12 July 2020

News Flash

कीर्तन-ऋण

एक कलावंत आणि विशेषत: कवी म्हणून स्वत:ची झालेली जडणघडण पाहताना नेहमीच जाणवतं, की कीर्तन या आदि-आविष्कार-माध्यमाचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे. विशेष अपूर्वाईची गोष्ट म्हणजे

| March 3, 2013 01:01 am

एक कलावंत आणि विशेषत: कवी म्हणून स्वत:ची झालेली जडणघडण पाहताना नेहमीच जाणवतं, की कीर्तन या आदि-आविष्कार-माध्यमाचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे. विशेष अपूर्वाईची गोष्ट म्हणजे हे कीर्तनसंस्कार आपल्यावर थेट आपल्या घरातूनच झाले आहेत. कारण आमचे वडील राम गणेश मोघे हे जातिवंत कीर्तनकार होते. म्हणजे तो त्यांचा व्यवसाय नव्हता, पण कीर्तनकार असणं हा सर्वार्थानं त्यांचा स्वधर्म होता. इथे, स्वधर्म हा शब्द आवर्जून योजला आहे.. कारण कीर्तन हा काही त्यांचा कुलधर्म नव्हता. त्यांचे वाडवडील पौरोहित्य करणारे होते. वडिलांनी ती परंपरा सोडून शिक्षणाची कास धरली. त्यासाठी औंध संस्थानात विद्यार्थी वसतिगृहात राहून माधुकरी मागून शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथे त्यांच्यातील सुप्त कला-गुण प्रकट होऊ लागले. औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी विद्यासक्त, कलासक्त होते. स्वत: चित्रकार होते. कीर्तनकार होते. त्यांनी पाहिलं की या मुलामध्ये वक्तृत्व, कवित्व, अभिनय, गायन आदी गुणांचा संगम आहे. बुद्धिमत्ता आहे. चिंतनशील स्वभाव आहे. तेव्हा त्यांनीच आवर्जून त्यांना कीर्तन करण्याची प्रेरणा दिली. कीर्तनकार राम गणेश मोघे हे अस्तित्व इथून आकार घेऊ लागलं.
असं जाणवतं, की कीर्तन परंपरेच्या ठरावीक संकेत-संकल्पना आणि त्यांच्या चौकटी यापासूनही ते मुक्त होते. अगदी वेशभूषेपासून ते सादरीकरणापर्यंत कीर्तन हा त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा सर्वार्थाने आत्माविष्कार होता. त्यांच्यातील सशक्त कलावंत आणि सुजाण विकसनशील व्यक्तिमत्त्व या दोन्हीच्या अभिव्यक्तीचं ते एक अत्यंत प्रभावी साधन होतं. त्यामुळे त्यांचं कीर्तन ऐकणं (आणि पाहणंही) हा एक समृद्ध अनुभव असायचा. तो पोटभर घेतच आम्ही सर्व भावंडं वाढलो आणि घडलोही. साहजिकच, आस्वाद आणि अभिव्यक्ती या दोन्ही गोष्टी केवळ एकेरी न राहता बहुआयामी होणं हे आमच्याही बाबतीत ओघानंच आलं.
माझ्या कवी होण्यासंदर्भात बोलायचं, तर कवितेचा केवढा तरी महाप्रपात माझ्यावर त्यांच्या कीर्तनातून अगदी नकळत्या वयापासून कोसळत राहिला. सर्व पंडित कवी, लोककवी आणि संतकवी यांची समग्र परंपरा सहजगत्या ओळखीची झाली. त्यातून कवितेचे विविध रचनाबंध, त्यातील गण-मात्रांच्या गणिती हिशेबात न गुंतताही अंगवळणी पडत राहिले. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काव्याचं केवळ लिखित रूपच अंतिम न मानता, तिचा वाणीशी असलेला अजोड अनुबंध अगदी लहानपणापासून खूप सहजपणे आणि तरीही खूप खोलवर रुजला. त्यामुळे आशय हा कवितेचा महाप्राण असला तरी नादतत्त्व, लयतत्त्व आणि रूपतत्त्व हे काव्यगुण तो आशय अधिक उत्कट होण्यासाठी प्रभावी ठरतात हे कुणी न सांगताही स्वत:लाच अनुभवातून उमगत गेलं. साहजिकच शब्द, नाद आणि चित्र हे तीन भिन्न प्रदेश नसून ते परस्पर पूरक तर आहेतच. पण खूपदा ते परस्परामध्ये प्रतििबबित होत असल्याची रोमहर्षक प्रचिती वारंवार येत राहिली. हे इतकं उलगडून सांगणं आज इतके पावसाळे उलटल्यावर शक्य होतंय. पण तेव्हा ते आम्ही वडिलांच्या कीर्तनातून आमच्याही नकळत जणू सर्वागानं अनुभवत होतो.
मोरोपंत-वामन पंडित-ज्ञानेश्वर-तुकाराम-नामदेव-एकनाथ-रामदास हे तर नेहमीचे जिव्हाळ्याचे जिवलग. पण शिवाय जोडीला कबीर-सूरदास-मीराबाई यांचाही अधूनमधून परामर्श घेतला जायचा. मला अधिक अपूर्वाई आहे ती या सर्व पारंपरिक काव्यासोबत, आधुनिक मराठी कविता आणि गीतप्रवाहांचाही त्यामध्ये समावेश होत होता. या गोष्टीची.. कविवर्य केशवसुत, राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज ही नावं प्रथम ओळखीची झाली. ती पुस्तकातून नव्हे तर वडिलांच्या कीर्तनातून घडणाऱ्या त्यांच्या साक्षात्कारी सजीव काव्य प्रकटीकरणातून..
‘कांठोकांठ भरू द्या प्याला
फेस भराभर उसळू द्या..
प्राशन करता रंग जगाचे
क्षणोक्षणी ते बदलू द्या..’
‘ब्राह्मण नाही. हिंदूही नाही
न मी एक पंथाचा..
तेच पतित की जे
आखडती प्रदेश साकल्याचा’
‘चला रूढीवर आता घसरा..
सीमोल्लंघन- कालचि दसरा’
‘तोच खरा हठयोग,
प्रीतीचा रोग लागला ज्याला,
लागते जगावे त्याला.. हे असे..’
‘वरच्या लत्ता झेलीत माथा,
सवेची झाडी खाली लाथा,
न ती निवारी, न ही आवरी- बेशरमी हैवान..’
अर्थाचे समृद्ध कुंभ वाहणारे रसरशीत शब्द. मग ते साहित्यातून येतात की नाटय़गीतातून येतात, ध्वनिमुद्रिकेवरील भावगीतातून येतात की आधुनिक चित्रपटगीतातून. याची नस्ती उठाठेव त्यांनी कधीच केली नाही. अगदी पुराणकथेतली प्रणयव्याकूळ नायिका आईजवळ काकुळती करताना व्यक्त करायची असेल तर ते बेलाशक गोविंद बल्लाळ देवलांच्या शारदेची विनवणी सादर करायचे. ‘तू टाक चिरून ही मान, नको अनमान.. नवमास वाहिले उदरी तिचा धरि काही तरी अभिमान..’ पुराणातील आख्यान लावतानाही वसिष्ठ ऋषीचा आश्रम श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहावा म्हणून ते गदिमा-सुधीर फडके युतीचं नितांत सुंदर चित्रगीत रसाळपणे सादर करायचे..‘ आश्रम की हरिचे हे गोकुळ, भासतसे वनवासही मंगल..’
कीर्तनाच्या आख्यानासाठी कथाविषय निवडतानाही त्यांची अभिरुची नेहमी विकसनशील आणि आधुनिक होती. पुराणातील कथा त्यांना मुळीच वज्र्य नव्हत्या.. पण त्यांनाही तर्कावर आधारित नवा अर्थ देण्याकडे त्याचा कल होता. वनवासात एकदा कुटीमध्ये द्रौपदी एकटीच असताना अचानक शिकारीसाठी बाहेर पडलेला कर्ण तहान लागली म्हणून योगायोगाने तिच्या दाराशी येतो. दोघे एकमेकांना ओळखतात.. पण काही न बोलता तो जलपान करून निघूनही जातो. हिच्या मनात मात्र एक अनावर चक्रीवादळ उठतं. स्वयंवरात तिनं अपमानित करून त्याचा अव्हेर केलेला असतो. पण आज ते सर्वागसुंदर पौरुष अचानक पुढे उभं राहतं. तो पांडवांचा ज्येष्ठ बंधू हे देखील आता गुपित राहिलेलं नाही.. आपण पाचांची पत्नी आहोतच.. हाही खरं तर आपलाच नाही का? तिची ही आतली खळबळ इतर कुणाला कळली नाही तरी कृष्णाला बरोबर कळते आणि तो त्या संमोहाचं निराकरण चतुरपणे करतो. या कथेवर वडिलांनी एक फार सुंदर आख्यान रचलं होतं. पुढे या क्षेत्रातील एका अधिकारी व्यक्तीनी, या कथेला पुराणात काही आधार नाही, म्हणून करू नये, असा प्रेमळ सल्ला दिला. वडिलांनी तो नम्रपणे नाकारला. कारण या घटनेत काही अस्वाभाविक आहे असं त्यांना मनापासून वाटत नव्हतं. उषा-अनिरुद्ध यांची प्रेमकथा सर्वश्रुत आहे. तिच्या स्वप्नात तो अचानक येतो. तो कोण कुठला ठाऊक नाही.. उषा कासावीस.. मग तिची सखी चित्ररेखा रंगरेषांतून त्याचा शोध घेते आणि कथेचा सुखान्त होतो. आपल्याकडे मूळ कथेत, आदल्या रात्री जगन्माता उषेच्या स्वप्नात येऊन पुढच्या घटनेची आगाऊ सूचना देते अशी एक ‘व्यवस्था’ आहे. एका षोडशीच्या स्वप्नात एखादा युवक येण्यासाठी मध्ये जगन्मातेला खर्ची का पाडायचं? आणि मग तेव्हाच ती त्याचं सगळं नावगाव सांगून तो विवाह जमवूनच का टाकत नाही, असा एक प्रश्न पुढे मी आकाशवाणीत एका कीर्तनकारांना केला होता. त्याचं मूळ या बालपणीच्या संस्कारात आहे. इतिहास आणि वर्तमानही आख्यानासाठी त्यांना वज्र्य नव्हतं. शिवचरित्र मी प्रथम मालिकेच्या रूपात अनुभवलं ते त्यांच्या कीर्तनातून.. गांधीजींचा आफ्रिकेतला पहिला एकाकी सत्याग्रह हाही त्यांच्या आख्यानाचा विषय होता.
किलरेस्कर मासिकाचे साक्षेपी संपादक कै. शं. वा. किलरेस्कर ऊर्फ शंवाकि हे नंतर वानप्रस्थ म्हणून घटप्रभेत राहत होते. ते वडिलांशी पत्र-संपर्क ठेवून होते. त्यांच्या पत्रात एक उल्लेख वारंवार असायचा. ‘तुमच्या धाकटय़ा मुलानं तुमचा कीर्तनाचा वारसा चालवावा.’ आपला काही तो घास नव्हता. पण त्यांना हे कसं पटवणार?.. पण पुढे एक गंमत झाली.
१९८७ मध्ये मी माझा ‘कविता पानोपानी’ हा एकसंध आत्माविष्कार असलेला काव्यप्रयोग सुरू केला. जो आज रौप्यमहोत्सवी वर्षांत प्रवेशतो आहे. मुंबईच्या छबीलदासमध्ये एक सणसणीत प्रयोग नेहमीप्रमाणे पार पडला. संपूर्ण आधुनिक युगात आणि संस्कारात वाढलेला एक दिग्दर्शक मित्र मला म्हणाला, ‘काय बोलू? मी काही तुझ्या वडिलांना पाहिलेलंही नाही. पण त्यांचं कीर्तन काय असेल, ते पूर्णपणे कळलं.’
मी आतून हललोच. वाटलं, हे ऐकायला शंवाकि हवे होते- आणि आमचे वडील, बापूरावही..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2013 1:01 am

Web Title: marathi kirtan and kirtankar
टॅग Kavita Sakhi
Next Stories
1 अनिकेत.. निरंजन
2 नाते काळोखाचे ..
3 अस्तित्वाशी जोडलेली बेचैनी
Just Now!
X