मकरंद देशपांडे

जाहिरात लिहिणारी निवेदिता पोहनकर मला म्हणाली की, ‘‘मला नाटक या माध्यमासाठी लिहायचंय!’’ मी म्हटलं, ‘‘लिहून टाक.’’ तिनं माझी ‘जोक’, ‘सा ही बेसूरा’, ‘सर सर सरला’ ही नाटकं पाहिली होती. माझ्या नाटकांबद्दल तिला कुतूहल होतं आणि त्याची मांडणी तिला आकर्षक वाटली होती. तिनं मला स्पष्ट सांगितलं, ‘‘तुझ्यासारखं जमणारच नाही, पण तू ‘लिही’ म्हणण्यानं हुरूप आलाय.’’ मला एक गोष्ट तिच्याबद्दल माहिती होती. ती अशी की, जाहिरातीसाठी खूप कमी शब्दांत खूप काही सांगावं लागत असलं तरी ती माझी नाटकं बघून खूप सविस्तर आणि खूप वेळ बोलायची. पंडित सत्यदेव दुबेंनाही वाटायचं की, तिची एखाद्या विषयाची आकलनशक्ती चांगली आहे.

मला नेहमी वाटतं, नाटककाराला एखाद्या विषयापाशी ध्यान लावावं लागतं. त्याची सुरुवात ठाण मांडून बसण्याने करायची असते. मग रंगमंचाच्या एन्ट्री, एक्झिटप्रमाणे विषयासंबंधी येणाऱ्या, पण काही नको असणाऱ्या विचारांची ये-जा बघायची असते. विषयाचा विशेष आशय लक्षात आला की पात्रांचा शोध सुरू. मग त्या पात्रांना नाटकीय अंग द्यायचं म्हणजे नाटकात प्रत्येक पात्राचं स्वगत नसलं (स्वगत म्हणजे नाटकातलं पात्र एका स्पॉटलाइटमध्ये त्याच्या मनातलं बोलतं.) तरी त्याचं स्वगत लिहून काढायचं म्हणजे त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळते. जवळपास एखाद्या सायकिअ‍ॅट्रिस्ट किंवा सायकोअनॅलिस्टची भूमिका घेऊन लेखकानं पात्राला बोलतं करायचं; आणि मग त्याच्या मनातले राग-द्वेष, लोभ-मत्सर, माणुसकी-कृतघ्नता लक्षात येते. त्याचा वापर नाटकाच्या विषयाला कोणत्या रसात सादर करायचं आहे यासाठी होतो.

स्वगतासाठी एका गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे पात्राच्या विश्वाची. त्याचं विश्व माहिती असलं किंवा आपण असं म्हणू या की पात्राला ओळखीचं विश्व आपण दिलं की, मग पात्राला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडत नाही. तो एखाद्या अकरा महिन्यांच्या भाडेकरूसारखा घरात जरी राहत असला, तरी फ्लॅटचा मालक असल्यासारखा आत्मविश्वासानं राहतो- जरी बिल्डिंगच्या खालच्या मुख्य बोर्डवर मालकाचं (लेखकाचं) नाव असलं, तरी फ्लॅटचं इंटिरिअर भाडेकरू (पात्र) आपल्याला पाहिजे तसं करून घेतो. याचं कारण- पात्राला दिलं गेलेलं विश्व.

निवेदिता हुशार निघाली. तिनं ऐंशी मिनिटांचं स्वगत लिहिलं. मी अवाक् झालो. कारण त्या ऐंशी मिनिटांत तिनं नंदिनी जोशी हिची नऊ ते एकवीस वर्षांपर्यंतची जीवनकहाणी लिहिली. नंदिनी जोशी राज्याच्या किंवा देशाच्या इतिहासाचा भाग नव्हती. म्हणजे सगळ्यांना माहिती असलेली किंवा जिचा कोणी उदोउदो केला असेल अशी नव्हती. ती एक मध्यमवर्गीय केमिकल इंजिनीअर आणि फूड टेक्नॉलॉजिस्ट आई-वडिलांची मुलगी. पण निवेदितानं नंदिनीला मॅजिकल रिअ‍ॅलिझमची (वास्तवतेला जादूची) फोडणी दिली म्हणावं की जादूनं कल्हई केली ते तुम्ही (वाचकानं) ठरवा. किंवा एखादी वेगळी उपमा तुम्हाला सुचली तर तसं समजा. पण त्यामुळे वास्तवाच्या जगण्याला एक वेगळंच परिमाण मिळतं. जीवनाची आणखीन एक डायमेंशन उभी राहते. तशी उभी राहिली म्हणजे २डी फिल्म ३डी-च्या चष्म्याने बघावी तशी भासते.

लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत नागपूरला गेल्याने नंदिनी जोशीला सनस्ट्रोक अर्थात उन्हाची झळ लागल्याने डोकं दुखणं, ताप येणं, उलटय़ा होणं चालू असताना आजीने तांब्याच्या लोटय़ात पाणी घालून तो लोटा नंदिनीच्या डोक्यावरून, खांद्यावरून फिरवला. जिथे दुखत होतं तिथे तिथे चिकटवला.

नंदिनीला बरं वाटलं. खरं तर तिला आजीने जादू केल्यासारखं वाटलं आणि आजीनेही सांगून टाकलं की, तो आजीचा जादूई लोटा आहे. नंदिनीच्या आईनं ओरडून आजीला म्हणजे तिच्या आईला सांगितलं, ‘‘तांब्याच्या लोटय़ातल्या थंड पाण्याने अंगातली उष्णता शोषून घेण्यात जादू नाही, विज्ञान आहे; पण आजी आणि नंदिनीमध्ये लोटय़ाचं जादूई नातं सुरू झालं. दोन वर्षांनी आजी गेली; पण आजीकडून नंदिनीला लोटा मिळाला. आपल्या आजीच्या जाण्याचा नंदिनीला धक्का बसला; पण तिची पाच वर्षांनी लहान बहीण मनाली त्याच लोटय़ाने तिला बरं करण्याचं नाटक करते. आणि नंदिनी आजीच्या आठवणींनी किंवा लोटय़ाच्या जादूने नक्की सांगता यायचं नाही, पण बरी होते. आता या जादूई लोटय़ामुळे नंदिनीत एक वेगळीच शक्ती आली आहे. घरी आई-वडिलांच्या टोकाला गेलेल्या भांडणांना ती हातातला लोटा धरून शांतता आणते. मनाली आपल्या मोठय़ा बहिणीला तोंडाचा ‘आ’ करून पाहते.

मनालीचं अभ्यासातही लक्ष लागत नसलं की ती ताईला तिच्या डोक्याजवळ लोटा धरायला सांगते. मग तिला सद्बुद्धी होते, मन स्थिर होतं आणि अभ्यासही होतो. नंदिनीच्या आजीचा तो लोटा वडील जप्त करतात; पण आजीच्या आठवणींच्या दु:खाश्रूंनी आईच्या हृदयाला पाझर फुटतो. लोटा परत नंदिनीला दिला जातो. आता लोटय़ाच्या परत येण्यात लोटय़ाच्या जादूचा हात की नंदिनीच्या दु:खाश्रूंचा तुटलेला बांध? कारण काहीही असो, पुन्हा नंदिनी आणि मनालीची जोडी जादूचा लोटा बरोबर घेऊन एकामागून एक परीक्षा पास होतात. मात्र, लोटय़ाला लपवून वापरण्याचं कसब त्यांनी आत्मसात केलेलं असतं. आईला वाटतं, नंदिनीनं पुण्यात ग्रॅज्युएशन करावं. नंदिनी पुण्याला गेल्यावर मनाली-नंदिनी जोडी फुटते; पण शेवटी लोटा जादूई असल्यानं त्यांना अंतरामुळे फरक पडत नाही. मनालीला नंदिनी फोनवरसुद्धा जादू पाठवते.

नंदिनीला आपल्या आजीच्या लोटय़ाची ताकद त्या दिवशी कळते; जेव्हा पुण्यातल्या आपल्या खर्चासाठी पैसे कमवायला ती एका पिझ्झा पार्लरमध्ये काम करत असताना, कोरेगावच्या एका प्रतिष्ठित लोकप्रिय आश्रमांतील विदेशी भक्त (डच) पिझ्झा खाऊन जाता जाता तिच्या कॅश टेबलवर ठेवलेल्या आजीच्या लोटय़ात चॅरिटी म्हणून सुट्टे पैसे टाकतात. नंदिनी तेव्हा त्याला लोटा काय आहे ते सांगते. तो भक्तच, त्याचा या सगळ्या गोष्टींवर जास्त विश्वास. तो लगेच डोळे बंद करून काहीतरी मागतो (पुटपुटतो) आणि पैसे टाकून निघून जातो. दुसऱ्या दिवशी आश्रमातल्या आणखीन एका भक्ताला पाठवतो. कारण त्याचा हरवलेला पासपोर्ट त्याला सापडतो. दुसरा आफ्रिकन भक्त भलत्याच म्हणजे अशक्यप्राय कारणासाठी येतो. त्याला कोरेगावमधलं जुनं गुजरात्यांचं घर विकत घ्यायचं असतं; आणि त्या घरातली आजी ते घर सोडायला तयार नसते. नंदिनीच्या आजीच्या लोटय़ाने तिला सद्बुद्धी होते. घरातल्या सगळ्यांना ते विकायचं असतंच आणि आता तिचा विचार बदलल्याने नुसत्या विदेशी नाही तर देशी लोकांचाही विश्वास नंदिनीवर बसतो.

पिझ्झा पार्लरमध्ये लोक आता पिझ्झा खायला कमी आणि अडचणी दूर करायला जास्त येतात. त्यामुळे मालक तिला नोकरीवरून काढून टाकतो. त्यामुळे आता ती एक घर भाडय़ानं घेऊन छोटा घरगुती सेवाधाम सुरू करते. त्यात भक्तांची मानसिक स्थिती बळकट करण्यावर जोर असल्यानं श्रद्धा जागृत होते; अंधश्रद्धा नाही. नंदिनी खूप कमी वेळेत ‘माँ नंदिनी’ होते. तिचे भक्तच आता तिची सगळी कामं करतात. अर्थात आता कॉलेजात जाणं शक्य नाही. खरं तर प्रिन्सिपल तिला कॉलेजमधून काढतात. तिच्या घरी फोन करून तिच्या आईला पुण्यातील वस्तुस्थिती सांगतात. आई पुण्याला येऊन थक्क होते. आपली मुलगी खरंच आपल्या पायावर उभी राहिलीये; पण तिनं लोकांना आजीच्या लोटय़ाची कुबडी दिलीये आणि त्यांना तिच्यावर अवलंबून ठेवायला भाग पाडलंय, हे पाहून तिला राग येतो. ती रागावून नंदिनीशी बोलणं बंद करते. नंदिनी आईला समजावण्याचा प्रयत्न करते, पण आईला काहीही पटत नाही.

‘माँ नंदिनी’ तरुण मुला-मुलींसाठी ‘कूल गर्ल’ असते, तर मोठय़ांसाठी ‘माँ नंदिनी’. तिची लोकप्रियता लक्षात घेता आगामी निवडणुकांआधी एक राजकीय पक्ष तिच्यासमोर  प्रस्ताव ठेवतो. ती त्या पक्षात सामील होण्याआधी तिला हव्या असलेल्या अनेक समाजहिताच्या योजना सुरू करण्याचं आश्वासन घेते. माँ नंदिनीचं कार्यक्षेत्र आणि लोकप्रियता वाढत असताना एक दिवस आई आजारी पडते. आईचा आजार वाढतो. ती नंदिनीला भेटायला तयार नसते. आईचं म्हणणं असतं की, जेव्हा डॉक्टर म्हणतील की आता देवच वाचवू शकेल, तेव्हासुद्धा ती नंदिनीच्या लोटय़ाला- तिला बरं करण्याची संधी देणार नाही. नंदिनी दु:खी होते. आईची तब्येत ढासळते, जणू तिला आपले शब्द खरे करायचे असतात. आई ना बाबांचं ऐकते ना मनालीचं. नंदिनीच्या डोळ्यासमोर आई आयसीयूमध्ये जाते. नंदिनी रात्री आईला सांगण्याचा प्रयत्न करते की, ती समाजाला फसवत नाहीये. तिच्यात आलेली मानसिक शक्ती तिच्या आजीच्या लोटय़ानं दिलेली आहे. माझ्यासाठी नाही, पण आपल्या आईसाठी तरी माझ्यावर विश्वास ठेव. आई डोळे बंद करते. समाजाच्या कामी येणारा लोटा आपल्या आईने नाकारला.. आई गेली.

स्वगत वाचल्यावर मी निवेदिताला म्हणालो की, हे मी रंगमंचावर आणणार, कारण मला खूपच ताकदीचा संघर्ष त्यात दिसला. आई आणि मुलीचा, विश्वास आणि श्रद्धेचा! श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक बारीक रेघ असते. मला लिखाणातल्या नाजूकतेने या स्वगताचं दिग्दर्शन करायचं होतं आणि लिखाणात असलेलं हास्याचं पुटही हरवायचं नव्हतं.

सगळ्यात आधी दिव्या जगदाळे या सर्वागसुंदर अशा नटीला निवेदिताने वाचून दाखवलं. निवेदितामध्ये एक अभिनेत्री असल्याने वाचन उत्तम झालं. स्वगतात जवळपास पंचवीसेक पात्रं होती. एका अभिनेत्रीला सगळी पात्रं करणं किचकट म्हणून मी तीन नट-नटी स्वगताला जोडली. मयुरी, आकांक्षा आणि भरत.. या तिघांना मी ‘मराठी पाऊल पडते पुढे’चा जज असताना एका माइम अ‍ॅक्टमध्ये पाहिलं होतं. हे तिघंही अगदी गुणी, शिस्तप्रिय आणि कष्टाळू, त्यामुळे तालमींना एक वेगळीच मजा आली. ते एकही संवाद बोलले नाहीत, पण दिव्या स्वगतात ज्या प्रवेशासंबंधी बोलायची त्यातलं एखादं पात्र, एखादं टेबल, घडय़ाळ, दरवाजा, कुत्रा, गार्ड आणि अनेक गोष्टी एवढे सहज करायचे की, प्रयोगानंतर प्रेक्षक त्यांच्यासाठी वेगळ्या टाळ्या वाजवायचे. त्यांना या नाटकाचं महत्त्वाचं अंग व्हायचं होतं म्हणून की काय, ते ‘मराठी पाऊल पडते पुढे’मध्ये आले असं मला वाटलं. कारण त्यांच्यामुळे स्वगत सादर करण्याचा एक वेगळा प्रयोग मला करता आला.

दिव्यासाठी सर्वात अवघड होतं ते या तिघांबरोबर संवाद आणि हालचाली करणं. कारण त्यांचा वेग जबरदस्त होता आणि ऐंशी मिनिटं बोलणं आणि रंगमंचभर फिरणं यात दमछाकसुद्धा खूप होते. पण दिव्यानं ती समर्थपणे केली.

बिजॉय मॉन्डल या बंगालच्या प्रकाशयोजनाकारानं पंधरा स्थळं नुसत्या प्रकाशाच्या डिझाईनने दाखवली; अगदी धावत्या ट्रेनमधील संभाषणसुद्धा!

या नाटकामुळे रंगभूमीला एक लेखक मिळाला- निवेदिता पोहनकर.. याचं अप्रूप जास्त.

जय लोटा! जय आजी!

जय आई! जय मुलगी!

mvd248@gmail.com