09 March 2021

News Flash

कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया!

गायिका आणि हिंदी चित्रपट संगीतावर संशोधन करणाऱ्या डॉ. मृदुला दाढे- जोशी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील निवडक संगीतकारांच्या गाण्यांतील सौंदर्यस्थळे आणि त्यांच्यातला अनवटपणा समजावून देणारे रसाळ मासिक

| January 26, 2014 01:01 am

गायिका आणि हिंदी चित्रपट संगीतावर संशोधन करणाऱ्या डॉ. मृदुला दाढे- जोशी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील निवडक संगीतकारांच्या गाण्यांतील सौंदर्यस्थळे आणि त्यांच्यातला अनवटपणा समजावून देणारे रसाळ मासिक सदर..
काही गाणी पहिल्या भेटीत फक्त कुतूहल निर्माण करतात.. तर काही स्लो पॉयझनिंगसारखी आपल्यात भिनत जातात. काही त्यातल्या चमत्कृतीपूर्णतेनं आपले लक्ष वेधून घेतात. तर काही आपल्या माधुर्याने गारूड करतात. अशा काही गाण्यांबद्दल आणि त्यांच्या संगीतकारांबद्दल.. त्यांतले पहिले मानाचे पान जाते ते संगीतकार जयदेव यांना!
‘ये दिल और उनकी निगाहोंके साए’, ‘मैं जिंदगी का साथ’, ‘अभी न जाओ छोडम्कर’ यांसारखी सुरेख गाणी देणारे जयदेव. एक अत्यंत प्रयोगशील संगीतकार. नैरोबीला जन्म, लुधियानात बालपण आणि मुंबईत कारकीर्द असा प्रवास असणाऱ्या जयदेव यांनी चित्रपटांत अभिनय करण्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली. ‘वामन अवतार’, ‘काला गुलाब’ यांसारख्या चित्रपटांत काम केल्यावर ते उस्ताद अली अकबरखाँ साहेबांकडे सरोद शिकले. ‘आँधियाँ’, ‘हमसफर’ यांसारख्या खाँ साहेबांचं संगीत असलेल्या चित्रपटांसाठी संगीत साहाय्यकाचीही त्यांनी भूमिका निभावली. दरम्यान, सचिनदेव बर्मनदादांनाही ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘कालापानी’ यांसारख्या चित्रपटांच्या संगीतात सहाय्य केलं. जयदेव यांचं उर्दू-हिंदी काव्याचं ज्ञान, अनवट संगीतरचना श्रवणीय करण्याचं कसब बर्मनदा जाणून होते आणि ही जबाबदारी म्हणूनच त्यांच्यावर सोपवीत होते. स्व. शामराव कांबळेंशी (सुप्रसिद्ध अ‍ॅरेंजर) गप्पा मारताना समजलं की (‘कालापानी’) ही रचना खरंतर जयदेव यांची.
गायकीला वाव देणाऱ्या अनवट जागा (phrases) आपल्या गाण्यात गुंफणारे, गीताचा ढाचा (Structure) मुळापासून बदलू शकणारे जे अत्यंत मोजके संगीतकार झाले, त्यात जयदेव यांची गणना करावी लागेल. नव्हे, त्यांचे स्थान मानाचे असेल. यासाठी लागणारी प्रतिभा, काळाच्या पुढे असणारी नजर आणि सौंदर्यदृष्टी पुरेपूर होती. त्यांच्याकडे नशिबाची साथ नसेल कदाचित (नव्हतीच), पण प्रतिभेने साथ सोडली नाही. अनेक संगीतकारांचा सृजनाचा आलेख हा पुढे ओसरता उतार दाखवतो, पण एस. डी.नंतर जयदेव हे असे एकमेव संगीतकार म्हणावे लागतील की, शेवटच्या चित्रपटापर्यंत (‘अनकही’) गाण्यांचा दर्जा आणि जयदेव टच कायम होता.
मानवी भावसंबंध, नात्यातली गुंतागुंत, स्वभावातले कंगोरे, काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवणं जसं कर्मकठीण, तसेच हे सगळं सुरावटीत बांधणं किती अवघड असेल. मग झाली चाल अवघड त्याला काय करणार? म्हणूनच बर्मन सल्ला देत बहुतेक की, थोडी सोपी चाल बांध! जयदेव यांच्या चाली मला नेहमी वेगळ्या अर्थानी आव्हानात्मक वाटतात. जिथे जिथे त्या सोप्या करता येऊ शकल्या असत्या असं वाटतं, तिथे हा मोह टाळलेला आहे. आपल्या गळ्यातून त्या जागा अलवारपणे जाव्या याचा ध्यास लागतो, असं काही विलक्षण या चालींमध्ये आहे. पाहा ना, ‘प्रभु तेरो नाम’ (‘हम दोनो’) सारखं गाणं, पुढच्या ओळीत- ‘तेरी कृपा हो जाए’- या शब्दांना दोन वेगळ्या चाली का? याला उत्तर नाही.
अंतऱ्यात ‘हर बिगडी बन जाए’मध्ये जाऽऽए वरची तान मोत्याची लड ओघळावी, तसे अनवट स्वरसमूह घेऊन येते. केवळ अप्रतिम! या प्रकारची त्यांची कितीतरी गाणी- ‘कभी खुदपे, कभी हालात पे’ या गाण्यात या ओळीलासुद्धा लगेचच वेगळ्या चालीत गुंफले आहे. शास्त्रीय संगीतातल्या improvisation (बढत) या सौंदर्यतत्त्वाचा हा किती सुंदर आविष्कार! जयदेवजींच्या गाण्यांतल्या, मुरक्या किंवा खास (phrases) हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. काही जागा खास गायकी अंगाच्या! गमक, मींड, फिरत अशा गाणाऱ्याला स्वत:ची सारी आयुधं परजायला लावणाऱ्या जागा. किंबहुना ही आयुधं परजल्याशिवाय जयदेव यांच्या गाण्यांना हात (गळा) लावूच नये!
कितीतरी उदाहरणं ‘ये दिल और उनकी’मध्ये ‘उनकी’वरची जागा, ‘हर आस अश्कबार हैं’मध्ये ‘तेरे बगैर जिन्दगी’वरची जागा, ‘आपकी याद आती रही’मध्ये ‘आपकी’वरची मोहक करामत..
गाणं एका विशिष्ट तालात चाललेलं असतं. दादरा-केरवा आणि मध्येच एखादी ओळ त्या तालाच्या कचाटय़ातून पूर्णपणे सुटून पुन्हा, त्याच्या कवेत अलगदपणे विसावते. हे अप्रतिमच! अत्यंत कमी काळासाठी तालापासून घेतलेली ही फारकत इतकी गोड की पुन:पुन्हा गाण्याचा मोह पडावा. एखादी वेडी-वाकडी उडी मारून जिम्नॅस्टने दोन पायांवर नीट उभं राहावं, अगदी तसंच ‘तुम्हे हो ना हो’ (‘घरोंदा’)मध्ये अशी एक ओळ येते. ‘मगर फिर भी इस बात का तो यकीन है’- ‘तू चंदा मैं चाँदनी’ या गाण्यातही ‘अपने हाथों से पिया मोहे लाल चुनर ओढा’हीसुद्धा अशीच कसरत- लाजबाब..
जयदेव यांचं ‘गंधार’ स्वरावरचं विलक्षण प्रेम कधी कधी अवचित समोर येतं. कित्येक गाणी गंधाराचं प्राबल्य मुखडय़ात घेऊनच येतात. तो गंधार एखाद्या guiding star सारखा समोर येत राहतो. लुभावत राहतो. ‘आपकी याद आती रही’, ‘अल्ला तेरो नाम’, ‘सीने में जलन’ अशी कितीतरी गाणी.
गौडसारंग (‘अल्ला तेरो नाम’), धानी (‘रात भी हैं कुछ’), पहाडी (‘ये दिल और उनका’), तिलक कामोद (‘ये नीर कहाँ से बरसे हैं’), माँड (‘तू चंदा मैं चाँदनी’) असे राग भारदस्तपणे जयदेवजींच्या गाण्यांत डोकावतात, पण गाण्यांवरचा जयदेव ठसा हाच खरा त्या गाण्यांचा स्थायीभाव आहे.
काही काही स्वरसमूह जयदेवचे लाडके आहेत आणि विशिष्ट सेन्सुअस गाणी असली की हमखास हे स्वरांचं मोहोळ रंग जमवतं. दोन मध्यम आणि कोमल गंधाराचं हे अफलातून कॉम्बिनेशन ‘रात भी हैं कुछ, प्यास थी फिर भी तकाजा न किया’ (‘आलिंगन’), ‘जब से लगन लगायी’ (‘रेश्मा और शेरा’) या गाण्यात जादुई प्रभाव करते.
सुनील दत्तची कामुक नजर, वहिदाचं अप्रतिम सौंदर्य आणि हा स्वरसमूह यांचा एकत्रित परिणाम म्हणजे रोमांचकारी अनुभव आहे. ‘रात भी हैं कुछ भीगी भीगी’ हा स्वरसमूह दत्ता डावजेकरांच्या ‘चांदणे फुलले माझ्या मनी’ या गाण्यातही आढळतो. डीडी आणि जयदेव हे असोसिएशन होतंच नाही. तरी गाण्यांचा पोत, त्यांचा भाव,  visualisation power गाणं प्रत्यक्ष पडद्यावर न पाहता निर्माण होणारं दृष्टिचित्र याबाबतीत या दोन प्रतिभावंतांमध्ये साधम्र्य आढळतं.
गाण्याच्या बंदिस्त चौकटीत मन न रमणाऱ्यांपैकी जयदेव असल्याने अनेकदा अंतरे, मुखडा यांच्या रचनेत वेगळ्याच कल्पना साकार होतात. पहिला अंतरा सप्तकाच्या खालच्या भागात  lower middle बांधणं (जे जोखमीचं ठरू शकतं) ही अशीच एक धाडसी शैली. धाडसी अशासाठी की ऐकणाऱ्याचं लक्ष गाण्यावरून उडण्याची भीती अशा वेळी असते. जयदेव यांच्या समकालीन संगीतकारांमध्ये उंच पट्टीत मुखडे-अंतरे बांधण्याची लाट येत असताना हे धाडसच. या अंतऱ्याच्या ओळी पाहा- ‘पहाडों की चंचल किरन चूमती है’ (‘ये दिल और उनकी’), ‘अभी अभी तो आई हो’ (‘अभी न जाओ छोडकर’), ‘इन भूलभुलैया गलियों में’ (‘दो दिवाने शहर में’), ‘संस्कृती के विस्तृत सागर में’ (‘कोई गाता मैं सो जाता’).
जयदेवजींच्या गाण्यांत अंतऱ्याची शेवटची ओळ मुखडय़ाला अशा अजोड, अतूट धाग्याने विणलेली असते की तो ‘जोड’ खटकू नये. ही काही गाणी आठवा.
‘अस्मानी, या आसमानी!
अस्मानी रंग की आँखों में
बसने का बहाना ढूँढते हैं- ढूँढते है।
आबोदाना, ढूँढते है, इक आशियाना ढूँढते है’
(‘दो दिवाने’)- (‘घरोंदा’).
‘कोई मेरा सिर गोदी में रख सहलाता – मैं सो जाता- कोई गाता मैं सो जाता’ (‘आलाप’).
सगळं कसं सलग-अव्याहत. अंतऱ्यातून मुखडय़ावर आलो कसे अलगदपणे- कळणारही नाही.
वाद्यवृंदाचा orchestration वापर जयदेवजींनी अगदी नेमका केल्याचं आढळतं. त्यांच्या गाण्यात काही वाद्ये प्रकर्षांने ऐकू येतात, ती म्हणजे बासरी (‘ये दिल और उनकी’, ‘तू चंदा मैं चाँदनी’), सरोद (‘आपकी याद आती रही’, ‘जोगिया तो से नैना’), अ‍ॅकॉर्डिअन (‘दिल जवा हैं आरजू जवाँ’), ग्लॉकन्सपीएल (‘मैं जिन्दगी का साथ निभाता चला गया’, ‘अभी न जाओ छोडकर’)- लायटर म्युझिक – (वादक- केरसी लॉर्ड) इ.
अशा या संगीतकाराची प्रायोगिक गाणी आठवायची झाली तर सगळीच गाणी पुढय़ात घेऊन बसावं लागेल! तरीही, ही काही अनमोल रत्नं!
१. ‘तू चंदा मैं चाँदनी’ (‘रेश्मा और शेरा’)
प्रयोगशीलतेच्या बाबतीत या गाण्याला मी सर्वात जास्त पसंती देईन. तीनही अंतरे वेगवेगळ्या चालीत, तरीही अंतऱ्याचा शेवट ते मुखडा हा प्रवास अत्यंत रोमांचकारी, अंतऱ्यात दादरा ते केरवा आणि केरवा ते दादरा असा change over केवळ सुंदर, लताबाईंचा तीव्र भेदक आवाज, उच्च दर्जाचं काव्य, वाळवंटाची पाश्र्वभूमी.. सगळं केवळ अवर्णनीय.
२. ‘आपकी याद आती रही’ (‘गमन’)
जयदेवजींचं सरोदशी असणारं नातं दाखविणाऱ्या गाण्यातल्या जागा. अर्ध गाणं तालाच्या साथीशिवाय मुक्त पद्धतीने असणं आणि दोन अंतऱ्यानंतर हळुवारपणे प्रवेश करणारा डफ, टिपऱ्यांचा ठेवा. ‘चष्मेनम मुस्कुराती रही..’ (डोळ्यात आसू, ओठात हसू अशी स्थिती) ही भावना उत्कटपणे दाखविणारं अप्रतिम गाणं.
३. ‘जिन्दगी, जिन्दगी मेरे घर आना’ (‘दूरियाँ’)
एका ओळीला (मुखडा) दोन चालींमध्ये वळवणं यातही आहेच, पण जवळपास सारखे शब्द असलेले दोन अंतरे वेगळ्या चालींमध्ये बांधलेले आहेत. भूपेंद्र आणि अनुराधा पौडवाल यांचे हे अंतरे ऐका..
‘मेरे घर का सीधा सा इतना पता है। मेरे घर के आगे मुहब्बत लिखा है
न दस्तक जरुरी, न आवाज देना..’
यासारख्या ओळींच्या चाली मात्र वेगवेगळ्या- किती वेगळं गाणं दिलंय जयदेव यांनी.
४. ‘तुम्हें हो ना हो मुझको तो’ (‘घरोंदा’)
एक गंमत या गाण्यात ‘पॉज’नी करून ठेवलीय. ‘मुझे प्यार तुमसे नहीं है नहीं है’ म्हणताना, एक पॉज त्या ‘नहीं’नंतर असा येतो की ‘प्यार हैं’चं सत्य मिश्कीलपणे बाहेर येतं..
असाच एक पॉज ‘रात भी है कुछ भीगी भीगी’ (‘रेश्मा और शेरा’)मध्ये कसा प्रभावी ठरतो पाहा..
‘तपते दिलपर यूँ गिरती है
तेरी नजर से प्यार की शबनम
जलते हुए जंगलपर जैसे
बरखा बरसे रुक रुक-थम थम’
यामध्ये ‘रुक रुक-थम थम’ या दोन शब्दांमध्ये हा जीवघेणा पॉज असा काही येऊन भिडतो की ती बरखा, वणवा पेटवायलाच निघालीय असं वाटावं..
५. ‘अल्ला तेरो नाम..’
जयदेवची गाणी अवघड होतात ती शास्त्रीय संगीतामुळे नव्हे, तर त्यातल्या मुश्कील मुरक्या आणि लयीच्या अत्यंत नाजूक बारकाव्यांमुळे किंवा बुद्धिमान स्वराकारांमुळे (phrase). कारण ‘अल्ला तेरो नाम’मधून गौडसारंगच नव्हे, तर इतरही अनेक पैलू समोर येतात. गप्पांच्या ओघात या गाण्याच्या विलक्षण बांधणीतील एक गंमत पं. उल्हास बापट यांनी लक्षात आणून दिली. ते म्हणाले, ‘बघ, याच्या मुखडय़ात ज्या पद्धतीचे सूर आहेत, अगदी तसेच स्वर ‘सा’ बदलून अंतऱ्यात आहेत.’ खरंच की! मुखडा (‘अल्ला तेरो नाम’) आणि अंतऱ्याची ओळ (‘ओ सारे जग के’) एकच पॅटर्न घेऊन येतात. फक्त आधार स्वर (सा) बदलतो. पाहा, कसं ते..
मुखडा – सा ग रे म ग
अंतरा – म ध प नी ध
फक्त आधाराचा स्वर बदलला की अंतऱ्याची चाल तयार! ही खरी कम्पोझरची मॅजिक.
अशी अनेक गाणी.. ‘मीठी मीठी सी चुभन’, ‘माँग में भरले रंग सखी री’, ‘ये तीर कहाँ से बरसे है’, ‘पीतल की मोरी गागरी’..
लिली कोर्ट (चर्चगेट) या इमारतीत छोटीशी खोली भाडय़ाने घेऊन राहणारे जयदेव.. फिल्म इंडस्ट्रीचे व्यवहार शेवटपर्यंत न जमल्याने घरमालकाने सामान घराबाहेर काढेपर्यंत वेळ आल्याने व्यथित झालेले जयदेव.. ‘हम दोनो’च्या संगीताच्या यशानंतरही नवकेतनच्या बॅनरखाली कुठलाच चित्रपट देव आनंदने दिला नाही, ही खंत कायम उरात बाळगणारे जयदेव.. लता व एस. डी. बर्मनदांमध्ये वितुष्ट असणाऱ्या काळात त्या दोघांमधला संपर्कदुवा असणारे जयदेव.. आणि लता मंगेशकर पुरस्काराचे पैसे मिळण्याआधीच या जगाचा निरोप घेणारे जयदेव..
शेवटी एकच म्हणावंसं वाटतं, जयदेवसारखा संगीतकार तुमच्यातला गायक समृद्ध करतोच; पण तुमचं ऐकणं, संगीताची जाण वरच्या पातळीवर नेऊन ठेवतो.
सलाम जयदेवजी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 1:01 am

Web Title: musician jaidev
टॅग : Hindi Songs,Music,Musician
Just Now!
X