|| पराग कुलकर्णी

केदारनाथच्या गुहेतील मोदींची ध्यानधारणा, राहुल गांधींनी मोदींना मारलेली मिठी आणि नंतर मारलेला डोळा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची मेट गालामधील वेशभूषा, पाकिस्तानचा क्रिकेट कर्णधार सरफराज याने भर मदानात दिलेली जांभई.. या सर्व गोष्टी तुम्हाला आठवत आहेत का? बहुदा आठवत असतील. या गोष्टी आठवण्यामागचं कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या, जग बदलणाऱ्या किंवा इतिहासात स्थान मिळेल अशा निश्चितच नव्हत्या. पण हे प्रसंग काही काळ (आणि कदाचित खूपच अल्प काळ) आपल्या स्मरणात राहतील, ते त्या प्रसंगांवर समाज माध्यमांमध्ये आलेल्या विनोदांमुळे! त्या प्रसंगाचा फोटो आणि त्यावर एक-दोन ओळींत केलेला विनोद असे त्यांचे स्वरूप होते. दिवसभरातील कोणत्याही मोठय़ा घटनेवर भाष्य करणारे असे हे विनोद आजकाल समाज माध्यमांवर खूप जास्त संख्येने दिसतात. या प्रकाराला ‘मिम्स’ (memes) म्हणतात. आणि  त्याचा संबंध एका सांस्कृतिक आणि जीवशास्त्रीय संकल्पनेशी आहे असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल?

मागच्या लेखात बघितल्याप्रमाणे डार्वनिचा उत्क्रांतिवाद सांगतो की, पिढय़ान् पिढय़ा सजीव आपले गुणधर्म पुढच्या पिढीला देत असतात (heredity). या संक्रमणात थोडे बदल होण्याचीही शक्यता असते (mutation). आणि जे बदल सजीवाला जगण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी मदत करतात तेच नैसर्गिक निवडीद्वारे (natural selection) टिकतात. यातूनच सजीव अधिक उत्क्रांत, अधिक विकसित होत जातो आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत टिकून राहायला शिकतो. पुढे चालून गुणसूत्रांचा (Genes) शोध लागला आणि हे सर्व प्रत्यक्षात कसे होते याचा उलगडा झाला. गुणसूत्रे म्हणजे सजीवांची ब्लू पिंट्र! त्यांच्यात सजीवांच्या वैशिष्टय़ांची आणि गुणधर्माची माहिती साठवलेली असते. ते स्वतच्या प्रती (copy) बनवू शकतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत ती संक्रमित होतात आणि त्यांच्यात बदल झाले की सजीवातही बदल होतात. थोडक्यात- सजीवांच्या बदलांचे वहन करणारा आणि उत्क्रांतीस कारणीभूत असणारा मुख्य घटक ‘गुणसूत्रे’ हाच असतो.

जीवशास्त्रज्ञ आणि उत्क्रांतिवादाचे खंदे समर्थक रिचर्ड डॉकिन्स यांना त्यांच्या The Selfish Genel  (१९७६)  या पुस्तकात  जैविक उत्क्रांतीच्या समांतर असे सांस्कृतिक उत्क्रांतीचे उदाहरण द्यायचे होते. मानवी संस्कृतीचा विकास हा जैविक उत्क्रांतीसारख्या प्रक्रियेतून झाला आहे असे त्यांना मांडायचे होते. त्यासाठी त्यांना गुणसूत्रांसारखीच संकल्पना पाहिजे होती; ज्याद्वारे सांस्कृतिक माहितीचा कशा प्रकारे प्रसार होऊन सांस्कृतिक उत्क्रांती होते, हे दाखवता आले असते. अशा संस्कृतीचे वहन करणाऱ्या सांस्कृतिक घटकाला त्यांनी नाव दिले- ‘मिम’! मूळ ग्रीक शब्द आहे- mimeme.. ज्याचा अर्थ होतो : अनुकरण करणे, कॉपी करणे.  पण जीन्सशी यमक जुळवत त्यांनी ‘मिम्स’ हा शब्द वापरला. कोणीतरी एखादं गाणं  गुणगुणत असताना आपण ऐकतो आणि थोडय़ाच वेळात आपल्याही नकळत आपण ते गुणगुणायला लागतो. आपले ऐकून अजून तिसऱ्याच व्यक्तीच्या मनातही तेच गाणे सुरू होते. येथे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाणारे गाणे म्हणजेच एक प्रकारचे सांस्कृतिक ‘मीम’च आहे. गाणे, शब्द, कल्पना, विचार, बोलण्याची- वागण्याची पद्धत, फॅशन ही सगळी मिम्सचीच उदाहरणे आहेत. स्वतच्या प्रति (copy) बनवणे, एका माणसाकडून/ मनाकडून/ मेंदूकडून दुसरीकडे जाणे आणि या प्रक्रियेत बदलास, नवनिर्मितीस चालना देणे हे ‘मिम्स’चे काम गुणसूत्रांसारखेच आहे.

डॉकिन्स यांनी ‘मिम्स’ हा शब्द १९७६ साली पहिल्यांदा वापरला. अर्थात त्या काळात इंटरनेट नव्हते. त्यामुळे या शब्दाचा उपयोग हा बऱ्याच मर्यादित अवस्थेत राहिला. सांस्कृतिक उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्यांनी हा शब्द उचलून धरला. तर इतरांकडून त्यावर टीकाही झाली.  विशेषत: गुणसूत्र आणि ‘मिम्स’मधील काही फरकांवरून. तसेच हे ‘मिम्स’ चांगले का वाईट, यावरही चर्चा झाली. चांगला विचार पसरवणारे मिम्स चांगले, तर वाईट पसरवणारे मिम्स हे व्हायरससारखे अपायकारक आहेत असेही काही जणांनी मांडले. पण जेव्हा इंटरनेटचा वापर वाढला तेव्हा मिम्सने या नवीन जगात आपली नवीन ओळख बनवली. इंटरनेटने नेमके काय केले? माहितीच्या प्रसारणातील वेळ कमी केला आणि लोकांना एकमेकांशी जोडले. मिम्सचा प्रसार होण्यासाठी अजून काय पाहिजे होते? एखादा फोटो, व्हिडिओ, विनोद व्हायरल होण्यास आता सुरुवात झाली. ‘कोलावरी डी’, गंगनम स्टाईलसारख्या व्हिडिओपासून ‘ट्विटर रिव्होल्यूशन’ म्हटलं गेलेल्या २०११ च्या ‘अरब स्प्रिंग’पर्यंत (आफ्रिका आणि मध्य-पूर्व आशियातील लोकशाहीवादी उठाव) आणि सध्याही रोज नव्याने व्हायरल होणारे नवे ट्रेंड्स म्हणजे एक प्रकारचे मिम्सच आहेत. आधी ई-मेल आणि आता विविध समाज माध्यमांद्वारे हे मिम्स आता वेगाने पसरत असतात. पण आपण आज ज्याला ‘मिम्स’ किंवा ‘इंटरनेट मिम्स’ म्हणतो ते म्हणजे लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या प्रकारचे विनोद.

पण हे मिम्स एवढे लोकप्रिय का झाले? एक म्हणजे आजच्या वेगवान जगात काही सेकंदांत पाहून होणारे मिम्स आजच्या काळाच्या वेगाला धरूनच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या विनोदाची पार्श्वभूमी- ज्यात लोकांना माहिती असलेल्या प्रसंगांची आणि घडणाऱ्या घटनांची गुंफण केली जाते. उदा. ‘टायटॅनिक’ चित्रपटातील रोज आणि जॅकचा शेवटचा प्रसंग आणि पावसाळ्यात मुंबईची झालेली तुंबई याबद्दलचं भाष्य! ही पार्श्वभूमी किंवा त्यामागची घटना समजणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच सहसा प्रसिद्ध चित्रपट, गाणी आणि लोकांच्या मनात अजूनही ताजी असणारी एखादी बातमी यांचा त्यासाठी उपयोग केला जातो. मिम्स बघणाऱ्यालाही आपण एक सामायिक (shared) अनुभव घेतो आहोत आणि त्याद्वारे इतर लोकांशी- आणि कदाचित आपल्या चालू वर्तमानाशीही जोडलेलो आहोत अशी भावना देते. आज मिम्सचा उपयोग जाहिरातीत, मनोरंजन क्षेत्रात तसेच राजकीय प्रचारातही केला जातो. आजच्या आपल्या संवादाचे एक साधन बनू पाहणाऱ्या आणि सांस्कृतिक मिमपासून इंटरनेट मिमपर्यंत स्वत:च उत्क्रांत होत आलेल्या या मिम संकल्पनेचं पुढचं रूप आणि त्याचे परिणाम मात्र येणारा काळच ठरवेल.

parag2211@gmail.com