14 August 2020

News Flash

बाळासाहेबांचा करिष्मा

बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि राजकारणाचे मर्म उलगडून दाखवणारे हे दोन लेख. एक ‘दलित पँथर’ या लढाऊ बाण्याच्या संघटनेच्या संस्थापक-अध्यक्षाचा, तर दुसरा त्यांच्या पक्षाच्या

| November 25, 2012 12:52 pm

बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि राजकारणाचे  मर्म उलगडून दाखवणारे हे दोन लेख. एक ‘दलित पँथर’ या लढाऊ बाण्याच्या संघटनेच्या संस्थापक-अध्यक्षाचा, तर दुसरा त्यांच्या पक्षाच्या पहिल्या केंद्रीय मंत्र्याचा. या दोघांनाही बाळासाहेबांचा दीर्घकाळ सहवास मिळाला. या लेखांत त्यांनी त्यांचे काही अपरिचित पैलू उलगडले आहेत..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी आपला देह ठेवला. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये जसे मोठय़ा संख्येने शिवसैनिक होते तसेच सर्व जातधर्माचे, शोषित, कष्टकरी, शेतकरी समाजातील समूहदेखील होते. सर्व राजकीय पक्षांचे, संघटनांचे मान्यवर पुढारी होते. अगदी बाळासाहेबांनी ज्यांच्याशी राजकीय झुंजीही दिल्या, तेदेखील दु:खी अंत:करणाने सामील झाले होते. विरोधकांशीही  ऋणानुबंध जोडणारे बाळासाहेब एका अर्थाने अजातशत्रूच होते.
१९६० सालापासून महाराष्ट्रातील प्रागतिक राजकारणाच्या व्यामिश्रतेचा बहुरूपदर्शी आलेख बिघडून गेला. त्याचा अन्वयार्थ प्रागतिक राजकारण्यांनी अद्यापही नीट लावलेला नाही. तो लावताना  शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना डावलता येणार नाही. प्रागतिक राजकारण ज्या गोष्टीमुळे मार खात राहिले, त्याचे विश्लेषण नव्या पिढीसाठी होणे मला आवश्यक वाटते.
लोकप्रियतेच्या अतिउच्च टोकावर आज बाळासाहेब ठाकरे होते. सुष्टदुष्ट गोष्टींच्या, आधार आशीर्वादाने बाळासाहेब लोकनेतेपणाच्या संज्ञेपर्यंत पोहोचले.  त्यांचा बौद्धिक प्रवास प्रबोधनकारांच्या भाषेतच सांगायचा तर ‘दृष्ट लागावा’ असा होता. ते लोकनेते झाले, पण ते पद मिळवण्यासाठी पूर्वीच्या लोकनेत्यांनी जे कर्तृत्व, त्याग, समष्टीविषयीचे सम्यक्  विधायक ज्ञान, वैचारिक अधिष्ठानाची बांधीलकी स्वीकारलेली असे, या सर्वापासून बाळासाहेब चार कोस दूर होते. तक्षकातल्या गोष्टीतील राजाप्रमाणे त्यांची स्थिती होती. पिंजरा, पिंजऱ्याच्या आत दुसरा पिंजरा, स्वपक्षाची सत्ता आल्यामुळे तर त्यांच्या भोवतालचे पिंजरे अधिकच वाढत गेले. लोकनेतेपद मुक्त सर्वथैवसंचारी असते. बाळासाहेब स्वत: निर्माण केलेल्या राजकारणात कैद होऊन पडले होते. त्यांच्या बोटातल्या प्रतिभावंत चित्रकाराची जादूच त्यांनी स्वीकारलेल्या सांप्रदायिक राजकारणामुळे हरवली होती. त्यांच्या अवतीभवती स्वानंदींचा मायाबाजार पसरला होता. बाळासाहेब लोकनेते झाले, परंतु त्याचे कारण प्रागतिक राजकारणाच्या अध:पतनातच होते आणि आहे.
बाळासाहेबांनी राजकारणात कुठलेच राजकीय तत्त्वज्ञान स्वीकारले नाही, बनवले नाही. ना सिद्धांतावर आधारलेला दीर्घसूत्री कार्यक्रम आखला. तरीही ते लोकप्रियतेच्या सर्वोच्च स्थानावर होते. यामागचे गौडबंगाल काय? १९८५ साली मराठी माणूस, त्याच्या उद्धाराची प्रांतिक अस्मितेची भूमिका सोडून बाळासाहेबांनी हिंदूधर्माभिनिवेशाची भूमिका स्वीकारली होती. त्याचसोबत सामान्यांच्या दैनंदिन प्रश्नांवर व्यक्तिगत संघटनात्मक पातळीवर ते क्रियाप्रतिक्रिया व्यक्त करत राहिले. सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील दुर्धर समस्यांचे सैद्धांतिक घर्षण ते करत बसले नाहीत. डोक्याला डोकी घासून बुद्धय़ांकातली आगही विझवत बसले नाहीत. हिंदू-मुस्लिम, दलित-स्पृश्य अशा झुंजीसाठी त्यांच्याही राजकारणात जागा होत्या. परंतु त्यांच्या राजकीय जाणिवेचे विश्व मध्यमवर्गीय जाणिवेतूनच निर्माण झाले. प्रथम गिरगाव, दादर, नंतर गिरणगावमधल्या उरल्यासुरल्या मराठी माणसांचा येईल तो दैनंदिन प्रॉब्लेम सोडवण्यासाठी बाळासाहेबांनी आपल्या राजकारणात ‘इमिजिएट रिलीफ’ शोधण्याचा प्रयत्न केला. कुठे रेशनिंगमधली लबाडी बाहेर काढ, कुठे तेल-डालडय़ाचे डबे शोध, अजगरासारख्या चालणाऱ्या ट्रेनची गती वाढवण्यासाठी रेल्वे स्टेशनात धुमाकूळ घाल, चाकरमान्यांच्या कुचंबणेला वाचा फोड.  अगदी ६ डिसेंबर १९९२ पर्यंत बाळासाहेब आणि त्यांच्या संघटनेचा हा प्रवास पाहण्यासारखा आहे. बाबरी पाडली गेली. त्यात बाळासाहेबांचे अनुयायी सर्वात पुढे होते. ती पाडण्याची नैतिक जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. बाबरी पाडल्यानंतरच्या मुंबई शहरातील धार्मिक दंगली, या सर्वाचा व्हायचा तोच परिणाम झाला. बाळासाहेब लोकनेते झाले, नुसते ते लोकनेते झालेच नाही, तर त्यांना सत्ताही मिळाली.
शिवसेनेची पहिली जाहीर सभा मला अजूनही आठवते. प्रबोधनकार त्या सभेच्या मंचावर प्रमुख होते. स्वत:ला त्या वेळी सत्यशोधक पुढारी म्हणून समजणारे रामराव आदिक आणि त्यांच्या सावलीला घासून जाणारी स. ह. रानडेंसारखी मंडळी या सभेत होती. ‘मार्मिक’ने जे सतत सहा वर्षे  जागरण घातले, त्याचा परिणाम लाखाची सभा होण्यात झाला. त्याच सभेत सूत्रसंचालन करणाऱ्याने बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनाप्रमुख अशी पदवी दिली. या सभेत बाळासाहेब १५-२० मिनिटेच बोलले असतील. तेव्हापासून ते आजतागायत ते सेनाप्रमुख म्हणून प्रचंड गाजले, गाजत आले.
१९७२ साली महानगरपालिकेत सेनेला ७० जागा मिळाल्या. त्यानंतर ओळीने शिवसेनेचे महापौर होत गेले. ७५ साली शिवसेनेचा पडता काळ आला. डॉ. गुप्ते, मनोहर जोशी इत्यादींनी अंतस्थ बंडाळीचा डाव आखला होता. त्याचा स्फोट गुप्तेंनी करायचा असे ठरले. बाळासाहेबांना याची भुणभुण लागली. त्यांनी आणीबाणीला पाठिंबा देऊन ही बंडाळी मोडून काढली. आज या बंडाळीतले एक प्रमुख भाजप-सेनेच्या युतीचे मुख्यमंत्री होऊन राज्याच्या सिंहासनावर बसले आहेत. या सर्व प्रकरणात डॉ. गुप्तेंच्या राजकारणाचा खातमा झाला. गिरणगावातून सेनेला आमदार हवा होता. अडसर दूर करण्यासाठी सेनेचा भगवा गार्ड आणि कृष्णा देसाईंचा रेड गार्ड अशी झुंज झाली. परिणामी कृष्णा देसाईंचा मर्डर झाला. आई-बाप कम्युनिस्ट, मुले मात्र शिवसेनेत. सेनेला गिरणगावात या मुलांनी असे वाजतगाजत नेले. गिरणगावातील ट्रेड युनियन चालवणारे कम्युनिस्ट मात्र आंतरराष्ट्रीय भूमिकेची भजनेच म्हणत राहिले. त्यांना नव्या पिढीशी नाते जोडता आले नाही.
दादर, गिरगावातला मध्यमवर्ग शहरातील चाकरमानावर्ग, गिरणगावातील विस्थापित झालेला कामगार आणि बेकारीचे जिणे जगणारा त्याचा मुलगा, परप्रांतीयांना हाकलून देण्याची भाषा, या शहरातील उद्योगधंद्यातले परप्रांतीयांचे अधोरेखित करून टाकलेले स्थान, दाक्षिणात्य अधिकाऱ्यांविरुद्ध केलेली वाचिक, शाब्दिक आंदोलने नव्या पिढीच्या मनाची पकड घेणारी ठरली. सेनेच्या यशाचे हेच उघड गुपित आहे.
१९९५ साली युतीला सत्ता मिळाली. पूर्ण बहुमत नसतानाही दहशतीच्या हंटरच्या जोरावर सेनेने साडेचार वर्षे ती सत्ता निभावून नेली. काहीही म्हणा बाळासाहेबांचे स्टार अफलातून होते. त्यांनी स्वत:च्या पुढारीपणाचे एक वलय निर्माण केले होते. सत्ता आल्यानंतरही ते मुख्यमंत्री झाले नाहीत, त्यांनी आपल्या मुला-बाळांनाही मंत्री होऊ दिले नाही. स्वत:साठी त्यांनी ‘लक्ष्मणरेषा’ आखून घेतली होती.
बाळासाहेबांचे हे सत्तानिरिच्छ राजकारण त्यांना पाहता पाहता लोकनेता बनवून गेले. सर्वसाधारणपणे राजकीय टीकाकार कायम म्हणत आले, की ही सत्ता आणण्यासाठी बाळासाहेब तीसेक र्वष वाट पाहत राहिले. प्रसंगी काँग्रेसला मदत करत बदलत्या परिस्थितीला सामोरे जात राहिले. संयुक्त महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर समितीचे राज्य म्हणजे शेतकरी कामगार दलित शोषितांचे राज्य षड्यंत्र रचून ज्या काँग्रेसने येऊ दिले नाही, त्याचे बाळासाहेबांनी असे उट्टे काढले. समितीच्या राजकीय आघाडीत डावे-उजवे  कम्युनिस्ट पक्ष, सोश्ॉलिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षांसारख्या बहुजनांचा बलदंड पक्ष समितीत असूनही त्यांना या राज्यात ‘नाही रे’ वर्गाची दलित शोषितांची सत्ता स्थापन करता आली नाही. तो करिष्मा बाळासाहेबांनी केला.
कुठलीही आयडियॉलॉजी नसताना ही किमया फक्त बाळासाहेबांच्याच राजकीय, सामाजिक बांधीलकीची म्हटली पाहिजे. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचताना त्यांनी जे तात्कालिक आणि दीर्घदृष्टीचे डावपेच आखले आणि त्यातून त्यांनी जी लोकचळवळ उभी केली, त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात तोड नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2012 12:52 pm

Web Title: magic of balasaheb
टॅग Namdeo Dhasal
Next Stories
1 शिवसेनेसमोरील नवी-जुनी आव्हाने
2 राजकीय चारित्र्य बदलावे लागेल!
3 संक्षेपात..
Just Now!
X