हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

मी शाळकरी अवस्थेच्या शेवटच्या टप्प्यात होतो. शाळेतील शिक्षकांकडून, पुस्तकी साहित्यातून, राजकीय नेत्यांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या लिखाणातून आणि भाषणांतून २१ वे शतक हे आधुनिकता, तंत्रज्ञान, विज्ञानवाद, समता यांचं जग असल्याची धारणा सतत कानावर पडत होती.. वाचनात येत होती. या व्याख्या किंवा अशा विषयांवरील चर्चा जगभरात आदर्श मनुष्यत्वाच्या व्याख्या बनलेल्या आहेत अशी धारणा नकळत मनात रुजत होती. १९९२-९३ च्या रामजन्मभूमीवादाच्या, मुंबई बॉम्बस्फोट मालिकेविषयीच्या लहानपणीच्या स्मृती पुसट होत गेलेल्या होत्या. कारगिल युद्धातील आपला विजय आणि ऑपरेशन विजय यांसारख्या शब्दांमुळे, अणुचाचण्यांमुळे पाकिस्तानविरोधी भावना आणि पर्यायाने गप्पांपुरता आक्रमक, पण निखळ, भाबडा राष्ट्रवाद मनात भिनलेला होता. एक दिवस ‘आज तक’च्या की कुठल्या तरी बातम्यांमध्ये अमेरिकेतील दोन मोठय़ा इमारतींवर दहशतवाद्यांच्या विमानांनी केलेला हल्ला आणि  जमीनदोस्त झालेल्या इमारतींची दृश्यं पाहायला मिळत होती. मग जॉर्ज बुश, लादेन, अल-कायदा, इस्लामी आतंकवाद, आखाती देश असे शब्द कानावर सतत पडत होते, डोळ्यात भरत होते. साधारण कळायला लागायचं ते वय. याच वयामध्ये माझ्या हिंदू श्रद्धाविश्वातून निर्माण झालेल्या धर्मव्यवस्थांविषयीच्या जाणिवा, माझ्या आर्थिक-सांस्कृतिकदृष्टय़ा समकक्ष असलेल्या वर्गातील समवयस्क मुलांशी झालेली मैत्री, माझ्या व माझ्याहून उच्च व निम्नवर्गीय विद्यार्थ्यांमधील आचार-विचारभेद याची पुसटशी जाणीव मनात होऊ लागलेली होती.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

त्यानंतर अवघ्या तीन-चार वर्षांनी हाताशी आलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेल्या समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर लोक व्यक्त होऊ लागले होते. आता तर साधारणत: कधीही आपला मोबाइल किंवा लॅपटॉप हातामध्ये घ्यावा, फेसबुक वा ट्विटर उघडावं किंवा एखाद्या वृत्तपत्राचं पान उघडावं.. त्यातल्या पोस्ट्स, ट्वीट्स, बातम्यांची विषयवार सूची बनवावी.. त्या एकत्रित सूचीतील बहुतांश बातम्या, पोस्ट्स या जात, धर्म, राष्ट्रीयता, भाषिक अभिमान यावरच असल्याचं आपल्याला दिसून येईल. साधारणत: या सगळ्या गोष्टींना समाविष्ट करून घेणाऱ्या चौकटींना ‘अस्मितेचं राजकारण’ किंवा इंग्रजीत ‘Identity Politics’ असं म्हटलं जातं. मराठीतील ‘अस्मिता’ हा शब्द आणि इंग्रजीतील ‘आयडेंटिटी’ हा शब्द एकमेकांना समानार्थी रीतीने वापरले जात असले तरी त्यांची घडण किंचितशी वेगळी आहे. ‘अस्मिता’ हा शब्द ‘अस्मि’ या (‘मी आहे’ या अर्थाच्या) संस्कृत क्रियापदाला ‘ता’ हे वैशिष्टय़निदर्शक उत्तरपद लागून बनतो; ज्यातून स्वत्वाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या राजकीय धारणा व्यक्त होतात. या स्वत्वाच्या जाणिवा वैयक्तिक किंवा सामूहिक जाणिवांना उद्देशून असलेल्या राजकीय चळवळी किंवा तत्त्वज्ञानाच्या अंगाने अभिव्यक्त होतात तेव्हा त्याला ‘अस्मितेचे राजकारण’ अशी ढोबळ संज्ञा प्राप्त होते. इंग्रजीतील ‘Identity’ हा शब्द ‘Idem’ (एकसमान, तंतोतंत अशा अर्थीच्या) या लॅटिन शब्दापासून बनला आहे. त्यात एकाच प्रकारच्या विवक्षित वैशिष्टय़ांनी बनलेल्या ओळखी अभिव्यक्त होतात. ‘अस्मिता’ या शब्दाला असलेला काहीसा वैयक्तिक स्वत्वाच्या तीव्र जाणिवा ‘identity’ या शब्दाला मुळातून तितक्याशा अभिप्रेत नाहीत. वरकरणी शब्दश: असे वाटत असले तरी अंतरंगात अनेक पोटभेद, वैशिष्टय़भेद असलेले अनेक समूह विशिष्ट हेतूंनी, गरजांपोटी, विचारसरणी/ श्रद्धांच्या नावाखाली एकत्र येऊन संबंधित सूक्ष्म/ ठळक भेदांना आपल्या मागे ठेवून दीर्घकालीन ध्येयाच्या दृष्टीने एकत्र येतात तेव्हा ती सामूहिक ओळख वैयक्तिक अस्मितेइतकीच लक्षणीय ठरते. खरे तर अस्मिता ही गोष्ट वाईट असते असे यातून समजायचे काही कारण नाही. काही अभ्यासकांच्या मते, अस्मिता किंवा ओळख या तत्त्वामुळे एखाद्या व्यक्तीचे किंवा विशिष्ट समूहाची वैयक्तिक किंवा सामूहिक वैशिष्टय़े, वर्तन किंवा त्यांची ऐतिहासिक-राजकीय-सांस्कृतिक प्रकृती ढोबळमानाने आपल्या लक्षात येण्यासाठी अशा ओळखी/ अस्मिता ढोबळ अंगाने कामी येतात. याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अभिव्यक्तींकडे आपण यानिमित्ताने पाहू. त्यादृष्टीने ‘युवकांनी गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना/ वृद्धांना बसायला जागा द्यावी’ किंवा ‘अमुक अमुक वसाहतीमध्ये अमुक आहारशैली असलेल्या व्यक्तीला घर/ जागा घेऊ देऊ नये’ ही दोन उदाहरणे आपण लक्षात घेऊ. विशिष्ट वयोगटातील शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या व्यक्तींना युवा, सबल अशा व्यक्तीने बसण्यासाठी जागा द्यावी असे म्हणताना त्यातून काही विशिष्ट सामाजिक संकेत, सौजन्य अभिप्रेत असते व तसे वर्तन करणाऱ्या तरुण व्यक्तीविषयी चांगली किंवा वाईट अशा रीतीची ओळख त्यातून बनते. त्यातून समाजात रूढ असलेल्या संकेत चौकटींनुसार संबंधित व्यक्तीची नैतिकता ठरवली जाते. आता दुसरे वाक्य पाहू.. अमुक आहारपद्धत असलेल्या, अमुक नाव/श्रद्धा इत्यादी वैशिष्टय़े घेऊन वावरणाऱ्या व्यक्तीला त्या आहार-आचारपद्धती आणि वैशिष्टय़ांहून वेगळी, विसंगत वैशिष्टय़े व रीतभात असलेल्या परिसरात/ वसाहतीत घर घेऊ न देणे ही गोष्ट अस्मितेच्या राजकारणाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील ठरते. या दुसऱ्या संदर्भामध्ये संबंधित विवक्षित समूहाच्या दाटीने युक्त अशा वसाहतीमध्ये काही ठरावीक महत्त्वाचे असे आचार-आहार-भाषाविषयक साम्य-संकेत आहेत. त्यातून त्या समूहाचा असा एक ‘कम्फर्ट झोन’ बनला आहे. त्याबाहेरील व्यक्तीला तिथे येण्यापासून परावृत्त करणे, रोखणे यातून संबंधित समान आचार-आहाराची रीत असलेल्या समूहाच्या अस्मितेचे बळ नकारात्मकरीत्या, असहिष्णूरीत्या अभिव्यक्त होते. आहार-आचारपद्धतींतून निर्माण झालेल्या या ओळखी व त्यातून आलेला हा आपपरभाव संबंधित समूहाच्या सामूहिक बळाचे दर्शन घडवतात. बहुतांशी या अशा विशिष्ट आहार/ आचारविषयक सवयी आणि ओळखी श्रद्धाविषयक धारणा, आर्थिक प्रवर्ग, जात, वंश, वर्ण, भाषा इत्यादी पूरक घटकांशी जोडलेल्या असतात. त्यातून मानवी समूह आपल्याशी समान/ समांतर सवयी, आचारवैशिष्टय़े असलेल्या कबिल्यांना एकत्र घेत आपल्या सामूहिक ओळखी बनवतो आणि त्या ओळखी जपण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने वैयक्तिक व सामूहिक स्तरावर अभिव्यक्त होत असतो. यातून आपल्या विशिष्ट सवयी किंवा आचार-आहारपद्धती, विशिष्ट श्रद्धापर व वैचारिक धारणा/ तत्सम धारणांच्या चौकटी यांचा सार्वत्रिक स्वीकार व्हावा, किंवा किमान आपल्या भवतालात त्या धारणांशी विसंगत आचार असलेल्या गोष्टी शिरू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. असे प्रयत्न किंवा संबंधित आग्रहांची पूर्ती व्हावी यासाठी केले जाणारे डावपेच व त्यातून साधल्या जाणाऱ्या हितसंबंधांच्या व्यवस्था यांना आपण ढोबळमानाने ‘राजकारण’ असे म्हणतो. अस्मितेचे राजकारण आकाराला येते ते असे.

रोनाल्ड ड्वॉर्किन या नीतिशास्त्रज्ञाने म्हटले आहे त्यानुसार एथिक्स किंवा नैतिकतेची चौकट आपण कसे वागायला हवे, कोणत्या प्रकारचे वर्तन योग्य, कोणते अयोग्य याविषयीच्या धारणांच्या ठाम जाणिवांनी युक्त असते. दुसरीकडे विल्हेम फॉन हुम्बोल्ट या विख्यात समाजशास्त्रज्ञाने म्हटल्यानुसार, जगात उपलब्ध असलेल्या किंवा आपल्याकडे किंवा इतरांकडे असलेल्या संसाधनांच्या व्यवहारात आपल्या वैयक्तिक गरजा, आपल्या समूहातील लोकांच्या क्षमता इत्यादी माध्यमांतून सहभागी होऊनच सामाजिक व्यवस्था आकाराला येतात. त्यामुळे राजकीय इतिहासाचा व वर्तमानाचाही अभ्यास करताना आपल्याला अस्मितांचा विचार सर्वात आधी करावा लागतो. हे सारे लक्षात घेत एल. ए. काउफमान या राजकीय विश्लेषक-अभ्यासकाने म्हटल्यानुसार, कुठल्याही राजकीय कृतीचा पाया हा अशा अस्मितांचा विस्तार, अभिव्यक्ती आणि रूढीकरण हा असतो. असे अस्मितांचे राजकारण हे बहुतकरून सांस्कृतिक धारणांभोवती केंद्रित झालेले दिसते याचे कारण अस्मिता या विशिष्ट वर अनेकदा उल्लेखिलेल्या गुण-आचार-वैशिष्टय़ांच्या संस्थात्मक रचना आणि त्यातून आकाराला आलेल्या राजकीय अर्थप्रणालीशी जोडलेल्या असतात व त्यातून विशिष्ट सांस्कृतिक भेदांना त्या अधोरेखित करत असतात.

लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, समाजमाध्यमे किंवा वृत्तमाध्यमे असलेल्या व्यासपीठांवर ओझरती नजर टाकली तरी तिथे अस्मिताप्रवण तपशील अधिक असल्याचे दिसून येते. या अस्मिता अनेकदा जातीय असुरक्षितता/ अहंगंड, राजकीय विचारसरणी/ नेत्यांविषयीच्या निष्ठा, धर्मविषयक-श्रद्धाविषयक धारणांचे संदर्भ, राष्ट्र-राज्य या सामाजिक-राजकीय व्यवस्थाप्रणालीविषयीचे अभिनिवेश आणि अत्याग्रह यांभोवती केंद्रित असतात. या व्यवस्थांचे मूल्यमापन करताना किंवा त्याचे पदर चाचपताना द्यावी लागणारी उदाहरणे दरवेळी संबंधित व्यवस्थांमधलीच असतात असे नाही. उदाहरणादाखल आपण सध्या अगदी कळीचा मुद्दा असलेल्या ‘हिंसा/ ऐतिहासिक-सांस्कृतिक वास्तूंची नासधूस’ या प्रकारातल्या काही वानग्या लक्षात घेऊ. ‘अमुक व्यक्ती/ योद्धा/ राजाने अमुक समूहाशी संबंधित असलेले ऐतिहासिक वास्तू/ श्रद्धास्थान पाडले’ हे वाक्य संबंधित समूहाच्या सामूहिक अस्मितांना चेतवणारे किंवा भडकवणारे ठरते. संबंधित समूहाच्या सामूहिक धारणा या त्या समूहातील ऐतिहासिक अंतर्गत विसंगती, परस्पर भेद, अंतर्गत कलह, संघर्ष, शोषण इत्यादींचे संदर्भ विशिष्ट राजकीय-सांस्कृतिक ओळख अधिक दृढमूल करण्याच्या दृष्टीने बाजूला ठेवले जातात आणि एक समष्टीस्वरूप कृत्रिम आयडेंटिटी/ अस्मिता यातून बनवली जाते व संबंधित कृत्रिम अस्मिता स्थानिक, प्रांतिक, राष्ट्रीय किंवा अन्य स्वरूपाच्या व्यवस्थात्मक संरचनेचा पाया असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संबंधित उद्ध्वस्त केलेल्या ऐतिहासिक वास्तू/ श्रद्धास्थानाच्या इतिहासातील राजकीय संदर्भ, त्या मंदिराच्या अर्थकारणाचा, धर्मकारणाचा इतिहास किंवा त्या धर्मकारणाशी निगडित असलेल्या संप्रदायांच्या-समूहांच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासातील विसंगती व संघर्ष विसरले जाऊन संबंधित वास्तू त्या कृत्रिमरीत्या एकसाची केलेल्या अस्मितेचे प्रतीक बनते आणि त्या वास्तूला/ वास्तूशी संबंधित श्रद्धास्थानाला क्षती पोहोचवणाऱ्या अनेक घटनांपैकी तत्कालीन वर्तमानातील राजकारणाला अनुकूल अशा एका घटनेला किंवा त्या घटनेला विशिष्ट संदर्भात बळ देणाऱ्या मुख्य व्यक्तीला खलनायक ठरवून सबंध समाजाच्या अस्मिता त्या व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीच्या उपासनाविश्वाला केंद्रस्थानी ठेवून अस्मितांचे राजकारण पुढे केले जाते.

वरील मांडणी (व विशेषत:) उदाहरण वाचल्यावर अस्मिता या वाईट असतात असा एक सरसकट संदेश यातून द्यायचा आहे असा गैरसमज मात्र वाचकांनी करून घेऊ नये. अस्मिता असोत किंवा राष्ट्र-राज्यासारख्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व्यवस्था असोत; मानवी समूहांची जीवनशैली अधिक सुकर व्हावी यासाठी वसाहतीकरणाच्या या प्रक्रियेतून जन्माला आलेल्या या संरचना आहेत. मानवी स्वभावातील दोष, गुण व भावनांचा समुच्चय या अस्मितांच्या चौकटींवर परिणाम करत असतो. मानवजातीचे इतर सजीवसृष्टीतील जीवांहून असलेले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी नवनव्या संरचना आणि मूल्यव्यवस्थांना मानव जन्म देत असतो. या संरचना अशा अनेक मानवी समूहांच्या अस्मिता, असुरक्षितता आणि महत्त्वाकांक्षांची ओझी पेलून तयार होत असतात. त्या संरचनांना वेगवेगळ्या कारणांमुळे समावेशकतेचा अंगीकार करावा लागतो, हे हजारो वर्षांच्या इतिहासातून सिद्ध होत आले आहे. आधुनिकतेच्या आदर्श चौकटीचे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून कोडकौतुक करताना आपल्याला हे सारे भान जपायला आपण शिकले पाहिजे. अशा सर्व जंजाळातून बाहेर पडणे हेच मानव्याचा जागर ठरेल.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)