अंतराळातल्या घडामोडी, विविध उपग्रहांचं प्रक्षेपण, नवं तंत्रज्ञान, इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन केंद्राबाबत असणारं कुतूहल शमवण्यासाठी ‘इस्रो- झेप नव्या क्षितिजाकडे’ हे पुस्तक वाचायला हवं. इस्रोच्या प्रारंभापासून या संस्थेशी जोडलेले शास्त्रज्ञ आर. आरवमुदन व सहलेखिका गीता आरवमुदन यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रणव सखदेव यांनी मराठीत अनुवादित केलं आहे.

या पुस्तकात इस्रो या संस्थेचा प्रवास मांडला आहे. अनेक मोठय़ा शास्त्रज्ञांचं ही संस्था घडवण्यातलं योगदान, इस्रोचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प याची सविस्तर माहिती रंजक पद्धतीनं दिली आहे.  भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. विक्रम साराभाई, सतीश धवन यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांबरोबर काम करताना आलेले अनुभवही आरवमुदन यांनी यात लिहिले आहेत.

सुरक्षा धोरणांतील गोपनीयता या कारणांस्तव सर्वसामान्यांना एरवी अशा संस्थांमध्ये जाऊन प्रत्यक्ष माहिती घेणं शक्य नसतं. मात्र अशी संस्था नेमकं काय काम करते याचा दृश्यधांडोळा या पुस्तकामुळे घेता येतो. इस्रोच्या महत्त्वाच्या मोहिमांदरम्यानचे दुर्मीळ फोटो हे पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय़.

‘इस्रो- आर. आरवमुदन, गीता आरवमुदन’

अनुवाद – प्रणव सखदेव

रोहन प्रकाशन,

पृष्ठे – १८६, किंमत- २५० रुपये.