१९७० पासून नव्वदीच्या दशकापर्यंतचा मराठवाडय़ातील काळ हा साहित्यिक, सांस्कृतिक घडामोडींनी, व्यक्तिमत्त्वांनी बहरलेला काळ. ‘अस्मितादर्श’कार गंगाधर पानतावणे, रा. रं. बोराडे, नागनाथ कोतापल्ले, फ. मु. शिंदे, इंद्रजीत भालेराव यांसारखे दिग्गज साहित्यिक विविध पातळ्यांवर कार्यरत राहून मोठे योगदान देत होते. दुसऱ्या बाजूला अनंत भालेरावांसारखे साक्षेपी संपादक, दैनिक मराठवाडासारखे वृत्तपत्र, गो.मा. पवारांसारखे समीक्षक, महावीर जोंधळे अशी व्यक्तिमत्त्वं मराठवाडय़ाचं आणि महाराष्ट्राचं साहित्यिक – वैचारिक भरणपोषण करत होती. या काळाचे गमकच हे होते की या व्यक्तिमत्त्वांच्या विचारांनी प्रेरित होऊन दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील कित्येक तरुण उच्च शिक्षणाची कास धरू लागले. निव्वळ उच्च शिक्षणच नाही, तर आपण प्रत्यक्ष समाज घडणीतही काही योगदान द्यावे, या विचारांनी हे तरुण भारून गेले नसते तरच नवल. मराठवाडय़ातल्या या दिग्गज सुहृदांचा सहवास ज्यांना लाभला, त्यातल्या अनेक तरुण – तरुणींनी हा समृद्धीचा वारसा पुढल्या कैक पिढय़ांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जिव्हाळघरटी’ या ललितगद्य लेखसंग्रहातून लेखकाने व्यक्तिचित्रणपर लेखांमधून हा ठेवा वाचकांना दिला आहे. केवळ मराठवाडय़ातीलच नव्हे, तर महाराष्ट्रभरातील अन्य लेखक, समीक्षक, विचारवंत यांच्या सहवासाने अनेक पिढय़ा कशा समृद्ध झाल्या याचे हे चित्रण आहे. या सर्व व्यक्तिमत्त्वांचे पैलू, त्यांच्यासोबतचे जिव्हाळ्याचे नाते लेखांमधून व्यक्त केलेले आहे. ही थोर व्यक्तित्त्वं त्यांच्या खासगी आयुष्यात कशी आहेत, सामान्य लोकांशी असणारा त्यांचा वर्तनव्यवहार या बाबीही लेखांमधून मांडण्याचा प्रयत्न विश्वास वसेकर करतात. अत्यंत आत्मीयतेने केलेले हे लेखन माणसांच्या मर्यादांवरही प्रकाश टाकते.

जिव्हाळघरटी – विश्वास वसेकर

रजत प्रकाशन,

पृ- २२८, किंमत -३०० रुपये.