|| डॉ. अनिल आठल्ये

भारतीयांना राजकारणाची चर्चा फार आवडते. चहाचे दुकान असो वा संध्याकाळचा कट्टा, जागोजागी लोक राजकारणाच्या चर्चेत मग्न असतात. परंतु ही राजकारणाची चर्चा क्वचितच परराष्ट्र घटनांबद्दल असते. राजकारणावर तावातावाने चर्चा करणाऱ्या व्यक्तीला सीरिया किंवा लेबनॉन म्हटले, की अळीमिळीगूपचिळी असते.

गेल्या शतकाचे एकूणच राजकारण मध्यपूर्व, तेल व तिथल्या अरब देशांभोवतीच फिरत होते. २१ वे शतकही त्यास अपवाद नाही आणि आजसुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणात मध्यपूर्व प्रमुख भूमिका बजावत आहे. ‘द ग्रेट गेम १९१७ : मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी’ या पुस्तकात मध्यपूर्वेतील सात नव्या राष्ट्रांच्या उदयाची कहाणी लेखक जयराज साळगावकर यांनी उलगडून दाखवली आहे. मध्यपूर्वेच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासावर लेखकाने थोडक्यात, पण समर्पक प्रकाश टाकला आहे. ‘एम.आय. ६’ या गुप्तहेर संघटनेचे काम असो किंवा अमेरिकेने खेळलेली दुटप्पी चाल असो, लेखकाने त्या सर्व घडामोडींवर उत्तम भाष्य केले आहे.

आज मध्यपूर्वेच्या व जगाच्याही राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सौदी अरेबियाचा उदय कसा झाला आणि अमेरिकेची भूमिका त्यात किती महत्त्वाची होती, त्याबद्दल पुस्तकात रोचक माहिती दिली आहे. याशिवाय या पुस्तकाचे एक लक्षणीय श्रेय म्हणजे अरब जगातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींचा केलेला उल्लेख. एक प्रकारे साळगावकरांचे हे पुस्तक म्हणजे मध्यपूर्वेचा ज्ञानकोशच म्हणावे लागेल. थोडक्यात, लेखकाने उत्तम माहिती संकलीत केली आहे. एक संदर्भग्रंथ या अर्थाने हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरावे.

इतिहासाची पुनरावृत्ती जशीच्या तशी होत नाही हे मान्य केले तरी वर्तमानकाळातल्या घटनांची मुळे इतिहासात कशी आहेत, हे लेखकाने दाखवून दिले आहे. परंतु, या एकूण २८१ पृष्ठांत राजकीय भूगोल किंवा इस्लाम व त्याचा प्रभाव यावर विशेष भर दिलेला नाही. मध्यपूर्वेतल्या या सर्व घटनांमागे सार्वत्रिक सूत्र काय होते, या प्रश्नाचे उत्तर मात्र पुस्तकात मिळत नाही.

इतिहास म्हणजे केवळ घडलेल्या घटनांची जंत्री नव्हे, तर त्यामागच्या कारण-परंपरेचा शोध घेणे गरजेचे असते. त्या निकषावर या पुस्तकाचे मूल्यमापन करता येऊ शकत नाही. पुस्तकाच्या शीर्षकात जो ‘ग्रेट गेम’चा उल्लेख केला गेलेला आहे, ते ‘ग्रेट गेम’ हे विशेषण इंग्लंड व रशियातल्या मध्य आशियातल्या स्पर्धेच्या संदर्भात वापरले जाते, मध्यपूर्वेच्या संदर्भात नव्हे!

असे असले तरी, मध्यपूर्वेत आज घडणाऱ्या घटनांचा उपयुक्त संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक नक्कीच उपयोगी आहे. स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींनाही हे पुस्तक उपयोगी पडेल.

‘द ग्रेट गेम १९१७: मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी’- जयराज साळगावकर,

परम मित्र पब्लिकेशन्स,

पृष्ठे – २८१, मूल्य – ४०० रुपये