महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या सभापतीविषयी काही बरे बोलण्याची सोय नसते, असे त्यांच्याविषयीचे चित्र सिनेमा, साहित्य आणि लोकव्यवहारातून रंगवले जाते. ते बहुतांशी खरेही आहे. पण भारत पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले गृहस्थ वेगळे आणि म्हणून दखल घेण्याजोगे आहेत. ‘निर्मलग्राम..हागणदारीमुक्त गाव’ ही योजना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ातील १०२८ गावांमध्ये यशस्वीपणे राबवली. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामीण जनतेच्या सहकार्याने तिला चळवळीचे रूप दिले. त्यांच्या या कामाची त्यांनीच सांगितलेली ही कहाणी आहे. ८ डिसेंबर २००८ रोजी तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ाचा ‘निर्मल ग्राम जिल्हा’ म्हणून गौरव केला, त्या घटनेपासून या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात होते. ‘प्रामाणिकपणा, कष्टांचा वारसा’, ‘सर्वाचे सहकार्य’, ‘शिक्षक-विद्यार्थ्यांचे योगदान’, ‘आर्थिक समस्यांवर तोडगा’, ‘स्वच्छतेचे आर्थिक गणित’ अशा एकंदर वीस प्रकरणांमधून या उपक्रमाची यशोगाथा सांगितली आहे. आपल्यापरीने प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचे मोल संयतपणे सांगण्याकडे आणि श्रेय इतरांनाही देण्याकडे लेखकाचा कल आहे, हे विशेष महत्त्वाचे आहे. या पुस्तकाचे वारली चित्रांनी सजलेले मुखपृष्ठही अतिशय नेमके आणि आशय स्पष्ट करणारे आहे. त्यातला साधेपणा आणि पुस्तकातील यशोगाथा यांची योग्य सांगड घातली गेली आहे.
बाईपणाचा, आईपणाच्या कविता
स्त्री ही अधिक संवेदनशील, भावनाशील असते, असे जे म्हणतात, त्याचा प्रत्यय या कविसासंग्रहातून येतो. आईपण आणि बाईपण दोन्ही निभावताना मिळालेलं सुख आणि ऐश्वर्य, दु:ख आणि व्याकूळता यांच्या काही परी या कवितांतून जाणून घेता येतात. पण तितकंच. त्यापलीकडे काही यातून हाती लागत नाही. अगदी सुरुवातीच्या ‘वारी’ आणि ‘चाहूलीच्या झऱ्यांनी’ या दोन कवितांमध्ये केवळ शब्दप्रतिमांचा खेळ केल्यासारखा वाटतो. शब्दप्रतिमांवर असलेल्या अनिवार प्रेमातून हे घडत असावं. ग्रेस यांच्यावरची कविताही अशीच सामान्य आहे. नुसती त्यांच्या पुस्तकांची नावं गोवून कविता करता येत नसते. तेव्हा असा मोह टाळलेला बरा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना प्रस्तावना लिहिण्यासाठी स्पष्टपणे नकार देता येत नाही, अशा व्यक्तींनाही धर्मसंकटात टाकायचे नसते. या संग्रहाला लिहिलेल्या प्रभाकर बागले यांच्या प्रस्तावनेतून त्यांचे अवघडलेपण आणि चतुरपणाही जाणवतो. रोमँटिक विषयावर कविता लिहिणे वेगळे आणि कवितेविषयी रोमँटिक असणे वेगळे. त्यामुळे या कवितांचा एकच विशेष जाणवतो आणि तो म्हणजे निरागसता. त्याच जाणीवेने कवयित्रीने संग्रहातल्या कविता लिहिल्या आहेत.
अंग भरून वाहणाऱ्या पान्ह्य़ातून – प्रिया धारुरकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद, पृष्ठे – १२८, मूल्य – १२० रुपये.
हळूवार आणि अलवार
मराठी शुभेच्यापत्रांची चलती असण्याच्या काळात एक नाव सर्वतोमुखी झाले होते. ते म्हणजे प्रसाद कुलकर्णी. त्यांनी लिहिलेल्या शुभेच्छापत्रांची भाषा हळूवार आणि अलवार असे. त्यामुळे त्यांना काहींनी ‘शुभेच्छांचा सौदागर’ म्हटले आहे. पण या पुस्तकात कुलकर्णी यांनी ‘मी मुळात कवी आहे’ असे आपल्या मनोगतात सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. हे पुस्तकही कवितामय गद्याचे आहे. म्हणजे गद्य कवितेसारख्या लयीत लिहिले आहे. यात एकंदर ५८ लेख आहेत. प्रत्येक लेख अडीच-तीन पानांचा आहे. लेखांचे विषयही साधेसुधे आहेत. त्यामुळेच ते सुसह्य़ही आहेत.
प्रासादिक – प्रसाद कुलकर्णी, राजेंद्र प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १४४, मूल्य – १४० रुपये.