अलीकडेच निवर्तलेले ज्येष्ठ साहित्य समीक्षक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष प्राचार्य म. द. हातकणंगलेकर यांचा दीर्घ सहवास लाभलेल्या दिलीप कुलकर्णी यांनी सरांसोबतच्या उत्कट आठवणींना दिलेला उजाळा..
‘समीक्षाप्रवाहातला अखेरचा रोमन गेला’ ही बातमी वाचली आणि क्षणभर सगळंच थांबल्यासारखं वाटलं. तसं हातकणंगलेकर सरांचं जाणं अकस्मात म्हणता येणार नाही. गेले बरेच महिने ते आजारीच होते. लेखनही जवळजवळ थांबलंच होतं. फोनवरही ते क्वचितच बोलत. तशी मरणाची तयारी त्यांनी गेल्या १३-१४ वर्षांपासूनच सुरू केली होती. १२-१३ वर्षांपूर्वी त्यांना सौम्य हार्टअटॅक आला होता. मुंबईच्या एका कवीनं त्यांना त्याची पूर्वकल्पना दिली होती. सर्व स्थिर झाल्यावर एक दिवस सर पुन्हा त्या कवीकडे गेले. ‘आता किती वर्ष आहे माझं आयुष्य?’ म्हणून विचारायला आणि उदार मनानं त्या कवीनं त्यांना हाताची दोन बोटे दाखविली. सर तिथून पुण्याला आले ते खचून नव्हे तर दोन र्वष जगण्याची गॅरंटी मिळाली म्हणून ते आनंदात होते.
सरांची आणि माझी पहिली भेट १८/२० वर्षांपूर्वी माऊंट आबूला झाली. असेच थंडीचे दिवस होते. एका तीन दिवसीय संमेलनासाठी आम्ही माऊंट आबूला निघालो होतो. ‘बेळगाव तरुण भारत’च्या टीममध्ये मी होतो. याळगी होते, कलघटगी होते. सरसुद्धा होते. सर म्हणजे प्राचार्य म. द. हातकणंगलेकर! संपादक अशोक याळगींनी माझ्याशी रीतसर ओळख करून दिली होती. त्यावेळी सर हाताचे दोन्ही तळवे पाठीमागे गुंफून उभे होते. ओळख झाल्यावरही गुंफलेला हात त्यांनी हस्तांदोलनासाठी पुढं केला नाही.
योगायोगानं आम्हा दोघांच्या राहण्याची व्यवस्था यजमानांनी एकाच खोलीत केली होती. हे संमेलन तीन दिवस चाललं. सकाळ, दुपारच्या बऱ्याच चर्चासत्रांना फाटा देऊन आबू पर्वतावरच्या त्या हाडं गोठविणाऱ्या थंडीत आम्ही कथाकार जीए कुलकर्णीविषयी बोलत राहिलो.
१९७८-७९ पासून ‘जीएं’च्या कथांचं भूत माझ्या डोक्यावर बसलं होतं. ‘पिंगळावेळ’ मधली ‘स्वामी’ ही कथा मी प्रथम वाचली आणि ‘स्वामी’तले ते तीन मानवी हाडांचे सांगाडे आणि गूढ लालसर अंधारातून हिरव्या नम्र डौलानं बाहेर पडलेल्या ‘स्वामी’ची मला ओढ लागली. मी हातकणंगलेकर सरांना म्हटलं की, गेली २०-२२ वर्षे आपल्या मातकट दातांनी या कानापासून त्या कानापर्यंत सदैव हसत असलेले ते तीन स्वामी मला न्याहाळत आहेत. कधी तरी या ‘स्वामीं’ना आपण भेटायचंच असं मी ठरवलंच होतं. तेव्हा हे संमेलन संपताच आपण या ‘स्वामीं’चा शोध घेऊया का?’ ते ‘हो’ म्हणाले आणि एक दिवस मी त्यांच्याकडे सांगलीला गेलो. मग पुढं तो शिरस्ताच होऊन गेला. मी वारंवार त्यांच्याकडे जाऊ लागलो. तिथून पुढं बेळगाव, धारवाड, कित्तूर! कर्नाटकातली किती नावं सांगायची?
तेही अगदी किरकोळ निमित्तानं पुण्याला यायचे. अगोदर मला फोन करायचे. मग त्यांच्याबरोबर दोन दिवस मजेत जात. त्यांच्याशी गप्पात वाङ्मयेतर विषय क्वचितच यायचे. पण जीएंविषयी ते भरभरून बोलत. धारवाडला नोकरीच्या सुरुवातीच्या काळात ते जीएंच्या होस्टेलवर त्यांच्याच खोलीत राहात होते. त्या काळातल्या हकिगती ते फार रंगवून सांगत. खरं म्हणजे जीए कुलकर्णी त्यांच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे होते. पण हातकणंगलेकर सर त्यांना फार मायेची जागा वाटे. सुमारे ३५/४० वर्षे त्यांचा पत्रव्यवहार होता. त्या असंख्य पत्रांत ‘जीएं’नी आपल्या कथांमागचे स्रोत संदिग्धपणे तर कधी कधी उघडपणे व्यक्त केले आहेत. अर्थात ही सारी पत्रे प्रकाशित झाली नाहीत. पण हा सारा पत्रव्यवहार मी सूक्ष्मपणे पाळला आहे.
सर पुण्यात आले, की काही जागा त्यांच्या ठरलेल्या असायच्या. तिथं हमखास जावं लागे. ग. प्र. प्रधान, प्रा. रा. ग. जाधव आणि प्राचार्य बाळ गाडगीळ. आज त्यापैकी फक्त रा. ग. जाधव आहेत. हे जाधव सर त्यावेळी सदाशिव पेठेत अनपट बिल्डिंगमध्ये अगदी वरच्या मजल्यावर राहात. कधी कधी रस्त्यावरूनच आम्ही त्यांना हाक द्यायचो. ते खिडकीतून वाकून हसत आणि खाली येत. तिथून आम्ही एका ठराविक हॉटेलात जात असू.
जीएं कुलकर्णीची ती ऐसपैस पत्रे वाचल्यानंतर एक दिवस मी त्यांना सहज म्हटलं, ‘सर यांच्या काही संसारकथा म्हणजे त्यांची विखुरलेली आत्मवृत्तेच आहेत, असं वाटतं.’ ते मंदपणे हसले. पण त्यांनी ती शक्यता फेटाळून लावली नाही. त्यांच्या संसारकथा आपल्याला एवढय़ा भिडतात तेव्हा त्यांचे स्रोत हे त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातून आले असले पाहिजेत. खुद्द जीएंनीच एका पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, ‘काही पाहिलेल्या व्यक्तींची चित्रं इतक्या काळानंतर इतक्या अंतरावर त्रस्त करतात. हे …समंध… गाडण्यासाठी कदाचित काही कथा तर्पण असू शकतील.’
पत्रातील त्या संदर्भाच्या आधारे आम्ही कर्नाटकमधल्या त्यांच्या कथांचा परिसर धुंडाळून काढला. धारवाडमधल्या जीएंच्या घरी अनेकदा गेलो. त्यांच्या क्लबवर गेलो. त्यातून ‘जीएं’चं धारवाडमध्ये स्मारक करण्याची कल्पना पुढं आली. पण त्यासाठी जीएंचं धारवाडमधलं घर ताब्यात घेणं आवश्यक होतं. तिथं कुणी एक पोष्टमास्तर राहात होता. काही दिवसांनी ते घर रिकामं होणारच होतं. घराचा मूळ मालक मोहन कडेमणी यास आम्ही भेटलो. त्याला ही सर्व कल्पना दिली. जीए त्या घरात २० वर्षे राहिले होते. त्यांच्या बहुतेक कथांचं लेखन त्या घरातच झालं. कॉलेजच्या नोकरीतून ते निवृत्त झाले. त्यावेळीही ते तिथंच राहात होते. पुढे ते पुण्यात आले. कोथरूडमध्ये एक फ्लॅटही त्यांनी घेतला. पण मनानं ते धारवाडमध्येच होते. मोहन कडेमणीला (घरमालक) पत्र पाठवून ‘माझं घर रिकामं आहे का?’ अशी विचारणादेखील त्यांनी केली होती, पण तोपर्यंत मालकानं ते घर कुणाला तरी भाडय़ानं देऊनही टाकलं होती. त्यांना धारवाडमधल्या त्या घराविषयी ममत्व होतं आणि तेच घर त्यांना राहावयास पाहिजे होतं.
हे सगळं बघता सरांनी कडेमणीला त्याच घरात त्यांचं स्मारक होणं कसं उचित आहे हे पटवून  दिलं आणि त्यानंही ते घर आमच्या ताब्यात दिलं.
त्या भारलेल्या काळात सरांचे फार फोन यायचे. त्यांची स्टाईल म्हणजे ते थेट विषयाला हात घालायचे. आपण कसं, ‘हॅलो, अमूक आहेत का? नमस्कार. मी अमूक अमूक’ वगैरे.. औपचारिक बोलून मग मूळ संभाषणाला सुरुवात करतो. यांचं तसं नाही. ‘कोयना एक्स्प्रेसनं निघतोय, संध्याकाळी प्रधानांकडे जाऊ..’ आणि फोन बंद. एकदा मी सर्व ऐकून घेतलं आणि म्हणालो, ‘हे सर्व ठीक आहे, पण महाशय, आपण कोण आणि कुठून बोलता आहात?’ यावर फक्त ते गडगडाटी हसले आणि नेहमीप्रमाणे फोन बंद केला.
व्यंकटेश माडगूळकर ही त्यांची आणखी एक जागा होती. पुण्याच्या वास्तव्यात भेटण्याची. एरंडवण्यातल्या त्यांच्या बंगलीत सकाळी सकाळी आम्ही जायचो. शेवटच्या काळात जेव्हा माडगूळकर रुग्णालयात होते. तिथंही जाऊन आम्ही त्यांना भेटलो आहोत. सरांसमवेतच्या या साऱ्या भेटी कायम स्मरणात राहतील.
सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या एका पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांची ‘व्हायव्हा’ घेण्यासाठी नागपूर विद्यापीठानं सरांना बोलावलं होतं. ऐनवेळी ते म्हणाले, ‘तुम्ही बरोबर चलाच, नागपुरातल्या जुन्या मित्रांची त्यानिमित्तानं भेट होईल’ आणि आम्ही नागपुरात पोचलो. स्टेशनवर उतरून घ्यायला डॉ. द. भि. आले होते. वास्तविक आमची सोय विद्यापीठाच्या अतिथीगृहात केली होती. तरीही काही वेळासाठी ‘द. भि.’ आम्हाला त्यांच्या ‘जंतर-मंतर’वर घेऊन गेले.
काही तास आम्ही तिथं होतो. मी गेल्या गेल्या पुस्तकात डोकं घालून बसलो. हातकणंगलेकर सर काही काम नसलं की डोळे मिटून बसत. तसे ते एका खुर्चीवर बसले. ‘दभि’ही अंगावर शाल घेऊन एका पलंगावर संथपणे सुपारी कातरत बसले.
‘‘नाव काय रे तुझं आणि काय करतोस तू पुण्यात?’’ अचानक थांबून ‘दभिं’नी मला विचारलं.
‘‘मी सांगतो..’’ म्हणून हातकणंगलेकरांनी परस्पर त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
‘‘आता तुम्ही सांगा हो, त्या ‘जीएं’बाबत तुम्ही काय कार्य आरंभलं आहे ते,’’ माझ्याकडे वळून सर म्हणाले आणि पुन्हा ते डोळे मिटून बसले.
मग मी जीए स्मारकासंबंधी त्यांना सर्व सांगितलं. आतापर्यंत झालेली प्रगती सांगितली. जीएंच चरित्र जवळजवळ अनुपलब्ध आहे. त्यांच्या चरित्राचा आणि वाङ्मयाचा शोध संपणारा नाही. तेव्हा पुढील संशोधकांना उपयोग होईल अशी सामग्री एकत्रित करण्याच्या प्रयत्नांत आम्ही होतो. अर्थात या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक होते; हातकणंगलेकर सर त्याखेरीज सोलापूरचे प्रा. नागेश पत्की आणि धारवाडचे रवीन्द्र फडकेदेखील आमच्या प्रयत्नांत सहभागी झाले होते.
याच नागपूरभेटीत ‘जीएं’चा कट्टर पत्रमित्र अवलिया ‘ग्रेस’ला आम्ही भेटलो. ही भेट म्हणजे एका वादळाशीच भेट होती. ग्रेस नावाचं वादळ तर कधीच आकाशात गेलंय, पण या भेटीचा आणखी साक्षीदार पुण्यात अजूनही आहे. त्याचं नाव केशव जोशी. हा केशवराव नुकताच काही वर्षांपूर्वी नागपुराहून पुण्यात स्थायिक झाला आहे. ग्रेस सांगेल ते सर्व टिपकागदाप्रमाणे शब्दात शोषून घेणारा म्हणजे हा केशव जोशी!
त्या १२/१५ वर्षांत धारवाड आणि बेळगावला आम्ही किती वेळा गेलो आणि किती दिवस राहिलो याचा तर हिशोबच माझ्याकडे नाही. तो काळच असा होता की, जीएंशिवाय आम्हाला काही सुचत नव्हतं. केवळ माझ्या आग्रहानुसार सर या शोधकार्यासाठी उन्हांतान्हात, वादळवाऱ्यात आणि पावसातदेखील माझ्यासोबत हिंडले. मला आठवतं, धारवाडपासून दूर एका निबीड खेडय़ात ‘जीएं’चा सख्खा मामेभाऊ राहात होता. ज्या मामांनी बेळगावात ‘जीएं’चा बालपणी सांभाळ केला, त्या गोपुमामाचा हा एकुलता एक मुलगा. त्याच्याकडे ‘जीएं’ची पत्रिका मिळाली. पूर्ण पत्ता माहीत नसताना शोधत एका पावसाळी सकाळी आम्ही त्याच्याकडे गेलो होतो.
१३ वर्षांपूर्वी सरांचा अमृतमहोत्सव सांगलीत साजरा झाला. हे असले समारंभ त्यांना फारसे मान्य नसत. ऐन संध्याकाळी मी त्या ठिकाणी पोचलो. स्टेजवर सर बसले होते, हार-तुरे घालून. कुणी तरी भाषण करीत होतं. यांच्या चेहऱ्यावर मात्र शंभरी पूर्ण झाल्याचं गांभीर्य!
पुण्यात एका संध्याकाळी आम्ही एकदा आनंद अंतरकरांकडे बसलो होतो. मी सहज त्यांना विचारलं, ‘‘सर, अजून एक-दोन वर्षांचं एक्स्टेंशन नाही मिळणार का त्या मुंबईच्या कविमहाराजांकडून?’’ सर नुसतेच हसले. आम्ही काही मित्र खरं तर हादरून गेलो होतो. कारण ते म्हणायचे, ‘मुंबईच्या कविराजांनी सांगितलेलं भविष्य माझ्याबाबतीत खरोखरच भूतकाळ झालं आहे. हा ‘दोन वर्षे एक्स्टेंशनचा त्याचा शेवटचा होरा!’
एक्स्टेंशन मागायला काही हे गेले नाहीत. त्या घटनेलाही (भविष्य वर्तविण्याला) बरीच वर्षे होऊन गेली. कदाचित चित्रगुप्ताला त्याच्या हिशेबातली त्या कवीची लुडबूड मान्य झाली नसावी!
ते काही असो. सरांनी आमची आणि अनेकांची आयुष्ये समृद्ध केली आहेत. वयामुळे म्हणा किंवा सततच्या आजारपणामुळे गेले कित्येक महिने त्यांचं पुण्याला येणं थांबलं होतं. फोन मात्र यायचे. तीच स्टाईल. एखादं वाक्य बोलणार आणि फोन बंद!
मागच्या वर्षी औदुंबर संमेलनानंतर त्यांच्या घरी गेलो होतो. सोबत माझी बहीण आणि मेव्हणेदेखील होते. आमची वाट पाहात ते बाहेरच नेहमीच्या खुर्चीत बसले होते. मला पाहताच ते म्हणाले, ‘आजोबा या. अहो हे नुकतेच आजोबा झाले आहेत बरं का!’ सुधाताईंकडे वळून ते म्हणाले. त्यांनाही आश्चर्य वाटलं. पण नंतर मी आत जाऊन सांगितलं की ‘तसं काही’ नाही. यांच्या डोक्यात हे ‘आजोबां’चं खूळ कुणी घातलंय, मला माहीत नाही. त्या संपूर्ण भेटीत माझा उल्लेख ते वारंवार ‘आजोबा’ म्हणून करत होते. पुढंही फोनवर तोच शिरस्ता त्यांनी कायम ठेवला. परवा दिवाळीच्या दिवशी अगदी सकाळीच त्यांचा फोन आला. ‘अरे आजोबा, दिवाळी सुरू झाली की नाही तुमची? बरं.’ आणि नेहमीसारखा फोन बंद झाला. दुर्दैवानं त्याच दिवशी दुपारी माझे वडील अचानक वारले. मी काही त्यांना फोन करून ती बातमी सांगितली नाही. पण दोन / तीन दिवसांनी पत्रानं कळवून टाकलं. खरं इतक्या वर्षांत मी त्यांना आणि त्यांनी मला अनेकवेळा विविध कारणांनी पत्रे लिहिली. हे पत्र दुर्दैवानं शेवटचं ठरलं. सरांचेही वडील ऐन दिवाळीतच गेले होते. तो एक खुनी हल्ला होता. पत्रात मी लिहिलं होतं,
‘प्रिय सर,
ता. २३ ला सकाळीच आपण बोललो आणि दुपारीच माझे वडील वारले. याप्रसंगी तुमची प्रकर्षांनं आठवण झाली. कारण ते असेच दिवाळीचे दिवस होते. सगळीकडे लक्ष दिवे लागले असताना हातकणंगल्याला तुमच्या घरात त्या दिवशी दिवा लागला नाही, पण पुढं आयुष्यभर वडिलांच्या आठवणींचा दिवा तुमच्या मनात नंदादीपाप्रमाणे तेवत राहिला. आता असाच एक दिवा घेऊन मी तुमच्या पाठीमागे बसलो आहे. फरक एवढाच आहे की, तुमचे वडील गेले तेव्हा तुम्ही चढण चढत होता आणि माझे गेले तेव्हा मी हळूहळू खाली उतरतो आहे.
पत्र मिळाल्यावर सरांचा लगेच फोन आला तेव्हा मी दशक्रियेसाठी घाटावर आलो होतो. त्यांनी नुसताच हुंकार भरला. ते ‘आजोबा’ वगैरे बोलून गडगडाटी हसणं नाही काही नाही. फक्त एक हुंकार, पण त्यानंही माझं सांत्वन झाल्यासारखं वाटलं.
इतक्या वर्षांच्या सरांच्या सहवासात मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की ते कमालीचे अंतर्मुख झालेले होते. का? याचं उत्तर त्यांच्या बालपणात आहे. त्यांच्या मन:चक्षूंसमोर दोन चित्रं कायमची गोठून राहिली होती. एक म्हणजे हातकणंगल्याच्या त्यांच्या बालपणीच्या घरात उन्हं अंगावर येईपर्यंत सुखानं घेतलेली निद्रा! अर्धवट निद्रेत असताना हळूच कुणा तरी मायेचे हात छोटय़ा मधुकराला उचलून उन्हापलीकडे गादीवर निजवीत असत. त्यानं झोप चाळवे, पण ते सुकुमार हात त्यांच्या वडिलांचे असत. सूर्योदयाला वडील स्नान करून उघडय़ा अंगानं मृगजिन घालून देवपूजा करीत असत. वडिलांचे ते मंत्रघोष, धूप-दिव्यांची वलयं.. इतकी वर्षे वाहून गेली तरी त्यांच्या मनातून विझली नव्हती. पहाटच्या साखरझोपेत काल परवापर्यंत ते अदृश्य हात त्यांना सुकुमारपणे अलगदपणे उचलत होते आणि हे आमचे सर, मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर वय वर्षे ८८; उन्हं अंगावर येण्याची वाट पाहात तसेच पडून राहात होते..
दुसरं चित्र सरणावरचं: त्यांच्या वडिलांच्या घातपाती मृत्यूनंतर सरणावर ठेवलेला त्यांचा अचेतन देह. मृत्यूची नीट समज येण्यापूर्वीच अत्यंत जवळच्या माणसाचा इतक्या जवळून पाहिलेला मृत्यू! छोटय़ा मधुकरानं ते वडिलांचं शव उरावर घेऊनच आयुष्याची वाटचाल केली. कुठलंच सुख स्थानबद्ध करून ठेवता येत नाही, हे जरी खरं असलं तरी काही काही दु:खं मात्र उभं आयुष्यच जखडून ठेवतात.
सरांच्या रूपानं ‘शेवटचा रोमन’ गेल्याची बातमी आली तेव्हा उताराकडे जाणारे माझे पाय आणखीनच जड झाले. कारण आठवणींचा आणखी एक दिवा माझ्या हातात देऊन सर निघून गेले होते.    

-दिलीप कुलकर्णी