07 July 2020

News Flash

हास्य आणि भाष्य : उद्योगपती व्यंगचित्रकार आणि नर्स

नर्स या विषयाला व्यंगचित्रांमध्ये विलक्षण प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली ती लॅरी कॅट्झमन या बिझनेसमनने.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि रुग्ण यामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती असते ती म्हणजे नर्स!

प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि रुग्ण यामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती असते ती म्हणजे नर्स! त्यामुळे वैद्यकीय विषयांवर व्यंगचित्र काढत असताना डॉक्टर्स आणि पेशंट्स यांच्याबरोबरीने नर्स हाही विषय व्यंगचित्रकारांनी मोठय़ा प्रमाणावर हाताळला आहे. या नर्सेसच्या स्वभावाचे अनेक प्रकार मोठय़ा खुबीने त्यातून व्यक्त होतात. पेशंटवर ओरडणाऱ्या, त्यांची प्रेमाने काळजी घेणाऱ्या, डॉक्टरांना सल्ला देणाऱ्या, टेलिफोनवर सतत बोलणाऱ्या, डॉक्टरांवर प्रेम करणाऱ्या, आपापसात मोठमोठय़ाने गप्पा मारणाऱ्या असे नर्सेसचे अनेक प्रकार आपल्याही परिचयाचे असतीलच. या साऱ्यांचे रेखाटन जगभरातल्या अनेक व्यंगचित्रकारांनी मेडिकल जर्नल्समधून आणि इतरत्रही केलेलं आहे आणि ते निश्चितच मनोरंजक आहे.

अनेक दिवस बेशुद्ध असलेला पेशंट शुद्धीवर आल्यावर सुंदर नर्सकडे ‘त्या’ नजरेने बघतो; तेव्हा व्यंगचित्रातील ती नर्स तातडीने डॉक्टरांना म्हणते, ‘‘पेशंट शुद्धीवर आलाय बरं का!’’ पुरुषी स्वभावावरचं हे फारच भेदक भाष्य आहे. काही पेशंट हे अत्यंत तक्रारखोर असतात. त्यांना एक इरसाल नर्स ठणकावून सांगते, ‘‘हे पहा, तुम्हाला आमचे उपचार आवडत नसतील तर तुम्ही एकतर नियमाप्रमाणे आजारी पडा किंवा स्वत:चा आजार ‘विथड्रॉ’ करा.’’

व्यंगचित्रातला ‘पंच’ शक्यतो दृश्यातून दिसावा यासाठी सगळे व्यंगचित्रकार हरतऱ्हेने प्रयत्न करत असतात. काही जण अद्भुत वाटावेत असे प्रयोगही करतात. बिल ओ’मेली यांचं हे या प्रकाराचं चित्र. ‘मुलांच्या वॉर्डमध्ये एक नवीन नर्स आली आहे,’ हे सांगत असताना त्या नव्या नर्सचे रेखाटन हे मुलांनी काढलेल्या चित्राप्रमाणे असावं, ही कल्पना केवळ अद्भुत!

पण नर्स या विषयाला व्यंगचित्रांमध्ये विलक्षण प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली ती लॅरी कॅट्झमन या बिझनेसमनने. होय, उद्योगपती होते लॅरी कॅट्झमन शिक्षणाने इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले लॅरी हे शिक्षणानंतर एका उद्योगात आले. तो उद्योग होता वैद्यकीय विषयांशी संबंधित वस्तू तयार करण्याचा. थर्मामीटर, वाफेचे मशीन, हीटिंग पॅड इत्यादी वैद्यक विषयाशी संबंधित वस्तू ते तयार करत असत. अमेरिकेत त्यांचे अनेक ठिकाणी कारखाने होते. त्यात अंदाजे साडेतीन हजार कामगार काम करत असत. यावरून त्यांच्या व्यवसायाच्या व्यापकतेचा अंदाज येईल. असा हा मोठा उद्योजक शनिवारी-रविवारी मात्र व्यंगचित्रकाराच्या भूमिकेत असायचा. त्यांच्या व्यंगचित्रांचा विषय- आरोग्य. आणि टोपणनाव- काझ. (१९२२-२०१६) काझ यांनी एक पात्र तयार केलं.. एका नर्सचं! तिचं नाव आहे- नेल्ली!  या नेल्लीच्या नावाचेच अनेक व्यंगचित्रसंग्रह काझ यांनी प्रकाशित केले आहेत. याशिवाय ‘गेट वेल सून’ टाईप काही ग्रीटिंग कार्ड्सही त्यांनी तयार केली आहेत. पाच भाषांत आणि २१ देशांत त्यांची व्यंगचित्रं प्रकाशित होतात. या सर्वाचा एकत्रित खप हा तब्बल ३० लाख इतका आहे. काही वर्षांपूर्वीच काझ यांनी त्यांची कंपनी विकून टाकली अन् ते व्यंगचित्रांमध्येच रमू लागले होते.

काझ यांची ही नेल्ली नावाची नर्स अत्यंत मिश्कील आहे, बिनधास्त आहे. आणि मुख्य म्हणजे डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील ती दुवा आहे. साधे वाटणारे रेखाटन. फारसे तपशील नाहीत. चेहरेसुद्धा फारसे हावभाव नसणारे. जेमतेम दोन किंवा तीन पात्रे आणि पेनाने केलेलं रेखाटन ही स्टाईल असूनसुद्धा त्यांची चित्रं लोकप्रिय झाली ती त्यांच्या कल्पनाशक्ती आणि विनोदबुद्धीमुळे! नेल्ली नर्सशिवायसुद्धा त्यांनी शेकडो व्यंगचित्रं काढली आहेत. त्याचे काही नमुने हे असे..

सर्दी झाल्यामुळे दारू पिणारे अनेक जण आपल्याला माहिती असतात. पण सर्दी बरी झाल्यावर पुढच्या सीझनमध्ये ती होऊ नये म्हणून आधीच दारू पिणारा महाभाग मात्र काझ यांनाच  दिसतो. नाकात घालायचे ड्रॉप्स तयार करणाऱ्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये खरीखुरी विनोदबुद्धी असणारा डायरेक्टर म्हणतोय, ‘आपली ही एकमेव कंपनी असेल, जी इतरांच्या नाकात आपला बिझनेस खुपसते.’

एका चित्रात चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक खरोखरचा डॉक्टर हा डॉक्टरच्या भूमिकेसाठी आला आहे आणि अशा वेळी तो दिग्दर्शक त्या डॉक्टरला म्हणतो, ‘‘सॉरी डॉक्टर! तुम्ही डॉक्टरच्या भूमिकेसाठी योग्य आहात असं वाटत नाही! फक्त अभिनेत्यांनाच कळतं, की डॉक्टरसारखं कसं दिसायचं ते!’’ हा फार मिश्कील विनोद आहे.

एका चित्रात हॉस्पिटलमधला बेसिनचा नळ बिघडल्यामुळे डॉक्टर स्वत:च तो दुरूस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी त्यांची नर्स प्लम्बरला फोन करते आणि त्याचा निरोप ती डॉक्टरांना सांगते. प्लम्बर  म्हणतो, ‘‘सॉरी! हल्ली मी कोणाच्या घरी व्हिजिटला जात नाही!’’ अलीकडे डॉक्टर्स सहसा कोणाच्या घरी रुग्णाला तपासायला जात नाहीत.. त्यावरचं हे मर्मभेदी भाष्य म्हणायला हवं!

काझ यांची ही नेल्ली नावाची नर्स अत्यंत मिश्कील व बिनधास्त आहे आणि अभावितपणे विनोद करणारी आहे. म्हणूनच ती लोकप्रिय आहे. ती वेगवेगळ्या प्रकारे विनोदनिर्मिती करत असते.

एका चित्रात काही लोक भलामोठा मासा घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात, ज्याने एका माणसाला अर्धवट गिळलेलं असतं. अशा वेळी नेल्ली विचारते, ‘ही केस र्अजट आहे का?’

दुसऱ्या एका चित्रात एक माणूस पाठीत खंजीर खुपसला गेलेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये येतो. त्यावेळी नेल्ली विचारते, ‘आजची अपॉइंटमेंट आहे का?’

एकजण चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केलेला जुना पेशंट येतो. त्याला ही नेल्ली म्हणते, ‘वा.. वा! आम्ही ओळखतो की तुम्हाला! आमचे चेहरे आम्ही कधीच विसरत नाही!!’

फोनवर बोलत असताना ती म्हणते, ‘युरॉलॉजी डिपार्टमेंट पाहिजे? प्लीज.. होल्ड ऑन!’

एका पेशंटला गोळ्या देताना ती म्हणते, ‘दुखणं सुरू होण्याआधी एक तास या गोळ्या घ्यायच्या!’ डॉक्टरांच्या (आणि पर्यायाने स्वत:च्या!) काळजीपोटी ती डॉक्टरांना सुचवते की, ‘आपण बिल देणाऱ्या पेशंटचे स्पेशालिस्ट का होऊ नये?’

काझ अमेरिकेच्या नॅशनल कार्टूनिस्ट सोसायटीचे संचालक होते. उद्योजक आणि व्यंगचित्रकार ही दोन्ही आयुष्यं ते मनापासून जगले. त्यांनी खूप वर्षांपूर्वी एक इलेक्ट्रिक हीटिंग पॅड तयार केलं.. प्रवासात सहजपणे नेता यावं असं. त्यानंतर त्यांनी त्याचं पेटंटही मिळवलं, हे विशेष! ‘व्यंगचित्रकाराने पेटंट मिळवलं’ अशी बातमी त्यावेळी अमेरिकन वर्तमानपत्रांतून आली होती. त्यानंतर काझ यांनी अशी शेकडो पेटंट्स मिळवली. पण त्याहीपेक्षा नर्स नेल्ली आणि तिचा हलकाफुलका, हास्य फुलवणारा विनोद याचं पेटंट रसिकांनी त्यांना केव्हाच बहाल केलं होतं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 1:14 am

Web Title: larry katzman industrialist cartoonist and nurse hasya ani bhavishya dd70
Next Stories
1 विश्वाचे अंगण : मधुघटचि रिकामे पृथ्वीवरी..?
2 सांगतो ऐका : उपेक्षित अन् अपमानित नेहरू
3 या मातीतील सूर : मनस्वी…
Just Now!
X