13 August 2020

News Flash

हरवलेली सांज

गवाक्ष

|| समीर गायकवाड

परिवर्तनाच्या कराल चक्रात पिसून निघणाऱ्या ग्रामजीवनात गतकाळी एक सांज होती, जी आता विस्कटून गेलीय. गावाकडची ती सांज नभातून हळुवार उतरत दबक्या पावलानं सारवलेल्या अंगणात दाखल होताच गळ्यातल्या घंटांचा मंजुळ नाद करत सगळं गोधन शेतशिवारामध्ये परते. त्यांच्या खुरांवरची माती गोठय़ात विसावायची. ताठलेली वासरं गाईच्या दिशेनं सुसाट पळत सुटताच गोठय़ांना उधाण येई. दिवसभर उन्हात उभी असलेली पिकं सांजेशी गुजगोष्टी करीत.

पानापानावरली धूळ अलगद हवेत उतरे आणि  तिरप्या झालेल्या बिलोरी सूर्यकिरणांशी बिलोरी खेळत ताल धरून फिरे. हळूच येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेवर ज्वारीच्या ताटांनी अंग झटकून घेताच त्यांना पेंग चढे. त्यांना डोळे मिटताना पाहून करडय़ा तांबडय़ा रानातल्या तुरी खिदळत. केळीच्या तटतटलेल्या पोटऱ्या रात्रीतून येणाऱ्या विणेसाठी सांजेपासूनच तयारीला लागत. शेवरीच्या झाडावरल्या कापसाचा तरंगता संसार तांबूस झालेल्या सूर्यकिरणांना अंगावर आरपार खेळवत राही. सूंऽऽसूंऽऽ आवाज करत उसाच्या फडातून वाहणारा वारा विसाव्याच्या वाटेला जाऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसे. मावळतीच्या जाणिवेनं विहिरीतले पारवे कडय़ाकपारीत जाऊन बसत. ते स्तब्ध होताच सुगरणीचं घरटं बांधायचं काम थांबे. बांधावरल्या बाभळीच्या घरटय़ातली नुकतीच जन्मलेली होल्यांची पिलं चोच उघडून व्याकुळतेनं आईची वाट बघत. नारळाच्या झावळ्या सावल्यांची नवी नक्षी मातीवर काढू लागत अन् आमराईतली घेरदार झाडं उगाच मान वाकवून उदास होऊन जात. चिंचपट्टीतले घनदाट वृक्ष पानगळीच्या डौलदार नक्षीकडे आपल्याच तालात बघू लागत. झाडाझाडांतून पक्ष्यांची किलबिल टिपेस जाऊ लागे. अस्ताला जाणारा सूर्य चराचरांत नव्या चेतना जन्मास घाले.

पश्चिमेची लाली दिगंतातून थेट मातीत उतरू लागे. खुरटय़ा झाडाझुडपांतले रातकिडे अंग झटकून जागे होत आणि निशेच्या गीतगायनासाठी घसे साफ करू लागत. चंद्रमौळी छपरातून घरात शिरणाऱ्या तिरक्या धूसर सावल्या कोनाडय़ातल्या आडोशाला अंग टेकत. आचळाला तोंड लावून आपली तहानभूक भागवणाऱ्या मखमली वासरांना गाई चाटायला लागत तेव्हा केसाची चांदी झालेल्या डोईवर फाटका पदर चापूनचोपून घेतलेल्या बायाबापडय़ांच्या आसावल्या डोळ्यांत तृप्ततेचे मेघ तरळून जात. दावणीला बांधलेल्या म्हशींच्या पुढय़ात कडबाकुट्टीचा घास, आमुण्याच्या पाटय़ा येताच जबडे हलवत त्यांचे एकसुरी चर्वण सुरू होई. मग बळीराजा धारा काढायची पितळी चरवी थंडगार पाण्यानं विसळू लागे. वस्तीवरच्या चुलीतला विस्तव फुरफुरू लागताच भुकेचे गंधवेडे निरोप घेऊन मंद हवा आसमंतात फिरू लागे.

ओढय़ातल्या संथ पाण्याचे आवाज उगाच मोठे वाटत. बांधाबांधावरचे दगडधोंडेदेखील वेगळ्या रंगाचे भासत. गावठाणाकडच्या वाटेवरचा फुफाटा जमिनीवर विसावे. याच वाटेवर असलेल्या नागोबाच्या देवळाबाहेरची विशाल झाडं मनात अकारण काहूर माजवून ओशाळलेल्या सावलीला कवटाळून बसत. विजनवासातल्या जीर्ण, छोटेखानी गाभाऱ्यात किरणांचा अभिषेक घालून काही क्षण सांज रेंगाळत राही. थोडं पुढं गेलं की गावाजवळच्या पीरसाहेबाच्या दग्र्याचे मीनार मेघात लपलेल्या सृष्टीच्या निर्मिकाशी गळाभेट घेत. कलमा पढत असल्यागत त्याचे घुमट कंबरेतून वाकून नमाज अदा करत. तिथल्या अलौकिक गंधाच्या धूप-ऊदाचा दरवळ दूरवर एक आगळी प्रसन्नता घेऊन जाई. वाटेतले खाचखळगे पायाशी मस्ती करू लागत. माथ्यावरल्या दुरडीत माळवं घेऊन शेतशिवारातून येणारे कष्टकरी जीव वेशीपाशी येताच तळ्यातल्या पाण्याच्या थंडगार झुळका त्यांच्या पायांना मालीश करत. मग त्यांचा थकवा कुठच्या कुठे निघून जाई.

घराबाहेर लावलेल्या शेणकुटाच्या गोवऱ्या एव्हाना वाळून गेलेल्या असत अन् त्यांचा एक वेगळाच वास प्रत्येक घराच्या अंगणात तरळे. या गोवऱ्या गोळा करत अंगण लख्ख झाडून घ्यायचं काम कुठं कुठं अजूनही चालू असे. तळ्याकाठची झाडं पाण्यात विरत चाललेलं प्रतिबिंब पाहून उगाच हिरमुसली होत. तिथल्या पानगळीची पानं मात्र आनंदाने स्वत:भोवती फेर धरून पाण्याच्या लाटांवर स्वार होत. हिरव्या- निळ्या पाण्याचं तळं आस्तेकदम शांत होऊ लागे. त्याची हिरवाई काळसर होऊ लागे. स्थिरावलेल्या पाण्यात पाणकोंबडय़ा वेटोळे करून अंग चोरून सूर मारू लागत. आसमंतातले बगळ्यांचे थवे त्रिकोणी आकारात लयबद्ध विहरू लागत. सांज गडद होऊ लागताच पाणंद उगाच भीतीची चादर अंगावर ओढून बसे. पाणंदीतली झाडं उगाचच भकास, उदास वाटू लागत. तिथल्या जुनाट वडाच्या पारंब्या भेसूर वाटत. पिंपळपानाआड बसलेली घुबडे अन् अशोकाच्या झाडांत लटकलेली वटवाघळे जागी होऊ लागत. हळूहळू तिथली वर्दळ घटू लागे. वेगानं रिती होत जाणारी पाणंद एकीकडे असे आणि त्याचवेळी दुसरीकडे वेशीजवळील मारुतीरायाच्या देवळात वाढत जाणारी लगबग दिसे.

देवळातल्या लामणदिव्यांना तेलवात होताच सांज झाल्याची जणू अधिकृत घोषणा होई. ज्यांच्या घरी वीज असे तिथले बल्ब उजळत. अन्यत्र लख्ख पुसून ठेवलेले कंदील जागे होत. काही ठिकाणी बत्तीचे मेंटल भडके. काही दारांजवळील देवळ्यांत बारीक वातीचे दिवे तेवू लागत. दरम्यान, पारावरील गप्पांना वेगळाच कैफ चढलेला असे. सांजेची निळाई पारावरल्या वडाच्या पारंब्यावरून लोंबकळत गावातल्या मातीत उतरे. गप्पांच्या या फडात पानतंबाखूची चंची उघडली जाताच बोलघेवडय़ा लोकांच्या डोळ्यांत चतन्य तरळे. शेतशिवारापासून ऊनपावसापर्यंत अनंत विषयांवरच्या तिथल्या गप्पांचा शेवट आपल्या नेहमीच्या चिंता विठूचरणी वाहून सुफळ होई.

संध्याकाळ सरताना चावडी मात्र भकास वाटे. गावातलाच कोणीतरी गांजलेला, नडलेला अंधाराची प्रतीक्षा करून तिच्या कोनाडय़ात दाखल झालेला असे. मंदिराचा पिवळसर कळस उतरणीच्या आभाळाकडे उद्याच्या दिवसाचे दान मागत तांबूस होऊन जाई. देवळाच्या शिखराभोवती काही उनाड कबुतरं गुटर्गुमचा आवाज काढत पंख फडफडवत बसत. वेगवेगळ्या गल्ल्यांतनं डोईवर पाटी घेऊन ताज्या भाजीपाल्याचं माळवं विकणारे आपापल्या शैलीत आवाज देत फिरू लागत. घरोघरी चुली धडाडत. काही ठिकाणी स्टोव्ह असत. क्वचित एलपीजीसुद्धा असे. चर्र्च आवाज करत पातेल्यांमध्ये आधण चढे. दरम्यान, गल्लोगल्ली पोरांचे खेळ जोमात येत. एकच गलका चोहीकडे उडालेला असे.

बागेतलं फिरणं, शॉपिंगची उनाडकी, बाजारपेठांतली चहलपहल, मॉल्सचा चकचकाट, हातात ताट घेऊन टीव्हीवरील मालिका बघत बसणं, योगा क्लासला जाणं, इव्हीनिंग वॉक एन्जॉय करणं.. असली कोणतीही सोंगं न करता अगदी नजाकतीनं ही सांज गावातल्या मातीत उतरे. तिला नशेची तलफ नसे. पशाचा माज नसे. ज्ञानाचा अहंकार नसे. आपल्याच नादातला एकलकोंडा विखार नसे. शिटय़ा फुंकणारे, हॉर्न वाजवणारे कर्कश्शऽ आवाज तिच्या कवेत नसत. ती भरजरी वस्त्रांत कधीच लपेटून येत नसे. नेसूच्या जुनेर कपडय़ांत ती येई. गावाकडची ही सांज भरल्या डोळ्यानं येऊन पणती-दिव्याच्या वातीत उतरायची आणि घराघरांत प्रकाशाची आभा पसरवायची. पारावर विसावायची. गल्लोगल्ली खेळणाऱ्या पोरांच्या पायांत थिरकायची. मंदिरातल्या टाळ-चिपळ्यांच्या नादात दंग व्हायची. शेतशिवारात मनसोक्त भटकून होताच बळीराजाच्या दमलेल्या पायांशी माथे टेकायची. गाईच्या शेपटीवरून बलाच्या वशिंडावर घसरगुंडी खेळायची. गोठय़ातल्या वासराला झोपी लावून गावातल्या घरात यायची आणि झोळीत टाकलेल्या इवल्याशा देवपावलांचे चुंबन घ्यायची. देव्हाऱ्यात जायची. समईच्या धाग्यात स्वत:ला गुंफून घ्यायची. ढेलजेत येऊन ढांगा टाकायची.

ही सांज सगळीकडे प्रफुल्लता घेऊन यायची. दमलेल्या प्रत्येक खांद्याला विसावा द्यायची. सुखाच्या गुजगोष्टी करायची. मात्र उंबरठय़ाजवळ येऊन थबकताच तिच्याही डोळ्यात पाणी यायचं. कारण दाराबाहेरच्या ओसरीत थकलेभागले जीव उरलेसुरले दिवस मोजत, जुन्या आठवणींना उजाळा देत डोळ्याला पदर लावत बसलेले असायचे. उंबऱ्यापाशी उभं राहून दरवाजाच्या कडीशी चाळा करत नवी हळदओली सून माहेरच्या काचबिंदी आठवणींनी कासावीस झालेली असायची. तिच्या डोळ्यांतला मायबापाचा विरह अन् पडवीत झिरपत असलेल्या चांदण्यांचा आर्त प्रकाश यामुळं हिरमुसलेली सांज तिथून निघून अखेरीस विठ्ठल मंदिराच्या पायऱ्यावर जाऊन मस्तक टेकवी.. आपला शीण घालवे.

एव्हाना रात्रीचा अंधार घनगर्द होऊन गेलेला असे. आणि श्रमलेल्या सांजेला त्यानं आपल्या कुशीत सामावून घेतलेलं असायचं. आईचे मखमली हात पाठीवरून अदृश्य व्हावेत तशी ही सांज काळाच्या ओघात हरवून गेलीय. कासावीस झालेला चंद्रमा मात्र अधूनमधून लिंबाच्या झाडाआड हमसून हमसून रडताना दिसत असतो..

sameerbapu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2019 12:07 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by sameer gaikwad 4
Next Stories
1 ब्रेग्झिट
2 पंचवार्षिक प्रगती हा आर्थिक विनोद!
3 दुष्काळझळा
Just Now!
X