News Flash

ही तर स्पष्टीकरण कथा!

पडसाद

(संग्रहित छायाचित्र)

 

ही तर स्पष्टीकरण कथा!

‘लोकरंग’ (२९ डिसेंबर) मधील विजय पाडळकर यांनी लिहिलेला ‘मृणाल सेन आणि एकलव्य’ हा लेख वाचला. लेखाच्या अखेरीला त्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांचं स्पष्टीकरण इथे देत आहे.

‘मृगया’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी घडलेल्या एका प्रसंगाची मृणालदांनी सांगितलेली आठवण पाडळकरांनी या लेखात उद्धृत केली आहे. हरणावर बाण मारण्याच्या पहिल्याच शॉटच्या वेळी चित्रपटाच्या नायकाने अंगठय़ाचा वापर केल्याची चूक एका स्थानिक आदिवासीने मृणालदांच्या लक्षात आणून दिली, तेव्हा अंगठा न वापरण्यामागचं कारण स्पष्ट करताना त्यानं ते आदिवासी एकलव्याचे वंशज असल्याचं मृणालदांना सांगितलं. महाभारतातली ही कथा एका दुर्गम आदिवासी भागात रुजलेली पाहून मृणालदा थक्क झाले. पुढे पॅरिसमध्ये एका मुलाखतीच्या वेळी हा किस्सा त्यांनी फ्रेंच श्रोत्यांना सांगितला. त्यावेळी फ्रेंच वडील आणि आफ्रिकन आई यांच्या पोटी जन्मलेल्या आणि व्यावसायिक नेमबाज असलेल्या एका श्रोत्यानं मृणालदांना मधेच थांबवलं आणि जगभरात कुठेच नेमबाजी करताना अंगठय़ाचा वापर होत नाही, फक्त मधली दोन बोटंच वापरली जातात, असं सांगितलं. त्यामुळे द्रोणाचार्याची कथा खोटी आहे, असं मतही त्यानं बोलून दाखवलं.

वर्षांनुवर्ष सांगितली/ ऐकली जाणारी ही कथा ‘खरी’ का मानली गेली आणि एकाही भारतीय अभ्यासकाने यादृष्टीने विचार का केला नाही, असे प्रश्न मृणालदांनी आपल्या लेखात नोंदवल्याचं सांगून, तोच धागा पकडून पाडळकरांनी स्वत:ही महाभारताचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी या कथेच्या खरेखोटेपणाचा विचार केला नाही का? वास्तवाचा आधार नसेल तर ही कथा जन्माला कशी आली? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत वाटणारं कुतूहलही त्यांनी अखेरच्या वाक्यात व्यक्त केलं आहे.

मुळात, द्रोणाचार्यानी एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागून घेतल्याची ही कथा म्हणजे स्पष्टीकरण कथा आहे. नेमबाजी करताना सामान्यत: अंगठय़ाऐवजी मधल्या दोन बोटांचा वापर केला जातो, या वास्तवाचं स्पष्टीकरण देण्यासाठी निर्माण केलेली ही लोककथा आहे. अशा अनेक स्पष्टीकरण कथा शतकानुशतकं काळाचा प्रवास करत आपल्यापर्यंत पोचल्या आहेत. जांभुळाख्यानातही जांभळाला दोन्ही बाजूंनी असणाऱ्या तोंडांचं स्पष्टीकरण देण्यासाठी द्रौपदी आणि दुर्योधनाची कथा मांडली आहे. ही कथा लोकमानसानं निर्माण केली आहे; महाभारताच्या मूळ कथानकाचा ती भाग नाही. मूळ कथेला काळाच्या ओघात जी अनेक उपकथानकं जोडली गेली, त्यापैकी जसं हे एक कथानक आहे, तसंच द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची कथा हे एक कथानक आहे.

विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित होण्याआधीच्या कालखंडात अनाकलनीय वाटणाऱ्या भोवतीच्या घटनांचा किंवा वस्तुस्थितींचा आपल्या परीनं अन्वयार्थ लावण्यासाठीही ठिकठिकाणच्या लोकसमूहांनी अनेक कथा/ गीतांची निर्मिती केली आहे आणि लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी त्यांचं सांस्कृतिक-सामाजिक महत्त्व अधोरेखितही  केलं आहे. त्यामुळे द्रोणाचार्याची कथा ही वास्तवाचा आधार नसलेली खोटी कथा आहे, असं म्हणण्यापेक्षा वास्तवाला आधार देण्यासाठी निर्माण केलेली ही स्पष्टीकरण कथा आहे असंच म्हणावं लागेल.

– वर्षां गजेंद्रगडकर

अभिनयाप्रमाणे लेखनही उत्तम

‘लोकरंग’मधील गेल्या वर्षीचे ‘बहरहाल’ सदर मी नियमित वाचले. गिरीश कुलकर्णी यांनी नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला लिहिलेला लेख वाचला. लेखकाने स्वत:च्या लिखाणाचे  तटस्थपणे केलेले परीक्षण आवडले. इतक्या सहजतेने आपण स्वत:कडे बघू शकलो तर सुधारणा होण्यास नक्कीच वाव असतो असं जाणवलं. गिरीश कुलकर्णी त्यांच्या अभिनयात जसे त्या- त्या भूमिकेला न्याय देतात, त्याचप्रमाणे त्यांच्या लेखनातून मांडलेली भूमिका, विविध विषयांनाही त्यांनी न्याय दिला आहे. शेवटच्या लेखातील कविता सार्वत्रिक भावनांचे प्रतिनिधित्व करते.

– स्वप्नील कराळे

समाजभान देणारे सदर

एक उत्कृष्ट सिनेअभिनेता म्हणून गिरीश कुलकर्णी परिचित होतेच, पण ‘पाणी फाऊंडेशन’च्या २०१८ मधील त्यांच्या सहभागामुळे एक सजग, कृतिशील माणूस म्हणून त्यांचा परिचय झाला. गेल्यावर्षीच्या ‘बहरहाल’ या लेखमालेतून कुलकर्णी यांनी जे अनुभव कथन केले, त्यातून त्यांची जलमित्र म्हणूनही ओळख झाली. या लेखमालेतील जवळपास सर्व लेख वाचले. या लेखमालेतून वाचकांचे रंजन तर निश्चितच झाले आहे. किंबहुना, या लेखमालेने भोवतालच्या सामाजिक स्थितीचे सजग भान आणून दिले. त्याचबरोबर हरवत चाललेल्या निसर्गभानाचीही जाणीव वाचकांना करून दिली.  स्वत:च्या लिखाणाकडे तटस्थपणे पाहण्याची लेखकाची दृष्टी त्यांना लेखक म्हणून उंचीवर घेऊन जाणारी आहे.

– इंद्रजित जगन्नाथ वीर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 4:08 am

Web Title: lokrang article readers response abn 97 2
Next Stories
1 रंग बदलत्या दुबईचे..
2 विद्यार्थ्यांनी नव्हे, युवकांनी आंदोलनात उतरावे!
3 पढ़ने वालों के नाम..
Just Now!
X