|| मकरंद देशपांडे

चित्राचा महादेवावरचा राग दाखवताना संजनाच्या मुखातून येणाऱ्या एखाद्या जंगली श्वापदाच्या ‘घर्घघर्घघर्घ..’ अशा भीतीदायक हुंकाराच्या ध्वनीमुळे तालमीत एक प्रकारची भीषणता निर्माण झाली होती. अशा वेळी मी मोलीना सिंग- जी मणिपुरी लोकनृत्यात आणि गाण्यात पारंगत होती- तिला हळुवारपणे आलाप म्हणत प्रवेश करायला सांगितलं आणि संजनाच्या आक्रोशाला शृंगाराची सावली मिळाली. रांगडय़ा धनुर्धर चित्राला तिचं सौंदर्य मिळाल्याचा भास झाला आणि जंगलाशिवाय तालमीच्या जागेत भर दुपारी घामाच्या धारा वाहत असताना मात्र ध्वनीलहरींतून टागोरांचं काव्यात्म मणिपूर जंगल उभं राहिलं.

संजना ‘ताय-ची’ हा मार्शल आर्ट फॉर्म शिकत होती. त्या आर्ट फॉर्मच्या हालचाली नृत्यासारख्याच सुंदर असतात. मोलीनाचं लोकनृत्य हे स्वर्गातून उतरलेल्या एखाद्या नर्तिकेइतकंच देखणं होतं. मला दिग्दर्शक म्हणून अपेक्षित असलेलं गद्य आणि काव्य यांचं मीलन त्यातून मिळालं. चित्राच्या मनातला संघर्ष आणि मग मिळालेल्या सौंदर्याचा हर्ष संवादाशिवाय तीन मिनिटं बांधला गेला तेव्हा मला वाटलं- मला दिग्दर्शन करता येतं.

केकेनी अर्जुन करताना काय करावं, काय करू नये यावर थोडी चर्चा झाली. अर्जुन या पात्रात पराक्रमी, बलशाली गुण असलेला अर्जुन न दाखवता टागोरांना दिसलेला कवी, संत अर्जुन दाखवावा असं ठरलं. अर्जुनामध्ये विषादहीन हा गुण जरी महाभारतातल्या युद्धात श्रीकृष्णाचा उपदेश (श्रीमद भगवद्गीता) ऐकल्यानंतर आला असला तरी दु:ख होऊ न देणं हे संतांचं लक्षण टागोरांनी चित्राच्या शेवटी लिहून ठेवलं होतं. तालमीला केकेच्या कोमल, काव्यात्म, चपळ हालचालींमुळे विलक्षण वेग मिळाला. कवी अर्जुन साकार करताना अर्जुन चंचलही होऊन गेला.

सुंदर चित्राचं प्रथमदर्शन दाखवतानाचा प्रभाव आणि त्यानंतरचा प्रभाव हा एखाद्या रसानं भरलेल्या फुलातल्या मधाला पाहून वेडावून गेलेल्या भ्रमराप्रमाणे भ्रमिष्टावस्थेपर्यंत नेता आला. केकेमध्ये भगवान विष्णूच्या अवतारातील वामन अवतारीत झाला होता. तो जणू काही एका पावलात रंगमंचाच्या एका िवगेतून दुसऱ्या िवगेत पोहोचायचा. दुसऱ्या पावलात मणिपूरचा डोंगर चढायचा आणि तिसरं पाऊल म्हणजे तो एका जागी उभं राहून नजरेनं सभोवताली पसरलेलं जंगल (प्रेक्षक) जिंकायचा.

जंगलातला डोंगर- म्हणजे चित्राच्या रागावलेल्या मन:स्थितीतला डोंगर- जो फक्त मातीचा, हिरवंपण नसलेला- उभा करण्यासाठी दोन मोठय़ा तारपोलीनचा वापर केला. त्या तारपोलीनच्या कापडाला आपल्या शाळेतल्या चित्रकलेच्या वहीत जसा आपण त्रिकोणी डोंगर काढायचो तसा डोंगराप्रमाणे त्रिकोणी उभा केला. त्याची उंची वीस फूट होती. स्टेजच्या उजवीकडे साडेतीन फुटी दोन लाकडी त्रिकोण वापरले. वीस फुटी डोंगरावर पोहोचल्यावर चित्रा आणि अर्जुन या साडेतीन फुटी त्रिकोणाभोवती फिरायचे आणि तो डोंगरमाथा असल्याचा भास निर्माण करायचे.

प्रॉपर्टीचा उपयोग करून काही प्रवेश साकारले गेले. सुंदर चित्राला पाहिल्याबरोबरचा प्रभाव दाखवण्यासाठी अचानक मंचावरचा बंद करून दहा सेकंदांत पुन्हा उघडून त्या ठिकाणी शंभर ज्योतींचा तेलाचा मोठा दीपस्तंभ प्रज्ज्वलित केला. चित्रा सुंदर झाल्यावर तिला जंगलातल्या नदीत विहार करताना दाखवण्यासाठी चार बाय पंचवीस फुटांचे दोन निळे पडदे तयार केले आणि त्यावर निळा प्रकाश पडला की असं वाटावं, जणू चंद्राचा प्रकाश पाण्यावर चंदेरी चादर बनवतोय. याकरता त्यावर चंदेरी टिकल्या चिटकवल्या. असेच दोन पडदे रंगमंचाच्या डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे क्रॉस पसरवले. बरोबर मध्यावर जिथे ते कपडे क्रॉस झाले त्यावर एक टोपली ठेवली. त्या टोपलीत चित्रा बसली. जसजशी ती टोपली स्टेजवर फिरली, वर पसरलेले निळे पडदे चंदेरी प्रकाश टाकत टोपलीकडे खेचले जाऊ लागले आणि प्रेक्षकांना असं वाटलं की चित्रा नदीत विहार करतेय. पृथ्वी थिएटरला बसण्याची जागा ही वर वर जाणारी असल्याने रंगमंचावर पसरलेले पडदे हे प्रेक्षकांना पाण्याचा भास करून गेले. दरोडेखोर येणार म्हणून घाबरून गावकरी ज्या रुक्ष रानात जमले, ते रुक्ष रान असंख्य खराटय़ांच्या साहाय्यानं उभं केलं.

पंडित सत्यदेव दुबे नेहमी म्हणायचे की, पात्रांची एन्ट्री ज्या पद्धतीनं दाखवली जाते त्यावर त्याचं महत्त्व अवलंबून असतं. चित्राची एन्ट्री विलक्षण असावी असं मला वाटलं. पण नाटकाच्या सुरुवातीला तर ती महादेवाला कोसत तप करतेय. मी क्रिएटिव्ह लायसन्स घ्यायचं ठरवलं आणि चित्राला झाडाच्या फांदीवर उलटं लटकवत ठेवायचं असं ठरलं. पण दिसताना प्रेक्षकांना तिचा उलटा चेहरा लटकताना दिसायला हवा, तरच ते अधिक परिणामकारक ठरेल असंही वाटलं.

पृथ्वीच्या कॅटवॉकवरून एक रस्सी खाली सोडली. समोर काळा पडदा सोडला. प्रयोगाची वेळ झाली. संजनानं सांगितलं की, शशी कपूरसाहेब नाटक बघणार याचा आनंद तर झालाच, पण त्यांच्या मुलीच्या एन्ट्रीचा विचार करून मी थोडा भांबावलो. कारण रस्सीवर भरवसा रस्सीभरच ठेवता येतो.

मी चित्राचे लाइट्सही करायचो. पण त्या प्रयोगासाठी पहिला लाइट देण्यासाठी मी एका दुसऱ्या माणसाला लाईट रूममध्ये पाठवलं आणि स्वत: संजनाला रस्सीवर लटकवलं. शो सुरू झाला. अंधारात मी समोरचा पडदा बाजूला केला आणि उलटय़ा लटकवलेल्या संजनाला पुढे धक्का मारला. संजना ओरडली. फूट लाइट म्हणजे जमिनीवर ठेवलेला स्पॉट ऑन झाला. त्यात उलटय़ा संजनाचा ओरडणारा चेहरा प्रेक्षकांना दिसला. तो जवळ जवळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता. पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकांकडून संजनाच्या ओरडण्याला प्रतिध्वनी मिळाला. लाइट्स ऑफ. तिला खाली उतरवलं. मी लाइट रूममध्ये गेलो. पुढचा लाइट ऑन केला. संजना आता गुहेत पद्मासनात बसलेली. सुरुवात एकदम झकास झाली. शशी कपूर प्रेक्षकांत बसल्याने प्रेक्षकांची डोकी आणि मनं त्यांच्याकडे वळलेली होती. पण त्यांच्या मुलीच्या अशा एन्ट्रीमुळे सगळे थक्क झाले. नाटक पुढे तालबद्ध सुरू राहिलं आणि मनात विचार आला की, ज्या शशी कपूर आणि जेनीफर कपूरने हे पृथ्वी थिएटर बांधलं त्यात त्यांची मुलगी काम करतेय आणि तिचे डॅड प्रेमानं पाहत आहेत.

प्रयोगानंतर शशी कपूरसाहेब मला म्हणाले, ‘‘तू धाडसी आहेस. माझ्या मुलीला उलटं लटकवलंस.’’ आणि हसले. त्यांचा हसरा चेहरा पाहणं हे फुलाला उमलताना पाहण्याइतकंच सुंदर. संजनाला म्हणाले, ‘‘तू छान काम केलंस. यापुढेही अ‍ॅक्टिंग करत राहा.’’ प्रेक्षक नाटक बघून भारावून गेले होते.

चित्रा आणि अर्जुनचे कॉस्च्युम्स टेडी मौर्याने मशीन मागवून पृथ्वी थिएटरच्या मागे बसून स्वत: शिवले होते.

चित्राच्या प्रयोगाला कौतुकाची जी पावती अमोल पालेकर सरांनी दिली ती तर मी कधीच विसरू शकणार नाही. ते म्हणाले, ‘‘मॅक, मला नाटक खूप आवडलं. आणि यापुढे जर तुझं नाटक एखाद्या अशा ठिकाणी असेल, जिथे ट्रान्सपोर्ट नसल्याने चालत पोहोचायचं असेल तरी मी चालत येईन आणि तुझं नाटक पाहीन.’’

दिल्लीतील एनएसडीच्या थिएटर फेस्टिव्हलमध्ये रामगोपाल बजाजमुळे ‘चित्रा’चा शो झाला. शो पाहायला भारतीय नाटकाच्या इतिहासातील खूप महत्त्वाचे रंगकर्मी बाबा कारंथ आले होते. प्रयोगानंतर त्यांनी माझे हात धरले आणि ते माझ्याकडे पाहतच राहिले.

जय बाबा! जय अमोलदा!

जय टागोर! जय चित्रा!

mvd248@gmail.com