|| मकरंद देशपांडे

आपण जगता जगता जीवनाकडे कलात्मक दृष्टिकोनातून बघू लागतो आणि कलेला जीवनदान देतो. पण खरं तर कला जन्मापासून तुम्हाला दूर होऊ  देत नाही, याचा प्रत्यय मला ‘संगीता का नीला चेक्सवाला स्वेटर’ लिहिताना आला. मला नाटककार म्हणून रौद्र रस रंगमंचावर आणायचा होता- ज्याचा स्थायीभाव क्रोध आहे. एक पात्र विंगेतून मंचावर आल्यावर दुसऱ्या पात्राच्या नावानं शिवीगाळवजा राग, द्वेष, घृणास्पद बोलत आणि पुन्हा विंगेत निघून जातं. त्यानंतर दुसरं पात्र मंचावर येतं. ज्याला पहिल्या पात्रानं तिटकारलेलं, फटकारलेलं असतं. मग ते पात्र पहिल्या पात्राचा साधारण तेवढय़ाच ऊर्जेनं पाणउतारा करतं.

दोघांचं रागवायचं कारण एक स्त्री आहे- जिचं नाव ‘संगीता’आहे. दोघांचं म्हणणं असं आहे की, ते जेव्हा जॉगिंगला टेकडीवर जातात, तिथे संगीता त्यांची वाट पाहत असते आणि ती एक स्वेटर विणत असते. तो चेक्सवाला स्वेटर ती दोघांना देणार असते. पण खरं तर तो स्वेटर दोघांपैकी एकालाच मिळणार असतो. ती कोणाला निवडणार, तिचं खरं प्रेम कोणावर, या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी संगीतासुद्धा रंगमंचावर येते. पण तिच्या बोलण्यावरून कळतं की, तिचं प्रेम कोणा एकावर नाही, तर दोघांवर तेवढंच आहे. ती जो स्वेटर विणते आहे, तो दोघांसाठी आहे. पण त्यांच्यात चाललेली स्पर्धा जो जिंकेल त्याला तो स्वेटर मिळेल. संगीता ही त्या दोघांसारखी रागीट आणि शत्रुता बाळगणारी नाहीये. तिच्यात असीम प्रेम आहे. ती खरं तर दोन स्वेटर विणणार आहे. पण पहिला कोणाला मिळणार?

पहिल्या अंकात दोन्ही पात्रांतील वैमनस्य हे दीर्घ स्वगतातून लिहिलं गेलं. दुसऱ्या अंकात मात्र दोघं एकमेकांना मारण्याचा प्लान करतात. कारण संगीता दोघांना प्रेमानं हाक मारते आणि पहिल्या अंकापेक्षा जास्त प्रेम करते दोघांवर. त्यामुळे आता दोघांनी लाथाबुक्क्यांची मारामारी सुरू केलेली असते. थोडंबहुत रक्तही सांडतं. संगीताला याचा खूप त्रास होतो. पण तिला काही केल्या हे कळत नाही, की हे दोघं आपल्या प्रेमासाठी भांडत आहेत. तिला वाटत असतं, की हे दोघं आपल्या वडिलांवर गेलेत. म्हणजे ते उगाच आपल्या मार्शल आर्ट एक्स्पर्ट ब्लॅक बेल्ट वडिलांकडून अभिमन्यूप्रमाणे पोटात शिकत आहेत.

तुम्हाला धक्का बसला असेल ना शेवटची ओळ वाचून? पण तोच क्लायमॅक्स आहे. संगीतासाठी भांडणारी ही दोन्ही पात्रं संगीताच्या पोटात आहेत. जुळी भावंडं.. ज्यांचा अजून जन्म व्हायचा आहे. संगीता त्यांची आई.. त्यांच्यासाठी स्वेटर विणतेय.

तिच्या पोटात प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स झाल्यामुळे दोघांपैकी एकच वाचणार असतो. परंतु संगीताच्या असीम प्रेमामुळे दोघेही वाचतात. मात्र, संगीताचा मृत्यू होतो. सुरू केला होता रौद्र रस लिहायला आणि संपला करुण रसाने.. ज्याचा स्थायीभाव शोक आहे.

नाटक लिहून झाल्यावर माझ्या लक्षात आलं, की आपण हे जुळ्यांचं नाटक लिहिलं आहे. कारण मीही जुळ्यांमधला एक. मी या जगात यायला एक तास बावीस मिनिटं घेतली.. माझ्या जुळ्या भावाच्या जन्मानंतर! काहीजण म्हणतातही- की त्या वेळात यानं नक्कीच एक नाटक लिहिलं असणार! कल्पना करायला गेलो तर नाटक सुचलं असेल; पण ते लिहिण्यासाठी शब्द यायला एवढी र्वष गेली असावीत.

ही जुळी भावंडं.. आवळेजावळे करणार कोण? नट असे हवे होते, की जे जुळे वाटायला हवे होते. जेणेकरून क्लायमॅक्स झाल्यावर हे दोघे जुळे पोटात आहेत हे प्रेक्षकांना कळल्यावर त्यांना ते खोटं वाटू नये. पण ते क्लायमॅक्सपर्यंत जे बोलतात, त्यात मात्र विविधता हवी होती. कारण दोघांमधलं वैमनस्य दाखवताना, स्वगतामध्ये द्वेष व सूडभावना मांडताना स्मशान, युद्धभूमी, समाजावस्था, गुन्हेगारी वृत्ती यांवर केंद्रित भाष्य होतं. त्यामुळे स्वगत हे कधी एखाद्या क्रांतिकारकासारखं, तर कधी एखाद्या सीरिअल किलरसारखं लिहिलं गेलं.

मला असं वाटलं, की आपलं हे नाटक समजून करण्यासाठी आपण लेखक अभिनेत्याला घेऊया. नाटकाच्या नशिबाने सौरभ शुक्ला आणि अब्बास टायरवाला हे दोघे खूपच चांगले लेखक मला मिळाले.

सौरभ शुक्ला म्हणजे कल्लूमामाची (‘सत्या’) खूप पात्रं लोकप्रिय आहेत. ‘जॉली एलएलबी’मधला जज्, ‘स्लमडॉग मिलेनिअर’मधला पोलीसवाला.. आणि बरीच. त्यानं मला एकदा शूटिंगला बोलावलं होतं. एक सीन संपवून दुसऱ्या सीनसाठी कपडे बदलायचे होते. मधे अर्धा तास वेळ होता. त्या वेळेत सौरभनं एक गोष्ट मला सांगितली. ती न थांबवता त्यात त्यानं कपडे बदलले, जेवला. मी चहा प्यायलो. आणि बरोबर ‘शॉट रेडी आहे’ असं सांगायला जेव्हा असिस्टंट आला, तोपर्यंत गोष्ट संपलेली होती! हे अतिशय अवघड काम आहे, की एखादं काम करता करता गोष्ट सांगणं आणि वेळेचं भान ठेवून ती संपवणं. तेही गोष्टीचा परिणाम कमी होऊ  न देता. त्यासाठी खूपच अनुभवी नट हवा आणि तो लेखक-दिग्दर्शकसुद्धा हवा. ‘संगीता का नीला चेक्सवाला स्वेटर’मधली लांब स्वगतं म्हणायला सौरभपेक्षा दुसरा नट मला आजही दिसत नाही. त्याच्या बोलण्यात एक कमालीची सहजता आहे. कधी कधी कळतच नाही, की हा आपल्याशी बोलतोय की अभिनय करतोय! सौरभची देहयष्टी, चेहरा आणि त्याच्यात असलेली निरागसता नाटकासाठी नक्कीच पूरक होती.

जुळ्यांतल्या दुसऱ्या भावासाठी मी जेव्हा अब्बास टायरवालाला विचारलं तेव्हा तो म्हणाला होता की, ‘‘मला अभिनयाचा तेवढा अनुभव नाही.’’ पण मला वाटलं, सौरभबरोबर अब्बास छान वाटेल. सौरभ अंगानं भरलेला, तर अब्बास बारीक. चेहरा लांबट. टोकदार नाक आणि मोठे डोळे. दोघांच्यात एक कॉमन होतं, ते म्हणजे डोक्याला टक्कल. दोघांनीही ‘आम्ही उरलेले केससुद्धा प्रयोगाआधी शेव्ह करू,’ असं सांगितलं.

आता एका अनुभवी नटाबरोबर तसा हुशार, पण नट म्हणून नवा असलेला कसं बरं आपलं वर्चस्व ठेवणार? अब्बासमध्ये एक खूपच चांगला गुण होता. तो म्हणजे रिहर्सलला तो आला की डोक्यात आणखी काही नसायचं. कारण तो मल्टिटास्किंग माणूसच नाही. सौरभचंही तसंच. रिहर्सलला आल्यावर शूटिंगचे किस्सेसुद्धा नाही.

मी नाटक बसवताना एक गंमत केली होती. सौरभ आणि अब्बास यांच्या तालमीच्या वेळा वेगळ्या ठेवल्या. त्यामुळे दोघांनाही माहिती नव्हतं, की दुसरा काय करतोय. कारण नाटकात तसंच होतं. फक्त दुसऱ्या अंकात ते एकत्र आल्यावर तालमीला एकत्र बोलावलं. तुम्ही मनात म्हणाल, की नाटक बसवताना याचा काय उपयोग? कारण नाटकाचा प्रयोग तर एकत्रच करायचा असतो. अगदी बरोबर. पण कधी कधी स्वत:लासुद्धा वेगळ्या पद्धतीनं एक्साइट करावं लागतं. नाटक लिहिताना मी खूप प्रयोग करतो. पण त्यावेळी मी एकटाच असतो. मला स्वत:ला फक्त नाटकाच्या बाजात ठेवावं लागतं. पण दिग्दर्शक म्हणून नटांना खूप एक्सायटेड ठेवावं लागतं आणि मला कधीच नटांचा अपमान करता आला नाही वा त्यांना नाखूश करता आले नाही. मला नेहमी वाटतं, की कलाकाराला कलात्मक व्हायला जीवनाचं बॅलन्स्ड चाक हवं. ते नसलं तर प्रेमाचं हॅण्डल असावं. माझ्याबरोबर काम करणाऱ्या नटांना नक्कीच माहीत होतं की, हे नाटक किती चालेल माहीत नाही, पण याच्याबरोबर एकदा काम करून घेऊ या!

संगीताच्या पात्रासाठी मला अशी बाई हवी होती, जिला पाहिल्याबरोबर असं वाटलं पाहिजे, की ती सौरभ आणि अब्बासची आई आहे. अनुराधा टंडन ही पाच फूट अकरा इंच उंच बाई. डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि पत्रकार. ‘गोवा पोर्तुगीज’च्या (मुंबईतील एक रेस्टोबार) मालकीण दीपा अवचट आणि डॉ. सुहास अवचट यांच्याबरोबर मिळून महिन्यातून एकदा ‘अड्डा’ नावानं एक छान चळवळ त्यांनी सुरू केली होती. जिथे अगदी गोविंद निहलानी, विक्रम चंद्रा, दीप्ती नवल, सुधीर मिश्रा, कुंदन शहा, जयंत क्रिपलानी असे विविध कलाक्षेत्रांतले मान्यवर यायचे, नवखे यायचे. त्यांच्यासमोर काहीजण आपले विचार, कला, कविता सादर करायचे.

अनुराधानं मला आमंत्रित केलं होतं. खरं तर अनुराधाला मला या बऱ्याच टॅलेण्टेड दिग्गजांसमोर पेश करायचं होतं. मी माझं नवीन लिखाण तिथं वाचायचो. फक्त माझी वाचनशैली वेगळी होती. माझ्या वाचनाबरोबर टेडी मौर्य हा फ्ल्यूट आणि साइड रिदम घेऊन बसायचा. त्यामुळे माझं कथानक हे जिवंत व्हायचं. मला आठवतंय, जयंत क्रिपलानी मला म्हणाले होते, ‘‘पहली बार ‘राधा निवास’, फिर ‘शाहरुख बोला खुबसूरत है तू’, अब देखते हैं तिसरी बार में मारते हो या नहीं!’’ आणि मी ‘बसंत का तीसरा यौवन’ वाचलं होतं. ती गोष्ट म्हणून वाचली आणि पुढे त्याचं नाटकात रूपांतर झालं. अनुराधामुळे वीस र्वष आधी ही ‘अल्टरनेट स्पेस’ तयार झाली होती. दीपा अवचट आणि सुहास अवचट या दाम्पत्यानं ‘गोवा पोर्तुगीज’ या कार्यासाठी फ्री देणं आणि त्यात काही स्टार्टर्ससुद्धा फ्री देणं, हे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन होतं.. कलात्मकतेला!

अनुराधा- जिनं ‘अड्डा’ या चळवळीला जन्म दिला. मला असं वाटलं, की तीच संगीता होऊ  शकते. तिनंही नाटकात कधी अभिनय केला नव्हता. पण मला तिच्याबद्दल खूपच विश्वास होता. फारशी मेहनत न घेताही तिनं आई उत्तम उभी केली. सौरभ आणि अब्बास तिची मुलं वाटली.. आणि संगीताचा नीला चेक्सवाला स्वेटर विणून झाला!

जय आई! जय जुळी! जय नाटक!

mvd248@gmail.com