18 November 2019

News Flash

वैद्यकशास्त्राच्या इतिहासाची सोनेरी पाने

हिपोक्रॅटिसला आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक मानले जाते.

|| डॉ. अविनाश भोंडवे

‘हिपोक्रॅटिसची शपथ’ हे डॉ. चंद्रकांत शंकर वागळे यांचे पुस्तक म्हणजे  वैद्यकशास्त्राच्या उगमापासून ते आजपर्यंत गेल्या शेकडो वर्षांत त्याने केलेल्या प्रगतीच्या इतिहासाचा एक धावता आलेख आहे. परमेश्वराचा कोप म्हणून आजार होतो, इथपासून ते आजच्या प्रतिजैविके आणि प्रत्यारोपण- शास्त्राच्या उदयापर्यंत वैद्यकीय जगतात झालेल्या असंख्य शास्त्रीय संशोधनांचा थोडक्यात परामर्श या पुस्तकात घेतलेला आहे.

हिपोक्रॅटिसला आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक मानले जाते. त्याच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शपथेतून वैद्यकशास्त्रातील नतिकतेच्या तत्त्वांची पायाभरणी झाली. पण ही शपथ खरेच हिपोक्रॅटिसने लिहिली की त्याच्यानंतर त्याच्या अनुयायांनी, याबद्दलचे रंजक वर्णन या पुस्तकात येते. ‘हिपोक्रॅटिक कॉर्पस’ या त्याच्या ग्रंथातील शपथेमध्ये कालांतराने आणि त्या- त्या काळातील विचारांप्रमाणे, देशांप्रमाणे कसकसे बदल होत गेले याचा गोषवारा बारकाव्यांसह डॉ. वागळे यांनी या पुस्तकात मांडलेला आहे. ही माहिती आजच्याच नाही, तर दोन पिढय़ांपूर्वीच्या डॉक्टरांच्याही ज्ञानात भर टाकणारी ठरावी. आज आधुनिक वैद्यकात असंख्य शाखा आणि उपशाखांमुळे शकले पडली आहेत. पण तरीही या शपथेमुळे वैद्यक हे एकसूत्री शास्त्र आहे आणि त्याला नतिकतेचा आधार आहे, हा विचार या पुस्तकात उत्तमरीतीने विशद करण्यात आला आहे.

वैद्यकशास्त्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात धार्मिक रुढींचा आणि धर्मपंडितांचा त्यावर पूर्णपणे वरचष्मा होता. हे स्पष्ट करताना ग्रीक, रोमन, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लीम आणि इतरही धर्माचे दाखले ‘वैद्यक आणि धर्मसत्ता’ या प्रकरणात दिले गेले आहेत. कुठलाही आजार का निर्माण होतो, याचे कारण म्हणजे देवाचा कोप असतो आणि कर्मकांडे करून तो दूर होतो अशी आरंभीच्या काळात मानवाची जगभर सर्वत्र कल्पना होती, हे अनेक देशांतल्या उदाहरणांनी त्यांनी दाखवून दिले आहे. फ्रान्समधील १७ हजार वर्षांपूर्वीचे शमान हे वैदू, मेसोपोटेमिया, इजिप्तमधील धार्मिक नेते, भारतातील भगत, गुरव, मांत्रिक व पुरोहित, चीन व अरबस्तानातील मांत्रिक असे धार्मिक उच्चभ्रू लोक जादूटोणा, मंत्रविद्या व देवाच्या कठोर उपासननेने आजार बरे होतात अशी ग्वाही देत. दैवी प्रकोप, वाईट ग्रह, साचलेले पाणी, ज्यू धर्मीयांनी केलेली पापे, चेटकिणीचे चेटूक यामुळे रोगराई निर्माण होते आणि ती दैवी आराधनेने बरी होते अशी कल्पना पुरातन काळी रूढ होती. यामध्ये काही लोकांना पापी समजून जाळणे, मारून टाकणे अशा प्रथा जगभरात हजारो वर्षांपासून सर्वत्र प्रचलित होत्या. तथापि आजच्या प्रगत जगातही अनेक ठिकाणी त्या अस्तित्वात आहेत हे पाहून नक्कीच खेद होतो.

आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा उगम होताना शवविच्छेदनातून आजारांच्या उगमाची कल्पना येऊ लागली. पण सुरुवातीच्या काळात धार्मिक गुरू आणि त्याकाळचे वैद्य शवविच्छेदनाचा पुरस्कार करणाऱ्यांची टवाळी करायचे, याबद्दलचे वर्णन वाचून विस्मय वाटतो.

प्राचीन काळी ख्रिश्चन आणि बौद्ध मठांत रुग्णांची शुश्रूषा म्हणजे ईश्वरसेवा मानली जायची. त्यात रुग्णाच्या आजाराचे निदान न करता केवळ त्याची लक्षणांनुरूप शुश्रूषा केली जायची. ‘इस्पितळ’ या संकल्पनेचा उगम यातूनच झाला असे या पुस्तकात नमूद केले आहे. मुस्लीम राजसत्तेत इ. स. ८७५ मध्ये बगदादला पहिले रुग्णालय स्थापन झाले. त्यानंतर स्पेनपासून भारतापर्यंत ३४ रुग्णालयांची स्थापना झाली असा उल्लेख या पुस्तकात आढळतो. पुढे राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या लढाईत इंग्लंडमधील राजांनी इस्पितळांमधील धार्मिक वर्चस्व कमी करून आधुनिक उपचार सुरू केले. हा सर्व इतिहास केवळ मनोरंजकच नव्हे, तर सामाजिक आरोग्यात कश कशा तऱ्हेने सुधारणा होत गेल्या याचे एक उत्तम संकलन आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रगतीत कित्येक डॉक्टर्स तसेच वैद्यकीय संशोधकांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन या पुस्तकात येते. त्यांत ‘आजारांचे कारण म्हणजे इंद्रियांमध्ये दोष निर्माण होतात..’ असे सातशे शवविच्छेदने करून जगापुढे यासंबंधीचा सिद्धान्त मांडणारा जिओवनी मॉरगॅग्नी, मानवी शरीरात असलेल्या पेशींची अंतर्रचना शोधून या पेशींत होणारे बदल हे आजारांना कारणीभूत असतात असा सिद्धान्त मांडणारा रुडॉल्फ फर्को आहे. तसेच मानवाला जंतूंमुळे निरनिराळे आजार होतात हे शोधून ‘अन्थ्रॅक्स’ या आजाराची लस आणि दुधाचे निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया शोधून काढणारा लुई पाश्चर, त्याचे समकालीन सेमेलविस यांच्याबद्दलही माहिती मिळते. जंतुनाशक काबरेलिक आम्ल वापरून केल्या जाणाऱ्या र्निजतुक शस्त्रक्रियेचा प्रणेता जोसेफ लिस्टर, कादंबरीकार बनायचे म्हणून वैद्यकीय सेवेचा मार्ग सोडून देण्याची मनीषा बाळगणारा; पण नंतर मलेरियावर भारतात येऊन संशोधन करणारा रोनाल्ड रॉस, त्याचा समकालीन प्रतिस्पर्धी जिओवनी ग्रासी, क्षयरोगाचे जंतू शोधणारा, पण नंतर त्यावर काढलेले औषध कुचकामी ठरले म्हणून परागंदा व्हावे लागलेला रॉबर्ट कॉख, पोलिओ निर्मूलनासाठी प्रतिबंधक लस शोधणारे जोनास साल्क आणि सबिन अशा अनेकानेक संशोधकांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींवर लेखकाने प्रकाश टाकला आहे.

वैद्यकशास्त्राला आधुनिकतेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी कारणीभूत ठरलेला प्रतिजैविकांचा शोध, अवयवांचे प्रत्यारोपण, डीएनएबाबतचे जैविक संशोधन याबाबतच्या प्रकरणांनी वैद्यकीय प्रगतीतल्या अर्वाचीन घडामोडींचा प्रत्यय येतो.

हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या वैद्यकशास्त्रातल्या निवडक गोष्टींना पुस्तकाच्या केवळ १३४ पानांत संकलित करणे ही तशी अवघडच गोष्ट आहे. त्यामुळे हे पुस्तक एका दृष्टीने त्रोटक वाटते. पण भाषेतील सहजता आणि क्लिष्ट वैद्यकीय शब्दांना समर्पक आणि साधे मराठी प्रतिशब्द वापरल्यामुळे हे वैद्यकीय इतिहासावरचे एक उत्कृष्ट व वाचनीय असे धावते समालोचन झाले आहे. पुस्तकाची मांडणी साधी-सोपी आहे. काही किरकोळ शब्ददोष वगळता पुस्तक आकर्षक झाले आहे. त्यात इसवी सनानुसार महत्त्वाच्या घटनांची सनावळी दिली असती तर ते अधिक उपयुक्त ठरले असते. पुस्तक वाचल्यावर वैद्यकाच्या ऐतिहासिक प्रवासाची उद्बोधक माहिती मिळतेच; पण यातील काही संशोधकांच्या जीवनाबद्दल अधिक वाचावे अशी कुतूहलपूर्ण इच्छासुद्धा निर्माण होते, हेच या पुस्तकाचे यश ठरावे.

‘हिपोक्रॅटिसची शपथ’ – डॉ. चंद्रकांत शंकर वागळे,

पॉप्युलर प्रकाशन,

पृष्ठे- १३४, मूल्य- ३५० रुपये. 

First Published on June 30, 2019 12:09 am

Web Title: hippocrateschi shapath dr chandrakant wagale
Just Now!
X