करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या अकल्पित संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची प्रातिनिधिक कथा म्हणजे ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांची ‘लॉकडाऊन’ ही कादंबरी. पुण्यातील एका इंजिनीयर तरुणाची ही हृदयद्रावक कथा. करोनाकाळात गावाकडे निघालेल्या या तरुणाला पोलीस ताब्यात घेतात, त्यातच त्याच्या पत्नीचा विलगीकरण कक्षात होणारा मृत्यू.. अशी अनेक संकटं झेलत करोनाकाळातील भीषण व भेदक चित्र मांडणारी ही कादंबरी मन हेलावून टाकते.

करोनाकाळाने मानवी जीवनाची मोठय़ा प्रमाणात उलथापालथ झाली  याच दरम्यान माणसांमधील अनेक चांगले-वाईट गुण समाजाने पाहिले. जवळच्या नात्यांमधील तुटकपणा पाहिला, तर अनोळखी माणसांनी अशा वेळी दिलेला मदतीचा हातही पाहिला. एकूणच करोनाकाळातील असुरक्षित जीवनाचे यथार्थ चित्रण या कादंबरीतून समोर येते. करोनाकाळात अनेकांनी अनुभवलेलं भयाण सत्य या कादंबरीत प्रतिबिंबित झालं आहे. ही कादंबरी वाचताना करोनाकाळात आपल्या आजूबाजूला अशीच काहीशी परिस्थिती होती याची वाचकाला प्रकर्षांने जाणीव होते. लॉकडाऊनच्या काळातील वेदनादायी प्रसंग या कादंबरीत शब्दबद्ध केले आहेत. ही कादंबरी एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता ती व्यापक होऊन जाते. तिचं अनुभवविश्व व्यापक होऊन जातं. एका कुटुंबाची ही कथा समाजाचे विदारक चित्रण करते. समाज, राजकारण, आरोग्य व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा अशा अनेक पैलूंना स्पर्श करताना सामान्य माणसांच्या हालांचे वास्तव चित्रण करण्यात ही कादंबरी  यशस्वी होते. लेखकाने लॉकडाऊनची करुण कथाच या कादंबरीत मांडली आहे. ती वाचकाला सुन्न करून जाते.

‘लॉकडाऊन’ – ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर, न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे- २६४,  मूल्य- ३०० रुपये.

‘स्क्रीन टाइम’साठी मार्गदर्शक

सध्या पालक मुलांच्या स्क्रीन टाइमविषयी खूपच चिंतेत आहेत. मुलांच्या हातात मोबाइल आला की ‘तू हे बघू नकोस, ते बघू नकोस’ अशी यादीच पुढे करतात. भविष्यात मोबाइल आणि इंटरनेट यांच्याशिवाय पर्याय नाही. अशा वेळी मुलांना केवळ सल्ले न देता त्यांना याबाबत साक्षर करणं ही काळाची गरज आहे. पालकांनी मुलांची अडवणूक न करता त्यांच्याबरोबर या इंटरनेट जगाची सफर करावी, त्यातल्या चांगल्या गोष्टी आणि धोके यांची जाणीव करून द्यावी.. तीही संयमाने. पालकांनी आपल्या मनातील भीतीचा बागुलबुवा दूर करायला हवा. तो कसा? तर त्यासाठी मुक्ता चैतन्य यांचं ‘स्क्रीन टाइम’ हे पुस्तक अवश्य वाचायला हवं. हे पुस्तक इंटरनेटच्या जगात प्रवेश करताना पालक आणि मुलांनी कोणती पथ्यं पाळावीत याबाबत उत्तम मार्गदर्शन करतं.

इंटरनेटवर मुलांसाठी खूप काही उत्तम गोष्टी आहेत. आपल्या कौशल्याच्या जोरावर लोकांचं जगणं सुकर करणाऱ्या लहानग्यांच्या गोष्टी इथं आहेत. त्यांनी आवर्जून पाहाव्यात अशा अनेक गोष्टींचा खजिना उपलब्ध आहे. परंतु हे करताना इथल्या काही वाईट गोष्टींची जाणीव करून देणारे लेखही या पुस्तकात आहेत. ‘अडनिडय़ा वयाची आव्हानं’, ‘गेमिंग चॅलेंजेसमधले धोके’, ‘पॉडकास्टच्या दुनियेत’, ‘ऑनलाइन भाषेचे धडे’.. असं बरंच काही यात आहे. या पुस्तकात पालकांसाठी खास विभाग आहे. ‘नेट पॉझिटिव्ह’, ‘गेमिंगचं अ‍ॅडिक्शन समजून घेताना’, ‘मुलं अनुकरणातनं शिकतात’, ‘स्क्रीन टाइम मॅनेजमेंट कशी करायची?’.. या लेखांमधून पालकांनाही इंटरनेटचे फायदे-धोके समजावून सांगितले आहेत. हे पुस्तक इंटरनेट आणि आपल्या मुलांचं वर्तन याविषयी संभ्रमात सापडलेल्या पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उकल करेल, हे निश्चित. विशेष म्हणजे हे पुस्तक मराठीसह इंग्रजीतही उपलब्ध आहे.

‘स्क्रीन टाइम’- मुक्ता चैतन्य, पृष्ठे- १३६, मूल्य- २०० रुपये.

तेरचं महत्त्व उलगडणारं पुस्तक

तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यतील एक खेडं. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे इथे संत गोरा कुंभार यांची समाधी आहे. सातवाहन, शिलाहार, मौर्य, मोगल, मराठे अशा अनेक राजवटी पाहिलेलं तेर हे वैभवसंपन्न खेडं आहे. दक्षिणेतील मथुरा म्हणून तेर ओळखलं जातं. तेरपूरची लेणी, इथला व्यापार-उद्योग, वारकरी संप्रदाय, लामतुरे पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय, शिलालेख, येथील लोकसंस्कृती, सणसमारंभ व यात्रा यांची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात आहे.

‘दक्षिणेची मथुरा तेर’- राज कुलकर्णी, ग्रंथाली, पृष्ठे- १३०, मूल्य- १६० रुपये.