News Flash

‘शोध’ पैशाचा!

संज्ञा आणि संकल्पना

पराग कुलकर्णी parag2211@gmail.com

‘डावे’-‘उजवे’ म्हणजे नक्की काय? ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ कशाला म्हणतात? ‘भांडवलशाही’, ‘कम्युनिझम’च्या नेमक्या व्याख्या काय आहेत?.. अशा संज्ञा-संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणारे सदर..

आपण दुकानात जातो आणि पैसे देऊन वस्तू विकत घेतो. समजा उद्या दुकानदार म्हणाला की, ‘मला पैसे नको, तुम्ही तुम्हाला पाहिजे ती वस्तू फुकटात घेऊन जा.’ तर? आपण आधी खूश होऊ आणि मग विचार करू, ‘कसं चालणार हे दुकान वस्तू फुकट दिल्या तर? लवकरच बंद पडेल.’

पण अशाच वस्तू आणि सेवा ग्राहकाला विनामूल्य देणारी एक कंपनी आहे आणि ती बंद तर नाहीच पडली, उलट करोडोने पैसे कमवते हे तुम्हाला सांगितले तर? त्या कंपनीचे नाव तुम्ही इंटरनेटवर शोधायला गेलात तर तुम्ही शोधण्यापूर्वीच ते नाव तुम्हाला दिसेल – ‘गुगल’!

तुम्ही जर इंटरनेट वापरत असाल तर नक्कीच ‘गुगल सर्च’, ‘गुगल मेल’, ‘गुगल मॅप्स’, ‘यूटय़ूब’ अशी गुगलची उत्पादने (Products) वापरली असतील. हे सर्व जर गुगल ग्राहकाला विनामूल्य देत असेल तर प्रश्न पडतो की, गुगल पसा कसा कमवते?

याचं उत्तर आहे – गुगल तंत्रज्ञान कंपनी असली तरी गुगलच्या उत्पन्नाचा स्रोत आहे- जाहिराती! ज्यांना आपल्या सेवा व वस्तूची जाहिरात गुगल सर्चमध्ये करायची असते त्यांच्याकडून गुगलला पसा मिळतो.

गुगलच्या जाहिरातींच्या केंद्रस्थानी आहे- गुगल सर्च! समजा आपल्याला विम्याबद्दल (Insurance) माहिती हवी आहे, तर आपण गुगलवर ‘विमा’ असा की-वर्ड टाइप करतो आणि गुगल आपल्याला क्षणात इन्शुरन्ससंदर्भातल्या वेबसाइट्सच्या लिंक देतो. विमा कंपन्या अशा की-वर्डच्या सर्चमध्ये आपले नाव यावे म्हणून गुगलला पैसे देण्यास तयार असतात. अशा की-वर्डसाठी अनेक इन्शुरन्स कंपन्या बोली लावतात आणि त्यांनी लावलेल्या बोलीनुसार त्यांचे नाव सर्च रिझल्ट्समध्ये सुरुवातीलाच वर दिसते. पण केवळ जास्त पसा हाच एक निकष गुगल वापरत नाही. गुगल सर्च प्रत्येक पेजचा एक ‘Quality Score’ ठरवते, ज्यात त्या की-वर्डसाठी ती साइट किंवा पेज किती समर्पक (Relevant) आहे हे जोखले जाते. जाहिरातदारांनी लावलेली बोली आणि त्यांचा ‘Quality Score’ यावरून जाहिरातदाराची साइट किंवा पेज सर्च रिझल्ट्समध्ये किती वर दिसेल, हे ठरवले जाते. जेणेकरून लोकांची त्या साइटवर क्लिक करण्याची शक्यता वाढते. लोक जेव्हा जाहिरात केलेल्या साइटच्या लिंकवर क्लिक करतात, तेव्हाच गुगलला त्या साइटकडून जाहिरातीचे पैसे मिळतात.

‘अ‍ॅडवर्ड’ आणि ‘अ‍ॅडसेन्स’ हे प्लॅटफॉम्र्स गुगलच्या जाहिरातीचे आधारस्तंभ आहेत. गुगलच्या स्वत:च्या साइट्सवर (सर्च, मॅप्स, यूट्य़ूब) जाहिराती दाखवण्यासाठी ‘अ‍ॅडवर्डस’चा उपयोग होतो. तुमची स्वत:ची साइट असेल आणि तुम्हाला त्यावर जाहिराती दाखवून पैसे मिळवायचे असतील, तर तुम्ही गुगलच्या ‘अ‍ॅडसेन्स’चा वापर करू शकता. ‘अ‍ॅडसेन्स’ तुमच्या साइटवर जाहिरात दाखवून, त्यातून येणारे उत्पन्न तुमच्यासोबत वाटून घेते. गुगल जाहिरातींशिवायही इतर उत्पादनांतून उत्पन्न मिळवते, जसे की- ‘प्ले स्टोअर’, ‘अ‍ॅप्स’, ‘क्लाउड’ आणि ‘हार्डवेअर’! परंतु जाहिरातींच्या मानाने ते सध्या तरी बरेच कमी आहे.

गेल्या २० वर्षांत गुगलने खूप साऱ्या गोष्टी जगाला दिल्या. तंत्रज्ञानामुळे आपल्या जगात आणि आयुष्यात खूप सारे बदल झाले, होत आहेत आणि अजूनही होतील. ते समजावून घेऊन नवीन तंत्रज्ञान, नवीन संधी आणि अगणित नव्या शक्यतांचा आपणही शोध घेऊ शकतो का? पुढची ‘गुगल’, ‘अ‍ॅपल’ किंवा ‘फेसबुक’सारखी कंपनी भारतात निर्माण होईल का? Can we put a dent in the universe?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:11 am

Web Title: how google earn money earn money with google
Next Stories
1 सत्यशोधाचा यात्रिक
2 आर्थिक मागास आरक्षण, गरीबांची क्रूर चेष्टा!
3 घटनाबदलाची रंगीत तालीम?
Just Now!
X