गेल्या जानेवारीत या पानावर तिरकी आणि सरळ रेघ मारायला सुरुवात केली. आज या शेवटच्या रेघा.
स्तंभलेखन आजवर खूप केलंय. त्याचा प्रतिसादही अनुभवलाय. पण ‘लोकसत्ता’च्या पानावरून ओढलेल्या रेघांनी संपूर्ण महाराष्ट्राला जोडून घेता आले. काही प्रश्न मांडता आले. तुकोबांच्या शिकवणीला अनुसरून नाठाळांच्या माथा हाणता आले. काही पूर्वग्रहांच्या, शरमेच्या, संवेदनहीनतेच्या गोष्टी अधोरेखित करता आल्या. अभिनिवेशाला नम्रपणे, पण ठामपणे विरोध करता आला. साधारण मौजेचा रविवार हा जागरणाचा, विचारांचा आणि स्वत:कडे नि:पक्षपणे बघण्याचा असा कृतिशील करता आला. याचे समाधान मोठे असले तरी अस्वस्थता अधिकच वाढली!
एखादे सदर अधिक वाचनीय, चर्चेत असणे हे त्या वर्तमानपत्रासाठी, लेखकासाठी सुखावणारे, समाधान देणारे असले तरी ती प्रकिया तिथेच थांबत नाही. कशाचाही इव्हेंट करण्याच्या आजच्या काळात आजही काही जागा शिल्लक आहेत- तिथे आपण या अशा रेघा ओढू शकतो. हे विनाशात काडीचा आधार मिळावा तसेच आहे.
जनसामान्यांच्या मनात असलेल्या किंवा त्यांनी विचार करावा, स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला जागृत करावे आणि सर्वच काही संपलेले नाही, कितीही अंधारात एक प्रकाशरेषा सापडतेच, हा आशावाद जिवंत ठेवावा, हेच सूत्र मनात ‘तिरकी रेघ’ सुरू करताना होतं. ते बऱ्याच अंशी सफल झालं याचं समाधान आज शेवटच्या रेघेत आहे.
मात्र, त्याचवेळी जी एक अस्वस्थता मनात आहे, ती अधिक महत्त्वाची व पुढच्या वाटचालीसाठी पथदर्शक ठरावी. या सदराला येणाऱ्या प्रतिसादात एक गोष्ट समान होती, ती म्हणजे ‘आमच्या मनातलं बोललात’, ‘कुणीतरी हे स्पष्टपणे सांगायलाच हवं होतं..’ या प्रतिसादाने लेखक म्हणून अंगावर मूठभर मांस न चढता मला चिंताच वाटली. म्हणजे या प्रतिसादाचा अर्थ असा होता की, ही निव्वळ लेखनाला दाद नव्हती, तर असंख्य वाचकांच्या मूकरुदनाचा तो आक्रोश होता.
साक्षरतेच्या प्रसारानंतर, माध्यमक्रांतीनंतर, संवादाची तांत्रिक माध्यमे वाढल्यानंतरही आपला आवाज उच्चारता येत नाही, योग्य ठिकाणी पोहोचवता येत नाही, कसातरी पोहोचवला, तरी ऐकला जात नाही, आणि ऐकला, तरी त्याला प्रतिसाद न मिळता तो पुन्हा प्रतिध्वनीसारखा आपल्यालाच ऐकू येत राहतो, ही अवस्था एखाद्या हुकूमशाही राष्ट्रात अपेक्षितच असते. पण ‘एक व्यक्ती, एक मत’ हे तत्त्व स्वीकारून जगातील सर्वात मोठय़ा व यशस्वी संसदीय लोकशाहीत हा अनुभव यावा? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका साप्ताहिकाला ‘मूकनायक’ असे नाव दिले होते. कारण त्यावेळचा तो समाज सर्वार्थाने मूक आणि बहिष्कृत होता. या मूकनायकालाच एका जाती-जमातीपुरता सीमित न करता बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील तळातल्या शेवटच्या माणसाला आणि समाजाच्या शीर्षस्थानी असलेल्या संपन्न माणसाला ‘एक मत’ आणि ‘लोकशाही’ या धाग्याने एकत्र बांधले. पण आज लोकशाहीची साठ वर्षे पूर्ण केल्यावर आम्हाला फक्त ‘वर’ बसलेल्या, पोहोचलेल्यांचा आवाज ऐकला जातोय असे ढळढळीतपणे दिसते. शेतकऱ्याची जनावरे, मध्यमवर्गाची गाडी, घरे बँकेचे तीन हप्ते थकल्यावर योग्य ती मानहानी करून बँक मोठय़ा टेचात जप्त करते. पण याच बँका मदमस्तमौला विजय मल्ल्याच्या सोनेरी केसांना किंवा सहाराश्रीच्या रंगवलेल्या केसांनाही धक्का लावू शकत नाही. दंडाची रक्कम गोळा करण्यासाठी सहाराश्रींना तुरुंगातच वातानुकूल कार्यालय थाटून दिले जाते. ही कुठली न्यायव्यवस्था?
एका बाजूला विनाशकारी, अर्निबध विकासाची फळे आणि दुसऱ्या बाजूला अभिनिवेशी धर्माधता, हमखास यशाची पावती-जात, सत्ताधारी आणि विरोधकांची संगनमताने देशाच्या निसर्गसंपत्तीसह प्रत्यक्ष संपत्तीची लूट, वाढती असुरक्षितता, वाढती आर्थिक, सामाजिक आणि लिंगभाव विषमता अशा या लढाईत भगवद्गीता राष्ट्रीय गं्रथ झाला तरी काय होणार आहे?
कर्तव्ये कठोरपणे सांगणारा कृष्ण आणि ती अमलात आणणारा अर्जुन आज अस्तित्वातच नसताना कोण कोणास काय सांगणार? ‘महाकाव्ये की इतिहास’ हे स्पष्ट नसलेल्या ग्रंथांतून ‘आदर्श’ उचलावे लागावेत एवढे आपण अजूनही ‘पुराणे’ आहोत? डार्विनचा वारा इकडे फिरकलाच नाही का? मर्यादापुरुषोत्तम रामाला पुन्हा जन्म देताना आपण हे विसरतो, की आत्ताचा राम सहजपणे भरताला सिंहासन देत नाही की भरतही पादुकापूजन करीत नाही. उलट, भरत राम कधी वनवासात जातो, अथवा त्याला पाठवता येईल, याचाच विचार करतो! (आठवा- अडवाणी रुसवानाटय़!) तर राम म्हणेल, कैकयीला वाटलं आणि राजा दशरथाची आज्ञा असली तरी मी वनवासात जाणार नाही.. याबाबत श्रेष्ठी विचार करतील आणि निर्णय घेतील! असा आहे आजचा राम!

आम्ही पूर्वीपासूनच प्रगत होतो, हे सांगण्यासाठी हनुमान (विमान), संजय उवाच (दूरचित्रवाणी), गणपती (प्लास्टिक सर्जरी) अशी उदाहरणे आता खुद्द पंतप्रधानांसह मंत्री, खासदार, आमदार सगळेच देताहेत. मग याच काळातील शबरीला पावडरने बोरे लवकर ‘तयार’ करतात, हे माहीत का नव्हते? आणि प्लास्टिक सर्जरीचा लाभ एकलव्याला का मिळाला नाही? हनुमान म्हणजे विमान इथपर्यंत पोहोचलो होतो, तर कर्णाला चिखलातून रथ काढणे अवघड का झाले? आणि मग इतक्या प्रगत काळात कुंतीला गर्भपात का करता आला नाही? कर्णाला कवचकुंडले मिळतात, तर आज अनाथाश्रमात वाढणाऱ्या बेवारस मुलांना साधी सरकारी खिचडी का मिळत नाही? गरगरलात ना? विकासाचे आश्वासन देणारे उलटय़ा पायाने चालायला लागल्यावर काय होणार?
अर्थात हे झाले आत्ताचे. सहा महिन्यांतले. याआधीचा अंधारही असाच. स्वातंत्र्यानंतर विकासाच्या नावाखाली बेबंद कारभारच चाललाय. आणि तोच पुढे जाणार, जातोय, जात राहणार. कारण एकदा ‘सत्ता’ हे संपत्तीनिर्माणाचं साधन मानलं की साध्य हवं तसं रेटायचं, हाच नवा पायंडा आहे.
त्यामुळेच आपल्या देशात एकाच वेळी एकविसावं शतक आणि सोळावं शतक समांतर नांदत असतं. आपण अणुचाचणीही करणार आणि मुंबईसारख्या महानगरात प्यायला पाणी विकत घ्यावं लागणार. आम्ही कमी पैशांत मंगळावर यान पाठवणार, पण स्त्रियांना शौचालये मात्र बांधून देणार नाही. आम्ही भव्य क्रीडा सामने भरवणार, फॉम्र्युला वनचा ट्रॅक बनवणार आणि त्याचवेळी खड्डेग्रस्त रस्ते बनवत टेंडर लॉबीची बँक अकाऊंट्सही फुगवणार! आम्ही सरदार पटेल, शिवाजीमहाराज यांची भव्य स्मारके उभी करणार आणि सामान्य जनतेलाही ‘पुतळ्या’ची अवस्था आणणार. आम्ही संसद, विधानसभा, पालिका ही सरकारी कार्यालये समजून अनुकंपा तत्त्वावर आपली मुलं, मुली, सून, जावई, भाऊ, पुतणे, नातवंडं यांना तिथे चिकटवणार. आम्ही सर्व काही आहोत आणि काहीच नाही- अशी अभूतपूर्व आध्यात्मिक अवस्था आपण सामान्यजनांनी प्राप्त करून घेतलीय.
आम्ही निष्क्रिय होऊ अशी व्यवस्था इथल्या राजकीय पक्षांनी प्रलोभने आणि दहशत दाखवून केली आहे. बोलणाऱ्याचा ‘सत्कार’ करायचा किंवा त्याला अपघाती मरण आणायचे, आणि वर श्रद्धांजली वाहून स्मारकही बनवायचे- अशी ही धूर्तपणापासून निष्ठूरतेपर्यंतची सुसज्ज व्यवस्था आहे. खुल्या अर्थव्यवस्थेनंतर संपत्तीनिर्माणाची उपलब्ध झालेली संधी यामुळे पूर्वीचा नीतिमान मध्यमवर्ग चंगळवादी, बेपर्वा नवश्रीमंत झाला; तर पूर्वीचा कनिष्ठ वर्ग बाजारपेठेतून वजा होऊन गरिबीरेषेच्या खाली फेकला गेला. समता, बंधुत्व, एक मत ही तत्त्वं सांगणाऱ्या लोकशाहीत पिवळी, पांढरी, नारंगी अशी विविधरंगी रेशनकार्डे निर्माण व्हावीत यातच सगळं आलं. गंमत अशी की, आम्ही विकसनशील राष्ट्र असताना सर्व भारतात एकाच रंगाचे रेशनकार्ड होते. आज महासत्तेकडे प्रवास करताना विविधरंगी रेशनकार्डे!
काय चाललंय या देशाचं? काय चाललंय आपलं? आपण मेंदूला शीतपेटीत ठेवलाय. समाजातला बोलका वर्ग- जो पूर्वी ५०० ग्रॅम साखरेसाठी, नळाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरत होता, व्यापाऱ्यांची गोदामे फोडत होता, चक्का जाम करत होता, ‘घेतल्याशिवाय जाणार नाय’ म्हणत होता, मंत्रालय बंद करत होता, भांडवलदारांना घाम फोडत होता, व्यवस्थेला प्रश्न विचारत होता, समाजपरिवर्तनासाठी शहरातून खेडय़ांत गेला होता, खेडय़ांतून दुर्गम जंगलात गेला होता, जात, धर्म, पंथ ओलांडून विवाह करून नवी संतती विचाराने जन्माला घालत होता, जो स्त्री-पुरुष समतेसाठी खांद्याला खांदा लावून लढला, आणीबाणीविरोधात तुरुंगात गेला.. कुठे गेला हा माणूस? की त्याचे लढे यशस्वी झाले? प्रश्न संपले? अपेक्षित लोकशाही प्रस्थापित झाली? संविधानानुसार भारतात बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी स्थिती निर्माण होऊन ती स्थिरावलीय? काय झालंय काय नेमकं? सत्ताधारी बेगुमान, बेबंद झालेले असताना, राजकीय पक्ष तत्त्वं खुंटीला लावून तत्त्वशून्य युत्या-आघाडय़ा करून सत्तेचे अंकगणित जुळवून देश लुटताना आम्ही गांधींची तीन माकडे झालो. पण उलट अर्थी! म्हणजे जे बुरं चाललंय ते आम्ही डोळ्यांआड, बुरा आवाज कानाआड, तर बुऱ्या वर्तनावर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसलोय! आम्ही ‘माणूस’पणाकडून मदाऱ्याच्या हातची माकडं झालो आहोत. आम्हाला पूर्वी गळ्याला बांधलेली दोरी आणि तालावर नाचणं खटकायचं, राग यायचा. पण आता दोरी तिनक्याचा आधार आणि तालावर नाचणं हा आपला कलाविष्कार असून मालक त्यासाठी तयार प्रेक्षक आणतोय, आपला सन्मान करतोय असं वाटतं. आपल्या षंढपणाचं अधिकृत सर्टिफिकेट सरकारने, राजकीय पक्षांनी एखादा इव्हेंट करून प्रदान करायचं तेवढं बाकी ठेवलंय.
काळही आपल्याला सुसंगत व्यवस्था निर्माण करतोय. नैसर्गिक नपुंसकत्वाला तिसरा लिंगदर्जा मिळालाय आणि आत्महत्या हा आता गुन्हा समजला जाणार नाही! आपल्या विकासाच्या नव्या मॉडेलचे हे दोन निर्णय जणू प्रतिनिधित्वच करतात!
आता एकच इच्छा- वर्षभरात ज्या या रेघा ओढल्या, त्यांचे जाळे होवो. त्या जाळ्याच्या विणकामात आपण सगळे कर्तव्यभावनेने सामील होऊ या आणि असंख्य हातांच्या ताकदीने ते असे आभाळावर फेकू या, की त्यात बोलघेवडे पोपट, शिकारी घारी, माध्यमदलाल कावळे, नव्या पहाटेने चिवचिवणाऱ्या, टिवटिवणाऱ्या चिमण्या, लबाड कोल्हे, नरभक्षक वाघ, लाथाळय़ाग्रस्त गाढवे, लाल ढुंगणांची माकडे, अजस्र जबडय़ाचे शार्क आणि तालावर नाचणारे डॉल्फिन असे सगळेच या जाळय़ात जेरबंद करून एक नवी सृष्टी निर्माण करू या. जिथे प्राणी माणूसपण घेतील आणि माणूस प्राणीगुण घेणार नाही. ही परस्पर पाळीवता सर्वाना सुखकारक होईल. तिरकी रेघ समाधिस्त होईल!

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Girl Dies After Eating Cake
१० व्या वाढदिवशी खाल्लेल्या केकने चिमुकलीचा मृत्यू, झोमॅटोची हॉटेलवर कारवाई; कुटुंबाने सांगितलं पूर्ण प्रकरण

शेवटची सरळ रेघ- वर्षभरात विविध विषय, समस्या यांवर लिहिले. त्यांच्या समर्थनार्थ सरसावून एसएमएस, मेल, फोन करणारे होते तसेच अत्यंत शेलक्या शब्दांत, अगदी जात शोधून त्या अनुषंगाने लिहिणारेही होते. त्याचप्रमाणे नव्या सोशल मीडियातही त्यावर पाठिंबा देणारे आणि जहरी टीका करणारे असे दोन्ही गट उपस्थित होते. यापैकी पाठिंबा देणाऱ्या, समर्थन करणाऱ्यांचे आभार मानतानाच जहरी टीका, असूयाग्रस्त, पूर्वग्रहदूषित आणि पारंपरिक दूषित दृष्टीतून बघणाऱ्यांना एक सावधगिरीची सूचना- तिरकी असो वा सरळ रेघेला पृष्ठभूमी कुठली यावर तिची गती थांबत नाही, ती अखंडच असते. तेव्हा आसमंतात नजर ठेवा. सरळ रेघेसह तिरकी रेघ कुठेतरी उमटताना दिसेलच!
 (समाप्त)