भारतात भटक्या जातीजमातींच्या सुमारे ३५० भाषा आहेत. त्यातल्या प्रत्येक जमातीची वेगळी बोलीभाषा आहे. त्या भाषेला पारुशी’ म्हणतात. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात ४२ भटक्या जातीजमाती आहेत. त्यांची भाषाही पारुशी’च आहे. उदाहरणासह सांगायचे तर पारध्यांची वेगळी, बेलदारांची वेगळी, वडारांची वेगळी, वैदूंची वेगळी, बंजारांची वेगळी भाषा. पण या भटक्यांच्या भाषा एकमेकांत गुंतलेल्या आहेत. मानववंशशास्त्राचे अभ्यासक सांगतात की, सगळ्या भटक्या लोकांच्या डोक्याचा आकार सारखा आहे. त्यांच्या बोलण्यात जोरकसपणा, भारदस्तपणा आहे. उंच, धिप्पाड आणि चिवट बांध्याचे हे लोक फार पूर्वी राजस्थानातून आलेले आहेत असं सांगितलं जातं. या जातीजमातींचे भाट १९८०पर्यंत राजस्थानातून येत. त्यांच्याकडे सगळं लेखी असे. ते सात-आठ पिढय़ांचे वंशज सांगत. असो.
मी भटक्यांच्या ओड बेलदार या जमातीचा. आमच्या १२ पोटजाती आहेत. त्या प्रत्येकीची भाषा वेगळी आहे. या जमातीचे महाराष्ट्रभर दोनेक लाख लोक असतील. ते महाराष्ट्रभर भटकत राहतात. महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतही मोलमजुरी करायला जातात. आमच्या जमातीचा मूळ व्यवसाय घरं बांधण्याचा होता. पण ती मातीची, दगडांची जुन्या काळची घरं. पूर्वीच्या काळी आमच्या वाडवडिलांनी किल्ले बांधले. सिमेंट-विटांचा जमाना आला आणि आमची जमात बेरोजगार होत गेली. कारण ती अत्याधुनिक घरे बांधू शकत नव्हती. तसे प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं. त्यामुळे आता आमच्या जमातीतले लोक मिळेल ती मोलमजुरी करतात. काही रेडिओ, घडय़ाळं विकतात. आता मोबाइलही विकू लागले आहेत.
आम्हा ओड बेलदारांची स्वतंत्र म्हणावी अशी बोली आहे. तिला स्वतंत्र नाव मात्र दुर्दैवाने नाही. तसा अभ्यास कुणी केलेला नाही. आमच्या समाजात शिक्षण घेणारे लोकही खूप कमी असल्याने भाषेबाबतची जागरूकता नसणे साहजिकही आहे. त्यामुळे आमच्या भाषेला ओड बेलदारांची भाषा असूच म्हणू या.
आमची ही भाषा राजस्थानी, हिंदी आणि मराठी या तीन भाषांतील शब्दांच्या आधारे तयार झालेली आहे. त्यातील काही शब्द असे- माय (आई), बाबा (वडील), बेन (बहीण), तात्या (काका), भाभी (वहिनी), मामेभाऊ (मामाचा मुलगा), सवत (सवत), चुल (पीठ), लुन (लसूण), भुरकी (तिखट), हांडा (भाडं), भिरा (मुलगा), बणडी (नवरी), बणडा (नवरा), टुरा (मुलगा), टुरी (मुलगी), इळनमाळ (दिवसरात्र भटकणारे लोक), तसव्या (घनदाट जंगलातून जाणारी पाऊलवाट). वाक्यरचना राजस्थानी-हिंदूीतल्या शब्दांचा आधार घेत तयार केली जाते. उदा. तुका साळनं बनवल?’ (तू काय भाजी बनवली?) तजं नाव का हं?’ (तुझं नाव काय आहे?), पोलिसा गणत आमानं घना डर’ (पोलिसांची आम्हाला खूप भीती आहे), मनं भूक लगली हं’ (मला भूक लागली आहे.).
आमच्या जमातीत लग्नात खूप गाणी म्हटली जातात. त्यातही राजस्थानी, हिंदी, मराठी या भाषेतील खूप शब्द घुसलेले आहेत. उदा.
भांडा होता तो बदलाय देती
(भांडं असतं तर बदलून टाकलं असतं)
नवरदेव बदला नयी जाय
(नवरदेव बदलता येत नाही)
तांबा पितळ होता तो बदलाय देती
(तांबं, पितळ असतं तर बदलून टाकलं असतं)
पण तकदीर बदलाई नही जाय
(पण नशीब बदलता येत नाही.)
अशी एकेका जमातीची शंभरेक गाणी आहेत.
क्या मस्त सजा है झुला
उसके धोती में अलबेला
उसके सूरमे में बलखाई
दुल्हन प्यारी में शरमाई
हे हिंदी गाणंही आमच्या लग्नात फार पूर्वीपासून म्हटलं जातं. हळदीच्या समारंभाचीही गाणी आहेत. उदा.
‘कोण भिरा बेटा सवा सुतगढ नाव्हारे’ (कोणाचा मुलगा आंघोळीला बसलेला आहे?)
‘ये तो भिरा अशोक पवार का है रे बाबा’
(हा तर अशोक पवारचा मुलगा आहे.)
एखादा बाप वा माय मुलावर रागावली म्हणजे ते त्याला म्हणीतून शिव्या देतात. उदा. ढुंगण घसेना तुराटी नई’ (कमालीचं दारिद्रय असणं),जमा करती आनदीरेवा का’ (भारा बांधून आणत होता का?), कुंकू पुसती गोबर लगावला’ (दुसरा नवरा करणे), जिंदगी घनी बडी हं’ (आयुष्य खूप मोठं आहे.)
आमच्या जमातीतल्या काही लोकांनी साहित्यलेखन केलं आहे. पण त्यांनी ग्रामीण भाषेतच लिहिलं आहे. आम्हा ओड बेलदारांची भाषा मी पहिल्यांदा इळनमाळ’, दर कोस दर मुक्काम’ या कादंबऱ्यांतून मराठी साहित्यात आणली. आमच्या जमातीत माझ्याशिवाय इतर कुणीही लिहिणारं नाही. एवढंच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या ४५ जमातींतला मी केवळ तिसरा-चौथा लेखक असेन. आम्ही भटके लोक असल्याने आमचा सतत इतर भाषांशी, त्यातल्या शब्दांशी संपर्क येतो. त्यामुळे ते- ते शब्द आम्ही उचलतो. मराठीतून अलीकडच्या काळात माचीस, वही, पुस्तक हे शब्द आम्ही स्वीकारले आहेत. पण आमच्या मुलांना आमची बोली बोलावीशी वाटत नाही. ते हिंदी किंवा मराठी बोलतात. त्यामुळे माझी पिढी ही आमची भाषा बोलणारी बहुधा शेवटची पिढी असेल. आमच्यानंतर ओड बेलदारी ही बोलीभाषा बहुधा इतिहासात जमा होईल.