News Flash

मन डोले, मेरा तन डोले..

काही संगीतकार अतिशय उत्तम कारागीर म्हणजे सर्जनात्मक मजकुराला सजवण्यात निष्णात असतात. मग मूळ मजकूर छोटा असला तरी कारागिरीमुळे उठून दिसतो.

| October 19, 2014 12:33 pm

सागराच्या तळाशी विसावलेल्या मोत्यासारखा गोल, तेजस्वी किंवा शिवालयातल्या गाभाऱ्यात तपस्वी साधुपुरुषाचा ओंकार घुमावा तसा घनगंभीर आवाज आणि थोडय़ा गूढतेकडे झुकणाऱ्या, पण एक अतिशय lok04वेगळी ऐट, अभिरुचीसंपन्न चाली देण्याचं विलक्षण सर्जन, असं अफलातून कॉम्बिनेशन झाल्यावर निर्माण होतं- ‘हेमंतकुमार मुखोपाध्याय’ हे एक वेगळंच रसायन. अस्सल बंगाली बाबू. बंगालची सगळी उच्च मध्यमवर्गीय ग्रेस, अभिरुची, अंतर्मुखता, वैचारिकता, एक प्रकारची सुसंस्कृतता घेऊन आलेला, तरीही खूप वेगळ्या भावभावनांचे रंग लीलया हाताळणारा, Class  आणि Mass या  दोघांनाही जिंकणारा संगीतकार म्हणून हेमंतकुमार यांचं नाव अत्यंत वरच्या क्रमांकावर राहील.
काही संगीतकार अतिशय उत्तम कारागीर म्हणजे सर्जनात्मक मजकुराला सजवण्यात निष्णात असतात. मग मूळ मजकूर छोटा असला तरी कारागिरीमुळे उठून दिसतो. काही संगीतकारांचं सर्जनच इतकं श्रीमंत, वजनदार, विचार करायला लावणारं असतं, की कुठल्याही कारागिरीशिवाय, ते तीरासारखं आपल्या काळजात घुसतं आणि तिथे कायमचं रुतून बसतं. त्या स्वररचनेचाच डौल तेवढा ताकदवान असतो. हेमंतकुमारांच्या चाली या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या. अशा चालींना ‘सजावट’ झाल्यावर त्यांचं सौंदर्य खुलतं, पण त्या सजावटीवर ते अवलंबून असत नाही. हेमंतकुमारांच्या चाली ऐकताना हे प्रकर्षांनं जाणवतं की, या चाली ‘आतून’ अगदी मनाच्या गाभाऱ्यातून आल्या आहेत. त्यांना कुठल्याही रागाचं, विशिष्ट स्वरावलींचं, विशिष्ट तालाचं बंधन नाही. त्या चाली उच्छृंखलपणा आणि भावविवशता यांच्यामधला सुवर्णमध्य गाठणाऱ्या, संयमी, तरीही भावनांचा कोमल पदर उलगडणाऱ्या आहेत. जिथे त्यांना चंचलता हवी आहे तिथे ‘भँवरा बडम नादान है’ म्हणत बागडत येणारे शब्द नाचरी चाल घेऊन येतात, ‘जादूगर सैंया, छोडो मोरी बैंया’ म्हणत नाचरा झिम्मा खेळतात, पण ‘कोई दूर से आवाज दे चले आओ..’ किंवा ‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ म्हणताना मनाच्या इतक्या आत आत पोचून तिथून ते सूर बाहेर येतात. काळजातली सगळी उत्कटता, भावनेचा अस्फुट उद्गार स्वररूप घेऊन प्रकटतो. ‘कुछ दिल ने कहा..’ ऐकताना किंवा ‘धीरे धीरे मचल ए दिल-ए-बेकरार’ ऐकताना जाणवतं, की आपण काही तरी खूप वेगळं ऐकतोय आणि आपल्या भावना जर संगीतमय झाल्या तर त्या अगदी तंतोतंत अशाच असतील. भावनेचं स्वरात रूपांतर व्हावं आणि अलवारपणे ते उलगडावं, असं काही तरी हेमंतकुमारांच्या चाली ऐकताना जाणवतं. वातावरणनिर्मितीची अद्भुत क्षमता घेऊन त्यांच्या चाली येतात. ‘कुछ दिल ने कहा..’ ऐकताना, धूसर सुंदर पहाट, दवबिंदूंची चमचम, हिरवळ, एक गुलाबी गारवा, हलकेच होणारी पक्ष्यांची किलबिल आणि त्या दवबिंदूइतकंच नाजूक रहस्य ओठावर येतानाची मनाची तरल अवस्था, हे सगळं सगळं पडद्यावर पाहायची गरज आहे? त्या चालीत, स्वरयोजनेत हे वातावरण केव्हाच उभं केलं. त्या हलक्याशा गारव्याचा अंगावर रोमांच घेत घेत, ‘ऐसी भी’ आणि ‘ऐसे भी बातें होती है’ म्हणजे काय, हे अनुभवायचं. हाच संगीतकार, ‘साकिया आज मुझे नींद नहीं आएगी’ म्हणत आपल्याला थेट कोठय़ावर घेऊन जातो. तिथली मस्ती, समोरच्याला जिंकण्याची ऊर्मी, नृत्याचा जोश घेऊन ती चाल येते आणि त्या हिरव्या जर्द विडय़ाबरोबर चढत्या रंगांनी चढत जाणाऱ्या रंगेल रात्रीत बेहोश होणं म्हणजे काय, ‘रत जगा’ करत आपण अनुभवतो. चार मिनिटांत ही जादू करणं ज्याला जमलं, तोच हा संगीतकार, हेमंतकुमार!
१६ जून १९२० ला बनारसला आजोळी जन्मलेल्या हेमंतकुमारांचे वडील कालिदास मुखोपाध्याय हे एका शिपिंग कंपनीत कारकून. साधंसुधं टिपिकल मध्यमवर्गीय, नोकरी -पेशा बंगाली कुटुंब. हेमंतनं चांगलीशी नोकरी धरावी, सामान्य रुळावरचं, माछेर झोल खात बंगाली माणसाचं आयुष्य जगावं, यापलीकडे आकांक्षा नसणारं. हेमंतला असलेला गाण्या-बजावण्यातला रस अशा कुटुंबात कसा पटावा? शाळेतल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शाळेतून येणाऱ्या वाढत्या तक्रारींनी व्यथित होऊन वडिलांनी सुभाष मुखर्जी नामक एका नातेवाईकाला ही खंत सांगितली. त्यांनी कुतूहलापोटी १३ वर्षांच्या हेमंतचं गाणं ऐकलं आणि प्रभावित होऊन ऑल इंडिया रेडिओला पाठवलं. तिथे शालेय कार्यक्रमात हेमंत पहिल्यांदा चमकला. पण आश्चर्य म्हणजे युवावस्थेत, गाण्यात काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या या कलाकाराचा आवाज सगळ्या म्युझिक कंपन्यांनी चक्क नाकारला.  इंजिनीअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून काही काळ साहित्य क्षेत्रातही उमेदवारी करत, कोलंबिया कंपनीच्या शैलेन दासगुप्तांच्या संपर्कात आल्यावर एकदाची संगीत क्षेत्राची दारं किलकिली झाली. काही टागोर गीतांच्या रेकॉर्ड्स निघाल्या. शैलेन दासगुप्तांच्या सांगण्यावरून शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न हेमंतदांनी केला; पण त्यात मन रमलं नाही. काही बंगाली चित्रपटांत पाश्र्वगायन करता करता पं. अमरनाथांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘इरादा’ या चित्रपटासाठी गाण्याची प्रथम संधी मिळाली. ते lr09वर्ष होतं १९४४. हेमंतदांनी १९४५ साली स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी पहिला बंगाली चित्रपट केला, ‘पूर्वराग’. याच वर्षांत त्यांचा विवाह शिष्या बेला मुखर्जी हिच्याशी झाला. चित्रपट सणकून आपटल्यामुळे हेमंतदांना नैराश्यानं ग्रासलं. सलील चौधरींच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या कम्युनिस्ट चळवळीत, ‘इप्टा’ संस्थेच्या माध्यमातून भाग घेत त्यांची अनेक गाणी गायली. त्यात ‘आनंदमठ’ (बंगाली)चं हेमंतदांनी दिलेलं संगीत गाजल्यावर हिंदी ‘आनंदमठ’साठी हेमंतदा मुंबईत आले. ‘आनंदमठ’ची गाणी खूप गाजली, पण ‘वंदे मातरम्’, ‘जय जगदीश हरे..’ या गाण्यांना जेवढी लोकप्रियता मिळाली, तेवढी चित्रपटाला मिळाली नाही, पण गायक म्हणून अनेक संधी मिळाल्या. ‘ये रात ये चाँदनी’ (‘जाल’, एस. डी. बर्मन), ‘जाग दर्दे इश्क जाग’ (‘अनारकली’, सी. रामचंद्र) ही गाणी गाजली, पण संगीतकार म्हणून ‘शर्त’(१९५४)शिवाय काहीच हाती लागेना. ‘न ये चाँद होगा’सारखं सुंदर गाणं ‘शर्त’मध्ये होतंच, पण ‘देखो, वो चाँद छुपके’सारखं छान द्वंद्वगीतही होतं. ‘शर्त’मुळे थोडंफार नाव झालं तरी मुंबईला रामराम करून कलकत्त्याला जायच्या इराद्यात असणाऱ्या हेमंतदांना एस. मुखर्जीनी रोखलं, त्यांच्यातील आव्हान जागवलं आणि ‘नागीन’चं संगीत जन्माला आलं. सामान्य चित्रपट आणि असामान्य संगीत. एखाद्या चित्रपटातली सगळीच गाणी गाजणं दुर्मीळ; पण ‘नागीन’नं हा चमत्कार घडवला. गमतीची गोष्ट अशी की, सुरुवातीला चित्रपटाला विशेष गर्दी होतच नव्हती. मग एस. मुखर्जीनी शक्कल लढवली. एक हजार रेकॉर्ड्स विकत घेऊन छोटय़ामोठय़ा हॉटेलला फुकट वाजवायला दिल्या. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे. निव्वळ गाणी ऐकण्यासाठी मग चित्रपटावर उडय़ा पडू लागल्या! ‘नागीन’नंतर, आजच्या भाषेत सांगायचं तर ‘अब तो अपनी चल पडी’ असं काहीसं हेमंतदांच्या बाबतीत घडलं! क्ले व्हायोलिनवर कल्याणजींनी वाजवलेली ‘नागीन’ची धून, अगदी श्रीमंतांच्या लग्नापासून ते आदिवासी पाडय़ापर्यंत आजही ऐकू येते, यातच सगळं आलं..
‘मन डोले, मेरा तन डोले’ची धून हेमंतदांना कशी सुचली असावी याचा विस्मय वाटतो. एक प्रकारची नशा आहे या चालीत.. ऐकणाऱ्याला हळूहळू डोलायला लावणारी..गुंगी आणणारी. ‘मन डोऽऽले’ म्हणताना लताबाईंनी आवाजाला एक ‘झोल’ दिलाय.. ‘तन डोले’चा स्वराला पुढच्या पंचमाचा कण देऊन इतका सुंदर डोलवलाय, की ऐकणारा त्यात कधी गुरफटला जातो त्याचं त्यालाच कळत नाही. एखादी धून वर्षांनुवर्षे राज्य करते ती अशी! तशीच जादू ‘जादूगर सैंया’मध्ये आहे. सुरांच्या कसरती न करता, जवळजवळचे स्वर घेऊन अत्यंत पकड घेणारी चाल बांधण्याचं कसब ‘जादूगर सैंया’मध्ये दिसतं. ‘अब घर जाने दो’मध्ये त्या ‘दो’वरची जागा खूप गोड, पुढच्या ओळीला कवेत घेणारी आणि मेंडोलीन, बासरीचे पीसेस त्याला एक विलक्षण चपळता देतात.
‘नागीन’च्या यशानंतर हेमंतदांकडे कामाचा ओघ सुरू झाला. मुख्य म्हणजे आर्थिक चिंता दूर झाली. पन्नासच्या दशकातल्या सुवर्णसंगीत काळाचे एक महत्त्वाचे संगीतकार म्हणून हेमंतकुमारनी स्वत:ची जागा निर्माण केली. ‘नागीन’च्या संगीताची झलक पुढे त्यांच्या अनेक गाण्यांत दिसत राहिली.
त्यात ‘कुछ दिल ने कहा’चं (कैफी आझमी, ‘अनुपमा’) स्थान सगळ्यात वरचं.
या गाण्याला उपमा द्यायचीच, तर दवबिंदूंचीच! तितकंच तरल, अस्पर्श, नाजूक गाणं. जराही धक्का लागला तर हरवेल, फुटेल हा दवबिंदू! खूप हलकेच स्पर्शावा, अनुभवावा हा चमचमणारा थेंब..
‘ऐसी’ भी बातें होती है
‘ऐसे’ भी बातें होती है..
या हृदयीचं त्या हृदयी पोचवायला शब्द लागत नाहीत नेहमी.. संवादाला शब्दांचं माध्यम कशाला? न बोलताच, आतून समजून घेणारा हा संवाद..
लेता है दिल अंगडाईयाँ
इस दिल को समझाए कोई
अरमाँ न आँखे खोल दे
रुसवा न हो जाए कहीं
पलकों को ठंडी सेज पर
किरनो की परियां सोती है
या मनाला समजावायला हवं.. स्वप्नं पाहायला लागलंय ते! त्या स्वप्नांचा अपमान व्हायला नको. ती ‘मुग्धा’- शर्मिला, डोळ्यांनीच सांगते सगळं.
संपूर्ण गाणं एका कुजबुजत्या स्वरात लताबाई गातात. जगात ‘हा’ असा आवाज फक्त त्याच लावू शकतात. ‘कलियों से कोई पूछता, हँसती है वो या रोती है..’ म्हणताना किंचित वाढणारा व्हॉल्यूम, आवेगाला आवर घालावा तसा, ‘ऐसी भी बातें..’ला त्या पुन्हा कुजबुजण्यावर आणतात, तो क्षण केवळ अवर्णनीय! मला तर क्षणोक्षणी थक्क करतं हे गाणं.. आपल्या अस्तित्वालाच वेगळी उंची देणारं हे गाणं या जगात नसतं, तर भावनिक परिपक्वतेच्या खालच्या पातळीवरच राहिलो असतो आपण!
(क्रमश:)
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2014 12:33 pm

Web Title: hemant kumar a singer of class and mass
Next Stories
1 घनश्याम सुंदरा..
2 बोले रे पपीहरा..
3 ‘तेरे सूर और मेरे गीत..’
Just Now!
X