08 July 2020

News Flash

‘माळय़ाच्या मळय़ामंदी..’

दुपारच्या वेळी आकाशात काळे ढग भरून आले असताना, वाऱ्यानं झाडांची पानं सळसळ करत असताना, पाऊस कधीही येईल अशा बेतात असताना ऐकायचं संगीत हे ‘कंट्री’ आहे.

| July 13, 2014 01:12 am

दुपारच्या वेळी आकाशात काळे ढग भरून आले असताना, वाऱ्यानं झाडांची पानं सळसळ करत असताना, पाऊस कधीही येईल अशा बेतात असताना ऐकायचं संगीत हे ‘कंट्री’ आहे. आपण पॉप संगीत ऐकलेलं, बघितलेलं असतं. मायकल जॅक्सन तरी निदान आपल्याला ठाऊक असतो. रॉक संगीताचा डमरू सध्या नित्य वाजत असल्यानं तेही कानावर पडलेलं असतं. (आणि ‘लयपश्चिमा’च्या वाचकांना तर ते आता नीटच ठाऊक आहे.) ‘जॅझ’ संगीत हा निदान शब्द तरी आपल्याला ठाऊक असतो. पण अजूनही पुष्कळांना ‘कंट्री’ संगीताचा पत्ता नसतो. अमेरिकेत संध्याकाळी आणि रात्री रेडिओवर ऐकलं जाणारं सगळ्यात प्रसिद्ध संगीत ‘कंट्री’ आहे, हेही आपणास ठाऊक नसतं. नॅशव्हिल गावचा कंट्री संगीताचा जलसा रेडिओवर १९२५ सालापासून आजपर्यंत दर शनिवारी ‘ग्रँड ओल् ओप्री’ या नावानं भरतो आहे, हे तरी आपल्याला कसं ठाऊक असणार? आणि हेदेखील, की मराठी भावसंगीताला अर्थाच्या, आशयाच्या, संगीताच्या दृष्टीनं सगळ्यात जवळ जाणारं पाश्चात्त्य ‘पॉप्युलर’ संगीत हे ‘कंट्री’ संगीत आहे!
‘कंट्री’ म्हणजे देश अथवा प्रांत हे आपण शाळेत शिकतो. ‘कंट्रीसाइड’ म्हणजे ‘गावाकडचा परिसर’ हेही भाषा शिकता शिकता कळतं. पण ‘कंट्री संगीत’ हा शब्द भाषेच्या पुस्तकात येत नाही.. संगीताच्या तासालाही उच्चारला जात नाही. पण त्यामुळे केवढय़ा अपार आनंदाला मुकतो आपण! ‘कंट्री’ संगीत हे तरल संवेदनांचं गाणं आहे. त्यामध्ये कर्कश्श वाजणारी इलेक्ट्रिक गिटार नाही. टणाटण वाजणारे ड्रम्स नाहीत. त्यात विद्रोह नाही, तर समजूत आहे. ते गाणं शहरात सजलेलं, नटलेलं ‘पॉप’ नाही; तर गावाकडचं मधाळ गाणं आहे. ‘कंट्री’ संगीतामध्ये खरोखरच गावाकडचं आयुष्य चितारलेलं असतं. सहज, साध्या शब्दांचं, भावनांचं आणि स्वरांचं ते गाणं आहे. आणि ते आपल्याला मुळीच परकं वाटत नाही. पहिल्यांदा ऐकतानादेखील नाही. तुम्ही जर कुठलंच इंग्रजी गाणं कधीच ऐकलेलं नसेल तर ‘कंट्री’ संगीतापासून सुरुवात करा. तुम्हाला बाबूजींचं, गदिमांचं एखादं गाणं इंग्रजीत ऐकतो आहोत असं वाटेल. हे पाहा ना :
‘माळय़ाच्या मळय़ामंदी, पाटाचं पाणी जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीत’
हे गाणं सर्वार्थानं ‘कंट्री’ संगीत आहे. त्याचा परिसर गावाकडचा आहे. त्याची चाल लोकसंगीताला जवळची आहे. (‘आनंदघन’ ऊर्फ लताबाईंना जाता जाता या चालीसाठी सलाम!) त्यामधली वाद्यं ही ‘कंट्री’च्या फिडल, व्हायोलिनसारख्या वाद्यांशी नातं सांगतात. काळजाला चटकन् भिडणारे त्या गाण्याचे सूर आणि ‘राइड, रेंजर राइड’सारख्या ‘कंट्री’गीताचे सूर यांत फारसा फरक नाही.
अर्थात काळाच्या रेटय़ात तो खेडवळ, ग्रामीण बाज तसाच्या तसा राहणं अवघड होतं. ‘कंट्री’च बदलली, तर ‘कंट्री’ संगीतदेखील बदलणारच ना! जागतिकीकरणाच्या लोंढय़ामध्ये आज अनेक गावं वाढत, एकवटत लघु शहरं वसताहेत. आणि मोठय़ा शहरांमध्ये कितीतरी गावंच्या गावं स्थलांतरित होत आहेत. तेव्हा ते ‘कंट्री’ संगीत काही पर्वतांमधलं, शेतांमधलं, नदी-डोंगरांमधलं गाणं राहिलेलं नाही. खरं तर आज गावातली माणसंच नव्हे, तर संगीताचे प्रकारही स्थलांतर करीत आहेत. तेव्हा ‘कंट्री’ संगीतानं कधी रॉकला जवळ करावं, कधी पॉपला स्पर्श करावा (कंट्री पॉप), हे स्वाभाविकच मानावं लागेल. पण त्याच्या गाभ्यात असलेलं ते मधाळ, गावाकडच्या निसर्गाचं आणि माणसांचं गाणं अजूनही जिवंत आहे. कंट्रीइतकं मनाचा तळ ढवळून काढणारं संगीत दुसरं क्वचित्च कुठलं असेल. रॉक हे शरीरानं ऐकायचं गाणं आहे. पॉप हे या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्यायचं गाणं आहे. जॅझ संगीत हे मेंदूनं सजगपणे ऐकायचं गाणं आहे. पण ‘कंट्री’ संगीताचा आस्वाद घ्यायला फक्त एक साधं मन लागतं. मग ते निबर झालेलं का असेना! ‘कंट्री’ संगीत त्या निबर मनाच्या आतलं उरलंसुरलं हळवंही उपसून बाहेर काढेल इतक्या ताकदीचं आहे.
‘कंट्री’गीत हे एखाद्या पॉप गाण्याइतकंच तीन ते पाच मिनिटांचं असतं. पॉपसारख्याच प्रेम, अनुराग, आकर्षणाच्या भावना ‘कंट्री’मध्ये असतात. दोन्ही संगीतप्रकार कधी कधी एकमेकांना छेदून जातात. तरीही ‘कंट्री’ लगेचच कानांना वेगळं कळण्याचं कारण म्हणजे त्याचा अगदी स्वतंत्र असा नाद! व्हायोलिन, बँजो, माऊथ ऑर्गन, अ‍ॅकॉस्टिक गिटार्स, फिडल्स यांसारख्या वाद्यांनी तयार झालेला. शिवाय कंट्री गाण्याची सुरावट ही सहसा सरळसोट, मेलडीला हार्मनीपेक्षा प्राधान्य देणारी असते. (अशोक पत्कींची गाणी ही इंग्रजीत नेली तर ‘कंट्री म्युझिक’ चार्टस्मध्ये सहज नंबर पटकावतील. त्यांच्या चालीचं सहजपण हे कंट्रीला जवळचं आहे. पुन्हा शब्द वाचा : सहजपण; सोपेपण नव्हे!) खेरीज कंट्री हे काही केवळ संगीत नाही, तर ती संस्कृतीही आहे. ते शेतावरचे घोडे, शेतीची अवजारं, घोडय़ावर रपेट मारणारे ‘रोडिओ’ मर्द, काऊबॉय टोप्या, लेदरचे दणकट बूट, जीन्सचं जॅकेट आणि थोडंसं रांगडेपण.. (रॉकसारखी शिवीगाळ ‘कंट्री’मध्ये नाही.)
‘कंट्री’ संगीताची गोडी सहज लागते. रॉकसारखं त्याची गोडी समजून घ्यायला प्रयास करावे लागत नाहीत. आणि एकदा ते मधुर सुरांचं रसायन प्यायलं, की वेळी-अवेळी ते नित्य आठवत राहतं. तुमच्या जगण्याला मागे एक आधाराचा फिडल.. शेला पांघरत राहतं! कालचीच गोष्ट. मी गणेश मनोहर कुलकर्णी यांचा लेख वाचत होतो. (जुलै ‘अंतर्नाद’) कुलकर्णी रेल्वेचालक आहेत. ते रेल्वे चालवत असताना कुठूनतरी एक फुलपाखरू येऊन ब्रेक हँडलवर बसतं. त्यांना शांता शेळक्यांचा हायकू आठवतो. आणि मग त्यांना अचानक लक्षात येतं की, गाडी ५०-६० कि. मी. पुढे आलेली आहे. घरापासून दूर आलेलं हे फुलपाखरू पुन्हा आप्तांना भेटू शकेल? ते अतिशय तरल संवेदन वाचताना माझ्याही नकळत मागे ‘बटरफ्लाय फ्लाय अवे’ हे ‘कंट्री’ गाणं सुरू झालं. (खूपदा वाचताना आपल्या मनामागे कुठलंतरी पाश्र्वसंगीत सुरू असतं, हा माझा आणि माझ्या पुष्कळ वाचक-मित्रांचाही अनुभव आहे.) ‘हॅना मोन्ताना’ चित्रपटामधलं ते गाणं तुम्ही हा लेख वाचल्या वाचल्या बघा. ऐका. माझ्या फेसबुकवर मी ते गाणं टाकतो आहे. एक षोडशा कन्या आणि तिचा बाप शेतावरच्या टेकाडावर एका खोपटय़ापाशी बसलेले आहेत. मुलगी मोठी होतेय आणि बापाला गाता गाता म्हणते आहे, ‘‘तू माझे कपडे करायचास. झोपण्याआधी ब्रश करून घ्यायचास. झोपताना अंगाईगीत गायचास. रात्र मग कशी निवांत पार पडायची.’’ आणि मग समज आलेल्या त्या मुलीला एकाएकी जाणवतं-
“You had to do it all alone
Make a living; make a home.”
घरचं आणि दारचं सांभाळताना मेटाकुटीला येणारे अनेक पालक मला मग आठवतात. आणि मग वाटतं, अरे, हे गाणं त्या साऱ्यांचं आणि त्यांच्या मुलांचंही! गाणं पुढे सुरू राहतं. एका टप्प्यावर ती तिच्या बाबाला तिच्यासोबत गाणं म्हणायला सांगते. मागे केवळ गिटार. मग हलकं व्हायोलिन. ड्रमबिम काही नाही. कॅमेरा शेतापलीकडे पसरलेलं हिरवंगार जंगल टिपतोय. ते दोघं गाताहेत. त्यांच्या डोक्यावर फिरणारं पिवळं फुलपाखरू कॅमेरा टिपतो आहे. बाबा गाऊ लागतो.
“Caterpillar in the tree,
now you wonder who you’ll be.”
(‘सध्यातरी झाडावरची आहेस छोटी अळी
कुणास ठाऊक, कधी मिळतील पंख सोनसळी!’)
पण ती अळी बघता बघता फुलपाखरू होतेच. आणि मग बापाला एकदम कडकडून जाणीव होते, की अरे, झालीच की ही पोर मोठी! आणि पंखांत बळही आलंय तिच्या आता. आणि याच सुंदर क्षणी निरोपही घ्यायचा असतो. कारण-
“Got your wings now you can’t stay
Take those dreams and make them all true.”
(‘पंखात आलीय ताकद, आता हवेत भरारी घेशील
पोरी, तुझी-माझी स्वप्नं आता खरी करशील!’)
अन् मग उडूनच जातं ते फुलपाखरू! राहत नाही घरामध्ये. घर मोकळं होतं. मुलं नोकरीसाठी, शिक्षणासाठी घराबाहेर जातात तेव्हा अमेरिकन आणि भारतीय पालकांचा आतला फडफडाट आणि टाहो (वरवर फरक वाटला तरी!) सारखाच असतो. पाखरू उडतं आणि घर मोठं वाटू लागतं. तरुण चेहरे घरात येईनासे होतात. घराचं चैतन्यच कुणी चोरतं. तेव्हा.. त्या क्षणी तुम्ही हे ‘कंट्री’ संगीत ऐका! जुनी आनंदी आठवण काढत ते गाणं हुंगून घ्या. डोळे मिटा शांतपणे आणि ते सूर आत आत ओढत राहा. मी हे जे सारं लिहिलंय ना, ते विसरून जा. बघा, ‘कंट्री’ संगीताचा अर्कच तुम्हाला गवसलेला असेल. आणि आपल्या जगण्याला एखादं साधं-सोपं गाणं कसं चटकन् सावरून घेतं याची सुखद जाणीवही तुमच्या आत हलके हलके पसरत असेल. बघा, तुमच्या मळ्यामध्येही गुलाब, जाई, जुई फुलत असेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2014 1:12 am

Web Title: maney do not know country music
Next Stories
1 कुसुमाग्रजांचे हिप-हॉप!
2 हिपहॉप-पठण!
3 सागरा प्राण तळमळला..
Just Now!
X