|| समीर गायकवाड

गावाबाहेरच्या आमराईतून जाताना सावल्यांचा काचिबदी खेळ अंगावर झुलत राहतो. कवडशांच्या गर्दीतून अंग झटकत दोन कोस चालत गेल्यावर केकताडांनी वेढलेला ‘झिपरीचा माळ’ लागतो. दहा-बारा एकराचं हे सगळं रान सुपीक मातीचं. इथं नांगराचा फाळ कधी लागला होता, हे गावातलं कुणीच सांगू शकत नव्हतं. काळीभोर मऊशार जमीन असल्यानं घासगवतापासून बोरी-बाभळीपर्यंतची सगळी झाडं एकमेकाच्या अंगाला खेटून पार फांदीत गळे गुंतवून ताठ उभी होती. आमराईपासून नजर टाकली की हे एक जंगलच वाटे. रात्रंदिवस कानावर पडणाऱ्या पक्ष्यांच्या हरतऱ्हेच्या आवाजांच्या जोडीला मोकाट कुत्र्यांच्या वर्दळीने आवाजात काहीबाही भर पडे. झुडपांच्या बेचक्यातून अलगद बाहेर येणाऱ्या साप-मुंगसांचं, विंचू-काटय़ाचं भयही मोठंच होतं. गावाबाहेरील पीरसाहेबाच्या दग्र्याकडून येणारा नागमोडी ओढा येथून पुढे उताराला लागत असल्याने उतरणीची अंगचण असलेल्या माळाच्या कडंनं बारमाही ओल असायची. ओढय़ात असलेल्या दगडधोंडय़ांवर चढलेलं शेवाळ क्वचितच सुकलेलं दिसे. या माळाच्या चहुदिशेने दगडी चळत रचलेले भराववजा बांध होते. ओढय़ाची ओल या गोलाकार बांधात पाझरलेली असल्यानं इथल्या दगडांच्या कपारीत उगवलेली केकताडं जोमात दिसत. आमराईकडून येणाऱ्या वाटेनं मधे येणारा आडवा बांध टोकरून त्यात पाऊलवाट बनवलेली. माणसांनी ये-जा करून ही नागमोडी वाट एकदम पक्की केलेली. आषाढात सगळ्या माळावर चिखल असला तरी या वाटेवरनं सहज ये-जा व्हायची.. इतकी या वाटेवरची माती टणक झालेली. गावात दिवेलागण झाली की या पायवाटेवरची ये-जा वाढलेली राही. उदबत्तीचा धूर हवेत विरावा तसा उजेडात अंधार मिसळत गेला की झिपरीच्या माळाबाहेर दोन-चार निलट माणसं रेंगाळताना दिसत. त्यांना कुणी हटकलं की ती खोटी खोटी हसत. उसनं अवसान आणून रामराम ठोकीत पुढं निघून गेल्यासारखं करीत. विचारपूस करणाऱ्याची पाठ वळली की पुन्हा माघारी फिरत. डोळ्यात बोट घातल्यावर समोरचं दिसेनासं होईल असा घनगर्द अंधार पडल्यावर मात्र तिथल्या वर्दळीची भीड चेपलेली राही. सपासप ढांगा टाकत केकताडं ओलांडून झिपरीच्या माळातल्या झाडाझुडपांत ही माणसं दिसेनाशी होत.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

झाडांच्या गर्दीतून फर्लागभर चालत गेलं की औदु पाटलांचा भग्न वाडा लागतो. चौसोपी बांधणीचा आणि भारीभक्कम दगडी चिऱ्यांचा हा वाडा आता अवशेष स्वरूपात बाकी आहे. वाडय़ाबाहेरच्या पडवीत दगडफुलं उगवलेली. गाजरगवताने थमान घातलेलं. वाडय़ाभवतालची दगडी कुंबी ढासळून त्याचे ढिगारे झालेले. अर्धवट पडक्या अवस्थेतल्या मोठय़ा ताशीव दगडांच्या अजस्र भिंती. वाडय़ाच्या गतकालीन वैभवाच्या दुखऱ्या खुणांच्या दार्शनिक मजबूत आढय़ाचं छप्पर कोसळून त्याचीही धूळधाण उडालेली. सर्वत्र दगडांचे भग्न अवशेष. त्यातून डोकावणारी रानटी झुडपं. पडक्या भिंतींच्या आतल्या बाजूने देवळ्या कोळ्याच्या जाळ्यात गुरफटून गेलेल्या. त्यात कधीकाळी शेकडो दिवे, पणत्या लवलवल्या असतील. त्यांच्या उजेडात औदु पाटलांचा वाडा झगमगून उठला असेल. खंडीभर माणसांचा राबता असेल. दुधदुभत्याने घर न्हाऊन निघत असेल. धान्यानं कणग्या खच्चून भरलेल्या असतील. कपडय़ालत्त्यांनी अलमाऱ्या ओसंडत असतील.

बत्तीस खणांचा वाडा होता तो. वाडा कसला? भक्कम गढीच होती ती! मधल्या चौकाला लागून चार दिशांना लांबसडक ऐसपस सोपे होते. एका सोप्यावर पाळणा असायचा. कर्रकर्र आवाज करणाऱ्या पाळण्यावर बसलेले औदु पाटील मिशांना पीळ देत बसलेले असायचे. एका ओवरीवर पोत्यांची चळत लावून ठेवलेली असे. माजघरात भल्यामोठय़ा चुली होत्या. भांडी ढिगानं होती. फुकाऱ्यांनी पांगवलेला धूर जाण्यासाठी सवनी होती. पडवीतल्या वृंदावनामागं सरपणाची स्वतंत्र खोली होती. सोप्यांच्या मागं प्रशस्त हवेशीर खोल्या होत्या. खोल्यांना शिसवी दरवाजे होते. वाडय़ाचं भक्कम प्रवेशद्वार कलाकुसर केलेल्या सागवानाने सजलेलं होतं. कधीकाळी घरधन्याने बारमाही दुधातुपात बोटं बुडवलेल्या त्या वाडय़ात आता रात्री-अपरात्री येणाऱ्या लोकांनी मुताऱ्या करून ठेवलेल्या. जिकडं तिकडं कोपऱ्या-कोनाडय़ांत नुसता उग्र दर्प भरलेला.

वाडय़ात शेकडय़ाने पंगती उठायच्या. काही कार्यक्रम असला की गावजेवण ठरलेलं असे. लक्ष्मी अक्षरश: पाणी भरत होती. कोणत्याही माणसानं आपली दाद-फिर्याद मांडावी.. पाटलांनी त्याला न्याय द्यायचाच. कुणी इथून रिकाम्या हाताने परत गेलेलं नव्हतं. पंचक्रोशीतले अनेक निवाडे इथं झालेले. गावाच्या आडाचं पाणी कमी-जास्त झालं की वाडय़ामागे असणाऱ्या दोन्ही बारवा गावासाठी खुल्या होत. वाडय़ात कुणासही मज्जाव नव्हता. पाटलांची कोणतीही बंधने नसूनही त्यांच्या कुटुंबकबिल्यातील बायका मात्र गोषात राहत. नाकापर्यंत खाली पदर ओढलेला राही. दागदागिन्यांनी मढलेल्या या बायका-पोरी मायाळू होत्या. त्यांच्या रूपानं अन्नपूर्णाच नांदत होती.

औदु पाटलांचा वाडा पिढीजात होता. विशेष म्हणजे गावाबाहेर होता तरीही गावाची शान होता. वाडा गावाबाहेर कसा, यावर बरेच किस्से- कहाण्या होत्या. मात्र, त्या ऐकीव गप्पाच होत्या. काळ पुढे जात राहिला तशी वाडय़ातली वंशावळगर्दी वाढत गेली. वाडा बायकापोरांनी गच्च भरून गेला. त्याचं गोकुळ झालं. भाऊबंदकीचे प्रसंग आले तेव्हा पाटलांनी शेतीवाडी वाटली. जमीनजुमला विभागून दिला. पण वाडय़ाची वाटणी कदापिही केली नाही. काहीही झालं तरी वाडय़ाची शानोशौकत कमी होणार नाही यावर त्यांचा भर असे. ज्या-त्या पिढीतला कर्ता पुरुष हेच धोरण ठेवी. पिढीगणिक जमिनीचे हिस्से पडत गेले, पण वाडय़ात राहणाऱ्या वंशजाला त्याची जमीन कशी, किती घटत गेली हे उमगले नाही. वाडय़ाला याची झळ बसणं क्रमप्राप्त होतं. पण त्याहून भयानक आक्रित वाडय़ाच्या नशिबी होतं. त्याचीच परिणती म्हणून आता वाडय़ातल्या त्या सुखसमृद्धीची, डोळे दीपवणाऱ्या ऐश्वर्याची कोणतीही चिन्हे उरली नव्हती.

वाडय़ाच्या मधोमध असलेल्या चौकात उन्हाळ्यात महिनाभर वाळवण घालायचा कार्यक्रम चाले, तिथं आता वारुळं झालेली. तुळया आणि खांबांचे काही अवशेष बाकी होते- ज्याला पाऊसपाण्याने वाळवी लागलेली. कुठं खिळे बाहेर आलेले, तर कुठं भिंतीत ठोकलेल्या खुंटय़ा बाहेर आलेल्या. लोकांनी काहीच शिल्लक ठेवलेलं नव्हतं. अलीकडच्या काळात ही असली थेरं सुरू झाल्यानं चोराचिलटांबरोबरच चांगलीचुंगली माणसंही तिथं यायची बंद झालेली. दोघंजण एकत्र आंघोळ करू शकतील इतकी मोठी घंघाळं वाडय़ात होती.

सात पोरींच्या पाठीवर झालेल्या औदु पाटलांच्या दिवटय़ा पोरानं परमुलखातून नाचगाणं करणारी देखणी, गोरीपान गुलाबबाई पळवून आणली. त्याला तिच्या हवेलीचा नाद लागला. घरात कुणालाही याची भनक लागू न देता त्यानं तिच्याबद्दल घरात खोटंनाटं सांगितलं. मात्र, पाटलांना संशय आलाच. त्यावरून त्यांच्यात खटके उडू लागले. खरे तर तेव्हाच वाडय़ाला तडे गेलेले. बाप-लेकात रोज भांडणं होऊ लागली. त्यानं आतल्या माणसांसह वाडा खचू लागला. पाटलांनी हात उचलण्याआधी गुलाबच्या जुन्या यारानं अकस्मात धाड टाकून तिला पळवून नेली. पोराला वाटलं, हे बापाचं कारस्थान आहे. त्यानं सूड घेण्यासाठी बापाऐवजी गावाला निवडलं. आडवाटेला कोणत्याही पोरीबाळीच्या अंगचटीला तो जाऊ लागला. पाटलांवरील प्रेमापायी गावकरी आधी गप्प बसले. नंतर पाटलांच्या कानी ही गोष्ट गेलीच. गावाची बेअब्रू सहन न झाल्यानं त्यांनी पोटच्या पोराला विष देऊन मारलं. नंतर स्वत:लाही संपवलं. दरम्यान, त्यांची जीवनसंगिनीही निवर्तली. पाटील गेले आणि वाडय़ाची रया गेली. वाडा भकास झाला. त्यांच्या भावकीने वाडा ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले. पाटलांच्या सात पोरी आणि जावई त्यांना पुरून उरले. यातच वाडय़ाची देखभाल तटली. दिवाबत्ती बंद झाली, तसे अंधाराचे साम्राज्य वाढू लागले. विहिरी बुजवल्या. झाडंझुडपं वाढू लागली तसे चोऱ्यामाऱ्या वाढल्या. तरी बऱ्याचशा वस्तू मुलींनी आपसात वाटून घेतल्या.

काळ पुढे जात राहिला.

बऱ्याच वर्षांनी मुलासोबत परतलेल्या गुलाबने घराण्याचा वारस परतल्याचा दावा केला. त्याचं रूपडं, देहबोली पाहून सर्वाचा विश्वास बसला. पण तो गुलाबबाईचा डाव होता. तिने सगळ्यावर कब्जा मिळवून तिथं उघड अय्याशी सुरू केली. तिचा कावा लक्षात येताच गावकऱ्यांनी थेट वाडय़ावरच हल्लाबोल केला. तिला हाकलून लावलं. पण त्यात वाडा उद्ध्वस्त झाला. पाटलांचा नातू भ्रमिष्ट होऊन तिथंच राहू लागला. बरीच वर्षे त्यानं तिथं एकटय़ानेच काढली. नंतर मात्र त्यानं गावावर खरा सूड घेतला. त्यानं तिथं पुन्हा बाईल आणली. तिची चव गावाला दिली. नंतर एकीच्या दोन झाल्या, दोनच्या चार झाल्या. पंचक्रोशीतून आंबटशौकीन तिथं येऊ लागले. गावातल्या बायकांची अब्रू धोक्यात आली तेव्हा संतापलेलं गाव आता इतरांच्या पोरीबाळींना नासवताना साळसूद होऊन बघत राहिलं. गुलाबबाईच्या झिपऱ्या धरून ओढत आणलेल्या त्या भागातल्या झुडपांच्या बुंध्यांत आता कितीतरी जणींच्या केसांचे गुंते सापडतात. गावानं दिलेलं ‘झिपरीचा माळ’ हे नाव सार्थ झालंय!

sameerbapu@gmail.com