News Flash

मॉन्टेरोसोचा लिंबू महोत्सव

नाताळ व ईस्टर या पारंपरिक सणांबरोबरच युरोपमध्ये वर्षभर छोटे छोटे अनेक सण व उत्सव साजरे केले जातात.

| September 6, 2015 02:44 pm

नाताळ व ईस्टर या पारंपरिक सणांबरोबरच युरोपमध्ये वर्षभर छोटे छोटे अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. एखाद्या गावाने वा शहराने एकत्र येऊन साजरे केलेले अनेक उत्सवही पाहायला मिळतात. जागतिक संगीत दिनानिमित्त (२१ जून) होणारा म्युझिक फेस्टिव्हल, इंग्लंडमधील मेडिवाल फेस्टिव्हल, फ्रान्समधील लियोन या शहरात होणारा दिव्यांचा सण, निस व मोनॅको या शहरांतील कार्निवल अशी या उत्सवांची अनेक उदाहरणे देता येतील. हे उत्सव जरी पारंपरिक सणांसारखे नसले तरी लोकांचा त्यातला सहभाग व उत्साह तितकाच लक्षणीय असतो. या उत्सवांच्या माध्यमातून नावीन्य आणि कल्पकतेचे दर्शन घडते. यानिमित्ताने पर्यटकांनाही स्थानिक संस्कृती, परंपरा, रीतीरिवाज आदी जवळून अनुभवता येतात.असाच इटलीमधील मॉन्टेरोसो या छोटय़ा गावात पाहिलेला ‘लिंबू महोत्सव’ विशेषकरून आठवतो. मॉन्टेरोसो हे चिंक्वा टेरा भागातील एक गाव. इटलीच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यालगत हा प्रदेश वसलेला आहे. समुद्रात शिरलेल्या डोंगरांच्या कडय़ांवर वसलेली मॉन्टेरोसो, वेरनाझा, कोर्निलिया, मनरोला आणि रिओमाजिओर ही पाच गावे. या पाच गावांवरूनच या प्रदेशाला ‘चिंक्वा टेरा’- म्हणजे शब्दश: ‘पाच जमिनी’ असे म्हटले जाते. ही गावे अतिदुर्गम प्रदेशात वसली असून अगदी अलीकडेपर्यंत केवळ चालत किंवा बोटीनेच या गावांपर्यंत जाता येत असे. आता रेल्वेने ही पाचही गावे जोडली गेली आहेत आणि हा दुर्गम प्रदेश पर्यटकांसाठी सुगम झाला आहे. हा प्रदेश चिंक्वा टेरा राष्ट्रीय उद्यानांतर्गत येत असल्याने इथे वाहने आणण्यावर कडक र्निबध आहेत. पर्यटक केवळ बोटीने, रेल्वेने किंवा चालतच या गावांना भेट देऊ  शकतात.मुख्यत्वे डोंगरउतारावर केली जाणारी शेती आणि पर्यटन हे येथील स्थानिकांचा मुख्य व्यवसाय आहेत. द्राक्षापासून वाईन तयार करून विकणे हादेखील उत्पन्नाचा एक स्रोत आहे. डोंगरउतारावरील द्राक्षांचे मळे, त्यातून जाणाऱ्या पाऊलवाटा, असंख्य प्रकारची रंगीबेरंगी फुले आणि समोर पसलेला अथांग निळाशार समुद्र, वळणावरून दिसणारे नवे गाव, टुमदार घरे, घरांभोवती फुलाफळांनी बहरलेल्या बागा, वातावरणात एक प्रसन्न निवांतपणा.. साहजिकच हा प्रदेश पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.मॉन्टेरोसो हे समुद्रालगत वसलेले ११ चौ. कि. मी. क्षेत्रफळाचे छोटेसे गाव. दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ाअखेरीस इथे लिंबू महोत्सव साजरा केला जातो. ईडलिंबू आणि इतर लिंबू वर्गातील फळांची भरपूर झाडे या प्रदेशात आहेत. साधारण वसंत ऋतूच्या शेवटी ही झाडे लिंबांनी भरगच्च लगडतात तेव्हा लिंबू महोत्सवाची तयारी सुरू होते. गावातील सर्वाचा यात उत्साहाने सहभाग असतो. घरे व दुकाने लिंबांनी सजवली जातात. सार्वजनिक ठिकाणे, गावातील चौक, कारंजेही लिंबांनी सुशोभित केले जाते.लिंबांचा वापर करून तयार करण्यात आलेले देखावे हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण. गावातले प्रत्येक दुकानदार या स्पर्धेत भाग घेतात. लिंबू वापरून कोणी इटलीचा नकाशा बनवतो, तर कोणी वेताचा झोपाळा लिंबांनी सजवतो. कुठे लिंबांच्या फोडींपासून समुद्री जलचरांची चित्रे सजवली जातात, तर कुणी नावाडय़ाचा परिवार लिंबांच्या समुद्रात होडी वल्हवतो आहे असा देखावा रचलेला असतो.दुपारी जेवणानंतर हे सारे देखावे पाहायला आणि लिंबू महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी लोकांची गर्दी सुरू होते. इथे ‘लिंबांच्या सुगंधातील ८००० पावले’ अशी एक वॉकिंग टुरही आयोजित केली जाते. तीत मॉन्टेरोसोमधील कवी युजिनो मोंटालच्या घरापासून लिंबू महोत्सव पाहावयास सुरुवात केली जाते आणि मग गावातल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत या उत्सवाचा आनंद घेता येतो. छोटी दुकाने पाहण्यासारखी असतात. त्यातही विशेष आकर्षण असते ते लहान मुलांनी चालवलेल्या स्टॉलचे. गावातील लहान मुले दोन-दोनच्या गटाने हे स्टॉल मांडतात. िलबू सरबत, िलबाचे आइस्क्रीम, विविध प्रकारचे केक, लेमन टोर्टास, लिमोसिलो, मार्मालेड, लेमन कुकिज अशा पदार्थाची तिथे रेलचेल असते. अगदी छोटी मुले नुसत्या िलबाच्या फोडी घेऊन लोकांना वाटतात. मुलांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. सुटय़ा लिंबांपासून ते अगदी लिंबांची पोती विकणारीही काही दुकाने असतात. लिंबांपासून बनवले जाणारे साबण, शाम्पू, अत्तरे, रूम फ्रेशनर अशा वस्तूंसोबतच िलबांच्या आकाराचे फुगे, टी-शर्ट्स, छत्र्या, टोप्याही आपल्याला इथे विकत घेता येतात. याबरोबरच स्थानिक खाद्यपदार्थाचे स्टॉल्सही फुलून गेलेले असतात. विविध प्रकारचे ‘सी-फूड’, बेसिलच्या पानांपासून बनवलेला पेस्तो सॉस, फोकाशिआ नावाचा पिझ्झाचा प्रकार ही या भागाची खासियत. दिवसाअखेरीस या स्पर्धेतील अव्वल देखाव्यास बक्षीस दिले जाते. त्याचबरोबर सर्वात मोठे लिंबू, सर्वोत्तम सजवलेली खिडकी यांनाही बक्षीस असते.एकंदरीत िलबाच्या रंग, गंध आणि चवीने संपूर्ण वातावरण भारून गेलेले असते. हा उत्सव केवळ पर्यटकांसाठीच आनंददायी न ठरता स्थानिकांसाठीही आर्थिक उत्पन्नाचा ठरतो. या छोटय़ाशा गावाने अत्यंत कल्पकतेने गावाचे पर्यटनमूल्य ज्या प्रकारे वाढवले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद वाटते.जसजशी संध्याकाळ व्हायला लागते तसे गावाच्या मुख्य चौकात संगीताचे सूर कानावर येऊ  लागतात. गावातील कलाकार आपल्या संगीतरचना तिथे सादर करत असतात. हळूहळू सगळा गाव या चौकात गोळा होतो. आपसूकच लोक या संगीतावर ताल धरू लागतात. त्यात वेळ कसा जातो हे कळतदेखील नाही. समुद्रावरून येणारा गार वारा अंगावर घेत, मावळतीचा सूर्य पाहत, डोंगराच्या कुशीत एकमेकांना बिलगून असलेल्या घरांच्या अरुंद गल्लय़ांमधून वाट काढत आपण परतीच्या प्रवासाला लागतो. जिभेवर मात्र अजूनही आंबट-गोड चव रेंगाळत असते ती मॉन्टेरोसोच्या लिंबांचीच!

priyankardevi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 1:01 am

Web Title: monterosso lemon festival
Next Stories
1 ‘खूप लोक आहेत’, पण श्याम मनोहर एकमेव अपवाद!
2 ऐंशीतले सिंहावलोकन
3 ‘दृष्टांत’ : गूढ, तरीही रम्य कविता
Just Now!
X