नरेन्द्र चपळगावकर

विचारांवर निर्लेप निष्ठा असलेले अनेक स्वार्थत्यागी कार्यकत्रे डाव्या चळवळीला मिळाले. प्रभाकर ऊर्ध्वरेषे हे त्यांपैकीच एक! १९४०-५० च्या दशकांत कम्युनिस्ट पक्षात पूर्णवेळ कार्यकर्ते आणि चळवळीच्या नियतकालिकांचे साक्षेपी संपादक राहिलेल्या ऊर्ध्वरेषेंनी ‘हरवलेले दिवस’ या प्रांजळ आत्मकथनातून आपले अनुभव मांडले होते. प्रभाकर ऊर्ध्वरेषेंच्या जन्मशताब्दीची सांगता ९ जानेवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…

राजकारणात ‘कार्यकर्ता’ असा एक वर्ग असतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाने, विचाराने भारलेले तरुण आपल्या आयुष्याचा मोठा भाग त्या ध्येयासाठी सहजपणे देऊन टाकतात आणि स्वतला या वर्गात सामील करून घेतात. नेत्यांची नावे इतिहासात नोंदली जातात. नेत्यांचे बरेवाईट निर्णय ज्या शेकडो कार्यकर्त्यांच्या जीवनाचे प्रवाह निश्चित करतात, त्या कार्यकर्त्यांची नोंद त्या इतिहासात राहण्याची शक्यताच नसते. स्वातंत्र्याच्या चळवळीने असे अनेक कार्यकत्रे निर्माण केले. १९१७ साली रशियात झालेल्या राज्यक्रांतीने आणि ती घडवणाऱ्या विचारांनी शेकडो तरुणांना झपाटून टाकले. आपल्या कुटुंबाच्या चरितार्थापेक्षाही त्यांना राजकीय परिवर्तनाची चिंता अधिक वाटू लागली. तर्काच्या कसोटीवर नेत्यांचे म्हणणे तपासून घेण्याऐवजी त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवून एका धुंदीत जगणे हेच त्यांनी आपले इतिकर्तव्य मानले. या कार्यकर्त्यांना ऐहिक लाभ तर होतच नसतात; त्यांना मिळते ते फक्त स्वतच करून घेतलेले आत्मसमाधान!

येत्या ९ जानेवारीला ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकत्रे व लेखक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण होतील. कनिष्ठ मध्यमवर्गीय आयुष्यातसुद्धा एक प्रकारचा शांतपणा असतो; तोही ऊर्ध्वरेषेंना लाभला नाही. एम.ए.चा अभ्यास इंदूरला करत असतानाच साम्यवादी विचार व चळवळींचे आकर्षण त्यांना वाटू लागले होते. लग्न झालेले असल्यामुळे अर्थार्जन करणे भाग होते. नोकरीच्या शोधात एका नातेवाईकाच्या सल्ल्याने ते ब्रह्मदेशात गेले. दुर्दैव असे की, थोडय़ाच दिवसांत जपान्यांचे आक्रमण तेथेही सुरू झाले. राजधानी रंगूनवरही बॉम्ब हल्ला झाला. ब्रिटिश साम्राज्य सरकारने तेथून काढता पाय घ्यायचे ठरवले. आपल्या नोकऱ्या आणि घरदार यांना मुकलेल्या दुर्दैवी भारतीयांचे तांडे शेकडो मलांची पायपीट करून, कोसळत्या पावसात झाडाखालीसुद्धा रात्री काढत कसेबसे भारतात येऊन पोहचले. त्यातल्याच एकात प्रभाकर ऊर्ध्वरेषेंचाही समावेश होता. आपल्या या अनोख्या दुर्दैवी प्रवासाबद्दल त्यांनी महायुद्धाच्या सरत्या काळात ‘किलरेस्कर’ मासिकात लिहिलेले लेख त्या काळात गाजले होते.

बेचाळीसच्या लढय़ाला विरोध करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हिटलरने रशियावर आक्रमण करताच आपली भूमिका बदलली आणि साम्राज्यवादी युद्धाचे रूपांतर लोकयुद्धात झाले! भारतात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचे पडसाद ऊर्ध्वरेषेंच्या मनातही उमटत होते. क्रिप्स योजना काँग्रेसने स्वीकारायला हवी होती, असे त्यांना वाटत होते. बेचाळीसच्या लढय़ाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्टांच्या सभा लोक उधळून लावत होते. घरची ओढगस्त इतकी होती की, मनात नसतानाही सरकारच्या माहिती खात्यात त्यांना काही काळ नोकरी करावी लागली. ही नोकरी संपता संपताच ‘किलरेस्कर’मधील त्यांचे लेख वाचून ऊर्ध्वरेषेंच्या लेखनक्षमतेविषयी कम्युनिस्ट नेते बी. टी. रणदिवे यांच्या मनात विश्वास निर्माण झाला होता. त्यांना पक्षाच्या ‘लोकयुद्ध’ या मराठी मुखपत्रासाठी एका उपसंपादकाची आवश्यकता होती. त्यांनी ऊर्ध्वरेषेंना निमंत्रण दिले. कम्युनिस्ट विचारांविषयी आणि चळवळीविषयी पूर्वीपासून त्यांना असलेल्या आकर्षणामुळे ‘लोकयुद्ध’मध्ये रुजू झाल्यानंतर काही काळातच ते पक्षाचे पूर्णवेळ कार्यकत्रे झाले. १९४४ ते १९५१ अशी सुमारे साडेसात वर्षे ते पूर्णवेळ कार्यकत्रे होते. त्यांच्या पत्नी- उषाताई प्रारंभी या नव्या भूमिकेबद्दल नाखूश होत्या; पण नंतर त्याही पक्षकार्यात सामील झाल्या. त्यांनी ‘कम्युन’मध्ये राहणे स्वीकारले आणि पक्षाच्या कलापथकातसुद्धा त्या काम करू लागल्या.

‘हरवलेले दिवस’ हे प्रभाकर ऊर्ध्वरेषेंचे आत्मनिवेदनपर पुस्तक. रूढार्थाने ते आत्मचरित्र नसले; तरी आपल्या जीवनातील महत्त्वाचा काळ त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकत्रे म्हणून घालवला, त्या काळाच्या आठवणी सांगणारे हे पुस्तक आहे. पुस्तकाप्रारंभी लिहिलेल्या प्रास्ताविकात- ‘१९४० ते १९५० या कम्युनिस्ट आंदोलनातील महत्त्वाच्या व वादळी कालखंडातील अनुभवांचे प्रांजळ चित्रण आपल्या लेखनात त्याकाळी पक्षात असलेल्या कुणीही केलेले नाही’ हे वास्तव त्यांनी नमूद केले आहे. काही कम्युनिस्टांची आत्मनिवेदनपर पुस्तके मराठीत प्रसिद्ध झालेली आहेत; पण ती वस्तुनिष्ठ चिकित्सा टाळूनच लिहिली गेलेली आहेत. पक्षाच्या चुकांबद्दल, आपण त्याविरुद्ध बंड का केले नाही याबद्दल, पक्षात आपण अनुभवलेल्या घुसमटीबद्दल खुलेपणाने आठवणी सांगणारे पुस्तक मराठीत प्रसिद्ध झालेले नाही. थोडय़ाफार फरकाने हीच गोष्ट इंग्रजीतील अशा लेखनाबद्दलही आहे. ‘अ ट्रॅव्हलर अ‍ॅण्ड द रोड’ या मोहित सेन यांच्या पुस्तकासारख्या काहींचा अपवाद! मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या काळात खुलेपणाचे धोरण राबवल्यावर सोव्हिएत साम्राज्याचा डोलारा कोसळला. कम्युनिस्ट राज्यपद्धतीवर व तत्त्वज्ञानावर आयुष्यभर निष्ठा ठेवणाऱ्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांचे भावजीवन अकस्मात उद्ध्वस्त झाले. त्यांच्यापैकीही कुणीच या अनुभवाबद्दल लिहिलेले नाही.

प्रभाकर ऊर्ध्वरेषे पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात नव्हते; परंतु जी कामे पक्षाने त्यांना सांगितली त्यापैकी काही वरिष्ठ नेत्यांच्या जवळ वावरण्याची संधी देणारी होती. भारतातील पक्षाचे धोरण ठरण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सहभागी होऊन पाहता आली नाही, तरी इथला पक्ष आपले अंतिम धोरण कुणाच्या निर्देशानुसार व कसे ठरवतो हे मात्र त्यांना पाहावयास मिळाले. आत्मसमर्थनाचा, पक्षाच्या चुकांबद्दल स्तब्ध राहून त्यांचेही समर्थन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लिखाणापेक्षा वेगळे असलेले ‘हरवलेले दिवस’ हे मराठीतले एक आगळे आठवणींचे पुस्तक आहे. जनतेपासून तुटून राहिले आणि पक्षाच्या सिद्धांताप्रमाणेच सगळे होत आहे असे गृहीत धरले म्हणजे भ्रम कसे निर्माण होतात याबद्दलचे एक उदाहरण त्यांनी सांगितले आहे. ९ जानेवारी १९४९ रोजी रेल्वे संपाची हाक पक्षाने दिली होती. अभूतपूर्व संप होईल आणि नंतर जनतेचा विशेषत: कामगारांचा उठाव होईल असा नेत्यांचा अंदाज होता; प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. अगदी संपसुद्धा झाला नाही. अशा फसगतींची कबुली तर सोडा, पण कारणमीमांसासुद्धा नेत्यांनी जाहीरपणे केलेली नाही. पक्षाचा इतिहास किंवा पक्षनेत्याचे चरित्र हे केवळ पक्षाच्या ठरावातून व त्या भाषेतून सांगता येत नाही. त्या ठरावाच्या मागे पुष्कळ गोष्टी घडलेल्या असतात. अनेकांचे स्वतंत्र विचार दडपून टाकलेले असतात. ऊर्ध्वरेषेंसारखा एखादाच पक्षातून निवृत्ती घेतलेला प्रांजळ कार्यकर्ता काही सत्य सांगू शकतो. एक प्रश्न मात्र शिल्लक राहतो- राजकीय घटनांचा क्रम आणि त्या घटनांची कारणमीमांसा लक्षात घेणारे ऊर्ध्वरेषे उघडउघड चुकीच्या व तर्कविसंगत धोरणांना राबवू इच्छिणारांच्या इतके कहय़ात कसे गेले? जनतेला बंडाची शिकवण देणाऱ्या संघटनांनाही आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणविषयक निर्णयांविरुद्ध मतसुद्धा व्यक्त करू नये असे का वाटते?

पक्षाचे पूर्णवेळ कार्यकत्रे म्हणून ऊर्ध्वरेषे काम करत असतानाच त्यांनी ‘मशाल’, ‘लोकयुद्ध’, ‘नवे जग’ अशा नियतकालिकांचे संपादनही केले. पक्षत्यागानंतरच्या काळात वाशीम, खामगाव आणि पुसद अशा विदर्भातल्या काही महाविद्यालयांत आणि शेवटी नागपूर विद्यापीठातही त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. पुसदला तर ते प्राचार्यही होते. संस्थाचालक त्यांचे मित्र, पण शिक्षणसंस्था चालवण्याच्या हल्लीच्या पद्धतीत ऊर्ध्वरेषे बसणेच शक्य नव्हते. गोडीगुलाबीने मित्राची समजूत काढून त्यांनी वर्षभरातच प्राचार्यपदाचा राजीनामा दिला आणि ते नागपूरला गेले. ऊर्ध्वरेषे इंग्रजीचे महत्त्व जाणत असले, तरी शिक्षण आणि व्यवहार दोन्ही ठिकाणी मराठीला यथोचित स्थान दिले पाहिजे असाच त्यांचा आग्रह असे. मलाच एकदा त्यांनी- ‘न्यायव्यवस्था आणि न्यायप्रक्रिया यांच्याबद्दल एखादे मराठी मासिक वा द्वैमासिक तुम्ही चालवावे,’ अशी सूचना केली होती. ‘वकिली करण्यापेक्षाही ते महत्त्वाचे काम आहे,’ असे ते पत्रातूनही लिहीत असत. १९८३ साली लिहिलेल्या पत्रात त्यांनी- ‘काळ निघून चालला आहे, पाच-दहा वर्षांनी हे तुम्हाला करता येणार नाही म्हणून हे लवकर सुरू करा,’ असा पुन्हा आग्रहही केला होता. त्यांची ही सूचना मी अमलात आणू शकलो नाही; परंतु दुसरे एक त्यांचे म्हणणे मात्र मी लक्षात घेतले. तोपर्यंत मी विपुल स्फुटलेखन केले होते. ‘अशा स्फुटलेखनाचा उपयोग तात्कालिक असतो. तुम्ही अभ्यासलेल्या विषयाबद्दल पुस्तकेच लिहा,’ अशी त्यांनी प्रेमाच्या अधिकाराने सूचनाही केली. त्यांची ही सूचना मी जमेल तेवढी अमलात आणली.

प्रभाकर ऊर्ध्वरेषेंचा माझा अधिक परिचय झाला तो मुकुंदराव- शांताबाई किलरेस्करांमुळे! पूर्वी असलेली आमची थोडीशी ओळख दृढ झाली आणि तिचे स्नेहात रूपांतर झाले. तसे त्यांच्या आणि माझ्या वयात वीस वर्षांचे, म्हणजे एका पिढीचे अंतर होते; पण या अंतराचा त्यात कधी अडथळा आला नाही. मुकुंदरावांच्या घरी रोज सकाळी चहाची बैठक असे. पुण्यात माझा मुक्काम असेल  तर मीही त्यात सामील होई. जवळच राहणारे ऊर्ध्वरेषे नेहमी तेथे येत. गप्पांत वेगवेगळे विषय निघत. ऊर्ध्वरेषे ‘किलरेस्कर’मध्ये लिहू लागले त्या वेळी शंकरभाऊ (मुकुंदरावांचे वडील) संपादक होते. पुढे मुकुंदराव संपादक झाल्यानंतर लेखक आणि संपादक या नात्यापेक्षा ‘मित्र’ हेच नाते त्यांच्यात अधिक दृढ झाले. ‘किलरेस्कर’ मासिकाच्या संपादकीय बठकींना ऊर्ध्वरेषे अधूनमधून हजर असत. १९७७ सालच्या इंदिरा गांधींच्या पराभवानंतर झालेल्या एका संपादकीय चच्रेच्या बठकीत- ‘इंदिरा गांधींची आपण मुलाखत घेऊ..’ अशी सूचना त्यांनी आणि मी केली. मुकुंदरावांनी ती स्वीकारली. ते आणि ऊर्ध्वरेषे यांनी इंदिराबाईंची मुलाखत घेतली. ती मुलाखत प्रसिद्ध झालेला अंक दोन-तीन वेळा छापावा लागला.

एकदा त्यांच्या घरी सकाळी गेलो असताना ते एका वहीवर एकाग्रपणे काही लिहीत होते. मी कुतूहलाने त्यांना विचारले की, ‘‘काय लिहिता आहात?’’ तेव्हा त्यांनी आठ-दहा वहय़ाच मला दाखवल्या. शाळेतील मुलांच्या वापरात असतात तशा आठ-दहा वहय़ा ऊर्ध्वरेषेंच्या सुवाच्च लेखनाने गच्च भरलेल्या होत्या. कम्युनिस्ट पक्षातील त्यांच्या दिवसांच्या त्या आठवणी होत्या. त्या वाचता वाचता त्यात मी रंगून गेलो. त्याबद्दल मी ‘मौज’च्या श्री. पु. भागवतांशी बोललो. श्रीपु त्यांना ओळखत होतेच. त्यांनी त्या वहय़ा मागवून घेतल्या, काही सूचना केल्या आणि नंतर ‘हरवलेले दिवस’ (१९८९) प्रसिद्ध झाले.

आर्थिक हलाखी आणि घुसमटवून टाकणारे पक्षीय आयुष्य यांच्या संगतीत दीर्घकाळ घालवलेल्या ऊर्ध्वरेषेंना स्वस्थतेत आणि आरामात उर्वरित काळ घालवण्याची संधी मात्र नव्हती. हृदयविकाराच्या व्याधीशी झगडत असतानाही इतरांची काळजी त्यांचे मन करतच असे. एकदा पुण्यातल्या एका रुग्णालयात मी त्यांना भेटायला गेलो. ‘‘लवकर दाखल का झाला नाहीत, पाच-सात दिवस घरीच का वाट पाहिली,’’ असे विचारले असता- ‘‘मी रुग्णालयात दाखल झालो तर घरच्यांना त्रास होतो,’’ असे उत्तर, तेही मोठय़ा संकोचाने त्यांनी दिले.

ज्यांच्या निष्ठा निर्लेप होत्या, ज्यांच्या मनात पक्षातील कामाचा व्यक्तिगत लाभ मिळावा असा विचार कधी आला नाही आणि जे लोकप्रिय नेते नसल्यामुळे दीर्घकाळ लोकस्मृतीत राहण्याची शक्यता नाही, असे अनेक स्वार्थत्यागी कार्यकत्रे मुख्यत: डाव्या चळवळीला मिळाले. राजकीय तत्त्वज्ञ काही स्वप्ने पाहतात. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक कार्यकत्रे आपल्या आयुष्याचा मोठा भाग देतात. राजकारणात त्यांना महत्त्व मिळाले नाही, तरी त्यांच्या जीवनाचे मोल कमी होत नाही. अशाच एका प्रांजळ कार्यकर्त्यांची जन्मशताब्दीची सांगता पुढील आठवडय़ात होत आहे.

nana_judge@yahoo.com