवू शकत नाही. ते आम्ही ठरवू आणि तो निर्णय आम्ही घेतलायही. तो कोणीही बदलू शकत नाही. तुम्ही एकच ठरवू शकता- आम्ही या युद्धात विजयी व्हावं, की मुफ्तीने विजयी व्हावं. तो निर्णय अमेरिकी ज्यू घेऊ शकतात.. फार उशीर करू नका म्हणून विनंती करते. जे आज करायचं टाळलं, त्यासाठी आजपासून तीन महिन्यांनी आत्यंतिक दु:खी होऊ नका. ती वेळ आत्ताच, या क्षणी सुरू झालीय..’’

पस्तीस मिनिटं ती बोलली. उत्स्फूर्तपणे बोलली. तिचं बोलणं संपताच श्रोते उठून उभे राहिले. टाळ्यांचा गजर किती तरी वेळ चालूच होता. काहींच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. गोल्डाच्या भाषणानं सगळं वातावरणच बदलून गेलं, भारावून गेलं. श्रोत्यांत अनेक झायॉनवादला विरोध असणारेही होते. मात्र, तिच्या बोलण्याने त्यांचा विरोध मावळून गेला होता.

पहिलीच सभा गोल्डाने जिंकली होती.

आणि दुसऱ्या दिवसापासूनच गोल्डाच्या अनेक गाठीभेटी, चर्चा, बठका, भाषणं घडवून आणायचा सपाटा हेन्री मॉन्टर यांनी लावला. अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील एकूण सतरा शहरांतून ती गेली. त्यात एखाद्या छोटय़ा गटाबरोबर सकाळची न्याहारी, मोठय़ा गटाबरोबर दुपारचं भोजन आणि भल्यामोठय़ा गटाबरोबर रात्रीचं जेवण. नंतर लगेच पुढच्या गावी प्रयाण, असा दणका सुरू झाला. तिच्या भाषणाने प्रभावित झालेले तिशीच्या आतले तीन-चार तरुण स्वयंसेवक म्हणून तिच्या दौऱ्यात साथ देऊ लागले. मॉन्टर व्यावसायिक होते, मात्र हे तरुण स्वत:हून पुढे आले होते. मॉन्टर यांचं वैशिष्टय़ हे की, कोणत्या भागातला वा शहरातला कोणता ज्यू समाज किती पैसे देऊ शकतो, याचा त्यांचा चांगलाच अभ्यास. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गोल्डाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेला दिसला, की लागलीच ते फटकारत. एक स्वयंसेवक साथी म्हणायचा, ‘‘आम्ही आर्जवं, विनवण्या करत नव्हतो. अगदी गोड शब्दांतही समजावत नव्हतो.. प्रसंगी भावनांना डिवचून पैसे जमवत होतो.’’

मियामी बीच हॉटेलमध्ये रात्रीची भोजनपार्टी होती. अगदी श्रीमंती थाट. अशा लोकांपुढे काय बोलायचं! गोल्डाच्या मनात आलं, यांच्या पुढय़ात आपण पॅलेस्टाइनची दु:खं सांगत बसलो, तर हे लोक उठूनच जातील. चिंतित होत गोल्डा सिगरेट्समागून सिगरेट्स आणि काळी कॉफी पीत बसली. तिच्यासोबत यू.जे.ए.चे कार्याध्यक्ष हेन्री मॉग्रेन्दो होते. त्यांनी गोल्डाची मन:स्थिती ओळखली. समोरच्या पदार्थाना तिनं स्पर्शही केला नव्हता. ते स्वत: उठले. उच्चभ्रू समाजातील सभ्यपणाचे रीतिरिवाज, त्या श्रीमंती हॉटेलचे अलिखित शिष्टाचार बाजूला सारत ते म्हणाले, ‘‘आज आत्ता आपण काही महत्त्वाची बोलणी करणार आहोत. ज्यांना त्यात रस नाही त्यांनी उठून निघून जावं.’’ कोणीही उठून गेलं नाही. तिथे त्या रात्री पंधरा लाख डॉलर्स जमा झाले आणि त्या दिवशी त्या गावातून एकूण मिळून पन्नास लाखांचा निधी जमा झाला.

गोल्डा अमेरिकेत निधी संकलन करत असतानाच इर्गुन पक्षाचा एक सदस्यही निधी संकलनासाठी अमेरिकेत फिरत होता. तिथल्या ‘मासी’ या सुप्रसिद्ध भव्य डिपार्टमेंट स्टोअरच्या मालकाने तिला दशलक्ष डॉलर्स देण्याची तयारी दाखवली, पण एका अटीवर. त्यातले अध्रे तिने इर्गुनला द्यायचे. गोल्डाने ही देणगी तात्काळ नाकारली. इर्गुन या उग्रवादी संघटनेशी तिने कोणताही संबंध ठेवणं नाकारलं. कितीही गरज असली तरी तिने तत्त्वाची साथ सोडली नाही.

दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात गोल्डाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. ती अधिकाधिक धीट, फटकळ, स्पष्टवक्ती, प्रसंगी कठोर बोलू लागली होती. न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये ती म्हणाली- ‘‘तुम्हाला निवड करायची आहे. एक तर तुम्ही ज्यू देश स्थापनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये जमायचं किंवा तिथेच पॅलेस्टाइनमध्ये मेलेल्या ज्यूंसाठी शोकसभा घ्यायला जमायचं.’’

ज्यूइश एजन्सीचे खजिनदार काप्लान अमेरिकेतील निधी संकलनात जेमतेम सतरा लाख मिळतील, असं म्हणत होते. मात्र गोल्डाने तिच्या या दौऱ्यात अवघ्या दोन महिन्यांत चक्क पाच कोटी (५० मिलियन) डॉलर्सचा निधी उभा केला होता. अमेरिकेतील दौरा संपवून गोल्डा मार्च महिन्यात पॅलेस्टाइनला परतली. गोल्डाचा हा दौरा चालू असतानाच जसा निधी जमत गेला तसा त्याचा विनियोग बेन गुरियॉन युद्धसाहित्य आणि इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी करत गेले. गोल्डा अमेरिकेसाठी प्रयाण करण्यापूर्वी ते तिला म्हणाले होते, ‘‘आपल्याकडे काहीही नाहीये. अरबांनी आपल्यावर हल्ला केला, तर प्रतिकारासाठी आपण सज्ज नाही आहोत. काय होईल आपलं? मला वेड लागेल की काय, असं वाटतंय.’’

तिच्या निधी संकलनाचा वाढता आकडा ऐकून, त्यांनी आपल्या दैनंदिनीत नोंदवलं : ‘गोल्डाचं यश हेच सध्याच्या परिस्थितीत आशेचा किरण आहे.’

गोल्डा मोहिमेवरून परतल्यावर एखाद्या जेत्याप्रमाणे तिचं स्वागत झालं. बेन गुरियॉन तर म्हणाले, ‘‘पुढे जेव्हा इस्राएलचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा एका ज्यू स्त्रीने जमवलेल्या पशांतून ज्यू राज्यनिर्मिती शक्य झाली, याची नोंद घेतली जाईल.’’

एवढं घवघवीत यश संपादन करून परतल्यावर त्या आनंदात मिठाचा खडा पडावा, अगदी तसंच काहीसं झालं. नवा देशनिर्मितीची शक्यता लक्षात घेऊन ज्यूइश एजन्सी आणि नॅशनल कौन्सिलच्या कार्यकारी मंडळाने देशात सार्वत्रिक निवडणूक होऊन लोकशाही मार्गाने शासनव्यवस्था निर्माण होईपर्यंत, देशाचा कारभार चालू करण्यासाठी दोन मंडळं स्थापली. एक होतं अस्थायी संसद मंडळ. हे अस्थायी मंडळ सदतीस सदस्यांचं, देशाचा संसदीय कारभार पाहणारं आणि दुसरं होतं प्रशासकीय व्यवस्था बघण्यासाठी. यात संसदीय मंडळातील सदतीस लोकांतून तेरा जण घेतले जावेत असं ठरलं. या तेरा जणांचं मंत्रिमंडळ अस्थायी सरकारचा कारभार सांभाळणार होतं. गोल्डाची निवड सदतीस जणांत झाली, पण कॅबिनेटसाठीच्या तेरा जणांत झाली नाही. वेगवेगळ्या पक्षांचा विचार करून, जागा निश्चित करताना मापाइच्या वाटय़ाला चार जागा आल्या. बेन गुरियॉन, मोशे शारेट, एलिझर काप्लान आणि डेविड रेमेझ यांच्यातच त्या चार जागा संपल्या. बेन गुरियॉन यांना गोल्डा या तेरा जणांत हवी होती, म्हणून त्यांनी स्वत: बाजूला होऊन गोल्डाला घ्यावं असं सुचवलं. अर्थातच मापाइनं ते नाकारलं. मग चौथ्या क्रमांकावरचे रेमेझ आणि गोल्डा यांपैकी कोणाला घ्यावं, यावर मतदान झालं. त्यात रेमेझ यांच्या बाजूने कौल मिळाला. बेन गुरियॉन यांनी आपल्या परीने गोल्डाच्या समावेशासाठी प्रयत्न केला होता. रेमेझ नेमस्त पंथी. जहाल पंथी बेन गुरियॉन आणि रेमेझ यांच्यात सख्य नव्हतंच. रेमेझच्या जागी निष्ठावंत गोल्डा आली तर ती त्यांना हवी होतीच. शिवाय स्त्रीला देशाच्या पहिल्याच मंत्रिमंडळात स्थान दिल्याची, एका ऐतिहासिक घटनेची नोंद इतिहासात झाली असती, पण ते शक्य झालं नाही.

अमेरिकेत असतानाच गोल्डाला हे सर्व समजले होते. रेमेझ यांच्याशी जवळीक आणि बेन गुरियॉन यांच्याविषयी निष्ठा यात तिची ओढाताण होत होतीच. गोल्डा परतली. बरेच दिवस तिच्या दृष्टीने निष्क्रिय असेच गेले. तिने बेन गुरियॉन यांना चिठ्ठी लिहिली :

‘घरी परतून बरेच आठवडे झालेत. काहीही न करता निष्क्रिय आहे मी..’

खाली सही- ‘देशाला वाचवणारी स्त्री.’