डॉ. मंजिरी भालेराव

सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. म. के. ढवळीकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले त्यांचे हे पुस्तक म्हणजे, सध्याच्या अतिशय चर्चेत असणाऱ्या सिंधू संस्कृती आणि आर्य यांच्यासंबंधी नवीन संशोधनाची जणू पूर्वपीठिकाच आहे. राखी गढी या ठिकाणी सापडलेल्या दफनातून जो डीएनए मिळाला त्याचा अभ्यास करून डॉ. ढवळीकर यांचे शिष्य डॉ. वसंत शिंदे यांनी त्यांच्या गुरूंचे काम पुढे चालवले आहे. पण डीएनए अभ्यासासारखी शास्त्रीय मदत न घेता आणि डॉ. ढवळीकर हयात असेपर्यंत झालेल्या सर्व प्रकाशित साहित्याचा आढावा घेऊन डॉ. म. के. ढवळीकर यांनी ‘कोण होते सिंधू लोक?’ या छोटेखानी पुस्तकाची मांडणी केली होती.

NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

या पुस्तकाची विभागणी सहा प्रकरणांत केली आहे. यामध्ये सिंधू लोक आणि आर्य, कलियुगातील संकट, सिंधू भाषा, सिंधू संस्कृतीचा वारसा, पूर्वेतिहास, मनू ते उदयन आणि उपसंहार.. अशा क्रमाने ही प्रकरणे आहेत. विषय मांडणी करताना डॉ. ढवळीकरांनी योग्य तिथे संदर्भ ग्रंथांची नावं दिली आहेत. सिंधू लोक आणि आर्य या भागात सिंधू संस्कृतीच्या स्थळांचा शोध कसा लागला हे सविस्तर सांगितले आहे. तसेच, या संस्कृतीचा उदय आणि भरभराट होत असताना त्याला कारणीभूत ठरलेले घटक कोणते याचीही चर्चा केली आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनानुसार, जगभरातील मानवी वसाहती बहरून त्यांचं रूपांतर मोठय़ा संस्कृतींमध्ये होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध घटकांमध्ये पर्यावरणाचा मोठा हात असतो, हे आता सिद्ध झालं आहे. त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीच्या बहराला त्या वेळचं पोषक पर्यावरण बऱ्याच अंशी कारणीभूत होतं हे आता लक्षात आलं आहे. सिंधू संस्कृतीच्या वसाहतींची रचना, समाजव्यवस्था, शासनव्यवस्था यांचीही चर्चा या प्रकरणात केली आहे. तसेच ऋग्वेदाचा काळ आणि सिंधू संस्कृतीतील काही उत्खनित पुराव्यांचा काळ आणि वैशिष्ट्यं सांगताना ते या दोन्ही गोष्टींचा भूगोल एकच आहे अशीही जाणीव करून देतात. पण सिंधू संस्कृतीच्या उत्खनित पुराव्यावरून लक्षात येणाऱ्या धार्मिक समजुती, तंत्रज्ञान, काही विधी यांच्यावरून ऋग्वेदातील संस्कृतीपेक्षा ते थोडं वेगळं आहे असं त्यांना वाटतं. किंबहुना, उत्तर सिंधू संस्कृती आणि वैदिक आर्य हे समकालीन असावेत असंच डॉ. ढवळीकरांचं मत होतं, हे स्पष्ट दिसतं. त्यासाठी घोडा या प्राण्याचं अस्तित्व हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे त्यांनी विविध पुराव्यांची चर्चा करून लक्षात आणून दिलं. त्यासाठी अंत्यसंस्कार पद्धती, भौतिक जीवन, उत्खनित पुरावे याचा आढावा घेऊन त्यांची चर्चा या प्रकरणात केली आहे.

‘कलियुगातील संकट’ या प्रकरणात भारताच्या पारंपरिक इतिहासाची मांडणी सांगून त्याला समांतर असणाऱ्या पुरातत्त्वीय पुराव्याशी त्याची तुलना केली आहे. पण एकंदरीत जो सांस्कृतिक ऱ्हास झाला त्यामध्ये असणारा पर्यावरणाचा हातही त्यांनी यात दाखवून दिला आहे. त्यामुळे सिंधू संस्कृतीचे लोक आणि वैदिक संस्कृतीचे आर्य यांची स्थलांतरं नेमकी कोठे झाली असावीत याचाही आढावा या ठिकाणी घेतलेला दिसतो.

उर्वरित प्रकरणांमध्ये त्यांनी सिंधू भाषा, त्या लोकांचा वारसा, भारतीय इतिहास, इ. बाबींची चर्चा केली आहे. ज्या प्रांतात सिंधू लोक राहत होते, त्या प्रांतातल्या आजच्या लोकांच्या भाषिक पूर्व-अवस्थेला सिंधू लोकांची भाषा म्हणण्यास हरकत नसावी असंही त्यांनी प्रतिपादन केलं आहे. त्यासाठी संस्कृत आणि प्राकृत भाषांच्या विकासाचे टप्पे, तसेच त्यांचा विविध प्रांतातला आढळ यांचीही चर्चा केली आहे. सिंधू संस्कृती आणि आर्य हे एकच की वेगळे, हे भारतीयांच्या मनावर गारूड घालणारे, पण समजण्यास गुंतागुंतीचे असे विषय ढवळीकरांनी अगदी लीलया हाताळून वाचकांसमोर दोन्ही पक्ष ठेवले आहेत. त्यात दोन्ही पक्षांची बाजू व्यवस्थित मांडली आहे. हे पुस्तक एका सूत्रात नीट बांधण्याचं काम डॉ. शुभांगना अत्रे यांनी जबाबदारीनं पार पाडलं.

क्व चित काही ठिकाणी थोडी गडबड  झालेली दिसते, उदा. बौद्ध धर्मातील स्तंभपूजेचा  पुरावा देताना तो चुकून स्तूप पुजेच्या ऐवजी दिला गेला आहे असं वाटतं. परंतु अशा चुका थोडय़ा आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रांमुळे आशय समजण्यास मदत होते आणि रंजकता वाढते. सामान्य वाचकांसह अभ्यासकांनाही उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे.

‘कोण होते सिंधू लोक?’

– डॉ. म. के. ढवळीकर, राजहंस प्रकाशन,

पृष्ठे – १२५, मूल्य – १६० रुपये.

manjirib24@gmail.com